फादर दिब्रिटो हे त्र्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हा मोठा मननीय योग आहे. त्यामुळे मराठी साहित्याच्या विशालतेची ग्वाही मिळते. फादर स्टीफन्स, ना.वा. टिळक, फादर लेदर्ले यांच्यापासून सुरू झालेली ख्रिस्ती साहित्य परंपरा मराठीच्या मुख्य प्रवाहात अग्रस्थानी येऊन विराजमान झाली. ते गरजेचे होते व आहेही. एका बाजूला मराठी साहित्याची निर्मिती अधिकाधिक विकेंद्रित होत जाणे महत्त्वाचे आहे. मुंबई-पुण्याची मिरास गेल्या दोन-तीन दशकांत नष्ट होऊन गेली आहे. परंतु त्याबरोबर ख्रिस्ती, मुस्लिम, दलित, बौद्ध असा साहित्यविचार दृढावणे गैर आहे. साहित्य हे सर्वसमावेशक असायला हवे. दिब्रिटो यांच्या निवडीने ते सिद्ध झाले आहे.
महाराष्ट्रातील एकूण वातावरण गेल्या काही महिन्यांत गढुळले गेले आहे. विधानसभेच्या निवडणुका-त्याआधीच्या प्रचारमोहिमा व नंतरचे सत्ताकारणाचे, नाट्य. सर्व समंजस, सुसंस्कृत मने विषण्ण होऊन गेली आहेत. अशा वेळी समाजातील साहित्यसंस्कृतीचे वातावरण जर चैतन्यमय होऊ शकले तर पुन्हा एकदा महाराष्ट्राचे समाजजीवन निकोप विचारांनी भरले जाईल.
सिसिलिया कार्व्हालो या महत्त्वाच्या मराठी लेखिका. त्यांची वाढ व विकास वसई परिसरात झाला. त्यांचे आत्मचरित्र ‘टिपंवणी’ या नावाने अलिकडेच ‘ग्रंथाली’तर्फे प्रसिद्ध झाले आहे. त्यातील ‘साहित्य सहवास व वसईतील सांस्कृतिक वातावरणविषयक छोटा भाग’ येथे पुन:प्रसिद्ध करत आहोत.
——————————————————————————————————————————————-
सिसिलिया कार्व्हालो यांच्या ‘टिपंवणी’ या आत्मचरित्रातील वेचा
माझी मावशी वांद्र्याच्या कलानगरमध्ये राहत होती. ती एम.आय.जी. कॉलनीत क्लेरा डिमेलो नावाने प्रसिद्ध होती. मावशीकडे आमचे सतत जाणे असल्याने आणि तिचे घर कलानगरच्या नाक्यजवळच असल्याने, घराच्या गॅलरीत उभं राहून एकीकडून जाणाऱ्या बसेस दिसायच्या आणि दुसऱ्या बाजूने ‘साहित्य सहवास’ आणि त्यामार्गावरच असलेल्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या मुलांच्या हॉस्टेलमधील चित्रकार आणि ‘साहित्य सहवास’मधील साहित्यिक येता-जाता दिसायचे. त्यांना बघण्यासाठी आम्ही मुली गॅलरीत उभ्या राहत असू. मावशीच्या मुली वा वसईतील मावशीच्या मुली वा काही नातेवाईक या मावशीच्या घरी असायचे. अनेकदा, रा.भि. जोशी आणि विंदा करंदीकर तेथून जाताना दिसत. आम्हाला विद्यापीठात शिकवणाऱ्यांपैकी डॉ. उषा देशमुख, प्रा. केशव मेश्राम, डॉ. विजया राजाध्यक्ष यांना फक्त आम्ही वर्गातच बघितलेलं होतं. परंतु ते ‘साहित्य सहवास’मध्ये राहत असल्याचं माहीत होतं. माझ्या पहिल्या कवितासंग्रहाला केशव मेश्रामसरांनी प्रस्तावना लिहिली होती, ‘ह्या दंशभारल्या कविता’ या शीर्षकाने. प्रकाशनापूर्वी कवितेचं हस्तलिखित देण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. प्रस्तावनेसाठी प्रा. दामोदर मोरे यांनी मेश्रामसरांचं नाव सुचवलं होतं.
फादर दिब्रिटो माझ्या मावशीकडे कधी जात. त्यावेळी ते गोरेगाव येथील संत पायस गुरुविद्यालयात शिकवण्यासाठी जात असत. माझ्या मावशीबरोबर आणि मावशीची मुलगी रूथ हिच्याबरोबर त्यांची ओळख होती. ती त्यावेळी एम.बी.बी.एस.चा अभ्यास करत होती. क्लेरा आण्टीची थोरली मुलगी सिबिल ही नायर हॉस्पिटलमध्येच मेडिकलचा अभ्यास करत होती. आण्टीचे चर्चशी चांगले संबंध असल्याने आणि गोरेगाव सेमिनरीत वसईचे अनेक धर्मगुरू व धर्मबंधू असल्याने त्यांचे आण्टीकडे येणे-जाणे असे. फादर हिलरी तेथे आधीपासून जात होते. शिवाय माझा मावसभाऊ फादर फेलिक्स मच्याडो हाही सेमिनरीतील विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचे काम करत होता. त्याचेही आण्टीकडे येणे-जाणे होते. अनेक धर्मगुरू त्यांच्या ताप-खोकल्यासारख्या आजारासाठी सिबिल, रूथच्या माध्यमातून नायर हॉस्पिटलमध्ये जात.
क्लेरा आण्टीला पाव्हणे-रावळे, नातेवाईक, धर्मगुरू तिच्या घरी आलेले आवडत असे. ती सुगरण असल्यामुळे जेवणाचे विविध पनकार (प्रकार) करून जेवणाचा साग्रसंगीत कार्यक्रम करण्यास तिला फार आवडायचे. त्यामुळे अनेक धर्मगुरू तिच्या हातचं जेवून गेलेले आहेत.
माझी पहिलीच कविता ‘सुवार्ते’त 1978 च्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाली होती. ती दिब्रिटोंनीच माझ्याकडे मागितली होती आणि ते ‘सुवार्ते’चंही काम बघत असत. याआधी मी आमच्या चर्चच्या परीशच्या वृत्तपत्रात लिहीत असे. ते दिब्रिटोंच्यापर्यंत पोचलं होतं. म्हणून ते एकदा आमच्या घरी आले होते. मी क्लेरा आण्टीची भाची आहे आणि रूथची मावसबहीण आहे, हे मात्र त्यांना माहीत नव्हतं. एकदा मी आण्टीकडे असताना दिब्रिटो तेथे आले होते. ते जेवण्यास थांबणार होते, मला तेथे पाहून त्यांना आश्चर्य वाटले, माझ्याबरोबर जुजबी बोलणं झालं. त्यांच्याशी माझी फारशी ओळख नव्हती आणि मी बुजरी असल्यामुळे त्यांच्याबरोबर मी जेवण्यासही बसले नाही, पण त्यानंतर मात्र असे झाले, की ‘साहित्य सहवास’मध्ये कोणाला पत्र द्यायचं असेल तर ते माझ्याकडे द्यायचे. एकदा त्यांनी अनंत काणेकर यांना पत्र द्यायला माझ्याकडे दिलं होतं. एकदा, रा.भि. जोशी यांच्याकडे पत्र द्यायला पाठवलं होतं. रा.भि. जोशी यांना वसईचं फार कोतुक होतं आणि वसईविषयी जाणून घेण्याची उत्सुकताही. ते मला बसवत, सुधाताईंना हाक मारून म्हणत, “सिसिलिया आली आहे.” मग सुधाताई मला पाणी आणून द्यायच्या. दोघेही म्हातारपणाकडे झुकले होते. रा.भि. अगदी खडखडीत होते. ताठपणे चालायचे, पण बोलण्यात मार्दव आणि ओलावा होता. सुधातार्इंशी जास्त बोलणं झालंच नाही. त्या फक्त हसायच्या. माझ्याकडेही बोलण्यासारखं काय होतं? रा.भि. खूप बोलायचे. कित्येक ठिकाणच्या प्रवासाविषयी बोलत राहायचे. बोलण्यात विलक्षण ओघ होता आणि आपलेपणा होता.
अनंत काणेकर यांना दिब्रिटोंचं एक पत्र दिलं. ते त्यांनी दारातूनच घेतलं. ते तर खूपच म्हातारे दिसत होते. त्यांच्या पायांची नखं खूप वाढलेली दिसली होती.
रमेश तेंडुलकर यांच्याकडे एकदा गेले होते. मी मुंबई विद्यापीठात पीएच.डी.च्या नोंदणीच्या निमित्ताने फॉर्म आणायला साधारणपणे 1990 च्या दरम्यान गेले होते. मी दोन-तीन विषय निवडले होते आणि मार्गदर्शकाच्या दोन वर्षं शोधात होते. तेव्हा मार्गदर्शकांच्या यादीत रमेश तेंडुलकर यांचे नाव होते. शिवाय ते आम्हाला एम.ए.साठी शिकवतही होते. त्यामुळे तशी थोडीफार ओळख होती. विद्यापीठातून कळले, की त्यांना पीएच.डी.साठी विद्यार्थी हवे आहेत. म्हणून मी त्यांच्याकडे गेले. त्या दिवसांत सचिन तेंडुलकर क्रिकेटविश्वात चमकणारा तारा होता. कोठेतरी परदेशात क्रिकेट मॅच चालू होती. मी त्यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी माझं प्रेमाने स्वागत केलं. अजित तेंडुलकरही घरात होता. मला त्याने पाणी आणून दिलं. तेंडुलकर यांनी त्यांची अडचण सांगितली. ते म्हणाले, “माझ्याकडे काही विद्यार्थी आहेत आणि आता जास्त विद्यार्थी घ्यायचे नाहीत.” मराठी कवितेवर त्यांचं प्रेम होतं. त्यांचा तसा अभ्यासही होता आणि मीही मराठी कवितेशी संबंधित असा विषय घेतला होता – ‘नारायण वामन टिळक यांची कविता’. त्यांनी नाही म्हटल्यावर मी विषयही बदलला. मग मी डॉ. उषा देशमुख यांच्याकडे गेले. त्या तेव्हा मराठी विभाग प्रमुख म्हणून मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी परिसरात असलेल्या इमारतीत त्यांच्या विभागात असत.
डॉ. उषा देशमुख यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे सर्व विद्यार्थ्यांना त्या फार आवडायच्या. त्यांच्याकडे विद्यापीठ नियमानुसार दहा-अकरा विद्यार्थी पीएच.डी. करत होते. मॅडमना भेटले तेव्हा त्या म्हणाल्या, “माझ्याकडील दोन विद्यार्थ्यांचं पीएच.डी. पूर्ण होतंय म्हणून मी तुला प्रवेश देऊ शकेन.” मग मी त्यांच्याकडे नोंदणी केली, तेव्हा 1993 साल उजाडलं होतं.
देशमुख बाईंबरोबर माझे सूर जुळले होते. एम.ए.च्या वर्गांना त्यांनी कुसुमाग्रज आणि संत साहित्य शिकवले होते. ‘ज्ञानेश्वरी’वर त्या बोलत तेव्हा साक्षात संत ज्ञानेश्वरच आम्हा विद्यार्थीश्रोत्यांसमोर निरुपण करत आहेत की काय असा भास होई. त्यांच्या चेहऱ्यावर दैवी तेज विलसत असल्यासारखे वाटत असे.
साहित्य सहवासमध्ये प्र.श्री. नेरुरकर यांचे निवासस्थान होतं. मी आणि ऊर्मिला पवार त्यांच्या घरी गेलो होतो. मॉरिशसला झालेल्या ‘जागतिक मराठी परिषदे’त नेरुरकर आणि ऊर्मिला पवारही सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांची मॉरिशस प्रवासाची पुस्तकेही प्रसिद्ध झाली होती. त्यांची ‘किरिस्ताव’ नावाची कादंबरी मी वाचली होती आणि ‘ख्रिस्ती समाजदर्शन’ म्हणून वाचलेल्या निबंधात त्याचा उल्लेख केलेला होता. तेरेखॉलच्या खाडीत मासेमारी करणाऱ्या एका किरिस्तांवाची कथा त्यात आहे. गोव्यातील ख्रिस्ती समाज त्या ग्रंथात जिवंत झालेला आहे. नेरुरकर मला ग्लोरिया म्हणायचे. ग्लोरिया आणि सिसिलिया यात ते गल्लत करत असत. खळखळत वाहणाऱ्या नदीसारखं त्यांचं बोलणं अगदी निर्मळ असे. ते भरभरून बोलत. हातचं काही राखून ठेवलं आहे, असं कधीच वाटलं नाही. एक-दोन कार्यक्रमात मी त्यांच्यासोबत व्यासपीठावर होते.
एकदा मला एक पत्र मिळालं. पोस्टानं आलं होतं. किशोर देशमुख असं नाव होतं लिहिणाऱ्याचं. त्याने लिहिलं होतं त्यानुसार तो कलानगरमधील जे जे स्कूल ऑफ आर्टच्या वसतिगृहात राहणारा होता. ‘साहित्य सहवास’जवळच्या एका रद्दीच्या दुकानात त्याला माझा ‘उन्मेष’ हा कवितासंग्रह मिळाला होता. तो त्याने वाचला, त्याला आवडला. मराठी साहित्यात ख्रिस्ती नाव पाहून त्याला आनंद झाला म्हणून त्याने मला पत्र लिहिलं होतं. मग त्यातून थोडाफार पत्रव्यवहार झाला. तोही हिंदी कविता लिहित असे. एकदा किशोर देशमुख आणि भगवान रामपुरे, मला वर्तक कॉलेजात भेटण्यास आले होते. किशोरचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला, त्यावेळी त्याने मला आणि वर्तक महाविद्यालयातील हिंदीचे प्राध्यापक असलेले नूतन आत्माराम यांना बोलावले होते. प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी रमेश तेंडुलकर होते.
कवितासंग्रह प्रकाशनानंतर पुढच्याच वर्षी किशोर देशमुखचा डिग्रीचा अभ्यास संपल्यामुळे तो मुंबईबाहेर गेल्याचे कळले. तेही त्याने पत्र लिहिले होते म्हणून. परंतु त्यानंतर पत्रव्यवहार वा भेट असे काहीच झाले नाही. एकदा वसईतील एक बाई मला एका कार्यक्रमात भेटल्या. त्या म्हणाल्या, “मी ‘हरे रामा हरे कृष्णा’ या संघटनेच्या कार्यक्रमात गेले होते, तेथे किशोर देशमुख भेटला. वसईतील म्हणून त्यांनी मला तुमच्याविषयी विचारले.” तिलाही आश्चर्य वाटले, की सिसिलियाला ओळखणारा हा योगी सिसिलियाला भेटला कोठे?
——————————————————————————————————————————————-
वसईतील सांस्कृतिक वातावरणातील निकोपपण मला अनुभवायला मिळाले, ते ख्रिस्ती साहित्य मंडळाच्या एका बैठकीसाठी डी.एम.सी. रॉड्रिग्ज यांनी मला बोलावले होते तेव्हा. पापडी चर्चच्या आवारात ही बैठक झाली होती. साधारण 1980-82 चा हा काळ होता. तेथे रॉक कार्व्हालो, सी.बी. दोडती उपस्थित होते. अॅण्ड्र्यू कोलासो, रजीन डिसिल्व्हाही होते. बिशप डॉमनिक डिआब्रिओ यांना मी पाहिले होते, परंतु माझी ओळख नव्हती.
रॉबी डिसिल्व्हा या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रकाराचा सत्कारसमारंभ न्यू इंग्लिश स्कूल येथे 1985 मध्ये आयोजित केलेला होता. सत्कारापूर्वीच्या तयारीच्या अनेक सभा वर्तक कॉलेजात असत. मी वर्तक कॉलेजातच अध्यापन करत असल्याने मी सभांना जात असे. या सभेसाठी वसई परिसरातील पंचवीस-तीस साहित्यिक-संपादक-सामाजिक कार्यकर्ते हजर असत. त्यांचे मानपत्र तयार करण्याच्या समितीत मी होते. सत्कार समारंभात मी मानपत्राचे वाचनही केले होते.
यशवंत जोशी, श्रीकांत वर्तक, वीणा गवाणकर, पत्रकार मार्कुस डाबरे ही नावं मी फक्त वाचून होते. परंतु प्रत्यक्ष परिचय मात्र खूप उशिरा झाला. तोही काही सांस्कृतिक कार्यक्रमातच. त्यानंतर मात्र लेखक-कवी-कलावंतांच्या भेटी सांस्कृतिक कार्यक्रमात होऊ लागल्या आणि कित्येकदा तर आम्ही एका व्यासपीठावर भेटू लागलो.
– नितेश शिंदे
info@thinkmaharashtra.com