आम्हा भावंडांना लहानपणापासून वाचनाचे वेड होते. तेव्हा मुलांसाठी पुस्तके म्हणजे इसापच्या नीतिकथा, बालबोध मेवा जोडाक्षरविरहित (मी वाचायची जोडाक्षर विहिरीत) असायची. आमच्या समाजात दरवर्षी दसर्याला सोने लुटण्याबरोबर पुस्तके वाटायचाही समारंभ व्हायचा. म्हणजे जी मुले त्या वर्षी एखादी शालेय परीक्षा पास झाली असतील त्यांना अध्यक्षांच्या हस्ते छानपैकी गोष्टीचे पुस्तक बक्षीस मिळत असे. नुसते पास झाले की, पुरे! शाबासकी म्हणून आणि वाचनाची आवड लागावी म्हणून पुस्तक मिळे. किती टक्के? कितवा नंबर? असे प्रश्न कोणी विचारत नसे.
एकदा साने गुरुजी कुठूनतरी कुठेतरी जाताना वाटेत दादर स्टेशनवर अर्धा तास थांबणार होते. कुसुम आम्हाला त्यांना भेटायला घेऊन गेली. आम्हाला कोण आनंद! पण ते फार काही बोलले नाही. मी म्हणाले, “देशासाठी, समाजासाठी काहीतरी भरीव काम करण्याची तीव्र इच्छा आहे. तर काय, कसे ते सांगा.”
गुरुजींनी विचारले, “सध्या तुम्ही काय करता?”
“सध्या कॉलेजमध्ये इंटरला आहोत. मागासवस्तीत थोडे काम करतो. सुट्टीत नेवाळकरांकडे काम करतो.”
“पुष्कळ झाले. सध्या हेच चालू ठेवा. त्यातच काहीतरी दुवा तुम्हाला आपोआप सापडेल.” गुरुजी हसून म्हणाले. आमची थोडी निराशाच झाली. ‘आता उठा आणि देश पेटवा’ असे ते सांगतील असे आम्हाला वाटले होते.
माझी आजी प्रभावित झाली, ते सर्व ऐकून म्हणाली, “किती खरे बोलतोय गं हा बाबा! कुठे मिळवले एवढे ज्ञान? आणि किती, साधा आहे. पुराणिकबुवांसारखे कपडेसुद्धा नाही. खरा ज्ञानी पुरुष.”
थोडे दिवस गेले. भारताला ब्रिटिशांपासून राजकीय स्वातंत्र्य मिळाले. सर्वसामान्य जनता आनंदाने बेहोष झाली. पण, दुर्दैव आपले की, वरिष्ठ पातळीवर नेत्यांमध्ये मतभेद झाले. विकोपाला जाऊ लागले. विशेषत: भारताचे पोलादी पुरुष गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल व तरुण रक्ताच्या प्रजा समाजवादी पार्टीचे पुढारी जयप्रकाश नारायण यांच्यात तीव्र स्वरूपाचे तांत्रिक मतभेद होते. साने गुरुजींनी प्रजा समाजवादी पक्षाची भूमिका प्रांजळपणे मांडणारे पत्र, मध्यस्थी करण्याच्या हेतूने गृहमंत्र्यांना पाठवले होते. त्याला त्यांनी जळजळीत उत्तर दिले होते. ते नायगाव (दादरच्या) मैदानावर सभा घेऊन गुरुजी वाचून दाखवणार होते. त्या गच्च भरलेल्या सभेत आम्ही होतोच. गुरुजी गृहमंत्र्यांचे पत्र वाचू लागले. पत्रात होते-
एखादे युद्ध विजयी झाले की थाटामाटात विजययात्रा निघते. शृंगारलेला भव्य रथ असतो. वारू जोडलेले असतात. वाद्ये वाजत असतात आणि लोक रस्त्यावर उभे राहून प्रशंसा करत असतात. मोठा सोहळा असतो. त्यामुळे रस्त्यावरची कुत्री प्रभावित होतात. तीही मोठमोठ्याने भुंकत रथाबरोबर धावत असतात. थोड्या वेळाने त्या कुत्र्यांना वाटू लागते की आपल्या धावण्या व भुंकण्यामुळेच विजयरथाला ऊर्जा मिळत आहे व ती अधिकच जोराने भुंकू लागतात. तुमच्या पक्षाची अवस्था त्या कुत्र्यापेक्षा निराळी नाही…
गुरुजींनी थरथरत्या हातात ते पत्र धरून संतप्त सूरात वाचून दाखवले आणि फाडून त्याचे बारीक बारीक तुकडे करून हवेत फेकून दिले. शेकडो प्रेक्षकांसमोर! म्हणाले, “हेच या पत्राला उत्तर. निराळे उत्तर देण्याची गरज नाही. एवढा अहं… निष्ठावंत कार्यकर्त्यांची ही कदर!!”
हा प्रसंग प्रत्यक्ष अनुभवताना आमच्या शरीरावर सरसरून काटा आला.
दादर स्टेशनवर कोरलेले ते साने गुरुजींचे बुझरे रूप, वनिता समाजाच्या प्रौढ सुरक्षित स्त्रियांना वटपौर्णिमेच्या निमित्ताने ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ म्हणून परखड शब्दांत सांगणारे मायाळू आईचे स्वरूप आणि आज घोर अन्यायाशी सामना करायला उभे ठाकलेले, लढाऊ रुद्र स्वरूप. त्यांची ही सर्व रूपे आयुष्यभर माझ्या मन:पटलावर कोरलेली आहेत.
– वसुमती धुरू
साने गुरूजी यांचे ‘श्यामची आई‘ हे पुस्तक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Sane Guruji is the best
Sane Guruji is the best writer.
-Ashok Bandhu, Gondia
Comments are closed.