Home अवांतर टिपण ‘श्या‍मची आई’ इंग्रजीत

‘श्या‍मची आई’ इंग्रजीत

अदिती कुळकर्णी

     मी ‘श्यामची आई’ इंग्रजीत भाषांतर करण्याचे ठरवले, ते अनेक कारणांनी. पण मुख्य होते ते म्हणजे हा अलौकिक ठेवा आजच्या तरुण पिढीपर्यंत पोचावा.  ‘श्यामची आई’ मध्ये माता-बालकाच्‍या नात्‍याचे अपूर्व चित्रण आहे. त्यामुळे त्याला काळाचे किंवा देश-प्रदेशाचे बंधन नाही. त्यामुळे मराठी मधील हे पुस्तक मी इंग्रजीत भाषांतरीत करण्याचे ठरवले आणि आजच्या मुलांना ऐतिहासिक वातावरणाची एक सफर घडवून आणली. ‘श्यामची आई’ मधील प्रेम, जिव्हाळा, निष्ठा, संस्कार हे गुण संसर्गजन्य आहेत. पण, ते पुस्तक मुलांपर्यंत गेले तर!  मी पुस्तक इंग्रजीत केल्यामुळे आई आणि श्याम यांच्या नात्यातील जादूचा प्रभाव सार्‍या जगाला जाणवू शकेल. मुख्य म्हणजे पालकांना देखील तो अनुभव घेता येईल.

      मी पुस्तकाची भाषा साधी-सोपी ठेवली आहे. मुलांना आपलीशी वाटावी अशी. त्यामुळे गुंतागुंत टाळली आहे. भाषांतर करत असताना माझ्या लहानपणीच्या आठवणी मला होत असत. माझे बालपण अनेक देशांत गेले. ते वेगवेगळे अनुभवसुद्धा भाषांतर करताना मला उपयोगी पडले. सानेगुरुजींच्या लेखनशैलीत पुनरावृत्ती भरपूर आहे, पण ती सकारण आहे. वाचकावर परिणाम होण्याच्या दृष्टीने ती महत्त्वाची आहे. मी देखील सानेगुरुजींचा तो विशेष सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे.

      मी इंग्रजी पुस्तकात काही जुन्या मराठी शब्दांचे अर्थ दिले आहेत. उदा. निरांजन, तुळशीवृंदावन. आजच्या मराठी मुलांनादेखील ते शब्द परिचयाचे असले तरी त्यांचा उपयोग, त्यांचे पावित्र्य असे संदर्भ त्यांना माहित नसतात. मराठी बाहेरच्या मुलांना तर ही माहिती फारच आवश्यक. त्यामुळे शब्दार्थ सूची ही इंग्रजी ‘श्यामच्या आई’ मध्ये महत्त्वाची ठरली. पुस्तक प्रसिद्ध होताच त्याचा प्रत्यय देखील आला. अमेरिकेतील काही मुलांनी व त्यांच्या पालकांनी ईमेल करुन मला तसे कळविले. श्यामच्या आईचा अमेरिकेतील मराठी समाजात प्रसार झाला, तो ‘ई प्रसारण डॉट कॉम’मुळे. मिलिंद आणि मधुरा गोखले ‘डेन्व्हर’ वरुन हा रेडिओ चालवतात. त्यावरुन माझी मुलाखत प्रसारित झाली होती.

      ‘श्यामची आई’ मध्ये माझा जीव एवढा गुंतला आहे, त्याचं कारण आमचं घराणं मूळ कोकणातलं. मी लहानपणी अनेकवेळा आजोबांच्या घरी गेलेली आहे. आजोबा गावचे खोत होते. पण त्याहून अधिक त्यांना वकील म्हणून मान होता. गावचं वातावरण, तेथील लोक, त्यांची जुन्या पद्धतीची घरे आणि शेतीवाडी. हे सगळं मी जवळून पाहिलं आहे. त्याच्या छान आठवणी माझ्या मनात आहेत. ‘श्यामची आई’शी माझं नातं असं व्यक्तिगत स्वरुपाचं देखील आहे. श्यामच्या आणि आईच्या कथा इंग्रजीत उतरताना मला तो लहाणपणचा भोळेभाबडेपणा आठवायचा आणि मी त्यातच रमून जायची. खरे तर श्यामचे आणि त्याच्या आईचे गुण आपल्या प्रत्येकाच्या अंगी असतात. पण आपण संकोचास्तव ते दडवून ठेवतो आणि आपल्याला समजूत असल्याचा मुखवटा धारण करतो.

      भाषांतर करताना मला भरुन यायचे; डोळ्यांत अश्रूदेखील उभे राहायचे. मी त्यात वाहून जाईल की काय अशी भीती वाटे. पण मग मीच मला सांभाळी. कारण पुस्तक बिगरमराठी लोकांपर्यंत पोचवणे हा माझा ध्यास होऊन गेला होता. मी जाणीवपूर्वक पुस्तकांतील भावनापासून मनामध्ये एक अंतर निर्माण करत असे आणि सानेगुरुजींच्या मूळ पुस्तकाला न्याय देईल, असे जसेच्या तसे पुस्तक वाचकांच्या हाती देण्यासाठी तयार होत असे. आता तर काय, मला दोन मुले झाली आहेत. त्यामुळे पुस्तकातील भाव जगताची महती मला अधिक कळते. त्यातील अनेक अनुभव ती स्वत: आई म्हणून घेऊ शकते आणि मी हे पुस्तक मुलांना वाचून दाखवते तेव्हा मला असे वाटते, की मुलांच्या कल्पकतेमधील विशुद्ध असा सच्चेपणा त्यांनाही प्रतीत होईल आणि त्यांच्या मनावर पुस्तकाचे उत्तम संस्कार होतील.

साने गुरूजी यांचे श्‍यामची आईहे पुस्‍तक वाचण्‍यासाठी येथे क्लिक करा.

अदिती कुळकर्णी,
इमेल – aaditi@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. अदितीताईला मन:पूर्वक धन्यवाद…
    अदितीताईला मन:पूर्वक धन्यवाद.खूप आनंद झाला.
    श्यामची आई इंग्रजीत आल्याचे वाचून !प्रत मिळवीन.
    साधनेच्या कार्यालयात असेलच.किंवा बुकगंगावर मिळेल. सध्या घरबंदी आहे ना ! पण मार्ग निघेल.अदितीताईला
    भरपूर आयुष्य लाभावे व त्यांच्या हातून भरपूर लेखन व्हावे ही सदिच्छा !

Comments are closed.

Exit mobile version