सांगलीचे सागरेश्वर अभयारण्य

carasole

सांगली जिल्ह्यात कराडपासून जवळ कृष्णा नदीच्या खो-यात असलेले सागरेश्वर हे निसर्गरम्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. भरपूर पडणारा पाऊस, धुकट वातावरण, वाहणारे गार वारे, हिरवागार परिसर, पक्ष्यांचे कुजन, डोंगरांमधून वाहणारे लहानमोठे झरे असे निसर्गरम्य वातावरण सागरेश्वर परिसरात अनुभवता येते. तेथे सातशे-आठशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या प्राचीन मंदिरांचा समूह आहे. त्यात सुमारे एकावन्न मंदिरे असून त्यापैकी सागरेश्वर हे शंकराचे मुख्य मंदिर आहे. तेथे समुद्राच्या कृपेने गंगा वास्‍तव्‍य करते अशी धारणा आहे. त्यावरूनच त्या परिसरास सागरेश्व‍र असे नाव पडले. सागरेश्वर मंदिराचे पुराणात उल्लेख आढळतात.

सागरेश्वर मंदिरापासून पुढे गेल्यावर यशवंत घाट लागतो. तो एक ते दीड किलोमीटरचा घाट ओलांडल्या‍नंतर सागरेश्वर अभयारण्याची सीमा सुरू होते. सागरेश्वर अभयारण्य हे कडेगाव, वाळवा व पलूस या तालुक्यांच्या सीमा जोडणा-या सह्याद्रीच्या सागरेश्वर पर्वताच्या माथ्यावर आहे. घाटापुढे गेल्यानंतर देवराष्ट्रे गावात पोचल्यानंतर डाव्या हाताला अभयारण्याचे प्रवेशद्वार लागते. तेथे शुल्क आकारून आत प्रवेश दिला जातो. देवराष्ट्रे हे गाव यशवंतराव चव्हाण आणि रमाबई रानडे यांचे जन्मस्थान आहे.

सागरेश्वर अभयारण्याचा विस्तार सुमारे एक हजार सत्त्याऐंशी हेक्टर क्षेत्रात आहे. ते देशातील पहिले आणि महाराष्ट्रातील एकमेव मानवनिर्मित अभयारण्य आहे. स्वातंत्र्यसैनिक-वृक्षमित्र धोंडीराम महादेव मोहिते यांनी 1970 ते 1983 या काळात अभयारण्य‍ तयार करण्याकरता अनेक प्रयत्न केले. मोहिते यांच्‍या प्रयत्नांमधून 1983 साली सागरेश्वर अभयारण्य तयार करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या. पूर्वी त्या परिसरात माळरान होते. मात्र मोहिते यांनी परिश्रमपूर्वक केलेल्या वृक्षलागवडीमुळे आज तो परिसर हिरवागार दिसतो. धोंडीराम मोहिते यांच्या कार्याची दखल घेत त्‍यांना 1994 साली राष्‍ट्रपतींच्या हस्ते ‘इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

सागरेश्वर अभयारण्याच्या परिसरात विपुल वनसंपदा आहे. तेथे उष्ण-कोरड्या हवामानातील पानझडी, काटेरी वनस्पती जास्त प्रमाणात आढळतात. धावडा, चंदन, बाभूळ, सुबाभूळ, कशिद, गुलमोहर, अंजन, निलगिरी, आपटा, सीताफळ तसेच माकडी धायटी, घाणेरी, सालफळ आदी वृक्ष आणि झुडपे यांसोबत तेथे इतर जंगली वृक्षही पाहण्यास मिळतात. अभयारण्यात करवंद, बोर या रानमेव्याच्या जाळी जागोजागी आहेत. तेथील वृक्षसंपदेत साग, वड, पिंपळ, लिंब, चेरी, औंदुबर सांरख्या अनेक वनौषधी आहेत. तेथे सुमारे तीस ते चाळीस प्रकारचे वृक्ष तर तीनशे प्रकारच्या वनस्पती आढळतात. अभयारण्यात चिमणी, पोपट, जंगली कोंबड्या, कोकीळ आदी पक्षी स्वच्छंदपणे विहरताना पाहण्यास मिळतात. तेथे एकूण एकशे पंचावन्न प्रकारचे पक्षी आढळतात. त्यामध्ये शहीन फालकॉन हा पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतो. तेथे मोरांची संख्या मोठी आहे. सागरेश्व‍र अभयारण्य हरणांचे माहेरघर म्हणूनही ओळखले जाते. तेथे आढळणारे साळिंदर, सांबर, चितळ, खोकड, कोल्हा, लांडगा, तरस, ससे, रानमांजर इत्यादी प्राणी पर्यटकांचे खास आकर्षण आहे. सोबत धामण, नाग, मण्यार, घोरपड हे सरपटणारे प्राणी तेथे पाहता येतात.

अभयारण्यातील सुधारणांसाठी सरकारकडून 2012 साली सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यानंतर अभयारण्याच्या अंतर्गत भागातील रस्ते चांगल्या पध्दतीने बनवण्यात आले आहेत. अभयारण्यातील सर्व जुन्या इमारतींची दुरूस्ती करण्यात आली. ठिकठिकाणी बांबूकुटी बांधण्यात आल्या आहेत. सोबत बालोद्यान आणि ऍम्पी थिएटर तयार करण्यात आले आहे. अभयारण्याबत येणा-या पर्यटकांना निसर्गाची माहिती व्हावी यासाठी पंचेचाळीस लाख रुपये खर्चून ‘निसर्ग माहिती केंद्र’ उभारण्यात आले आहे. तेथे पर्यटकांना अभयारण्यातील विविध स्थळांची, पक्ष्यांच्या विविध जातींची, झाडांची, प्राण्यांची तसेच सापांच्या विविध जातींची माहिती दिली जाते.

अभयारण्यातील किर्लोस्कर पॉइंट हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 3860 फूट उंचीवर आहे. तेथून आसमंतात नजर फिरवली तर वाळवा, पलूस, खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील विहंगम परिसर दिसतो. खालून नागमोडी वळणे घेत वाहणारी कृष्णा नदी दिसते. त्‍या पॉईंटजवळ एक गुहा आहे. काही अंतर पुढे गेल्यानंतर अभयारण्याच्या मध्यभागी काळभैरवाचे मंदिर लागते. त्याचे बांधकाम सातवाहन काळातील असल्याचे सांगण्यात येते. मंदिर कठिण बेसाल्टच्या दगडात कोरण्यात आले असून पुरातत्‍वदृष्‍ट्या महत्त्वपूर्ण आहे. डोंगरपायथ्याशी असलेल्या ताकारी गावाचे ते ग्रामदैवत आहे. त्यापुढे लागणारा रणशूळ पॉईंट हे अभयारण्यातील सर्वांत उंच ठिकाण आहे.

सांगलीतील वाईल्ड लाइफ फोटोग्राफर प्रदीप सुतार यांनी सागरेश्वर अभयारण्यावर एकोणीस मिनिटांची शॉर्टफिल्म तयार केली आहे. अभयारण्यातील जैवविविधता कशी विकसित होते, हे त्या फिल्ममध्ये पाहता येते. अभयारण्याच्या निर्मितीमध्ये धोंडीराम मोहिते यांचे लाभलेले योगदान, त्यांचा इतिहास इत्यादी माहिती त्या फिल्ममधून मिळते.

शाळेतील विद्यार्थ्‍यांना अभयारण्याच्या प्रवेश शुल्कात सवलत दिली जाते. अभयारण्य दर मंगळवारी बंद असते.

सागरेश्वर अभयारण्य मिरज रेल्वेे स्थानकापासून साठ किलोमीटर, कराडपासून तीस किलोमीटर तर ताकारी रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. कराड हे पुणे – बंगळुरू महामार्गावर असून तेथून सागरेश्वर येथे पोचण्यासाठी बससेवा उपलब्ध आहे. सागरेश्वर मंदिर आणि अभयारण्याचा निसर्गरम्य परिसर यांना भेट देण्यासाठी पावसाळ्याचा काळ अधिक चांगला! अभयारण्याचे जानेवारी 2013 मध्ये ‘स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य’ असे नामकरण करण्यात आले आहे.

– आशुतोष गोडबोले

Last Updated On – 24th September 2016

About Post Author

3 COMMENTS

  1. Salutations to Mr. Dhonfuram…
    Salutations to Mr. Dhonfuram Mahadev Mohite. A great site of nature evolved by human being. Incredible and laudable.

Comments are closed.