सर जमशेटजी टाटा यांचे नाव भारताचे आद्य उद्योगपती म्हणून घेतले जाते. न्या. महादेव गोविंद रानडे, दादाभाई नौरोजी अशांसारख्या राष्ट्रीय नेत्यांनी भारत देशाला औद्योगिक क्रांती गरजेची असल्याचे नेहमीच सांगितले होते. परंतु तो विचार प्रत्यक्षात उतरवला सर जमशेटजी यांनी.
टाटा यांचे मूळ घराणे गुजराथच्या नवसारीचे. जमशेटजी यांचा जन्म पारशी धर्मोपदेशकांच्या घरात 3 मार्च 1839 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नुसेरवान व आईचे नाव जीवनबाई. ते तेरा वर्षांचे असताना शिक्षणासाठी मुंबईत आले. ते विसाव्या वर्षीच चीनला गेले. त्यांनी त्यांच्या वडिलांप्रमाणे व्यापारात तेथे चार वर्षें राहून उत्तम जम बसवला. त्यांनी त्यांच्या पेढीच्या शाखाही हाँगकाँग व शांघाय येथे उघडल्या. नंतर ते लंडनला जाऊन कापसाचा व्यापार करू लागले. ते लंडनमधील गिरण्या पाहून केवळ मालाची देवघेव न करता उत्पादनक्षेत्रात शिरावे असा विचार करू लागले. जमशेटजींनी ‘अलेक्झांड्रा’ आणि 1877 मध्ये नागपूरला ‘एम्प्रेस मिल’ सुरू केली. त्यांनी त्या दोन गिरण्यांच्या अनुभवावरच मुंबईत ‘स्वदेशी मिल’ तर अहमदाबादला ‘अॅडव्हान्स मिल’ काढल्या व त्या उत्तमपणे चालवल्या.
जमशेटजींनी ‘टाटा’ उद्योगसमूहाचा व पर्यायाने भारतीय औद्योगिक विकासाचा पाया एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात घातला. त्यामागे दूरदृष्टी, अविश्रांत श्रम, चिकाटी यांबरोबरच राष्ट्रहिताची तळमळ दिसून येते. टाटा समूहाने त्यांच्या अंगीकृत व्यवसायाचा अनेक अंगांनी विस्तार केला आहे. त्याचे वर्णन ‘टाचणीपासून ट्रकपर्यंत’चे असे करतात.
जमशेटजींनी लोखंडाचा मोठा कारखाना स्थापन केला. त्यांच्या योगदानाने आणि प्रेरणेने मोटारी, रसायने, दैनंदिन गरजेच्या वस्तू, कापड, यंत्रसामग्री, इलेक्ट्रॉनिक्स, दळणवळण अशा अनेक क्षेत्रांत टाटा समूहाचे कारखाने उभे राहिले. त्यांनी शास्त्रीय शिक्षणाच्या संस्था उभ्या केल्या. जमशेटजी आणि ‘ताज’ यांचे नातेही तसेच विलक्षण. त्यांनी मुंबईच्या समुद्रकिनारी भव्य असे ‘ताज’ हॉटेल सुरू केले. औद्योगिक प्रगतीसाठी मूलभूत उद्योगाची गरज असते. अशा उद्योगांना पुरेशी वीज, लोखंड व पोलाद यांची उपलब्धता आणि तांत्रिक ज्ञान असलेले तरुणही गरजेचे असतात असे ते नेहमी म्हणत असत. जमशेटजींनी त्याला अनुसरून 1882 मध्ये पोलादाचा कारखाना काढण्याचे प्रयत्न सुरू केले. पोलाद करण्याचे तंत्रज्ञान आणि लोखंडाचा साठा यांबद्दल पुरेशी माहिती नाही हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान होते. त्यांनी मयुरगंज संस्थानात लोखंड व कोळसा यांचे साठे मिळाले म्हणून तेथे कारखाना काढण्याचे ठरवले. कारखान्यासाठी परकीय तंत्रज्ञान मिळवले. त्यांनी त्या काळी दोन कोटी बत्तीस लाख रुपयांचे भांडवल ‘शेअर्स’ विक्रीला काढून मिळवले. परंतु ते दुर्दैवाने लोखंडाची निर्मिती पाहण्यास हयात राहिले नाहीत!
त्यांचे वीजनिर्मितीचे स्वप्न ‘वळवण व मुळशी’च्या धरणांमुळे पूर्ण झाले. त्याचे श्रेय जमशेटजी यांचे सुपुत्र दोराबजी यांना जाते. त्यांनी तरुणांनी शास्त्रीय व तांत्रिक शिक्षण घेऊन पुढे यावे यासाठी ‘विज्ञान विद्यापीठ’ ही कल्पना पुढे आणली. त्यासाठी टाटांनी मुंबईतील स्वत:च्या चौदा इमारती व चार मोठ्या जमिनी देणगी म्हणून दिल्या. त्यातूनच ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या बंगलोरच्या संस्थेची निर्मिती झाली.
टाटा यांनी भारताच्या औद्योगिक समृद्धीचा पाया रचला व त्यावर मोठमोठे कारखाने उभे केले. त्यांनी पोलाद, वीज व विज्ञान ही भारतीयांना दिलेली देणगी आहे. टाटा समूह सामाजिक बांधिलकीसुद्धा विसरला नाही. त्या समूहाने शिक्षण, विज्ञान संशोधन, वैद्यकीय संशोधन, संगीत-कला, आरोग्य या क्षेत्रांत काम करणाऱ्या अनेक संस्थांना योगदान दिले. तो सगळा पाया घातला सर जमशेटजी टाटा यांनी!
(आदिमाता मार्च 2016 वरून उद्धृत)
– स्मिता भागवत