सरोजिनी वैद्य या लेखक व समीक्षक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. एकोणिसाव्या शतकात जेव्हा संशोधन सामग्री अपुरी होती, त्या काळात संशोधनाच्या नव्या वाटा धुंडाळून त्यांनी भोवती वलय नसलेल्या व्यक्तींवर लिहून त्यांचे कार्य प्रकाशात आणले. त्यांनी महाराष्ट्रातील सामाजिक विचारांची घुसळण आत्मीयतेने शब्दबद्ध केली. ज्येष्ठ लेखिका विनया खडपेकर यांनी सरोजिनी यांच्या साहित्यिक कारकीर्दीचा आढावा या लेखात घेतला आहे…
सरोजिनी शंकर वैद्य हे नाव महाराष्ट्राला परिचित आहे ते मराठी साहित्याच्या अभ्यासक-समीक्षक म्हणून! त्यांचे लेखन प्रामुख्याने संशोधनात्मक आहे. संशोधनात त्या एकोणिसाव्या शतकात अधिक गुंतल्या होत्या. त्यातही सरोजिनी यांचे वैशिष्ट्य हे, की त्यांनी भोवती वलय नसलेल्या व्यक्तींवर लिहून त्यांचे कार्य प्रकाशात आणले. लोकहितवादी, काशीबाई कानिटकर, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, वासुदेव बळवंत पटवर्धन हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय झाले. त्यांचे तत्कालीन महाराष्ट्राला महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यांनी एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रामध्ये चाललेली सामाजिक विचारांची घुसळण आत्मीयतेने शब्दबद्ध केली. त्या लेखनाचे स्वरूप कधी दस्तऐवजाचे आहे, तर कधी चरित्रात्मक आहे. सरोजिनी यांच्या साध्या बोलण्यातही त्या व्यक्तींविषयीचे संदर्भ येत असत.
सरोजिनी यांचा जन्म 15 जून 1933 रोजीचा. त्यांच्या ‘पहाटपाणी’ या पहिल्याच पुस्तकातील ‘नीतिशतकाची सकाळ’ हा लेख वाचला, की लक्षात येते; एकोणिसाव्या शतकातील बुद्धिजीवी संस्कृतीच्या अवशेषांचे बरेवाईट तरंग सरोजिनी यांच्या बालपणाच्या अवतीभवती घुटमळत होते. त्यातूनच त्यांच्या मनात त्या व्यक्तींविषयी आत्मीयता निर्माण झाली असावी.
अभ्यासाच्या जतनीकरणाची मराठीत हेळसांड असल्यामुळे चरित्रलेखनासाठी किंवा दस्तऐवजीकरणासाठी मराठीमध्ये साधनसामग्री अपुरी मिळते. सरोजिनी वैद्य यांच्या प्रत्येक पुस्तकाने त्यांच्या संशोधनाची स्वतंत्र वाट शोधली. लोकहितवादी यांच्या समग्र साहित्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व सरोजिनी यांच्या मनात तयार झाले होते. लोकहितवादी यांचे पणतू भाऊसाहेब देशमुख यांची सरोजिनी यांच्याशी भेट झाली. ते त्यांच्या पणजोबांविषयी भरभरून बोलले. त्यातून लोकहितवादी यांचे सुस्पष्ट चित्र डोळ्यांसमोर येत गेले. सरोजिनी यांनी त्यातून चरित्र अभिव्यक्तीचे निराळेच रूप योजले. भाऊसाहेब देशमुख यांच्या कथनातूनच ‘गोपाळराव हरी’ हे चरित्र साकार झाले. कथनाचे अवतरण अधुनमधून पूर्ण होते आणि सरोजिनी त्या अनुषंगाने लोकहितवादी यांच्याविषयी स्वत: मिळवलेली माहिती देतात, त्यावर भाष्य करतात. त्या त्या ठिकाणीच तळटीपा देतात. पुन्हा भाऊसाहेबांचे कथन अवतरणात सुरू होते. भाऊसाहेबांचे कथन आणि लेखिकेचे विश्लेषण यांचा संगम सहज होतो. त्याचे कारण सरोजिनी यांची प्रतिभा. मौखिक पद्धतीने सांगितला गेलेला इतिहास शब्दबद्ध होणे याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘गोपाळराव हरी’ हे पुस्तक.
काशीबाई कानिटकर यांच्या आत्मचरित्राचे हस्तलिखित सरोजिनी यांच्या हाती आले. त्यांनी त्यांच्या पुस्तकातील तो महत्त्वाचा मूळ दस्तऐवज काशीबाईंचे आत्मचरित्र म्हणूनच सादर करण्याचे योजले. चरित्राच्या आरंभी 18 फेब्रुवारी 1890 चे पत्र दिले आहे. ते पत्र ‘ज्ञानचक्षू’, ‘हिंदू पंच’ या साप्ताहिकांचे संपादक वामनराव रानडे यांना ‘सुबोधपत्रिका’ आणि ‘गृहिणी’ या नियतकालिकांचे मालक मोरोपंत विठ्ठल वाळवेकर यांनी लिहिलेले आहे. ते काशीबाई कानिटकर यांचे नेमके महत्त्व काळाच्या पार्श्वभूमीवर सांगते. त्या पत्रानंतर हकीगत आहे ती काशीबाईंचे आत्मचरित्र हाती कसे आले त्याची – ‘रूमाल उघडण्यापूर्वी’. मग सुरू होते काशीबाईंचे आत्मचरित्र. त्यानंतरच्या ‘उत्तरायण’ प्रकरणात सरोजिनी काशीबाईंविषयी लिहितात. सरोजिनी यांची ‘कहाणी लंडनच्या आजीबाईंची’ आणि ‘वासुदेव बळवंत पटवर्धन – व्यक्ती आणि कार्य’ ही आणि इतरही संशोधनपर-चरित्रात्मक पुस्तके वैशिष्ट्यपूर्ण विषय व समृद्ध आशय या श्रेणीतील आहेत.
सरोजिनी या कथा, कादंबरी, कविता अशा वाङ्मयप्रकारांकडे वळल्या नाहीत. परंतु त्यांनी कादंबरी, काव्य, आत्मचरित्र या वाङ्मयप्रकारांतील पुस्तकांची उत्तम समीक्षा केली. ‘माती आणि मूर्ती’ हे पुस्तक त्यांच्या समीक्षालेखनाचे विविध पैलू दाखवते. त्यांची समीक्षा आस्वादक आहे. त्या वाचकाला पुस्तकातील सौंदर्य उलगडून दाखवताना, पुस्तकाच्या मर्यादाही सांगतात. जसे त्यांना श्री.ज. जोशी यांची ‘आनंदी गोपाळ’ ही कादंबरी सामाजिक अंगाने महत्त्वाची वाटते, पण कलाकृती म्हणून उणी वाटते. त्यांनी तसे का वाटते याचे कारणही दिले आहे. लेखकाच्या बौद्धिक आकलनातून आलेले ते केवळ प्रसंगांचे आणि व्यक्तींचे वर्णन आहे. ती निर्मिती सहृदयतेने झालेली नाही. काशीबाई कानिटकर यांनी त्याच आनंदीबाई जोशी यांचे चरित्र चाचपडत चाचपडत, सहृदय धडपडीने, चरित्र लेखन प्रकाराची वाट शोधत लिहिले आहे. सरोजिनी यांना ते अधिक मोहवते. सरोजिनी यांनी त्या दोन्ही पुस्तकांवर लिहिले असले, त्यांना डावे-उजवे माप दिले असले तरी त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य असे, की त्यात हे बरोबर ते चूक असे सांगण्याचा त्यांचा आवेश नाही. ते लेखन कोणावर ताशेरे ओढणारे नाही, तर वस्तुनिष्ठ आहे. त्या विश्राम बेडेकर यांच्या ‘रणांगण’ची बलस्थाने आणि कमकुवत जागा त्याच वस्तुनिष्ठपणे सांगतात. तसेच, त्या माधव जूलियन यांच्या ‘विरहतरंग’ या दीर्घकाव्यात पांडित्यात गुदमरलेल्या भावोत्कट जागा जाणून घेतात. सरोजिनी यांना वा.म. जोशी यांची सहृदय वैचारिकता आवडते, पण त्याचबरोबर त्यांच्या कादंबरीतील पात्रे वा.म. यांच्या विचारांचे केवळ वहन करण्यासाठी जन्माला आली आहेत असे भाष्य त्या करतात. ती समीक्षा वाचकाचे पुस्तकाबद्दलचे कुतूहल जागवणारी आहे, त्याला अधिक समृद्ध करणारी आहे.
सरोजिनी यांचे ललित लेखन अनुभवकथन वा ललित निबंध या प्रकारात येते. त्या लेखनात नित्य व्यवहारातील प्रसंग आहेत. त्यात महाविद्यालयाच्या सहलीला गेलेली सिनेमावर बोलणारी मुले आहेत. आजीला भेटण्यास निघालेला सातआठ वर्षांचा नातू आहे. मुंबई–ठाणे प्रवासातील आठवणीचा एखादा प्रसंग आहे. तरुण प्राध्यापिकेच्या आयुष्यातील नोकरीमधील पहिलेवहिले दिवस आहेत. त्यांच्या ललित लेखनात कथनाच्या ओघात येणारे चिंतन आहे. ते चिंतन कधी माणसाच्या व्यवहाराचे सूक्ष्म निरीक्षण करते, कधी आत्मपरीक्षण करते, तर कधी वाचकांच्या मनात प्रश्न निर्माण करते. त्या एका ठिकाणी विचारतात, “जगातील सगळ्या कला, सगळे ज्ञान-विज्ञान सांगणारी शास्त्रे आपली नजर तयार करतात, की ती हळूहळू पार मारून टाकतात? आपण त्यांचे गुलाम की सहप्रवासी मित्र?” दुसऱ्या ठिकाणी, ‘निर्वासित’ आणि ‘अनिकेत’ यांतील फरक शोधताना सरोजिनी ‘घर’ या घटकाचे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील स्थान सांगून जातात – ‘घरात असमाधान निर्माण झाले, की मी बाहेरच्या जगातील हव्याहव्याशा वाटणाऱ्या गजबजाटात घर विसरण्यासाठी जाते. बाहेर टक्के खाल्ले की ‘होम… स्वीट होम’ करत घरी परतते आणि दोन्हीकडे माझे जुळले नाही की आयुष्य म्हणजे केवढी यातायात आहे असे म्हणत फिलॉसॉफिकल होऊन बसते.’
सरोजिनी यांचे व्यक्तिमत्त्व संशोधक–अभ्यासक–लेखक याही पलीकडचे होते! त्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होत्या. त्या मुंबई विद्यापीठात मराठी विभागप्रमुख होत्या. त्या अभ्यासासाठी कोणत्याही वयाच्या कोणत्याही गावातील अभ्यासकांना साहाय्य करत असत; शिवाय, त्यांचे वैयक्तिक प्रश्न समजावून घेऊन जमेल तशी मदत करत असत. त्यांच्या कार्याचा धडाका अफलातून होता. त्यांचा अनेक सामाजिक संस्थांशी संपर्क होता. सरोजिनी यांचा सल्ला तेथे घेतला जात असे. त्यांनी ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या संचालकपदी असताना, कित्येक प्रकल्प योजले आणि योग्य व्यक्ती हाताशी धरून ते पार पाडले. त्यांनी ‘वासुदेव बळवंत पटवर्धन’ हे पुस्तक कॅन्सरच्या दुर्धर दुखण्यातून बाहेर पडल्यावर झपाट्याने लिहून पूर्ण केले. त्यांचा लोकसंग्रह दांडगा होता. त्यांना अभ्यासकांच्या, विचारवंतांच्या वाट्याला सहसा न येणारी लोकप्रियता मिळाली होती.
सरोजिनी वैद्य यांची ग्रंथसंपदा विविधांगी आहे. त्यांनी ‘गोपाळराव हरी’, ‘श्रीमती काशीबाई कानिटकर : आत्मचरित्र आणि चरित्र’, ‘इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर’, ‘कहाणी लंडनच्या आजीबाईची’, ‘वासुदेव बळवंत पटवर्धन : जीवन आणि लेखन’ ही चरित्रे लिहिली. तसेच, त्यांच्या ‘संक्रमण’ नावाच्या पुस्तकात वैचारिक लेख वाचण्यास मिळतात. त्यांचे ‘माती आणि मूर्ती’, ‘समग्र दिवाकर’, ‘टी.एस. एलियट आणि नवी मराठी कविता– एक अभ्यास’, ‘वाङ्मयीन महत्ता’, ‘द.ग. गोडसे यांची कलामीमांसा’ ही समीक्षापर पुस्तके प्रसिद्ध आहेत. सरोजिनी वैद्य यांनी ‘वेचक वसुंधरा पटवर्धन’, ‘नटवर्य नानासाहेब फाटक : व्यक्ती आणि कला’, ‘ज्ञानदेवी खंड 1,2,3’, ‘कोश सूची वाङ्मय स्वरूप आणि साध्य’ या ग्रंथांचे संपादन केले. त्यांचे ‘पहाटपाणी’, शब्दायन’ यांमधील ललित लेख आत्मीय अनुभव देणारे आहेत. काही दाम्पत्यांनी मराठी साहित्यात लक्षवेधी कार्य केले आहे. त्यात कवी अनिल व कुसुमावती देशपांडे, इंदिरा संत व नारायण संत यांच्याप्रमाणे सरोजिनी वैद्य व कवी शंकर वैद्य यांचेही कार्य तितकेच महत्त्वाचे आहे.
अनेक पुस्तकांचे संकल्प मनात असताना, त्यांना पुनश्च निराळ्या आजाराने गाठले. मेंदूचा रक्तपुरवठा अनियमित झाला. त्यांचे निधन 3 ऑगस्ट 2007 रोजी झाले.
– विनया खडपेकर (020) 25465394 vinayakhadpekar@gmail.com
———————————————————————————————————————————————
छान! सर्व समावेशक उत्कट लेखन! सरोजिनी वैद्यांचे अनेक विषयांवरचे लेखन ऊधृत करणारे…!!