समाजमाध्यमे आणि मी

1
145
_Samajmadhyam_Aani_Mi_1.jpg

लेखन आणि संगणक या दोन्ही गोष्टी माझ्या आयुष्यात एकाच वेळी आल्या. मी पहिली कविता इयत्ता सहावीत असताना लिहिली. संगणक त्याच वर्षी शाळेत आले. ती घटना १९८९-९० सालची. माझा इंटरनेटशी परिचय झाला, ते साल १९९९चे. मला याहू चॅटिंग, हॉटमेल, याहू ग्रूप्स, हिंदी-इंग्रजी साहित्याची काही संकेतस्थळे त्याच वर्षी माहीत झाली. ऑर्कूट पुढे सुरू झाले, नंतर हायफाइव्ह. त्याच वेळी लिंकडइन आले. मग इतरही सोशल साइट्स येत गेल्या. मी त्यांच्यावर खाती उघडत गेलो – अगदी ट्वीटरपासून इन्स्टाग्रामपर्यंत, पण रमलो ते फेसबुक आणि व्हॉट्सॲप या दोन स्थळांवर. मला ती दोन्ही माध्यमे वापरण्यासाठी सोयीची व सोपी वाटली.

मी कशामुळे सोशल साइट्सच्या मोहात पडलो असेन? तर त्याचे पहिले उत्तर आहे, मित्रांचा शोध घेण्यासाठी – जगभरच्या समविचारी लोकांशी मैत्री करण्यासाठी. कविता हा माझा आवडता वाङ्मयप्रकार आहे. मी अनुवादाकडे वळलो. मला देशोदेशीचे कवी माहीत करून घ्यायचे होते, त्यांच्याशी स्नेह वाढवायचा होता, त्यांच्याशी चर्चा करायची होती, त्यांच्या कविता मिळवायच्या होत्या, त्यांच्या कवितांना त्यांच्या भाषेत काय प्रतिसाद मिळतो तेही समजून घ्यायचे होते. म्हणून मी ऑर्कूट, फेसबुक, हायफाइव्ह, लिंकडइन या संकेतस्थळांवर जात राहिलो. लेखन देवनागरीतून या साइटवर करता येत नसे. मला टायपिंगही येत नसे. त्यामुळे ते सगळे प्रकरण इतरांना वाचणे किंवा काही प्रश्नोत्तरे करणे एवढ्यापुरते सीमित होते. मला आत्मविश्वास युनिकोडमुळे आला आणि मी त्या माध्यमांवर देवनागरीतून अक्षरे गिरवू लागलो. त्यात सराईतपणा आला. मग मी फेसबुकवर जाणीवपूर्वक ‘वाचणा-या मुलांसाठी’ असे सदर तीन महिने रोज चालवले. मी जगभरच्या गोष्टींचे अनुवाद मुलांसाठी मराठीत उपलब्ध करून दिले. मी काही गोष्टींचे अनुवाद फेसबूकच्या वॉलवर रोज पोस्ट करत गेलो. त्यामुळे माझा टायपिंगचा स्पीड सुधारला आणि मला अक्षरशः शेकडो मित्र भेटले. रा. रं. बोराडे सरांनी सांगितल्यामुळे तुषार बोडके यांनी वर्तमानपत्रासाठी ‘वाचणाऱ्या मुलांसाठी’ या सदरावर फिचर बनवले. माझा कवितासंग्रह ‘गाव आणि शहराच्या मधोमध’ हा २०१३ साली प्रकाशित झाला. त्याचे मुखपृष्ठ अंत्वान जोन्स या फ्रेंच चित्रकाराचे आहे. अंत्वान हाही मला फेसबुकवर भेटला! मला त्याच्या हातात जादू आहे असे जाणवले. मी निना गोगटे हिच्या माध्यमातून अंत्वानला पत्र पाठवले, चॅट बॉक्समध्ये संदेश सोडला (निना या माझ्या सहकारी आहेत. त्या फ्रेंच शिकवतात). त्याचा होकार मिळाला. होकार मिळाला त्याचे एकमेव कारण म्हणजे मी अंत्वानला फ्रेंचमध्ये विनंती केली होती. मला फ्रेंच येत नाही. निना यांनी पत्राचा ड्राफ्ट तयार केला. तो आम्ही पाठवला. अंत्वानला आम्ही फ्रेंचमध्ये केलेली मागणी पाहून आनंद झाला. त्याने मुखपृष्ठासाठी त्याचे चित्र विनामूल्य दिले. मला जगभरातील अनेक लेखक-कवींशी फेसबुकने जोडले. फेसबुकची वॅाल, ग्रूप्स, मेसेंजर ही खूप चांगली सोय आहे. मला तिचा जास्तीत जास्त सकारात्मक वापर करता येईल असे सतत वाटते.

मी व्हॉट्सॲपच्या प्रेमात काही वर्षांपूर्वी पडलो. त्याचे व्यसन मला लवकरच लागले. माझा छंद व्हॉट्सॲपवर दररोज लिहिणे हा झाला आहे. मी लिहितो आणि सगळ्या ग्रूपवर धडाधड पोस्ट करत सुटतो. लोकांना हळूहळू मला वाचण्याची सवय लागली आहे. मग काही लोक माझ्या मजकुराची वाट पाहू लागले. माझे मित्र ‘व्हॉट्सॲप अल्पजीवी आहे, तिथं लिहिल्याचा काही लाभ नाही’ असे म्हणतात. मी त्यांचे म्हणणे ऐकत नाही. मला तेथे असणे अभिव्यक्तीसाठी, लिहिते ठेवण्यासाठी आणि तात्काळ प्रतिक्रिया मिळवण्यासाठी महत्त्वाचे वाटते. मी महाराष्ट्रात कोठे कोठे फिरतो, तेव्हा मला भेटण्यास जे वाचक येतात, त्यांनी मला व्हॉट्सॲपवर जास्त वाचलेले असते. ते व्हॉट्सॲपचाच संदर्भ देतात. त्याचा अर्थ, तुम्ही विशिष्ट जागी चांगले-वाईट सातत्याने लिहित राहिलात तर तुम्ही लोकांच्या नजरेस पडता!

माझी ‘जपानी कथा’, ‘खजिना आनंदकथांचा’, ‘देशोदेशींच्या म्हणी’ ही पुस्तके माझ्या समाजमाध्यमांवरील दररोजच्या लिहिण्यातून आकाराला आली आहेत. मला पेपरलेस लेखक समाजमाध्यमांनी बनवले. मी सरळसरळ संगणकावर किंवा मोबाइलच्या स्क्रीनवर टाइप करतो आणि ‘सेंड’ करतो. टायपिस्टकडे जाणे त्यामुळे थांबले, पुन्हा पुन्हा दुरुस्ती करून देणे थांबले. मजकूर एडिट करणे त्या साधनांमुळे सोपे झाले.

वाङ्मयीन नियतकालिकात लेखन प्रकाशित होणे ही प्रतिष्ठेची बाब कोणे एके काळी होती. लोक आवडीने त्या त्या क्षेत्रातील नियतकालिके वाचत. नियतकालिकांना घरघर लागली. वर्तमानपत्रांच्या रविवार पुरवण्या वाङ्मयीन झाल्या. रविवार जणू साहित्याच्या जगासाठी वर्तमानपत्रवाल्यांनी राखून ठेवला. काही बड्या लेखकांना वर्तमानपत्रात लेखन करणे हा कमीपणा त्यावेळी वाटायचा. वर्तमानपत्रासाठी एकही अक्षर न लिहिलेले वा न लिहिणारे मोठे लेखक मराठीत आहेत. ते चार-पाच हजार खपाच्या नियतकालिकात लिहिण्यास प्राधान्य देतील आणि काही लाखांचा खप असणा-या वर्तमानपत्रांकडे डोळेझाक करतील. तीच साहित्यजगाची मानसिकता समाजमाध्यमांबाबतही आहे. मी गणित काढतो. अडीचशे सदस्य एका व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये असतात. समजा, लेखकाने त्याचा विशिष्ट मजकूर वीस गटांवर पोस्ट केला, तर सहजच तो पाच हजार लोकांपर्यंत पोचलेला असतो. त्यातील काही लोक मजकूर वाचतात, आवडला तर त्यांच्या त्यांच्या ग्रूपमध्ये फॉरवर्ड करत जातात. म्हणजे लेखकाच्या वाचकांची संख्या प्रत्येक फॉरवर्ड सोबत अधिक अडीचशे या पद्धतीने वाढत असते. ती संख्या फेसबूकच्या संदर्भात प्रत्येक शेअरमागे पाच हजारांनी वाढते. वीस लोक लेखकाची पोस्ट शेअर करतात, तेव्हा तो एक लाख लोकांपर्यंत काही क्षणात पोचलेला असतो! मी ‘दोपदी सिंघार’च्या आदिवासी कवितांचे मराठी अनुवाद केले होते. ‘उतरवला नाही मी माझा पेटीकोट’ हा तिच्या कवितेचा अनुवाद शंभरपेक्षा जास्त वाचकांनी शेअर केला होता. आता वाचकांना तुम्हीच सांगा, तो किती वाचकांपर्यंत पोचला असेल? मराठीतही काही लेखक आहेत. बालाजी सुतार, दिशा शेख, छाया थोरात आणि अजूनही कितीतरी…  त्यांना प्रचंड फॉलोअर्स आहेत. लोक त्यांचे म्हणणे सतत शेअर करत असतात आणि न वाचणारे लोक तर सगळ्याच काळात सगळ्याच ठिकाणी असतात. वाचकांच्या घरी नियतकालिक येते तेव्हा तो ते पूर्ण वाचून काढतो किंवा वाचक पाच रुपये खर्चून पेपर विकत घेतो तेव्हा तो पेपर सगळा वाचतो असे थोडेच आहे. वाचक हजारो बातम्यांच्या गर्दीतून त्याला हवी ती बातमी हुडकून काढतो. त्याप्रमाणे वाचक व्हॉट्सॲपवरील पोस्टच्या पुरामध्ये पोस्ट पाहून/चाळून/वाचून पुढे सरकतो.

लेखकांची नवी पिढी समाजमाध्यमांनी पुढे आणली आहे. ती पिढी बिनधास्त आहे, स्पष्टवक्ती आहे, सडेतोड आणि कोणताही मुलाहिजा न बाळगता व्यक्त होणारी आहे. त्या पिढीजवळ स्वतःची मते आहेत. ती लेखक मंडळी स्वतःचे म्हणणे कोणाचीही भीड न बाळगता मांडत जात आहेत. सुदाम राठोड आणि विरा राठोड या दोघांचा त्याबद्दल खास निर्देश करता येईल. सुदामची वाङ्मयीन मते वादळी आहेत, पण प्रामाणिक आहेत. त्याच्या मतमतांतरातून मुखवटे नसलेल्या लेखकाचा सच्चेपणा व्यक्त होत राहतो.

अभिव्यक्तीचे आकाश समाजमाध्यमांनी सर्वांना खुले केले आहे. फेसबूक हे एकेका व्यक्तीचे बातमीपत्र आहे. काय खाल्ले, काय आवडले येथपासून काय वाचले, कोठे जाऊन आलो, काय घडले ही व्यक्तीची दैनंदिनी, व्यक्ती तिच्या वॉलवर डकवत असते. एखादी व्यक्ती समजून घ्यायची असेल, तिचा अभ्यास करायचा असेल तर ती समग्रपणे तेथे भेटू शकते. समाजमाध्यमांनी बड्या लेखकांचे ग्लॅमर संपवले तर ‘आपण लेखक नाहीत बुवा’ असे वाटणा-यांना लेखक म्हणून प्रस्थापितही केले! हजार विषयांवरील हजार ग्रूप समाजमाध्यमांवर आहेत. त्यांचे म्होरके आहेत आणि त्या टोळीप्रमुखांच्या हाती गटापुरते काही अधिकार आहेत. शिवाय, डोक्यावर सायबर लॉची टांगती तलवार आहेच. कायदा-सुव्यवस्था अबाधित राहील एवढे नियंत्रण गटसंचालकाला ठेवावेच लागते.

मी काही वाङ्मयीन गटांचा विशेष उल्लेख करीन – झिम्माड (वृषाली विनायक), माय मराठी (शे. दे. पसारकर), बालमित्र (प्रशांत गौतम), मराठी संस्कृती (राजेंद्र थोरात), काव्यचावडी (भगवान निळे, कल्पेश महाजन, योगिनी राऊळ), साहित्य संगिती (कपूर वासनिक), साहित्य आणि समाज (प्रशांत देशमुख), जय साहित्य प्रतिष्ठान (जय घाटनांद्रेकर), खान्देश साहित्य मंच (नामदेव कोळी), टीका आणि टीकाकार (गणेश मोहिते), सत्यशोधक (वंदना महाजन), अक्षरवाङ्मय (नानासाहेब सूर्यवंशी), पुरोगामी (हनुमान बोबडे, गजानन वाघ), शब्दसह्याद्री (बाळू बुधवंत). ते निखळ वाङ्मयीन गट आहेत, त्या गटांवरील चर्चा कोणत्याही चांगल्या चर्चासत्राइतक्या महत्त्वाच्या असतात. त्यांतील काही गट त्यांची साहित्य संमेलने भरवतात. काही स्नेहमेळावे आयोजित करतात. काही गट आठवड्याला चांगल्या लेखाचा, चांगल्या कवितेचा गौरव करतात. ‘झिम्माड’सारखा समूह कविता, कथा, आस्वाद यांची छानशी श्राव्य मैफल प्रत्येक आठवड्याला आयोजित करत असतो. वाङ्मयीन चळवळ ही काही केवळ अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि महामंडळ किंवा बड्या लेखक-प्रकाशकांमुळे जिवंत राहत नाही. आजूबाजूला सुरू असणारे असे छोटेमोठे प्रयत्न वाङ्मयाला प्रवाही ठेवत असतात, साहित्याचे डबके होण्यापासून थांबवत असतात आणि तेच महत्त्वाचे काम समाजमाध्यमातील लेखक करत आहेत. ते डबकीकरणाला नकार देत आहेत.

समाजमाध्यमे ही प्रस्थापित मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमांना समांतर असणारी माध्यमे आहेत. त्या माध्यमाचे विश्व समांतर आहे आणि घडामोडींना विविध बाजूंनी समजून घ्यायचे असेल तर समाजमाध्यमे उपयुक्त ठरू शकतात. विशिष्ट विचारधारा, साहित्यसंस्था, माध्यमसंस्था, साहित्य संमेलने, मासिके, रेडिओ-टीव्ही चॅनेल, प्रकाशनसंस्था, साहित्यप्रवाह यांनीही त्यांची त्यांची फेसबुक पाने तयार केली आहेत अथवा त्यांचे व्हाट्सॲप ग्रूप निर्माण केले आहेत. त्यातच त्या माध्यमांचे यश आहे. समाजमाध्यम हे तरुणांना त्यांचे वाटणारे माध्यम आहे. जुनीजाणती लेखक मंडळीही त्या पीचवर उतरली आहेत. रा. रं. बोराडे, नागनाथ कोत्तापल्ले, प्रमोद कोपर्डे, लक्ष्मीकांत देशमुख, अरुण शेवते, बाबाराव मुसळे, किशोर पाठक, राजीव तांबे, यशवंत मनोहर, श्रीकांत देशमुख अशी ज्येष्ठ मंडळी समाजमाध्यमांवर सक्रिय आहेत. त्यांचे अस्तित्व हे नव्यांना बळ देणारे आहे, मार्गदर्शक आहे.

नांदेड येथे आयोजित मराठवाडा साहित्य संमेलनात तीन वर्षांपूर्वी ‘व्हॉट्सॲप मराठी’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला गेला होता. त्यावेळी ते ॲप नवे होते, पण त्या अनुषंगाने काही विनोद, काही आरत्या, काही ओव्या लिहून झाल्या होत्या. त्या प्रासंगिकांमध्ये व्हॉट्सअॅपचे फायदे-तोटे वर्णन केलेले होते. आता ती माध्यमे गंभीर कवितांचा, कथांचा, कादंबरींचा विषय झाली आहेत. श्रुती आवटे, प्रवीण बांदेकर, राजेंद्र मलोसे यांच्या कादंब-यांचा निर्देश करता येईल. प्रवीण बांदेकर यांनी समाजमाध्यमांची संरचना कादंबरीत उपयोजली आहे. श्रुतीच्या कादंबरीचे शीर्षक ‘लॉग आऊट’ असे आहे. तर राजेंद्र मलोसे यांनी ‘मोबाईलपुराण’ लिहिले आहे. मोबाईलपुराणाचा सगळा विषयच व्हॉट्सॲप हा आहे. त्याचा साधा अर्थ, ती माध्यमे साहित्यविश्वाच्या चिंतनाचा आणि दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होत आहेत. जळगाव जिल्ह्यात विद्यार्थ्यांसोबत सेल्फी हा शिक्षकांच्या दिनक्रमाचा घटक झाला आहे. सरकारलाही ते माध्यम महत्त्वाचे वाटू लागले आहे, हे त्याचे निदर्शक आहे. बहुतेक कागदपत्रे, सूचना, अधिसूचना, जीआर सर्क्युलर्स आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मिळू लागले आहेत. दिवसेंदिवस, समाजाला समाजमाध्यमांची उपयुक्तता पटत जाईल.

ज्याने-त्याने त्याच्या हाती एखादी वस्तू आली, की तिचा वापर कसा करायचा हे ठरवायचे असते. ज्याने-त्याने त्याच्या हाती दगड दिला तर दुस-याचे डोके फोडायचे, की त्यातून मूर्ती घडवायची वा तो दगड खड्डा बुजवण्यासाठी वापरायचा हे ठरवायचे असते. बदलता काळ माणसाच्या हाती अनेक नव्या बाबी देणार आहे. त्याने स्वप्नातही पाहिले नव्हते असे तंत्रज्ञान त्याच्या घरात असणार आहे. त्यावर शाप की वरदान? अशी चर्चा करत बसण्यापेक्षा त्या बाबींचा सकारात्मक लाभ घेणे लेखक म्हणून मला गरजेचे वाटते. त्यामुळेच मी समाजमाध्यमांकडे जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोचण्याचा मार्ग म्हणून, मित्र जोडण्याचा मार्ग म्हणून पाहतो.
– पृथ्वीराज तौर
(मराठी विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड – 431606, संपर्क – 7588412153, 9423274565, drprithvirajtaur@gmail.com ) 

About Post Author

Previous articleसतीश भावसार यांचा सेप्टिक टँक
Next articleचंद्रकांत पवार – पोस्टमन ते कीर्तनकार
पृथ्वीराज भास्करराव तौर हे नांदेडला राहतात. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा विभागात कार्यरत आहेत. तौर यांचा 'गाव आणि शहराच्या मधोमध' हा कवितासंग्रह 2013 साली प्रसिद्ध झाला. त्यांनी 'सृजनपंख', 'नाट्यवैभव', 'मराठी शाहिरी कविता', यांसारखी अनेक पुस्तके संपादित केली आहेत. तसेच त्यांचे 'बसराची ग्रंथपाल' (जेनीट विंटर), 'जादूच्या बिया' (मित्सुमासा एनो), 'संयुक्त राष्ट्राची तीन वचने तुमच्यासाठी' (मनरो लीफ), 'होरपळलेल्या माणूसकीची कविता' (जमातवाद विरोधी कविता), 'जपानहून आणलेल्या छोट्यांच्या मोठ्या गोष्टी' (जपानी कथांचे अनुवाद) असे बरेच अनुवादित साहित्य प्रसिद्ध आहे. पृथ्वीराज तौर 'सक्षम समीक्षा' (पुणे), 'आमची श्रीवाणी' (धुळे), 'रुजुवात' (लातुर) या शोधनियतकालिकांच्या संपादक मंदळाचे सदस्य आहेत. त्यांनी 'दिव्य मराठी', 'पुण्यनगरी', 'सकाळ' या वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केले. त्यांच्या साहित्यिक कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तौर पीएच.डी., एम. फील आहेत. ते त्या अभ्यासक्रमांसाठी मार्गदर्शनदेखील करतात.

1 COMMENT

Comments are closed.