डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे नाव आज साठीत असलेल्या पिढीला सहज माहीत असते. अनेकांनी व्ही. शांताराम यांचा ‘डॉ. कोटनीस की अमर कहानी’ हा सिनेमाही पाहिलेला असतो. डॉ. कोटणीसांविषयी, त्यांच्या कार्याविषयी एक दूरस्थ आदर असतो. बहुतेक भारतीयांच्या मनात चीनविषयी अढी, पूर्वग्रह असतात त्यामुळे, ‘काय गरज होती आयुष्य ओवाळून टाकण्याची’ अशीही भावना काहीजणांच्या मनात असते. पण 1939 मधल्या चीनी जनतेच्या हालअपेष्टांविषयी वाटणारी करूणा आजच्या काळाच्या भिंगातून बघणे हे मूळातच गैरलागू. डॉ. कोटणीसांच्या कामाची, त्यागाची जाण चिनी जनतेने, राज्यकर्त्यांनी ठेवली आहे. चिनी राष्ट्रपती किंवा पंतप्रधान भारतभेटीवर आले की आवर्जून कोटणीस कुटुंबियांना भेटतात.
डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे मोठे बंधू, श्री. मंगेश शांताराम कोटणीस यांनी कष्टपूर्वक अनेक संदर्भ जमवून ‘समर्पण’ हे आपल्या धाकट्या भावाचे चरित्र लिहिले आहे. ह्या स्फूर्तीदायक पुस्तकाचा परिचय करून देत आहेत, सोलापूरच्या डॉ. गीता जोशी.
‘मोगरा फुलला’ या सदरातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
-सुनंदा भोसेकर
‘समर्पण, डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची जीवनगाथा’ ह्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होणे ही काळाची गरज होती. डॉक्टर कोटणीसांच्या जन्मशताब्दी वर्षात, 2010 मध्ये सत्तावीस वर्षांनी ही जीवनगाथा पुन्हा समाजाच्या हाती पडली. डॉ. कोटणीस यांचे मोठे भाऊ, श्री. मंगेश शांताराम कोटणीस यांनी अत्यंत ओघवत्या, भावपूर्ण शब्दांतून, कुठल्याही अभिनिवेशाखेरीज डॉक्टर कोटणीसांचे कार्य लोकांसमोर ठेवले आहे. डॉ. कोटणीसांचे चरित्र उभे राहता राहता भिंतीपलीकडला चीन फिरत्या रंगमंचासारखा डोळ्यांसमोरून सरकत राहतो. भावाच्या अंतरीचा ओलावा आणि संशोधकाची प्रज्ञावंत नजर असल्याशिवाय असे प्रामाणिक लेखन होऊ शकत नाही.
या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९८३ मध्ये प्रकाशित झाली होती. त्याआधी १९८२ मध्ये श्री. मंगेश कोटणीस यांनी लिहिलेले ‘The Bridge For Ever’ हे डॉ. कोटणीसांचे मूळ इंग्रजी चरित्र सोमय्या प्रकाशनाने प्रकाशित केले होते. ‘समर्पण’ पुन्हा प्रकाशात आणणाऱ्या ‘परिवर्तन अकादमी प्रकाशन, सोलापूर’ यांना धन्यवाद द्यायला पाहिजेत.
डॉक्टर कोटणीस यांनी चीनमधून वेळोवेळी पाठवलेली पत्रे, खाजगी डायरीतील अनेक टिपणे, चीनमध्ये प्रकाशित झालेली काही पुस्तके, डॉ. कोटणीसांच्याबरोबर गेलेल्या डॉक्टरांची पत्रे, पंडित नेहरूंची पत्रे असे अनेक संदर्भ घेऊन, श्री. मंगेश कोटणीस यांनी चित्रदर्शी शैलीत डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांचे चरित्र उभे केले आहे. कोटणीस घराण्याच्या इतिहासाचा धावता आढावा वाचताना हे जाणवते की डॉक्टर कोटणीस यांचा चीनला जाण्याचा निर्णय हा त्यांच्या घराण्याच्या मूळ परंपरेला साजेसाच होता.
कोटणीस घराणे मूळचे कोकणातील वेंगुर्ल्याचे. ‘बालपणीच्या सुखद स्मृती’ या पहिल्याच प्रकरणात वेंगुर्ल्यातील हमरस्त्यावर व बाजारपेठेपासून जवळच असणाऱ्या ‘कोटणीस हाऊस’चे ते वर्णन करतात. पश्चिम किनाऱ्यावरील वेंगुर्ले हे एकेकाळचे नावाजलेले बंदर होते. तिथे डच लोकांची गुदामे असत. तेथील मिशन हॉस्पिटल, आजोळचे ऐसपैस घर …एकूणच ‘जर्नी डाऊन द मेमरी लेन’ असा डॉ. कोटणीसांच्या बालपणाच्या, त्यांच्या व्रात्यपणाच्या रंजक कथांमधून हे पुस्तक सुरू होते.
डॉक्टर कोटणीस यांचे आजोबा, त्यांच्या काकांकडे, बडोदा संस्थानात शिक्षणासाठी व इंग्रजीचाही अभ्यास व्हावा या हेतूने गेले होते. पुढे वडील व काका बडोद्यात शिकून मुंबईला आले. नंतर नोकरीच्या निमित्ताने वडील सोलापूरला (१९०३), तर काका मद्रासमध्ये पोहोचले. काही काळ मूळ गावी वेंगुर्ला, तर काही काळ सोलापूर असा या कुटुंबाच्या स्थलांतराचा इतिहास आहे. गेल्या शंभर वर्षातील सामाजिक, सांस्कृतिक जीवनशैलीचे दर्शन त्यातून घडते. वडिलांनी १९२० मध्ये सोलापूर म्युनिसिपालटीची चुरशीची निवडणूक लढवली होती. निवडून आल्यावर पुढे दोन दशके काम केले. १९२१ मध्ये म. गांधींनी पुकारलेल्या असहकार चळवळीचे उल्लेख, सोलापूरला मुंबईमार्गे येताना, पणजी-मुंबई बोटीचा प्रवास, जयगड बंदराजवळ ती बोट खडकावर आदळून फुटल्यामुळे ओढवलेले संकट अशा अनेक घटनांमधून द्वारकानाथसह तीन बहिणी, तीन भाऊ अशा कोटणीसांच्या या उच्चशिक्षित कुटुंबाचे, शंभर वर्षांपूर्वीच्या त्या काळाचे दर्शन घडते.
प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर नॉर्थकोट हायस्कूल, सोलापूर मधे डॉ. कोटणीस यांच्या माध्यमिक शिक्षणाची सुरुवात झाली. १९२८ला पुण्याचे डेक्कन कॉलेज, १९३१ ते ३६ या काळात मुंबईत गोवर्धनदास सुंदरलाल( G.S.) मेडिकल कॉलेज, त्याला समांतर स्वातंत्र्य चळवळ आणि चीनला पाठविण्यात येणाऱ्या वैद्यकीय पथकात सामील होण्याचा त्यांचा निर्णय, या निर्णयाला घरचा विरोध, येथपर्यंत एका हुशार तरुणाचा जीवनप्रवास येतो.
१९३७मध्ये सुरू झालेल्या चीन-जपान युद्धात जखमी झालेल्या चिनी लोकांना मदत करण्यासाठी आणि जुलमी, परकीय सत्तेखाली भरडल्या जाणाऱ्या चिनी जनतेविषयी भारतीय जनतेला वाटणाऱ्या सहानुभूतीचे प्रतीक म्हणून एक वैद्यकीय पथक ‘इंडियन नँशनल काँग्रेस’ तर्फे पाठविण्याचे ठरले होते. पंडित नेहरूंनी ९जानेवारी १९३८ या दिवशी ‘चीन भ्रातृभाव दिन’ साजरा करावा अशी हाक दिली होती. जपानी साम्राज्यवाद व वसाहतवादाविरुद्ध लढा देणाऱ्या चिनी जनतेसाठी जरूर ती वैद्यकीय सामग्री व शस्त्रक्रियेसाठीची उपकरणे ह्या वैद्यकीय पथकाबरोबर पाठवली गेली. २६जून १९३८ हा मुंबईत ‘चीन दिन’ म्हणून पाळण्यात आला. पाच डॉक्टरांच्या ह्या पथकाचे नेतृत्व डॉ. कोटणीस करत होते.
या जीवनप्रवासाचा इतिहास अविस्मरणीय सफरीपासून सुरू होतो. भिंतीपलीकडच्या चीनचे दर्शन डॉक्टर द्वारकानाथ यांच्या डोळ्यांनी घ्यायचे असेल तर पुस्तकातील ‘अविस्मरणीय सफर’ हे प्रकरण बघावे. कोलंबो, मलाया, सुमात्रा, पेनांग, सिंगापूर, हाँगकाँग या पंधरा-वीस दिवसांच्या प्रवासात घडलेल्या घटना, बोटीवरच सुरू झालेले चिनी भाषेचे शिक्षण, त्यांचा चहा, अन्न, खाण्यापिण्याच्या पद्धती, पाककला, चीनमधील खेडी, त्यांचे लोकजीवन अशा अनेक तपशिलांच्या माध्यमातून चिनी संस्कृतीचे दर्शन घडते. सप्टेंबर 1938 मध्ये हे पथक चीनला पोहोचले.
लेखक सांगतात, ‘बोटीवर भेटलेल्या डॉ. चाऊ टिंग आणि डॉ. वांग या उच्चशिक्षित चिन्यांकडून चिनी भाषा शिकणे द्वारकानाथला आवघडच गेले. चिनी भाषेतील बहुतेक सर्व शब्द दोन अक्षरांतच सामावलेले असतात. संख्या किंवा लिंग हा प्रकारच त्यात नसतो. प्रत्येक दोन अक्षरी चिनी शब्द कमीत कमी चार निरनिराळ्या स्वरांमध्ये उच्चारता येतो व प्रत्येक वेळी त्याचा अर्थ हा निराळाच होतो. एवढा; की तुम्ही जर कोंबडी मागवली तर बायको पदरात पडेल. लिहायला, वाचायला सर्वात अवघड भाषा म्हणजे चिनी! प्रत्येक अक्षरासाठी एक खूण असते. त्यामुळे चिनी मुळाक्षरांची संख्या पन्नास हजाराहून जास्त आहे. प्रत्येक शब्द एकापासून अनेक मात्रांचा मिळून बनलेला असतो. एकेका शब्दात वीस पर्यंत सुद्धा मात्रा असू शकतात. ‘हाँगकाँग मधील एका इटालियन प्राध्यापकाला चीनी लिपी शिकण्याच्या प्रयत्नामुळे शेवटी वेड लागण्याची पाळी आली’ अशीही माहिती मंगेश कोटणीस देतात.
दक्षिण.. मध्य.. उत्तर.. पश्चिम.. पूर्व.. असा हजारो मैल चीन, मिळेल त्या साधनाने डॉ. द्वारकानाथ यांच्या पायाखालून जात राहतो. कॅन्टन, चांगशा, हॅको अशी अनेक शहरे.. खेडी.. यांगत्से, हॅन, पर्ल, पीत, चिअलिग अशा नद्यांचे प्रदेश, बॉम्ब हल्ल्यात बेचिराख झालेली गावेच्या गावे, सैरावैरा पळणारे निर्वासित नागरिक, धगधगणारे अंतर्गत राजकारण, असा अवघा चीन आपण डॉ. द्वारकानाथांच्या डोळ्यांनी पाहतो. पानोपानी आपल्यासमोर एकेक आश्चर्य उभे रहात जाते. आठव्या फौजेचे सरसेनापती च्यू तेह यांनी जपानी फौजेबरोबर दिलेला लढा असेल किंवा कॅनडातील धर्मगुरूचे पुत्र डॉक्टर नॉर्मन बेथ्यून यांनी जखमी जवानांना वैद्यकीय मदत मिळावी म्हणून उभ्या केलेल्या ‘आंतरराष्ट्रीय शांतता हॉस्पिटल’ची हकीगत असेल; अनंत अडचणींवर मात करणारी चीनी लोकांची मानसिकता पाहून आपण चकीत होऊन जातो. डॉक्टर बेथ्यून यांनी माओंना पटवून दिले की, युद्धभूमीवर गंभीर जखमी झालेल्यांवर ताबडतोब शस्त्रक्रिया केल्या तर शेकडा 75 तरी वाचू शकतील. प्रत्यक्ष रणभूमीवर फिरते शस्त्रक्रिया केंद्र ठेवण्याची कल्पना माओंना पसंत पडली. युद्धतळावरच्या एका पुरातन हॉस्पिटलचे पाच आठवड्यात एका आदर्श हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात आले… जपान्यांनी वुताई पर्वताजवळचा आपला वेढा आवळला आणि मोठ्या प्रयासाने बांधलेले हे हॉस्पिटल रिकामे करावे लागले. पश्चिम होपेमधील शेतकऱ्यांनी या रुग्णांना आपल्या घरी आसरा दिला, काही दिवसानंतर हॉस्पिटलचा शिल्लक भागही शत्रूच्या तोफांनी उडवला. एक दिवस होपे मधील शेकडो शेतकरी एका जवळच्या डोंगरावर गेले. पहिल्यांदा त्यांनी बावीस × दहा × दहा, अशा पन्नास गुहा खणल्या, त्याच्याच बरोबर खाली तीस फुटांवर दुसऱ्या पन्नास गुहा खणल्या, प्रत्येक गुहेत दगड- मातीच्या आधाराने फळ्या टाकून तयार केलेल्या पाच खाटा होत्या. शस्त्रक्रियेची खोली, तीन गुहा एकमेकांना जोडून आतल्या बाजूने विटांचे अस्तर लावून बनवली होती. शंभर गुहांमध्ये पसरलेले हे आदर्श हॉस्पिटल शत्रूच्या विमानांना न दिसणारे, त्यामुळे बॉम्बवर्षावापासून सुरक्षित होते.
असल्या अनेक घटना वाचताना वाटत राहते की यांगत्से सारखी पाच हजार किलोमीटर प्रवास करणारी नदी आणि आठ प्रांतातून वाहताना तिला येऊन मिळणाऱ्या लहान मोठ्या नद्या या स्फूर्ती, कल्पकता आणि पराक्रमाचे सिंचन करतात की काय? खंबीर, स्वाभिमानी स्वतंत्र राष्ट्र उभे करण्यासाठी उभी असलेली मोठी विद्यापीठे– पेकिंग, शिगहुआ, येनचिंग..नानकान, तेथील उद्योगधंदे, शेती आणि संपूर्ण देशाच्या उत्कर्षासाठी पेटून उठलेले नेतृत्व काय अद्भुत किमया घडवू शकते याचे दर्शन या पुस्तकातून घडते.
डॉ. द्वारकानाथ कोटणीसांच्या चरित्राबरोबरच केवळ १८४ पानांमध्ये अखंड चीन आपल्या डोळ्यांसमोर उभा करण्याचे लेखकाचे कौशल्य अतुलनीय आहे. लढाईसाठी वापरलेले गनिमी काव्याचे तंत्र, पेटून उठलेले विद्यार्थी, उद्योजक, सामान्य नागरिक, आठवी फौज, त्यांचे नेते जनरल च्यू तेह, निए, माओ-त्से-तुंग, दंतवैद्य डॉक्टर लि तेह, चाऊ-एन-लाय, युद्ध वार्ताहर अॅग्नेस स्मेडले, डॉक्टर बेथ्यून अशी अनेक व्यक्तिचित्रे कमीतकमी शब्दात, परिणामकारकतेने श्री. मंगेश कोटणीस उभी करतात.
उत्तम शल्यविशारद होण्याचा ध्यास घेऊन चीनला गेलेले डॉक्टर कोटणीस, चीनच्या मातीशी एकरूप होत गेले. आंतरराष्ट्रीय शांतता हॉस्पिटलचे संचालक म्हणून त्यांनी केलेले काम, परिचारिकांची प्रमुख को -चिंग-लान हिच्याशी झालेला विवाह, त्यांचा मुलगा इंगव्हा, (इंग-भारत, व्हा-चीन यांचा संगम) दरम्यानच्या काळात दुसऱ्या महायुद्धाआधी घडलेल्या आंतरराष्ट्रीय घटना, त्यामुळे भारतात परत येण्याची दूरावत गेलेली शक्यता, चिनी भाषेत शस्त्रक्रियेवरचे पुस्तक लिहिण्याचा घेतलेला ध्यास आणि मलेरियाने प्रकृती ढासळत जाऊन 9 डिसेंबर 1942 रोजी तिथेच त्यांचा झालेला अंत अशा सर्व घटना पुस्तकात एकापाठोपाठ एक येतात.
त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या डॉक्टर बसूंनी सोलापूरला येऊन डॉक्टर कोटणीस यांच्या आईची भेट घेतली. श्री. मंगेश कोटणीसांनी चीनला भेट दिली आणि इंगव्हा आणि त्याची आईही भारतभेटीवर आली होती. पुढे डॉ. कोटणीसांच्या कतृत्वाचे चित्रण करण्यासाठी चित्रपती व्ही. शांताराम यांनी राजकमल कलामंदिर प्रॉडक्शनसाठी ‘डॉ. कोटणीस की अमर कहानी’ हा चित्रपट १६मार्च १९४६ला काढला. त्यात डॉ. कोटणीसांची भूमिकाही स्वतः केली.
छोट्या इंगव्हा कोटणीसचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. आंतरराष्ट्रीय मानवतावादाची जपणूक करण्यासाठी, चिनी जनतेसाठी, अहोरात्र वैद्यकीय सेवा देत असताना ज्यांनी आपले प्राण अर्पण केले त्यांची स्मृती सतत जागती ठेवण्यासाठी चिनी सत्ताधाऱ्यांनी व चिनी जनतेने त्यांचे स्मारक उभारले. १९७५ नंतर अनेकवार कृतज्ञता व्यक्त केली. ‘चिनी जनतेचे कोटणीस प्रेम’, हा डॉक्टर वत्सला कोटणीस यांनी लिहिलेला लेख व अनेक छायाचित्रे ‘समर्पण’ पुस्तकाच्या परिशिष्टात येतात. ते वाचल्यावर चिला-इ (उठा- जागे व्हा) असे म्हणण्याची वेळ भारतीयांवर येते. वाटते, पाठ्यपुस्तकातील धडा म्हणून ही माहिती आपल्या मुलांसमोर आली तर ‘नाही चिरा नाही पणती’ असे म्हणण्याची वेळ येणार नाही. जागतिकीकरणाच्या लाटेत मानसिकता संकुचित होत जाणाऱ्या भारतीय मुलांच्या मनात ही पणती तेवत राहील. आजवर अनेक मुलांना मी हे पुस्तक भेट, बक्षीस म्हणून दिले आहे. आजच्या पिढीला पुस्तकांपेक्षा इंटरनेट माध्यम जास्त जवळचे आहे, हे लक्षात घेता हे पुस्तक इंटरनेटवर वाचनासाठी उपलब्ध झाल्यास काळाशी जास्त सुसंगत ठरेल असे वाटते.
माणसे भावनेच्या भरात, पोटतिडकीने काय काय करत जातात. काळाच्या तुकड्यावर लेणी खोदत जातात. पुढच्या काळाच्या तुकड्यावर उभे राहून मागच्या काळाचे मूल्यमापन करायला गेले की लेण्यांची पडझड बघायला मिळते. पण हाती राहिलेली शिल्पेही शेवटी त्यातील सौंदर्याचे दर्शन घडवतातच. एखाद्या बाळाच्या जन्माआधी आई आणि वडिलांच्या गूणसूत्रांमधून कुठल्या गुणसूत्रांची निवड व्हावी हे जेवढे निसर्गाधीन तसेच पुढे कोण कुठे जोडले जाईल हेही काळाच्या आधीन. ज्या समर्पण भावनेने डॉ. कोटणीसांनी काम केले त्या भावनेतील सौंदर्य कसे कमी होणार? काळाच्या ओघात दोन राष्ट्रातले हितसंबंध उलट-सुलट वळणे घेतीलही पण मानवतेची सुंदर भावना, कार्य, यांचे मोल हे ‘सत्य शिव सुंदर’ या त्रिकालाबाधित- मूल्यांना धरूनच करावे लागेल.
-डॉ. गीता जोशी
9423590013
drgeetajoshi59@gmail.com
छान माहिती. आता पुस्तकं विकत घेऊन वाचणार नक्की