लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पत्नी सत्यभामाबाई टिळक यांनी त्यांचा संसार चोख सांभाळला. लोकमान्य यांना संसाराच्या जबाबदाऱ्या जास्त सांभाळाव्या लागल्या नाहीत. टिळक यांना काही वेळा तुरुंगात जाण्याची पाळी आली, पण सत्यभामाबाई यांनी कधीही, कोठल्याही प्रकारची तक्रार किंवा नाखुषी व्यक्त केली नाही.
टिळक इंग्रजी शाळेत असताना, म्हणजे 1871च्या वैशाख महिन्यात त्यांचा विवाह झाला. त्यांची पत्नी कोकणातीलच होती व त्या दोघांचाविवाहसुद्धा कोकणातील चिखलगावी झाला. सत्यभामा यांचे पूर्वाश्रमींचे नाव – ‘तापी’. ते त्यांचे घराणे म्हणजे लाडघर (तालुका दापोली) येथील ‘बाळ’ घराणे. ते घराणे पाहुणचारासाठी प्रसिद्ध होते. ‘बाळ’ घराण्यात दानधर्माला विशेष महत्त्व होते. त्यांच्या गुरुजींनी सांगितलेली जुनी आठवण – कोकणात चोरट्यांचा उपद्रव असल्यामुळे दागदागिने रात्री धान्याच्या डब्यात ठेवून व सकाळी ते आठवणीने बाहेर काढण्याची पद्धत होती. एकदा ‘बाळ’ यांच्या घरी भिकारी आला असता, घरातील एका माणसाने त्याला ओंजळभर तांदूळ घातले. त्यात चुकून सोन्याचा दागिना आला. पण भिक्षेकरता वाढण्यात आलेल्या तांदुळात जे काही निघेल ते दानधर्म समजून तो सोन्याचा दागिना त्या भिकाऱ्याला देण्यात आला!
सत्यभामाबाई टिळक यांची राहणी साधी होती. त्या रेशीमवस्त्र विशेष परिधान करत नसत. त्या अबोल होत्या. त्यांनी घराचा उंबरठा कधी सोडला नाही व त्यांनी घरातील जवळच्या माणसांखेरीज कोणाशी कधी जास्त संभाषण केले नाही. त्या परक्या स्त्रीबरोबर बाहेर ओटीवर बसून बोलत आहेत असे कोणी पाहिलेले नाही. कथापुराण तर नाहीच; पण त्या देवदर्शनालासुद्धा क्वचितच जात. त्या स्वत: घरातील सगळी कामे करत. त्यांना त्यांच्या पतीच्या लोकप्रियतेची जाणीव असल्याकारणाने त्यांनी पतीचे घराकडे विशेष लक्ष नसते ही गोष्ट स्वीकारली होती.
टिळक पुण्याच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये शिक्षक असताना ते नारायणपेठमध्ये मोदी गणपतीसमोरील मांडे यांच्या वाड्यात राहत असत. नारायणपेठेत त्यावेळी कमीत कमी पाऊणशे माधुकरी होते. ते माधुकरी टिळक यांच्या घरीसुद्धा येत असत. ते आल्याचे कळताच, सत्यभामाबाई बाहेर येऊन माधुकऱ्यांची संख्या पाहत असत व एका मोठ्या ताटात माधुकऱ्या तयार करून आणत. मग सर्वांना नमस्कार करून त्यांना निरोप देत. सत्यभामाबाई जुन्या चालीरीतींच्या होत्या. त्या कधी सभा-संमेलनाकरता बाहेर पडल्या नाहीत. त्या धीराच्या होत्या, आल्यागेल्याची विचारपूस करून व मुलांचे नीट संगोपन करून त्यांनी निगुतीने संसार केला. लोकमान्य टिळकांना इंग्रज सरकारने देशद्रोहाबद्दल काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली व घरच्यांना न भेटवताच ब्रह्मदेशात सहा वर्षांसाठी रवानगी केली. शिक्षेची ती बातमी घरी कळवण्याची जबाबदारी टिळक यांनी काकासाहेब खाडिलकर यांच्यावर सोपवली. खाडिलकर मुंबईहून पुण्याला आले. दिवस उजाडण्यास अजून वेळ होता, म्हणून खाडिलकर देवडीवरच बसून होते. त्यांना ती वाईट बातमी कशी सांगावी या विचाराने रडू आवरले नाही. थोड्या वेळात, सत्यभामाबाई बाहेर आल्या व त्यांनी खाडिलकर यांचा चेहरा बघून टिळक यांना मोठी शिक्षा झाल्याचे ओळखले. त्यांनी स्वत:ला सावरले व त्या खाडिलकर यांना म्हणाल्या – “तिकडे शिक्षा झाली, हेच सांगण्यासाठी तुम्ही येथे आलात ना? मग रडत काय बसलात? शिक्षा झाली ती चोरीसाठी नाही, तर लोककल्याणासाठी झटण्याला गुन्हा ठरवून इंग्रज सरकारने शिक्षा ठोठावली. मग, त्यामुळे हातपाय गाळून बसण्यात काय अर्थ आहे? उठा, रडू नका, कामाला लागा”. (ही वाक्ये त्यांच्या तोंडी, प्रत्यक्ष नसली तर भावार्थ हाच होता). टिळक यांचे शिक्षेच्या वेळी वय बावन्न होते व ते मधुमेहाने ग्रासलेले होते. त्यात हद्दपारीची शिक्षा- या साऱ्या गोष्टी ऐकून सत्यभामाबाई काळजीने ग्रासल्या. परंतु त्यांनी त्यांची अवस्था बाहेर दिसू दिली नाही. उलट, त्यांनी भेटलेल्यांना धीरच दिला.
लोकमान्य टिळक, दुसऱ्या राजद्रोहाच्या शिक्षेसाठी 1908 ते 1914 या काळात मंडाले तुरुंगात होते. त्या काळात सत्यभामाबाई यांची अवस्था व वर्णन त्यांचे नातू – ग.वि. केतकर यांनी पुढीलप्रमाणे केले आहे –
सत्यभामाबाई यांचे ‘साध्वी’ या एका शब्दात वर्णन होऊ शकेल. लोकमान्य शिक्षा भोगून येईपर्यंत आपण इहलोक सोडून जाणार नाही असे त्यांना वाटे व त्या तसे बोलून दाखवत. त्या सहा वर्षांच्या काळात त्या कधी घराबाहेर पडल्या नाहीत. हातात नेहमी काळ्या बांगड्या व काळीच वस्त्रे परिधान करत. मंगळसूत्राशिवाय त्यांनी कोठलाही अलंकार घातला नाही. त्यांनी पक्वान्नं कधी खाल्ली नाहीत, सतत उपास करत व उपासाचेच पदार्थ खाऊन राहत असत. मुली शिकलेल्या असल्याने त्या सत्यभामाबाई यांना ‘केसरी’ वाचून दाखवत असत, पण त्यात त्यांचे विशेष लक्ष नसे. मात्र पार्वतीबाई यांनी वाचलेली ‘भक्तिविजय’ पोथी त्या लक्षपूर्वक ऐकत असत. त्यांनासुद्धा लोकमान्य यांच्याप्रमाणे मधुमेहाचा त्रास होता, पण तरी औषध घेण्याचे त्या टाळत असत. तोच विकार पुढे जाऊन जून 1912 मध्ये त्यांचा अंत झाला.
सत्यभामाबाई मुळातच अबोल असल्याकारणाने त्यांच्या मनात गोष्टी राहायच्या. त्यांच्या मनात काय चालू आहे ते त्या सहसा बोलून दाखवत नसत. त्यांना मैत्रिणी अशा फारशा नव्हत्या. स्वत:ची हौसमौज त्यांनी कधी केली नाही. दागदागिने, कपडेलत्ते यांची त्यांना हौस नव्हती. आपल्या नवऱ्याचे संकट (दुसऱ्या राजद्रोहाची शिक्षा) टळावे म्हणून त्यांनी कसले तरी व्रत धरले होते व त्या त्याचे मनोभावे आचरण करत. लोकमान्य यांच्या सार्वजनिक जीवनाबद्दल त्या मौन पाळत. त्यांनी तशी शिस्तच लावून घेतली होती. लोकमान्य मंडालेत असताना त्या खूप हळव्या झाल्या होत्या. म्हणून कदाचित मुलांचेच बरोबर असे मानून त्यांचीच कड घेण्याकडे त्यांचा कल झाला होता.
– (आधार केसरी)
छान माहिती।
छान माहिती।
Comments are closed.