सट्टा-मटका बाजाराची मराठी भाषा

2
329
satta-mataka-bajar

बसस्थानकांवरील वर्तमानपत्रे व पुस्तके यांच्या विक्रेत्यांकडे गुलाबी-पिवळे कागद असतात आणि त्यावर काही आकडे… ते कागद ‘आकडा लावतात त्यासाठी असतात’ त्याला ‘पॅनल चार्ट’ म्हणतात. मटकेबाजाराची ती पुस्तके बेलिलियस रोड, हावडा 711 101 पश्चिम बंगाल या पत्त्यावरून येतात. त्यात पूर्ण वर्षाचे तक्ते उपलब्ध असतात. तो खेळ कसा खेळावा याचीही पुस्तके असत. मी तो बाजार सुरू कसा झाला याची रत्नागिरी परिसरात फिरून माहिती घेतली; https:/ sattamatkai.net ही वेबसाईट पाहिली आणि मला त्यातील खास भाषेचा परिचय झाला…  

पहिल्यांदा कॉटन बाजार असायचा. कापसाचे दर फुटायचे. त्या दरानुसार ‘फिगर/ आकडा’ ओपन व्हायचा. तो बाजार नंतर पत्त्यांवरून सुरू झाला. भारतात मटका स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे असे जुनेजाणते लोक सांगतात. मडक्याच्या आत चिठ्या टाकून त्यातून नंबर काढला जात असे. मटक्याचा प्रयोग होई म्हणून मटका असे त्या खेळाचे नाव पडले. मटकाबाजार डे मधुर, नाईट मधुर, डे मिलन, वरळी बाजार, टाईम बाजार, बालाजी किंग डे, तारा मुंबई डे, राजधानी डे अशा नावांनी दिवसरात्र उपलब्ध आहेत. विशेषतः जे खास शब्द कल्याण व मुंबई बाजारांत मिळाले त्यांची माहिती अशी-

बावन्न पत्त्यांतील बारा रंगीत पत्ते (राजा, राणी, गुलाम) बाजूला काढले जातात. त्याला ‘भावली बाजूला काढणे’ असे म्हणतात. मटकेबाजारातील पत्ते पुढील विशेष नावाने ओळखले जातात. एक्का – एक्का, दुरी – दुवा, तिरी-तिया, चौका – चॉकलेट, पंजा – काँग्रेस, छक्का – छगन, सत्ता – लंगडा, अठ्याेष – अठ्या त, नव्वा – नयला, दश्शा – मेंढी/जिलबी. त्यांतील तीन पत्ते उघडले जातात. ते कसेही आले तरी ते 1, 2, 3 अशा चढत्या क्रमाने लावून घेतले जातात. उदाहरणार्थ 9, 3, 6 असे पत्ते आले तरी ते 3, 6, 9 असेच लावून घेतले जातात. तो खेळ दोनदा खेळला जातो. त्याला ‘‘ओपन’ व ‘क्लोज’ची खबर आली’ असे म्हणतात. ‘ओपन’ची खबर संध्याकाळी 4:12 ला फुटते आणि अवघ्या तीन मिनिटांत म्हणजे 4:15 पर्यंत जगात पोचते, तर क्लोजची खबर संध्याकाळी 6.12 ला फुटते आणि अवघ्या तीन मिनिटांत म्हणजे 6.15 पर्यंत जगात पसरते. उदाहरणार्थ 3, 6, 8 यांची बेरीज करायची (3+6+8 = 17) त्या बेरजेचा शेवटचा आकडा 7 म्हणजे ‘ओपन’/‘क्लोज’चा सत्ता/लंगडा आला; तर 1, 2, 3 = 6 ‘ओपन’/ ‘क्लोज’चा छक्का आला. ज्याला ‘ओपन’ लागला त्याला एक रुपयाला नऊ रुपये असे नऊपट रुपये मिळतात. 3, 6, 8 असे सगळे आकडे लावायचे असतील, तर त्याला ‘पाना लावा’ असे सांगतात. ‘ओपन’ व ‘क्लोज’चा पाना लागला तर त्याला ‘जॅकपॉट’ लागला असे म्हणतात. जॅकपॉटला एक रुपयाला आठ हजार ते दहा हजारापर्यंत रुपये मिळतात. 3 6 8 ला तीनशेअडुसष्ट न म्हणता तीन सहा आठ असेच म्हटले जाते. ‘गुणिले पाना’ ही अजून एक संकल्पना आहे. ओपन व क्लोज यांच्या आकड्यांची बेरीज काय येईल हे वर्तवायचे असते. उदाहरणार्थ ओपन ला 368 = 17 म्हणजे ओपनला 7 आला आणि क्लोजला 123 = 06 म्हणजे 6 आला तर 76 चे ‘ब्रॅकेट’ झाले असे म्हणतात. जर आकडा लावणाऱ्याने 76 चा गुणिले पाना लावला, तर 76 चे ब्रॅकेट होऊन, त्याचा ‘गुणिले पाना पास झाला’ असे म्हणतात. जुगारी खेळाडू 00 ते 99 पर्यंत ब्रॅकेट लावू शकतो. 00 ला ‘डबल मेंढी’ म्हणतात. जर डबल आकडा लागला तर त्याला ‘गेम झाली/आली’ असे म्हणतात. एखादा आकडा चार दिवसांनी असा येईल हा अंदाज वर्तवला जातो त्याला ‘टर्न’ म्हणतात. 

सिंगल पाना- आकड्याची पाने समान नसली तर ‘सिंगल पाना’ असे म्हणतात. उदाहरणार्थ 145, 289, 246 

डबल पाना- आकड्याची दोन पाने समान लावली तर ‘डबल पाना’ घ्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 233, 885, 677, 299 

राउंड पाना- आकड्याची पाने क्रमाने लावली उदाहरणार्थ 123, 789, 345 तर ‘राउंड पाना’ खेळला असे म्हणतात. अकोला भागात त्यालाच ‘उतार’ असेही म्हणतात. 

ट्रिपल पाना/संगम पाना – आकड्याची तिन्ही पाने समान लावली तर ‘ट्रिपल पाना’ घ्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 333, 555 

सायकल/मोटार पाना – पाच आकडे लावले जातात. त्याची दहा सिंगल पाने तयार होतात. उदाहरणार्थ 12345 लावले तर 123, 124, 125, 134,135, 145, 234, 235, 245, 345 ही दहा पाने तयार होतात. त्या पान्यांतील कोणतीही एक जोडी लागली तरी त्याचा पाना पास झाला म्हणतात. ती पाने एकीत 13579 वा बेकीत 24680 लावा असेही म्हणतात. अधिक माहिती MAIN MUMBAI cycle pana today या नावाने ‘यू ट्यूब’वर पाहू शकता, प्रत्यक्षात तो कसा काढतात याचा डेमोही पाहण्यास मिळेल. 

हे ही लेख वाचा – 
व्यवसायनिष्ठ बोली – मराठीवर आघात?
सांकेतिक बोली-गूढतेची गंमत

गेम व कट गेम – यांचे असे जोड तयार होतात. उदाहरणार्थ 11, 22, 33, 44, 55, 66, 77,88, 99,00 असा जोड आला तर गेम झाली असे म्हणतात. तर कट-   

1 x 6   16    61                   2 x 7     27      72 

3 x 8   38   83                   4 x 49   49      94 

5 x 0    50  00   असे आकडे आले तर ‘कट गेम’ झाली असे म्हणतात.

साधा जोड – याचे आठ जोड तयार होतात. उदाहरणार्थ 12-17, 62-67, 21-26, 71-76 किंवा उलट  23-28, 73-78, 32-37, 82-87 

लडी लागणे – हा प्रकार रत्नागिरी परिसरात नाही. नागपूर-अकोला परिसरात आहे. पहिला बाजार कल्याणचे ओपन-क्लोजचे 7 6 आणि नंतर उघडणाऱ्या मुंबई बाजाराचे ओपन-क्लोजचे 4 3 असे आकडे लावले आणि तसेच 7 6 4 3 आकडे लागले तर ‘लडी लागली’ असे म्हणतात. ही लडी मिलन डे, मिलन नाईट या बाजारालाही लावू शकतात. आधी व नंतर उघडणारे कोणतेही दोन बाजार घेऊन ती लडी लावता येते. 25 पैशाला 100 रुपये मिळतात. 

लेवल काढणे – धंदा करणारा नफातोटा किती होईल याचा अंदाज घेतो, त्याला ‘लेवल काढणे’ म्हणतात. 

खायला परवडणे- जितका धंदा परवडतो त्याने तेवढा करायचा आणि बाकी वरील माणसाकडे देऊन टाकायचा. तो जितका परवडतो त्याला ‘खायला परवडणे’ म्हणतात. जेवढा धंदा खाण्यास परवडतो त्याला ‘धंदा आत ठेवणे’ म्हणतात. जेवढा धंदा खाण्यास परवडत नाही त्याला ‘धंदा बाहेर काढणे’ म्हणतात. 

फुल भाव – आपण गिऱ्हाईकाला एक रुपयाला बाजारभाव नऊ रुपये देतो. त्यांतील वरील एक रुपया न खाता पूर्ण (रुपयाला 10 रुपये) पैसे देणे याला ‘फुल भाव’ म्हणतात.  

बाजारभाव व फुल भाव हे ठिकाणाप्रमाणे बदलतात. रत्नागिरीमधील सध्याचे भाव असे – 

    बाजारभाव         फुल भाव 
सिंगल: 1 रुपयाला 9 रुपये    10 रुपये 
जोड :     1 रुपयाला 90 रुपये  100 रुपये 
सिंगलपानाः 1 रुपयाला 120 रुपये    165 रुपये 
डबलपानाः 1 रुपयाला 200 रुपये  330 रुपये 
ट्रिपलपानाः 1 रुपयाला 500 रुपये      800 रुपये 
गुणिले पानाः   1 रुपयाला 800 रुपये    1000 रुपये 
जॅकपॉट:     1 रुपयाला 10000 रुपये    15000 रुपये

 

ही रत्नागिरीच्या आसपास फिरून जमवलेली माहिती असल्याने, ‘खायला परवडणे’ यासारखी वाक्यरचना खास कोकणातील आहे. त्यालाच अमरावती भागात ‘खायवाळी’ असे म्हणतात. परिसराप्रमाणे भाषा बदलतानाही दिसते. जसे- अमरावती-अकोट भागात डबलपान्याला ‘ज्यूट’ असे म्हणतात. ट्रिपल पान्याला ‘परेल’ असे म्हणतात. टर्नला ‘बोगी’ असे म्हणतात.

वर्तमानपत्रातून हे आकडे ‘शुभांक’ म्हणून जाहीर होत. त्या धंद्यातून मिळणारे उत्पन्न शासनाच्या तिजोरीत जात नाही, म्हणून शासनाने स्वतःची अधिकृत लॉटरी तयार केली. त्यामुळे सामान्य लोकांच्या मटक्याची जागा उच्चभ्रूंच्या बेटिंगने घेतली, इतकेच.

– निधी पटवर्धन  nidheepatwardhan@gmail.com
भाषा आणि जीवन’वरून उद्धृत, संपादित – संस्कारित

About Post Author

2 COMMENTS

  1. मी पण हे सगळे प्रकार आहेत
    मी पण हे सगळे प्रकार आहेत

Comments are closed.