मुलाची व्रतबंध केल्यानंतर गुरुगृही जाऊन शिक्षण घेणे अभिप्रेत होते. बटूला काही विशिष्ट नियमांनी बद्ध करणे हा अर्थ त्यात समाविष्ट आहे. मुलीचेही उपनयन होत असे. कूर्मपुराणात तसा स्पष्ट उल्लेख आहे. आरंभी उपनयन हा साधा संस्कार असावा. वडीलच त्याचे गुरू होत. उपनयन केल्यानंतर त्या कुमाराला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होवो आणि त्याला द्विजत्व मिळो, असा संकल्प कर्ता प्रथम करत असे. मग गणपती पूजन, पुण्याहवाचन व मंडपदेवतांची प्रतिष्ठा केली जाते. त्यापुढील काळात आईबरोबर जेवायचे नाही, उष्टे खायचे नाही असे नियम असल्याने व्रतबंधनापूर्वी मातृभोजन केले जाई. भोजनानंतर मुलाचे वपन करून त्याला शेंडी राखत. त्याला मंगलस्नान घालून, कपाळाला कुंकू लावून मंडपात आणत. मुंज मुलगा आणि त्याचा पिता किंवा कर्ता यांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणत. पिता मुलाचे नवे नाव ठेवत असे. ते गुप्त, त्या दोघांपुरते राही. मग मुलाला वडिलांच्या उजव्या बाजूस बसवून, स्थंडिलावर म्हणजे यज्ञकुंडावर अग्नीची स्थापना करून काही विधी करत. मुलाला लंगोटी नेसवून, शुभ्र वस्त्र पांघरायला देऊन, हरणाचे कातडे देऊन यज्ञोपवित घालण्यास देत. गायत्री मंत्राचा उपदेश देऊन कमरेला मेखला बांधत. नंतर कुमाराच्या हाती दंड देत. विधी ढोबळपणे असा असे.
मुलाने गुरुगृही शिक्षणासाठी गेल्यावर स्वावलंबन आचरणे अभिप्रेत असे. मुंजीपूर्वी भरपूर कोडकौतुक- त्या दिवशी तर स्नानाला सुगंधी द्रव्ययुक्त पाणी ! कारण तेथून पुढे मुलाने थंड व साध्या पाण्याचे स्नान करावे असे अभिप्रेत असे. गुरुकुलात शिकताना, राहताना पूर्ण ब्रह्मचर्य पालन आवश्यक मानले होते. आचार्य आणि कुमार यांच्यामध्येही स्नेहाचा धागा बांधला जाणे महत्त्वाचे होते. पाण्यात पाणी मिसळून जाते तद्वत गुरु-शिष्याचे नाते असावे असे वर्णन आहे . गुरूनेही कुमाराचे पालकत्व मोठ्या आनंदाने स्वीकारावे असे म्हटले आहे.
व्रतबंधाच्या संस्कारांच्या तपशिलात छोट्या छोट्या गोष्टींचा बारकाईने विचार केला आहे. त्या काळाचा विचार करता लक्षात येते, की शिष्याने गुरुगृही सर्व कामे करायची आहेत. आचार्य, आचार्यपत्नी यांना दैनंदिन कामांत मदत करणे. गुरे चरण्यास नेणे, लाकुडफाटा गोळा करणे, पाणी भरणे ही आणि अशीच बरीच कामे… अशा वेळी जनावरे हाकताना, स्वसंरक्षणासाठी, नदी-ओढा पार करताना पाणी किती खोल आहे हे बघण्यासाठी कुमाराच्या हातात दिलेल्या दण्डाचा उपयोग होत असणार. तो दण्ड ब्राह्मण कुमाराच्या हातात पळसाचा, क्षत्रियाच्या हातात उंबर, तर वैश्याच्या हातात बेलाचा असे. व्यवसायानुसार असे फरक/बदल उपनयन संस्कारात केलेले दिसतात. ब्राह्मण मुलाची मेखला ‘मुंज गवताची’, क्षत्रियाची मूर्वा म्हणजे धनुष्याला प्रत्यंचा असते गवताची तर वैश्याची तागाची असे. गायत्री म्हणजेच सावित्री मंत्रोच्चारणाने मनुष्याचे बुद्धिवैभव वाढवणे गृहित असे. त्याने भिक्षा मागावी का तर त्यातून त्याचा धीटपणा वाढतो – आप्तेष्टांचा परिचय होतो; तसेच अन्नाचे महत्त्व त्याला कळते. भिक्षा मागतानाही ब्राह्मणकुमाराने ‘ॐ भवति भिक्षां देहि ।’ म्हणावे, क्षत्रियाने ‘ॐ भिक्षां भवति देहि ।’ तर वैश्याने ‘ॐ देहि भवति ।’ म्हणावे. मिळालेली भिक्षा त्याने गुरूच्या स्वाधीन करायची असे.
उपनयनानंतर कुमाराच्या आयुष्यातील नवीन पर्वाला प्रारंभ होतो. गुरुगृही राहण्याचा त्याचा कालखंड एक तपाचा म्हणजे बारा वर्षांचा असतो. त्या तपश्चर्येच्या काळात विद्याभ्यास, गुरुशुश्रूषा, वेदाध्ययन व ब्रह्मचर्या असे त्याचे जीवन असे.
उपनयनविधी पूर्ण झाल्यावर ब्रह्मचाऱ्याला तीन दिवस कठोर संयम पाळावा लागे. त्याला त्रिरात्र व्रत म्हणत. क्वचित तो काळ बारा दिवस किंवा एक वर्षाचा असे. विद्यार्थ्याला जीवनातील काही कठोर नियम त्या वेळी पाळावे लागत. वेदाध्ययन करताना त्याने काही अनध्यायाचे दिवस पाळणे आवश्यक होते. अमावस्या, चतुर्दशी, पौर्णिमा, अष्टमी, प्रातःकाळ, सायंकाळ यावेळी स्वाध्याय न करण्याचा नियम होता. विजा चमकणे, वादळ-वावटळ असेल, तरीही स्वाध्याय न करण्याचे नियम होते. तसेच, स्वाध्यायाचे ठिकाण व स्वतः स्वाध्यायी शुद्ध, स्वच्छ व पवित्र असणे आवश्यक होते. मुंजीनंतर करण्याची संध्या, संध्येची नावे, गायत्री मंत्र संस्कृतात आहेत. ती म्हटल्यामुळे शब्दोच्चारण व्यवस्थित होते.
स्त्रियाही वेदाध्ययन करत असत. मात्र विवाह लहान वयातच होऊ लागल्याने मुलीचे शिक्षण घेणे कमी-कमी होत गेले आणि ती प्रथा कालबाह्य झाली.
– स्मिता भागवत 9923004118