Home व्यक्ती संत परंपरेचे विदेशी अभ्यासक (Foreign Scholars of the Saint Tradition )

संत परंपरेचे विदेशी अभ्यासक (Foreign Scholars of the Saint Tradition )

 

डॉ. एलिनॉर झेलिएट या मराठी दलित संत साहित्याच्या अभ्यासक आहेत. त्यांनी संत चोखामेळा व इतर दलित संत यांच्यावर अभ्यास करण्यासाठी मुख्यत: परिश्रम घेतले. त्यांचा संत चोखामेळा :विविध दर्शन नावाचा ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे. त्यांना वा.ल.मंजूळ यांचे सहकार्य लाभले. त्यांनी विस्कान्सीन विद्यापीठाच्या वतीने अमेरिकेतील मॅडीसन शहरात भरवण्यात आलेल्या एकतिसाव्या साऊथ एशियन कॉन्फरन्समध्ये एक दिवसाच्या सत्राचे बीजभाषण केले. ते सत्र भारतातील दलित चळवळींवर होते.
अॅना शुल्टज या न्यूयॉर्कच्या. त्या इलिनाईस विद्यापीठाच्या विद्यार्थिनी. त्या राष्ट्रीय कीर्तनावर पीएचडी करत आहेत. त्यांना अमेरिकेच्या प्रा. चार्लस् कँपबेल व मुंबईचे पं. विद्याधर व्यास यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्या वाखरी ते पंढरपूर पालखीबरोबर 1999च्या वारीत पायी चालल्या होत्या. त्यांने इंग्रजीतून कीर्तन वामनबुवा कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या नारद मंदिरात सादर केलेले आहे.
प्रा. शार्लोत वोदविले या फ्रान्सच्या ज्येष्ठ प्राध्यापक होत. त्यांनी फ्रेंच भाषेमध्ये ज्ञानदेवांच्या हरिपाठाची चिकित्सक आवृत्ती प्रसिद्ध केलेली आहे. त्यांनी पंढरपूर : एक संतांचा गाव असा संशोधनपर निबंध अमेरिकेत 1974 साली प्रसिद्ध केला होता, तर जर्मन भाषेत चोखामेळा यांचे चरित्र 1977 साली प्रसिद्ध केलेले आहे. त्या वारकरी संप्रदायात नाव मिळवलेल्या विदुषी आहेत. त्यांनी पालखी सोहळ्यात भाग अनेक वेळा घेतला आहे.
प्रा. विनान्द कॅलेवर्ट हे बेल्जियमच्या लोवेन विद्यापीठाचे प्राध्यापक. त्यांनी त्यांच्या देशात आंतरराष्ट्रीय भक्ती परिषद 1971 साली भरवली होती. ते संत नामदेवांचे अभ्यासक. त्यांच्या नामदेव गाथांचे संगणकयुक्त विश्लेषण संशोधन क्षेत्रात प्रसिद्ध आहे. तसेच, त्यांचे संत दादू, संत रोहिदास यांच्यावरील संशोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांची भारत भेट पंढरपूर वारीत सहभागी झाल्याशिवाय पूर्ण होत नाही.
प्रा. स्कायहॉक हे पश्चिम जर्मनीच्या हायडेलबर्ग विद्यापीठाचे प्राध्यापक. ते डॉ. सोन्थायमर (वारीहा मराठी चित्रपट निर्माणकर्ते) यांचे पीएचडीचे विद्यार्थी. त्यांचा विषय एकनाथी भागवत हा होता. त्यांनीही पंढरपूरच्या पालखी सोहळ्यात अनेक वेळा भाग घेतलेला आहे.
प्रा. डॉ. जेम्स लेन हे सेंट पॉलचे मॅकॅलेस्टर कॉलेजचे फॅकल्टी डीन. ते धर्म आणि संस्कृती या विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांच्या पत्नी जॉय ह्या पुण्याच्या पीएचडी आहेत. अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठ आशियायी अभ्यसाकरता प्रसिद्ध आहे. त्या विद्यापीठातर्फे चाळीस विद्यार्थी- विद्यार्थिनी पुण्यात येतात. तो प्रकल्प एसीएम या नावाने ओळखला जातो. त्या प्रकल्पाचे डायरेक्टर म्हणून प्रा. डॉ. जेम्स लेन अनेक वेळा पुण्याला सहकुटुंब, सहपरिवार राहून गेले आहेत. ते पालखी सोहळा, पंढरपूर भेट आणि वारीदर्शनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांसह योजतात.
इलिना कोर्टेलेस्सा या इटाली देशातील मिलान विद्यापीठाच्या अभ्यासक. त्या नवऱ्यासह पालखीसोहळा आणि वारकरी संप्रदाय यांचा अभ्यास (पीएचडी) करण्याकरता पंढरपूर येथे आल्या होत्या. त्यांना त्याबाबत पंढरपुरात इंग्रजी भाषेमधून माहिती सांगणारी कोणी व्यक्ती भेटली नाही म्हणून त्या चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या सूचनेवरून पुण्यात येऊन राहिल्या. तेथे त्यांना प्रा. शं.रा.तळघट्टी यांनी वारकरी संप्रदायाबाबत माहिती दिली. त्यांनी वारी, आळंदी आणि श्रीविठ्ठल यासंबंधीची माहिती वा.ल. मंजूळ यांच्याकडून घेतली.
ख्रिश्चन नोवेटस्की

प्रा. ख्रिश्चन नोवेटस्की हे मूळचे अमेरिकेतील मॅकॅलेस्टर कॉलेजचे, आशियायी तत्त्वज्ञान विषयाचे पदवीधर. ते हॉर्वर्ड विद्यापीठातून प्रा. गॅरी टब यांच्या हाताखाली धर्माचा इतिहास विषय घेऊन एम ए झाले. ते संत नामदेवांचे अभ्यासक. त्यांना मराठी भाषा शिकण्यासाठी तीन-चार प्रकारच्या शिष्यवृत्त्या लाभल्या आहेत. त्यांनी एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकामध्ये बहिणाबाई, तुकाराम, ज्ञानेश्वर, चोखामेळा यांच्यावर सविस्तर टिपणे लिहिली आहेत. ते 1996 साली कोलंबिया विद्यापीठातून प्रा. जॅक हावले, अरिझोनाच्या प्रा. फेल्डहौस यांच्या मार्गदर्शनाखाली संत नामदेवांवर पीएचडी करण्यासाठी दोन-तीन वेळा पुण्यात येऊन राहून गेले आहेत.

(बापरखुमादेवीवरूया मासिकातील वा.ल. मंजूळ यांच्या लेखनावरून संकलित राजेंद्र शिंदे)

———————————————————————————————-———–

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version