संघर्षवाटा – आंबेडकरी राजकारणाचे ताणेबाणे (Dalit politics analyzed in the book)

0
119

डॉ. संजय दामू जाधव यांचा एका दशकाचा विविधांगी अनुभव संघर्ष वाटा’ या पुस्तकात शब्दबद्ध झाला आहे. जाधव यांनी अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून जे यश संपादन केले आणि त्यासाठी जो संघर्ष केला त्याचे चित्रण पुस्तकात वाचण्यास मिळते. सालदाराच्या मुलाने एमबीबीएसनंतर अस्थिरोग तज्ज्ञ हा अभ्यासक्रम यशस्वी रीत्या पूर्ण करून त्या क्षेत्रात पाऊल ठेवले, हेच मोठे यश होय. त्याचबरोबर डॉक्टर स्वतःची स्वतंत्र वाटचाल करताना दिसून येतात. त्या पुस्तकात त्यांचे पुण्यातील दिवसतेथील धडपडनेप्रॅक्टिस आणि स्थैर्य मिळवण्यासाठी केलेल्या संघर्षाचे चित्रण वाचण्यास मिळते. डॉक्टरांनी त्यानंतर पुणे सोडण्याचा निर्णय घेऊन नाशिककडे वाटचाल केली. तेथे डॉक्टरांनी ते स्वतःच्या सुसज्ज अद्ययावत हॉस्पिटलकडे वाटचाल करत असताना, त्यांच्या वाटेत जे विविध गतिरोधक आले तेही पुस्तकात मांडले आहेत. त्यांना स्वतःचे हॉस्पिटल उभारण्यासाठी काडी-काडी जमा करावी लागली. कर्ज देणाऱ्या पतसंस्थांनीसुद्धा डॉक्टरांना कधी आवश्यक ते सहाय्य केले नाही. त्यांच्या संघर्ष वाटा’ पुस्तकात संघर्षातील त्यांचा वाटा अशीही फोड शीर्षकाची करता येईल ती लेखकाची रुढार्थाने आत्मकथा नाही असे रावसाहेब कसबे यांनी म्हटले आहे, कारण त्या पुस्तकाला विविधांगी पदर आहेत.

डॉ. संजय जाधव

 

         संजय दामू जाधव यांनी मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी दीर्घकाळ केली. त्यांचा दिनक्रम पहाटे चारपासून सुरू होत असे. संजय स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये नियोजित शस्त्रक्रिया करून मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून जात असत. त्यानंतर पुन्हा त्यांच्या वैद्यकीय व्यवसायात लक्ष घालत असत. त्यांना त्या नोकरीत स्थलांतरे करावी लागली. ते नोकरीसाठी थेट मुंबईपर्यंत गेले. त्यांनी नाशिक-मुंबई-नाशिक असा खडतर प्रवास काही काळ केला.

         जाधव यांनी जातीय मानसिकतेचा अनुभवही संघर्ष वाटा’ पुस्तकात मांडला आहे. त्यात त्यांचा संघर्ष दुहेरी दिसून येतो. त्यांनी जातजाणिवेचे पदर मांडले आहेत. त्यातून त्यांची समाजाप्रती असणारी आस्था स्पष्ट होत जाते. दया पवार यांच्या एका झाडाने किती टकरावे’ या ओळीचा प्रत्यय पुस्तक वाचताना येतो. डॉक्टरांना एका बाजूला अन्य जाती आणि दुसऱ्या बाजूला स्वसमाज असा दुहेरी संघर्ष करावा लागला. ते तसा संघर्ष अंगावर घेतानाही पुस्तकात दिसून येतात.

      दलित राजकारणाचे ताणेबाणे संघर्ष वाटामध्ये येतात. जाधव हे प्रथम साम्यवादी विचारांकडे आकर्षित झाले. ते पुण्यात शिकत असतानाअनेक विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांना चळवळीचे वारे विद्यार्थिदशेतच लागल्याचे स्पष्ट होते. पण त्यांना साम्यवादी राजकारणात जातप्रभावाचा अनुभव येत गेला. ते त्यातून कम्युनिस्ट चळवळीतील राजकारणापासून बाजूला गेले. त्यांचे मतभेद अनेक कार्यकर्त्यांशी झालेतरी ऋणानुबंध निर्माण झालेले दिसून येतात. चरित्रनायकाने ते जपले आहेत. त्यांनी दलितांचे राजकारण करताना प्रकाश आंबेडकर यांच्या विचारांची आणि राजकारणाची कास धरली. त्यांचा अनुभव आणि निरीक्षण प्रकाश आंबेडकर हे व्यापक राजकारण करतात असे आहेत. त्यांनी त्यांची राजकारणातील भूमिका स्पष्ट करण्यासाठी गजानन माधव मुक्तिबोध आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार दिले आहेत. त्यांना प्रत्येक व्यक्तीचे मत हे राजकीय असते ही भूमिका मान्य आहे. त्यांनी आंबेडकरी पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून संपूर्ण जिल्हाभर संपर्क ठेवला. कार्यकर्ते जोडले. त्यांचे प्रशिक्षण घेतले. विविध निवडणुका जवळून पाहिल्या आणि स्वतःही निवडणुकीच्या राजकारणाचा अनुभव घेतला. त्यात त्यांना यश आले नसले तरी त्यातून त्यांना बरेच काही अनुभवण्यासशिकण्यास मिळाले.

त्यांनी देवळाली विधानसभा मतदार संघातील निवडणुकीसंबंधीचा अनुभव विस्ताराने मांडला आहे. त्यांनी त्या मतदार संघातील मतदारत्यांची जातीय मानसिकता आणि अनुसूचित जातीसाठी आरक्षित असणाऱ्या त्या एकमेव मतदार संघातील उमेदवारीसाठी चाललेली दलित पुढाऱ्यांची चढाओढ यांचे वर्णन तपशिलात केले आहे. ते कार्यकर्त्यांच्या मानसिकतेची झाडाझडती त्यासंबंधात घेतात. तो मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर, भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर भिकचंद दोंदे हे एकमेव बौद्ध आमदार विजयी झाले. तो अपवाद वगळता नवबौद्ध उमेदवार तेथून विजयी होऊ शकलेला नाही. पुढील काळात तर बौद्ध उमेदवाराला तेथे बाजूला ठेवलेले दिसून येते. त्याविषयी जाधव यांचे निरीक्षण वाचण्यासारखे आहे. त्यांनी त्यांच्या विवेचनात आंबेडकरी राजकारणाचे ताणेबाणे मांडले आहेत. त्या ओघात दलितांच्या सामाजिक चळवळी आणि राजकारण यांची चर्चा केलेली दिसून येते. ती चर्चा संदर्भासाठी येत असली, तरी मला त्या पुस्तकाचे ते सौष्ठव वाटते. पुस्तकात दलित चळवळींसंबंधी अनेक दुर्मीळ संदर्भ जागोजागी आलेले आहेत. गोपाळबाबा वलंगकरछत्रपती शाहू महाराजबाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रातील दुर्मीळ प्रसंगांचे दाखले पुस्तकात दिलेले आहेत. त्या संदर्भांमुळे संघर्ष वाटा’ हे पुस्तक म्हणजे सामाजिक चळवळीचाही पट होतो.

        संघर्ष वाटामध्ये अनेक व्यक्ती वाचकाला भेटतात. लेखकाने त्या व्यक्तींची खासीयतत्यांच्या बाबतचे अनुभव पुस्तकात नोंदले आहेत. त्यात नारायण सुर्वेयशवंत मनोहर अशा कविवर्यांबाबतच्या नोंदी आहेत. शांताबाई दाणी यांच्या जीवनकार्याविषयीची आस्था लेखनातून प्रकट झाली आहे. लेखकाने ते बाबासाहेब आंबेडकर ज्ञानविकास केंद्र’ या संस्थेशी कसे जोडले गेले त्याचा अनुभव लिहिला आहे. लेखकाने करुणासागर पगारेयुवराज बावा यांच्याविषयीचे चळवळीतील कार्यकर्ते म्हणून अनुभव व निरीक्षणे मांडली आहेत. जाधव यांनी त्यांना भेटलेल्या कार्यकर्त्यांविषयीही कृतज्ञताभाव ठेवून लिहिले आहे.

शांताबाई दाणी, व्यंकटअण्णा रणधीर, सावित्रीबाई रणधीर

 

जाधव यांनी वृत्तपत्र आणि साहित्य या, चळवळीच्या दोन्ही साधनांचा उपयोग केलेला आहे. त्यांनी शांतिपर्व’ हे मासिक पदरमोड करून चालवले आणि महाराष्ट्रभर पोचवले. त्यांनी ललित लेखनाचा अनुभवही त्याच वेळी घेतला. त्यातून कथाआत्मकथाकवितासंक्षिप्त चरित्र या वाङ्मय प्रकारांतील लेखन केले. त्यांनी कथा प्रश्नांच्या’ लिहिल्या. ‘निखाऱ्यांचा उठाव’ हा त्यांचा कवितासंग्रह. त्यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाडकर्मयोगिनी शांताबाई दाणी यांच्याविषयी पुस्तिका लिहून प्रसिद्ध केल्या. त्याच वेळी ‘धडपड सालदाराच्या पोराची’ हे आत्मकथनही प्रसिद्ध केले. जाधव यांनी साहित्याची व्याख्या ‘आपण जे बोलतोलिहून काढतोत्यातून समाजामध्ये बदल घडू शकतोअशा सर्व मौखिक आणि लिखित गोष्टींना साहित्य म्हटले जाते’ अशी केली आहे. त्यांनी सांगितलेले प्रयोजन- साहित्यनिर्मिती ही समाज परिवर्तनासाठी आणि सामाजिक चळवळीसाठी असते, हे ‘संघर्ष वाटा’ वाचत असताना प्रचितीस येते. त्यामुळे ते विविध साहित्य संमेलनांमध्ये सहभागी होतात आणि त्यांचा साहित्यविचार आग्रहाने मांडत राहतात.

लेखकाच्या निवेदनात सहजता आहे. लेखकाने स्वतःचे दृष्टिकोन कोणतीच लपवाछपवी न करता मांडले आहेत.

संपर्क – संजय दामू जाधव 9689167222 shantiparv@gmail.com

शंकर बोऱ्हाडे 9226573791shankarborhade@gmail.com

शंकर बो-हाडे हे पिंपळगावनाशिक येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत. ते सिन्नर गावात साहित्य रसास्वाद‘ हे वाङ्मय मंडळ चालवतात. बो-हाडे हे राष्ट्र सेवा दलाचे सैनिक. बो-हाडे नामांतर चळवळीत सत्याग्रह करून शिक्षणावर तुळशीपत्र ठेवून जेलमध्ये गेले. ते परिवर्तनवादीदलित चळवळ व साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांनी पत्रकार जागृतिकार पाळेकर यांच्या साहित्याच्या संशोधनानिमित्ताने मराठी पत्रकारितेच्या इतिहासाचा अभ्यास केला. ते गेली तीन दशके नाशिकच्या वृत्तपत्रांतून लेखन करतात. त्यांची चार स्वतंत्र व दोन संपादित पुस्तके प्रसिध्द आहेत. त्यांची कार्यकर्ता लेखक अशी ओळख आहे.

———————————————————————————————————————————————-

——————————————————————————————————————————————————

About Post Author

Previous articleखिलाफत चळवळ आणि निजाम (Khilafat Movement & Nizam)
Next articleरामा राघोबा राणे चौक काश्मिरात ! (Rama Raghoba Rane Square in Kashmir ! So Surprising)
शंकर बो-हाडे हे पिंपळगाव, नाशिक येथील 'कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालया'त मराठीचे प्राध्यापक आहेत. ते सिन्नर गावात 'साहित्य रसास्वाद' हे वाङ्मय मंडळ चालवतात. बो-हाडे हे 'राष्ट्र सेवा दला'चे सैनिक. बो-हाडे नामांतर चळवळीत सत्याग्रह करून शिक्षणावर तुळशीपत्र ठेवून जेलमध्ये गेले. ते परिवर्तनवादी, दलित चळवळ व साहित्य याचे अभ्यासक आहेत. त्यांनी पत्रकार 'जागृति'कार पाळेकर यांच्या साहित्याच्या संशोधनानिमित्ताने मराठी पत्रकारितेच्या इतिहासाचा अभ्यास केला. ते गेली तीन दशके नाशिकच्या वृत्तपत्रातून लेखन करतात. त्यांनी लिहिलेला, 'ठाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'चे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षीय भाषणाची चिकित्सा करणारा लेख विशेष गाजला होता. त्यांची चार स्वतंत्र व दोन संपादित पुस्तके प्रसिध्द आहेत. त्यांची कार्यकर्ता लेखक अशी ओळख आहे. लेखकाचा दूरध्वनी 9226573791

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here