सी रामचंद्र
सी रामचंद्र हे हिंदी चित्रपटांमध्ये यशस्वी संगीत दिग्दर्शक होते. ते 1947 च्या फिल्म ‘शहनाई’पासून 1959 च्या ‘नवरंग’पर्यंत म्हणजे सुमारे बारा वर्षे कीर्तिशिखरावर होते. त्यांनी आरंभीच्या काळात संगीत दिलेला ‘अनारकली’ चित्रपटसुवर्णमहोत्सवी ठरला होता. त्याच विषयावरील ‘मुघले आझम’ हा चित्रपटसुद्धा पुढे सुवर्णमहोत्सवी ठरला. सी रामचंद्र यांचे पूर्ण नाव रामचंद्र नरहर चितळकर. ‘शहनाई’चित्रपटातील ‘आना मेरी जान संडे के संडे’ हे गाणे खूप प्रसिद्ध झाले. गजानन जहागीरदार यांस वाटले होते, की ते कोणी मद्रासी संगीत दिग्दर्शक असावेत. त्यांनी त्याबद्दल दस्तुरखुद्द सी रामचंद्र यांनाच विचारले. तेव्हा उलगडा झाला. सी रामचंद्र गातही चांगले असत. त्यांचा आवाज तलत महमूदसारखा होता. ‘आझाद’ चित्रपटात ‘कितना हसीन है मौसम, कितना हसीन सफर है’ हे गीत तलत महमूद गाणार होता, पण तो येऊ शकला नाही. म्हणून सी रामचंद्र यांनी ते गीत लता मंगेशकर यांच्या बरोबर गायले. पुढे, ती जोडी ‘ए मेरे वतनके लोगों’ या गाण्यासाठी एकत्र आली ती संगीत दिग्दर्शक व गायिका म्हणून. त्यांनी ते देशभक्तीपर गीत दिले. त्यावर जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचे कौतुक केले. जवाहरलाल नेहरूयांच्या घरी त्यांना बोलवण्यात आले होते आणि इंदिरा गांधी यांनी सी रामचंद्र यांचे स्वागत केले होते. ते गाणे अजरामर आहे.
‘सी रामचंद्र’ हे संक्षिप्त नाव त्यांनी सिनेदिग्दर्शक व्ही शांताराम ह्यांच्या सूचनेवरून धारण केले. ते त्यांच्या निकटवर्तियांत ‘अण्णा’ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी संगीतदिग्दर्शन व पार्श्वगायन आर. एन. चितळकर, श्यामू, राम चितळकर, सी रामचंद्र, अण्णासाहेब अशा विविध नावांनी केले. त्यांचा जन्म पुणतांब्याचा (जिल्हा अहमदनगर). पुणतांब्याजवळील चितळी हे त्यांच्या घराण्याचे मूळ गाव. त्यांचे वडील नागपूरला स्टेशन मास्तर होते. त्यांच्या वडिलांची ठिकठिकाणी बदली होत असल्यामुळे त्यांचे बालपण डोंगरगड, नागपूर, विलासपूर, गोंदिया अशा निरनिराळ्या ठिकाणी गेले. त्यांना शालेय शिक्षणात स्वारस्य नव्हते; पण संगीताची आवड लहानपणापासून होती. त्यांना त्यांचा गाण्याचा शौक पाहून नागपूरच्या ‘श्रीराम संगीत विद्यालया’त ‘टाकले’ होते. शंकरराव सप्रे हे त्या विद्यालयाचे प्रमुख होते. वसंतराव देशपांडे हे त्यांचे गुरुबंधू होते. व्ही शांताराम यांचे संगीत दिग्दर्शक वसंत देसाई होतेच, पण त्यांच्या काही बोलपटांना सी रामचंद्र यांनी संगीत दिले आहे. ‘सुबहका तारा’, ‘नवरंग’ हे व्ही शांताराम यांचे सी रामचंद्र यांनी संगीत दिलेले चित्रपट. ‘नवरंग’ या चित्रपटात आशा भोसले आणि चितळकर यांचे एक गीत आहे. चितळकर यांनी त्या गीतातील गद्य भाग मोठ्या कुशलतेने सांभाळला होता.
सी रामचंद्र यांचे संगीत दिग्दर्शनातील अष्टपैलुत्व आश्चर्यकारक आहे. त्यांनी विनोदी गाणी दिली,पाश्चात्य संगीतावर आधारित गाणी दिली, कव्वाली दिली, हिंदुस्थानी संगीत दिले. विनोदी गाण्यांमध्ये ‘मेरे पिया गये है रंगून जहां किया हैं टेलिफून…’, ‘ए दिलवालों, दिलका लगाना, अछा है, पर कभी कभी…’ (पतंगा 1949), शाम ढले, खिडकी तले… (1951, अलबेला). पाश्चात्य संगीताधारित ‘शोला जो भडके…’ (अलबेला- 1951) ‘मिस्टर जॉन’(बारिश- 1957), इना मीना डिका… (आशा- 1957), गोरे गोरे, ओह बांके छोरे… (समाधी-1950), ‘आना मेरी जान संडे के संडे’ ही गाणी अफाट गाजली. हिंदुस्थानी संगीत– ये जिंदगी उसीकी है (अनारकली 1953), जब दिलको सताये गंम (सरगम 1952), ठुमरी– ‘कैसे जाऊ जमुना के’ (देवता 1956), कव्वाली – ‘मरना भी मोहोब्बत मैं किसी काम ना आया’ (आझाद 1955) ही गाणी गाजली. वसंत देसाई म्हणतात, सी रामचंद्र यांनीच पाश्चात्य संगीत प्रथम चित्रपटात आणले.
सी रामचंद्र यांनी काही मराठी, तमिळ, तेलुगू व भोजपुरी चित्रपटांनाही संगीत दिले आहे. सुरुवातीच्या काळात, त्यांनी आर.एन.चितळकर या नावाने काही मराठी चित्रपटांत भूमिका केल्या व गाणीही गायली. त्यांनी ‘धनंजय’ व ‘घरकुल’ या मराठी चित्रपटांना संगीत 1960 च्या दशकात दिले व त्यांत प्रमुख भूमिकाही केल्या. ‘घरकुल’ चित्रपटाची निर्मिती सी रामचंद्र यांनीच केली होती. ‘घरकुल’मधील विशेषत: ‘पप्पा सांगा कुणाचे’ व ‘मलमली तारुण्य माझे’ ही गाणी लोकप्रिय झाली. जुन्या होतकरू कलाकारांना एकत्र आणून सी रामचंद्र यांनीच स्वरसाज चढवलेल्या सदाबहार गीतरचनांवर आधारित ‘भूलाये ना बने’ ह्या विलोभनीय कार्यक्रमाची निर्मिती केली. त्यांनी ‘गीतरामायणा’च्या धर्तीवर ‘गीतगोविंद’ हा प्रयोग ग.दि.माडगूळकर यांच्याबरोबर करून पाहिला.
सी रामचंद्र यांनी ‘माझ्या जीवनाची सरगम’ हे आत्मचरित्र लिहिले आहे (1977). सी रामचंद्र यांचे निधन 1982 मध्ये मुंबई येथे झाले.
(छायाचित्रे – इंटरनेटवरून साभार.)
– वसंत केळकर 9969533146 vasantkelkar@hotmail.com
वसंत केळकर हे नागपूरचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण पटवर्धन हायस्कूलमध्ये झाले. ते विज्ञान महाविद्यालय, नागपूर येथून फिजिक्स विषयात एम एससी झाले. ते भारतीय डाक सेवा या शासकीय सेवेत 1966 ते 2001 पर्यंत होते. ते बंगलोर येथून मुख्य पोस्टमास्तर जनरल या पदावरून सेवानिवृत्त 2001 साली झाले. त्यांनी आवड म्हणून जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, दिल्ली येथे फ्रेंच आणि इतिहास या विषयांचा अभ्यास केला आहे.
———————————————————————————————————-
छान माहिती, धन्यवाद
सी.रामचंद्र म्हटले की ऐ मेरे वतन के लोगो आठवते.माहीतीपुर्ण लेख आहे.
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
छान माहीती.
सी.रामचंद्र यांनी 110 हिंदी सह 5 मराठी चित्रपटाना संगीत दिले 1. छत्रपती शिवाजी (1952 ) 2. चूल आणि मूल, 3. संत निवृत्ती संत ज्ञानदेव, 4.धनंजय 5. घरकूल
संत निवृत्ती ज्ञानदेव असे वाचावे
माहितीपूर्ण लेख.आणि सुंदर असा अविस्मरणीय फोटो…!👌