Home वैभव ग्रामदेवता श्रीयोगेश्वरी (अंबाजोगाई) : योगमार्गातील शक्तिपीठ

श्रीयोगेश्वरी (अंबाजोगाई) : योगमार्गातील शक्तिपीठ

अंबाजोगाईची श्री योगेश्वरी ही महाराष्ट्रीय देवी भक्तांची श्रद्धेय देवता आहे. ती बहुसंख्य चित्पावन घराण्यांची कुलस्वामिनी कुलदेवताही आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचे स्थान महाराष्ट्रात तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. ते अनेक संतांचे वसतिस्थान आहे. ते शहर जैनधर्मीय राजा जैत्रपाल याच्या राजधानीचे शहर होते. त्यामुळे त्या गावाला वैभवशाली इतिहासही आहे. अंबाजोगाई शहराची वस्ती जयंती नदीच्या दोन्ही तीरांवर आहे.

तीर्थाबाबतची गोष्ट अशी आहे, की अंबाजोगाईपासून दहा मैलांवर, वर्दापूर येथे दुष्ट राक्षस राहत होता. त्याचे नाव दंतासुर. त्याने साधुसत्पुरुषांचा छळ मांडला आणि यज्ञयागांचा विध्वंस सुरू केला. त्याच्या अत्याचाराला कंटाळून तेथील भक्तांनी शक्तिदेवतेची आराधना केली.

देवीं भक्तजनप्रियां सुवदनां खड्गञ्च पात्रं तथा
स्वर्णालंकृतलांगलं समुसलं हस्तैर्दधानां श्रियम् ।
विद्युत्कोटिरवीन्दुकान्तिविमलां दन्तासुरोन्मूलिनीम् ।
ब्रहद्राद्यभिर्वदितां च वरदां ‘योगेश्वरी’ संभजे ।।

भगवती आदिशक्ती नारायणीने मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला सगुण रूप धारण केले व दंतासुराला ठार मारले. भक्तांना अभय दिले. भक्तजनांनी मातेला प्रार्थना केली, ‘हे महन्मंगले, तू सदैव आमच्या सन्निध असावेस.’ म्हणून जगदंबेने तेथे राहण्याचे आश्वासन दिले. देवी ज्या ठिकाणी साकार झाली, तेथेच भक्तांनी तिचे मंदिर बांधले.

देवीची स्थापना दहाव्या-अकराव्या शतकाच्या दरम्यान झाली असावी असे गावात असलेल्या सात शिलालेखांवरून समजते. योगेश्वरीचे मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराची रचना हेमाडपंथी, दोन परकोटांची आहे. प्रवेश करण्यासाठी दक्षिणेला विस्तीर्ण महाद्वार व ध्वजस्तंभ आहे. तेथे नगारखान्याची व्यवस्था आहे. प्रवेश करताच समोर तुळशीवृंदावन दिसते. पाण्याची सुविधा आहे. ध्यानधारणा, लेखनाभ्यास, पारायण करण्यासाठी अनेक ओवऱ्या बांधलेल्या आहेत. तेथे साधुसंत उपासनेकरता येत व राहत. योगेश्वरी मंदिरात ‘मोराची ओवरी’ आहे, तेथे बसून कृष्ण दयार्णव यांनी त्यांचा प्रसिद्ध ‘हरिवरदा’ हा भलामोठा ग्रंथ शब्दबद्ध केला. पूर्व व उत्तर महाद्वारांसमोर दीपमाळा आहेत. तेथेच आत योगेश्वरीचे दर्शन होते.

योगेश्वरी देवीची मूर्ती तांदळा स्वरूपाची आहे. तो तांदळा तीन फूट उंच व दोन फूट रुंद आहे- तो चार फूट उंचीच्या चौथऱ्यावर विराजमान आहे. तो ॐकार स्वरूपात आहे. शेंदूरचर्चित आहे. मातेची स्फटिकयुक्त नजर भक्तावर कृपाकटाक्ष टाकत असल्याचा भास होऊ शकतो. भालप्रदेशावरचे पिंपळपान, त्याच्या खालील चंद्रकोर, त्यावरील लालभडक कुंकुमतिलक. मस्तकावर चांदीतील केवड्याची वेणी. कानांची शोभा वाढवणारी मत्स्यभूषणे. डोईवर मुगुट व छत्रचामरे. ते दर्शन नयनमनोहर पण सामर्थ्यवान व मांगल्यदायक असे आहे. देवीपुढे दोन मोठ्या समया तेवत असतात.

मंदिरात महाकाली व तुळजाभवानी यांचेही दर्शन होते. तेथील गर्भागाराचे काम नाजूक व प्रमाणबद्ध असे कोरीव आहे. मध्यभागी घंटा आहे. घंटेभोवती भाविकांनी नवसाचे पाळणे व नारळाची तोरणे बांधलेली दिसतात. सभामंडपात विघ्नहर्ता गणपती व केशवराज आहेत. देवीची भोगमूर्ती तेथे आहेच.

बाहेर भलेमोठे होमकुंड आहे. तेथे शतचंडीचे हवन वेळोवेळी होत असते. तेथून पुढे देवीच्या स्नानासाठी केलेली योजना म्हणून ‘सर्वेश्वर’ व पश्चिमद्वाराशी ‘मायामोचन’ अशी तीर्थेही आहेत. संरक्षणासाठी म्हणून पश्चिमेस ‘रुद्रभैरव’ व ‘महारुद्र’ अशी दोन मंदिरे आहेत.

योगेश्वरीचा अवतारदिवस म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा ! त्यानिमित्त मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला घटस्थापना होते व पौर्णिमेला शतचंडी हवनाची पूर्णाहुती होते. म्हणूनच म्हणतात, ‘मासानां मार्गशीर्षोऽहम् !’ तीन फूट उंच व दोन फूट रुंद अशा भव्य तांदळारूपी आदिमायेला साडी-चोळी नेसवणे हे काम कौशल्याचे आहे. ते देवीचे पुजारी आत्मीयतेने करतात. शहात्तर पुतळ्यांची चंद्रमाळ त्यावेळी घातली जाते. आदिमाता चांदीच्या मखरात विराजमान आहे. पादुका चांदीच्या आहेत. अभिषेकादि धार्मिक विधी त्या पादुकांवरच केले जातात. मातुश्री तांबूलभक्षण नैवेद्यानंतर दुपारी तीन वाजता करतात. कुटलेल्या विड्याचा तो प्रसाद भक्तांनाही दिला जातो.

योगी लोकांची ईश्वरी ती योगेश्वरी किंवा ईश्वराशी जीवाचा संयोग करणारी शक्ती ती योगेश्वरी. अंबाजोगाई या शहराचे नाव पूर्वी ‘आम्रपूर’ असल्याचा उल्लेख बन्सीलाल बागेतील शिलालेखावर आहे.

योगमार्गाला नाथपरंपरेत फार महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी सहाव्या अध्यायात नाथपंथीय योगमार्गाचा उल्लेख केलेला आहे. मत्स्येंद्रनाथ व गोरक्षनाथ या गुरुशिष्यांप्रमाणे, रघुनाथ व मुकुंदराज ह्या गुरुशिष्यांच्या जोडीने आदिनाथ-हरिनाथ परंपरेच्या तत्त्वविचारांचे प्रतिपादन आजीवन केले. त्यांचे कार्यक्षेत्र विदर्भातच विस्तारलेले होते असे नव्हे, तर त्यांच्या विचारांचे लोण मराठवाड्यात अंबाजोगाईपर्यंत पोचले होते. मुकुंदराजांची समाधी त्याची साक्ष देते. तो काळ म्हणजे अकरावे आणि बारावे शतक यांच्या मध्यातील. सिंघण यादवांचा सेनापती खोलेश्वर याने त्याचे सैन्यदल तेथे ठेवले. मंदिराचा जीर्णोद्धार 1720 मध्ये नागोजी त्रिमल व श्यामजी बापूजी यांनी केला. सभामंडप 1800 च्या सुमारास पूर्ण झाला. मंदिरावर कळसही तेव्हाच विराजमान झाला.

योगेश्वरीची ‘जोगेश्वरी’ कशी झाली? जसे ‘योगी’ लोकांचे ‘जोगी’ झाले तशी. जोगी कोण? ‘अल्लखनिरंजन !’ म्हणून त्रिशूल आपटणारे, कटोरा पुढे करणारे, दंडात व गळ्यात रुद्राक्ष धारण करणारे, काळे गंडे बांधणारे असे नाथपंथीय; हेच ते जोगी. योगमार्गाची साधना करताना साधकाला काही सिद्धी प्राप्त होतात. त्या सिद्धींच्या मोहात न अडकता मोक्ष प्राप्त करणारे ते अवधूतपंथी श्रेष्ठ योगी व जे सिद्धींच्या मोहात, मायाजालात अडकतात ते जोगी. अशा सिद्धीमुळे किमयागार झालेल्या- तांब्याचे सोने करणाऱ्या विश्वनाथ जोग्याचा उल्लेख ‘लीळाचरित्रा’त आहे. नाथपंथीय हे जोगलदेवी व कृष्ण यांचे उपासक होत.

कुंडलिनीचे उत्थापन करून पिंडस्थ शिवाशी समरस होण्याकरता नाथपंथीय साधू तंत्र व योग यांचा अवलंब करतात. मार्ग दोन असले तरी आराध्यदैवत एकच व ते म्हणजे ‘आदिमाता’ ! तिला कोणी योगेश्वरी म्हणो, कोणी जोगेश्वरी म्हणो. कोणी तिला जगदंबा, महालक्ष्मी, नारायणी असेही म्हणतात. भगवान शंकराच्या तेजापासून निघालेली शक्ती म्हणजेच योगेश्वरी असेसुद्धा कोणी मानतात. काहींचे मत असे आहे, की ‘पार्वतीच्या शक्तिअंशाने उत्पन्न झाल्यावर जगताला प्रकाशभूत होणाऱ्या आणि सर्व देवी-देवतांमध्ये अंतर्भूत असलेल्या पंचभौतिक परमाणुयुक्त चैतन्यशक्तीला ‘योगिनी’ असे म्हणतात. योगिनींमध्ये मुख्य व योगिनींवर आधिपत्य करणारी देवता ती ‘योगेश्वरी’ होय. अंबाजोगाई येथे योगमायेच्या नाभिस्थानाची पूजा होते असे म्हणतात.

अंबाजोगाई ही कोकणस्थांची कुलदेवता. मग ती देशावर कशी काय? त्या प्रश्नाबाबतची एक आख्यायिका आहे. श्री महर्षी परशुराम हे शाप देण्यात व शरसंधानात प्रवीण असणारे. ते चित्पावनांचे आदिपुरुष. ते कोकणात वास्तव्यास असताना त्यांच्यासमोर सागरातून चौदा प्रेते वाहत आली. परशुरामांनी त्यांना बाहेर काढले व त्यांच्या स्वत:च्या योग-सामर्थ्याने त्यांना जिवंतही केले. परशुरामांनी त्यांच्यासाठी मुली पाहण्यास सुरुवात केली, पण त्यांना मुली कोणी देईनात. कारण ते एकदा मृत झाले होते व पुन्हा जिवंत केले गेले आहेत, याची कुणकुण सर्वांना लागली होती. तेव्हा परशुराम त्या तरुणांना घेऊन देशावर आले.

परशुराम त्या सर्व तरुणांना घेऊन अंबानगरीत, आम्रपुरात आले. परशुरामांनी त्यांचा तेथे येण्याचा हेतू कथन केला तेव्हा ग्रामस्थांनी अट घातली, की “आम्ही यांना जावई करून घेऊ, पण ह्या योगेश्वरीला त्यांनी त्यांचे कुलदैवत मानले पाहिजे.” परशुरामांनी ती अट मान्य केली व स्वतः कुवारीण असलेल्या जोगेश्वरीसमोर सर्व विवाह थाटामाटात पार पाडले ! लग्नाचे सर्व वऱ्हाड कोकणात वाजतगाजत परत गेले व कुटुंबकबिल्यासकट दरवर्षी कुलदेवतेच्या दर्शनासाठी अंबाजोगाईला येऊ लागले ! अशा तऱ्हेने ती कोकणस्थांची कुलदेवता झाली.

आदिमाता कुमारी का राहिली याविषयीही मजेदार कथा सांगितली जाते. योगेश्वरी ही मूळ कोकणची. तिचा विवाह परळीच्या वैजनाथाशी ठरला. पूर्वी विवाहाला वधूकडे वराने जावे असा प्रघात होता, पण वैजनाथाने स्पष्ट केले, की विवाह परळीलाच होईल. त्यामुळे वऱ्हाड नवऱ्या मुलीला घेऊन कोकणातून निघाले व मजल दरमजल करत जयंती नदीकाठी म्हणजे परळीपासून सुमारे पंधरा मैलांवर येऊन पोचले. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळचा विवाहमुहूर्त होता. योगी लोक त्या ब्राह्ममुहूर्तालाच पवित्र मानतात. सर्व मंडळी उठली व लग्नासाठी सज्ज झाली, पण योगेश्वरी उठली नाही- झोपूनच राहिली. तिने उठल्यावरही भराभरा आवरावे ना ! पण तिच्या मनात वैजनाथाशी लग्नच करण्याचे नव्हते, म्हणून ती साजशृंगार अतिशय थंडपणाने करू लागली. अखेरीस इतका उशीर झाला, की मुहूर्त टळून गेला ! लग्न रहित झाले ! योगच नव्हता त्या विवाहाचा !! योगेश्वरी म्हणाली, “मी आता येथेच मुक्काम करणार, येथून कोठेही जाणार नाही.” तिचे वास्तव्य जेथे झाले ते अंबाजोगाई गाव ! बाकीचे वऱ्हाडी थोडे लांब राहिले. ते जेथे राहिले तेच गाव ‘जोगाईचे माहेर’ या नावाने प्रसिद्ध झाले !

लेखक रा.चिं. ढेरे यांच्या लज्जागौरी पुस्तकाआधारे योगेश्वरीच्या कुमारी असण्यासंदर्भात जरा व्यापक अर्थ लावता येतो. योगेश्वरी ही जरी कालभैरवाची जोडीदारीण समजली जाते तरी अंबाजोगाईची देवी योगेश्वरी ही कुमारी आहे. ढेरे ‘लज्जागौरी’ या पुस्तकात म्हणतात, की जगन्माता ही कुमारी मानली जाते आणि लज्जागौरी, लंजा अथवा लंजिका या वेगवेगळ्या नावांच्या असणाऱ्या देवी ही सर्जनाची अधिष्ठात्री देवता म्हणून प्रागैतिहासिक काळापासून पूजली जात आहे. तिच्या स्वरूप-संकल्पनेतून पुढे आदिशक्तीची नाना रूपे उत्क्रांत होत राहिली; ‘लंजा’ हे तिचे मूळ रूप. ते मूळ रूप लोकधर्मात अवशिष्ट राहिले आहे. लंजा हे गौरीचेच एक रूप आहे. तिला प्रतिष्ठा देण्याच्या हेतूने ‘लंजागौरी’ (लज्जागौरी) असे म्हटले जाऊ लागले. ‘लंजा’ आणि ‘लंका’ हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत. आणि ‘गौरी’ व ‘पार्वती’ ही दोन्ही शिवपत्नीची नावे आहेत.

– वसुधा परांजपे (020) 24471109
(या लेखासंबंधात अधिक माहिती कोणाकडे असेल तर ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’कडे जरूर पाठवावी. लेखिका वसुधा परांजपे यांच्याशी संपर्क होत नाही.)
——————————————————————————————-

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version