‘श्यामची आई’ पुस्‍तकाची जन्मकथा

12
117
'श्‍यामची आई'
'श्‍यामची आई'

‘श्‍यामची आई’ : जिव्हाळा, प्रेम आणि कृतज्ञता

 ‘श्‍यामची आई’ या पुस्तकाला ७७ वर्षे झाली तरी त्याची क्रेझ अजून तितकीच आहे. साने गुरुजींनी स्वत:च्या हृदयातील जिव्हाळा त्यात ओतलेला आहे. आईच्या प्रेमाचा सुगंध त्या कथेतून दरवळत आहे. श्यामला वाटत असलेली आईबद्दलची कृतज्ञता, तिच्या विषयी असलेली भक्ती ‘श्यामची आई’ पुस्तकात मांडलेली आहे. तीच भावना आपल्या मनाच्या कोपऱ्यात असलेल्या ‘आई’विषयीच्या भावनांना साद घालते. म्हणूनच हे पुस्तक आजही पहिली पसंती आहे. 

 ‘श्यामची आई’च्या पहिल्या आवृत्तीवर प्रसिद्धीची तारीख दासनवमी शके १८५७ अशी छापलेली असल्याने ती आवृत्ती १९३५ साली प्रकाशित झाली, असा अंदाज केला जातो आणि तोच गृहीत धरला जातो. अनाथ विद्यार्थी गृह (सध्याचे पुणे विद्यार्थी गृह) यांनी दुसरी आवृत्ती प्रकाशित केल्यावर पहिल्या आवृत्तीच्या प्रसिद्धीचे साल १९३५ असेच छापले. ते अजूनही तसेच छापले जाते. खरी गोष्ट अशी आहे, की शके आणि इसवी सन या दोन कालगणनांमध्ये अठ्ठ्याहत्‍तर वर्षांचा फरक असतो. पण ‘शके’ ही भारतीय कालगणना असल्याने त्याच्या वर्षाची सुरुवात चैत्र प्रतिपदेपासून म्हणजे इंग्रजी महिन्यानुसार मार्च-एप्रिलमध्ये होते. त्यामुळे ‘शके’च्या सालामध्ये इंग्रजी महिन्यांचा मार्च-एप्रिल ते मार्च-एप्रिल हा काळ येतो. मग साने गुरुजींची पुतणी सुधा बोडा यांनी दासनवमी शके १८५७ चे इसवी सनामध्ये अचूक वार, तारीख, महिना आणि साल काय येईल, याचा बराच शोध घेतला. त्यांनी जुन्या पंचांग तज्ज्ञांकडून सारे पडताळून घेतले, तेव्हा ‘श्यामची आई’च्या प्रसिद्धीची अचूक तारीख १६ फेब्रुवारी १९३६ आहे, हे सिद्ध झाले. त्यामुळे २०११ हे वर्ष ‘श्यामची आई’चे अमृतमहोत्सवी वर्ष होते.

 साने गुरुजींनी चांगल्या पुस्तकाची व्याख्या ‘पुस्तक म्हणजे ज्यातून स्वत:ला साठवावे, आठवावे आणि वाटावेही’ अशी केली आहे. ती त्यांच्या सर्व लेखनाला लागू पडते. त्यातही गुरुजींचे सर्वांत आवडते पुस्तक आहे, ‘श्यामची आई.’ त्या पुस्तकाला तर ती व्याख्या अगदी समर्पक आणि यथायोग्य वाटते.

  साने गुरुजींनी त्यांच्या उत्तर आयुष्यातील १९३० ते १९५० या वीस वर्षांपैकी तब्बल सहा वर्षे सहा महिने हा काळ धुळे , नाशिक, जळगाव आणि येरवडा येथील तुरुंगांत काढला. त्याच काळात त्यांनी बरेचसे लेखन केले. गुरुजी नाशिकच्या तुरुंगात १७ जानेवारी १९३२ ते ऑक्टोबर १९३३ हे एकवीस महिने होते. त्यांनी तिथेच आपल्या सहकार्‍यांना दररोज रात्री आईच्या आठवणी सांगितल्या. मग त्यांनी सहकार्‍यांच्या आग्रहावरून त्या लिहून काढल्या. ते पुस्तक म्हणजे ‘श्यामची आई’. या पुस्तकातील छत्तीस रात्री साने गुरुजींनी ९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी १९३३ या पाच दिवसांतल्या चार रात्रींत लिहून काढल्या. उरलेल्या नऊ रात्री मात्र त्यांनी तुरुंगातून सुटका झाल्यावर लिहिल्या. त्यांनी पुस्तक करताना मात्र त्यातील तीन रात्री वगळून फक्त बेचाळीस रात्रींचेच पुस्तक केले. त्या तीन रात्रींमध्ये कोणत्या आठवणी होत्या हा प्रश्न कुतूहलाचा आणि औत्सुक्याचा आहे. पण त्याविषयी गुरुजींनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत आणि इतरत्रही काही खुलासा केलेला नाही.

 साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ पुस्तक तुरुंगात असताना लिहिलेसाने गुरुजींचे नाव पांडुरंग असले तरी त्यांचे घरगुती नाव पंढरीनाथ असे होते. त्यांना स्वत:ला मात्र ‘राम’ हे नाव अधिक आवडत असे. पुढे, ‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहिताना गुरुजींनी ‘श्याम’ हे नाव घेतले. कारण त्यांच्या आईचे नाव ‘यशोदा’ होते. ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव यांनी त्याविषयी एके ठिकाणी नमूद केले आहे. पुढे ‘श्याम’ या नावानेच गुरुजींनी इतरही काही लेखन केले.

 ‘श्यामची आई’चे हस्तलिखित साठ-सत्तर लोकांनी वाचले, ऐकले असे साने गुरुजींनीच लिहिलेले आहे. त्यातले एक होते यशवंतराव चव्हाण. दयार्णव कोपर्डेकर यांचा गुरुजींशी चांगला परिचय होता. साने गुरुजींनी कोपर्डेकरांचे लग्न ठरवले होते. कोपर्डेकर आणि यशवंतराव चव्हाण हे शालेय मित्र. कोपर्डेकरांनी चव्हाणांची साने गुरुजींशी ओळख करून दिली होती. दयार्णव कोपर्डेकर ‘सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला’च्या प्रचारासाठी फिरते विक्रेते म्हणून काम करत होते. त्यांनी जळगाव, इंदूर, देवास, उज्जैन, रतलाम, बडोदे, सोलापूर, अकोला, अमरावती अशा अनेक ठिकाणी फिरून पुस्तकांची विक्री केली होती. साने गुरुजींची इच्छा त्यांचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक कोपर्डेकरांनी प्रकाशित करावे, अशी होती. त्यामुळे त्यांनी हस्तलिखिताच्या वह्या कोपर्डेकरांकडे दिल्या. त्या त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना, ‘हे पुस्तक प्रकाशित करावे का?’ यासाठी वाचायला दिल्या. त्याविषयी चव्हाणांनी लिहिले आहे, “श्यामची आई’ वाचत असताना अनेक वेळा माझे डोळे पाणावून आले… साने गुरुजींचे प्रत्येक वाक्य भावनेने ओथंबून गेलेले व आईच्या प्रेमाने ओसंडून चाललेले होते.’’ चव्हाणांनी कोपर्डेकरांना ते पुस्तक त्वरेने प्रकाशित करण्याची सूचना केली, पण कोपर्डेकरांना ते काही कारणाने शक्य झाले नाही.

 मग, ‘श्यामच्या आई’ची पहिली आवृत्ती अमळनेरच्या जगन्नाथ गोपाळ गोखले यांनी प्रकाशित केली. त्यावर दासनवमी, शके १८५७ असा उल्लेख आहे. किंमत आहे एक रुपया.  पुस्तकाचे मुखपृष्ठ गुरुजींच्या नागेश पिंगळे या विद्यार्थ्यांने तयार केले आहे. त्या पुस्तकावर मात्र पां. स. साने असा उल्लेख आहे.  पुस्तक अमळनेरहून प्रकाशित झाले असले तरी त्याची छपाई पुण्यातल्या लोकसंग्रह छापखान्यात झाली. ‘श्यामची आई’ प्रकाशित झाल्यावर काही महिन्यांनी गुरुजींच्या ‘पत्री’ या कवितासंग्रहावर इंग्रज सरकारने बंदी आणली. तो संग्रह पुण्याच्या अनाथ विद्यार्थी गृहाच्या मालकीच्या लोकसंग्रह छापखान्याने छापला होता. त्यामुळे त्यांच्याकडे इंग्रज सरकारने दोन हजार रुपयांचा जामीन मागितला, तो त्यांनी भरला. पण, साने गुरुजींना त्यांच्यामुळे गरीब विद्यार्थ्यांसाठी काम करणार्‍या संस्थेला नाहक भुर्दंड बसला, याचे फार वाईट वाटले. त्यामुळे त्यांनी ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे सर्व हक्क पाचशे रुपयांमध्ये अनाथ विद्यार्थी गृहाला देऊन टाकले.

साने गुरुजी  त्यासंबंधी १६ ऑक्टोबर १९३६ रोजी झालेला हा करार मोठा मजेशीर आहे. अनाथ विद्यार्थी गृहाने गुरुजींना पुस्तकावर दहा टक्के मानधन देण्याची तयारी दाखवली होती, पण ते त्यांना नको होते. म्हणून मग गुरुजींना कराराच्या आधी पन्नास रुपये आणि करार झाल्यानंतर उरलेले साडेचारशे रुपये दिले. पण, त्याच वेळी संस्थेला देणगी म्हणून गुरुजींकडून शंभर रुपये घेण्यात आले. म्हणजे त्यांच्या हातात अवघे चारशे रुपयेच पडले. त्या बदल्यात गुरुजींनी ‘श्यामच्या आई’चे तहहयात हक्क देऊन टाकले. त्यात भाषांतराच्या हक्काचाही समावेश होता. गुरुजी करार करून घरी आले खरे, पण त्यांना खूप वाईट वाटले. त्यांना त्यांचे अतिशय आवडते पुस्तक नाईलाजास्तव विकावे लागल्याची निराशा त्यांना लपवता आली नाही. ते हताशपणे सहकार्‍यांना म्हणाले, ‘आज मी माझ्या आईला विकून आलो.’

 मराठीमधले रांगा लावून लोकांनी विकत घेतलेले पहिले पुस्तक म्हणजे लोकमान्य टिळकांचे ‘गीतारहस्य.’ ‘गीतारहस्य’ विक्रीसाठी तयार असल्याची जाहिरात १५ जून १९१५च्या ‘केसरी’च्या अंकात प्रकाशित झाली. ती वाचून लोकांनी केसरी कार्यालयासमोर सकाळपासून रांगा लावल्या. ‘गीतारहस्य’ची दुसरी आवृत्ती सहा महिन्यांत प्रकाशित झाली. त्या ग्रंथाचे तेव्हापासून गेली पंचाण्णव वर्षे सातत्याने पुनर्मुद्रण होत आहे.

 विनोबा भावे यांनी १९३० मध्ये ‘गीताई’ लिहिले. ‘गीताई’च्या १९३२ पासून २०११ पर्यंत दोनशे चाळीस आवृत्ती निघाल्या, सुमारे चाळीस लाख प्रती विकल्या गेल्या. विनोबांनीही धुळ्याच्या तुरुंगात १९३२ मध्ये ‘गीता प्रवचने’ दिली, ती सानेगुरुजींनी लिहून घेतली. त्याचे पुस्तक १९४५ मध्ये प्रकाशित झाले. त्या पुस्तकाच्याही २०११ पर्यंत चाळीस आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत. शिवाय, देशी-परदेशी मिळून तेवीस भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्या सर्वांचा विचार केला तर त्या पुस्तकाच्या सुमारे पंचविसेक लाख प्रती विकल्या गेल्या आहेत.

 त्या तीन पुस्तकानंतर आवृत्ती, विक्री आणि प्रभाव या तिन्ही बाबतींत ‘श्यामची आई’चा नंबर लागतो. ‘श्यामची आई’च्या छप्पन आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत. त्याचा हिंदी अनुवाद १९४० मध्ये झाला. त्यानंतर दोन इंग्रजी अनुवाद झाले. त्यातला एक पुणे विद्यार्थी गृहाने प्रकाशित केला तर दुसरा भारतीय विद्या भवनने. त्याशिवाय कानडीमध्येही अनुवाद झाला. ‘चित्ररूप श्यामची आई’ ही कॉमिक्स आवृत्तीही प्रकाशित झाली. डॉ. मु. ब. शहा यांनी ‘संवादरूप श्यामची आई’ लिहिले तर प्रभाकर ठेंगडी यांनी ‘श्यामची आई’चे नाट्यरूपांतर केले.

साने गुरूजी यांचे ‘श्‍यामची आई’ हे पुस्‍तक वाचण्‍यासाठी येथे क्लिक करा.

राम जगताप
८१०८४१३७२०
jagtap.ram@gmail.com

About Post Author

12 COMMENTS

  1. Khup chan aae kay aste ani…
    Khup chan aae kay aste ani tichi mulach man ya boo mdhe ahe l like so much book

  2. Khup chan aae kay aste ani…
    Khup chan aae kay aste ani tichi mulach man ya boo mdhe ahe l like so much book

  3. Khup chan aae kay aste ani…
    Khup chan aae kay aste ani tichi mulach man ya boo mdhe ahe l like so much book

Comments are closed.