शोध अस्वस्थ कल्लोळाचा

1
93
_Sharad_Joshi_1.jpg

शरद जोशी यांच्या नावाशिवाय शेतकऱ्यांच्या संघर्षाचा इतिहास पूर्ण होणार नाही. दारिद्र्याने पिचलेला, व्यापाऱ्यांनी नाडलेला आणि राजकारणाने गांजलेला बळीराजा आकाशातील देवाला बोल लावत भेगाळलेल्या ‘काळ्या आईचे ऋण’ फेडत होता, अशा काळात शरद जोशी नावाचा एक शिकलेला, परदेशात राहिलेला, मोठा सरकारी अधिकारी म्हणून काम केलेला अवलिया त्याच्या दुःख निवारणासाठी धावून आला. त्याने ‘शेतकरी संघटने’च्या झेंड्याखाली शेतकऱ्यांचे व्यासपीठ उभे केले. त्यांना नव्या जगाचे कायदेकानू सांगितले आणि खुल्या अर्थव्यवस्थेचे शास्त्र शिकवले. गरीब, अडाणी आणि दरिद्री अशा शेतकऱ्याच्या पुनरुत्थानाचा तो अफाट उद्योग हा भारताच्या इतिहासातील एकमेवाद्वितीय असावा. शरद जोशी हे लोकोत्तर नेते होते. त्यांच्या सार्वजनिक आयुष्याइतकेच त्यांच्या खाजगी आयुष्याचे देखील लोकांना आकर्षण वाटे. ‘शरद जोशी : शोध, अस्वस्थ कल्लोळाचा’ हे वसुंधरा काशीकर भागवत यांचे पुस्तक हा जोशी यांचा माणूस म्हणून शोध घेण्याचा प्रयत्न आहे.

‘शरद जोशी : शोध अस्वस्थ कल्लोळाचा’ या पुस्तकाच्या लेखिका वसुंधरा काशीकर – भागवत या जोशी यांच्या कुटुंबातील घटक आहेत. त्या त्यांच्या मित्रही कित्येक प्रसंगांत झालेल्या आहेत. जोशी त्यांना एखादा प्रश्न विचारू शकतात, एखादी गझल गाण्याची फर्माईश करू शकतात. ते लेखिकेच्या लग्नात आशीर्वाद द्यायलादेखील आवर्जून उपस्थित राहिले होते. लेखिकाही त्यांच्याशी संवाद करण्यास बडनेरा रेल्वे स्टेशनवर जाते. लेखिकेची त्यांना भेटण्यासाठीची धडपड जगावेगळी आहे. शरद जोशी यांचे भाषासाहित्य यांवरील प्रेम आणि विशेष म्हणजे त्यांचा संस्कृत भाषेचा व्यासंग असे काही अपरिचित कंगोरे लेखिकेने जवळून अनुभवलेले आहेत. शरद जोशी एक मुलगा म्हणून, वडील म्हणून, पती म्हणून कसे होते; त्यांनी शेतकरी संघटनेच्या अवाढव्य कामातसुद्धा त्यांच्यातील लेखक, व्यासंगी वाचक कसा जपला याचे कित्येक प्रसंग लेखिकेला पाहण्या-अनुभवण्यास मिळालेले आहेत. वसुंधरा यांचे हे पुस्तक रूढ अर्थाने शरद जोशी यांचे चरित्र नाही. ती शेतकरी आंदोलनाची बखरही नाही. त्यात शेतकरी आंदोलन, मुक्त अर्थव्यवस्था यांविषयी व अन्य तात्त्विक व राजकीय चर्चा येते; पण ती शरद जोशी या व्यक्तीला उलगडून दाखवण्यासाठी… त्यामुळेच पुस्तकाची मांडणीदेखील अतिशय मनस्वी झाली आहे. तिला काळाचे, वेळेचे, तारखेचे, दिवसाचे -कसलेही बंधन नाही. पुस्तक कोठूनही वाचण्यास घ्यावे; थांबणे मात्र वाचकाच्या हातात राहत नाही. पुस्तकात जायचे असे कोठेच नाही. त्यामुळे पुढे काय होणार याची कसली घाई नाही. हे पुस्तक वाचताना शरद जोशी यांच्या अंगारमळ्यात निवांत मुक्कामाला आल्यासारखे वाटते. “तेथे ते सांगत असतात एकेक गोष्टी. आपण फक्त कान देऊन ऐकायचे. त्यांची थोडी सोबत करावी. एखादी गझल वाचावी. वाटली तर गुणगुणून पाहावी. मधेच एखादी कविता वाचावी आणि अचानक, ‘सरकार कसलं सोडवतंय समस्या; सरकार हीच एक समस्या आहे’ अशासारख्या जोशी यांच्या वाक्यांना मनापासून टाळ्याही वाजवाव्यात. प्रसंगी पाषाणासारखे होणारे जोशीसर… इंद्रजित भालेराव यांच्या कविता ऐकताना मात्र हतबल झालेल्या बापाकडून फोडली जाणारी त्याच्याच पोराची पाठ सरांच्या डोळ्यांसमोर साक्षात उभी राहते नि त्यांचे डोळे बापाचे अंतःकरण होऊन वाहू लागतात! हे करत असतानादेखील लपवाछपवी नाही. ते अतिशय निष्पापपणे सांगून जातात, की ‘निर्विकारपणे दुःख पाहण्याचे मन माझ्याकडे नाही. तुम्हा साहित्यिकांच्या सहजतेने व्यक्त करण्याची ताकद नाही. अश्रू लपवण्यासाठी आम्ही आलेखांचा आणि आकड्यांचा आधार घेत असतो.’ म्हणून… मी शरद जोशी, मी कसा डोळ्यांतून पाणी काढू लोकांसमोर? लोक काय म्हणतील? असला भ्याड आविर्भाव पण कोठेही नाही. डोळे भरून रडायलादेखील वाघाचे काळीज लागते. येथे मी वाघ म्हणतोय ते त्याच्या असीम शक्तीसाठी नाही, ती तर त्याच्याकडे होतीच; पण येथे मला वाघाचे अखंड स्वातंत्र्य अभिप्रेत आहे.”

_Sharad_Joshi_2.jpgया पुस्तकात शरद जोशींच्या एकेका पैलूवर एकेक प्रकरण आहे. साहित्य, भाषा आणि शरद जोशी, प्रेम आणि मानवी नातेसंबंध, गझल-कविता, जोशी यांच्या पत्नी लिलाकाकू, नर्मदा परिक्रमा, करुणा, संवेदनशीलता, शरद जोशी यांचे वाचन, त्यांच्यातील वक्ता, विचारवंत, लक्ष्मीमुक्ती चळवळ व चांदवडचे अधिवेशन, अखेरच्या काळातील आध्यात्मिक चिंतन -असा खूप मोठा परीघ या पुस्तकाला आहे. त्यातून आंदोलक शरद जोशी, हमीभाव मागणारे शरद जोशी यांपलीकडचे कवेत न मावणारे रसिक, चिंतक आणि माणूस असलेले शरद जोशी वाचकांना भेटतात.

ते योद्धा होते, योगी होते, व्यासंगी होते, विद्वान होते, धोरणी होते, हळवे होते; पण त्यांचा सगळा अट्टाहास स्वातंत्र्यासाठी होता. व्यक्ती हा त्यांच्या जगण्याचा केंद्रबिंदू होता. त्यामुळे या पुस्तकात जशी गझल-कविता आहे तितक्याच गंभीरपणे स्वातंत्र्य या मूल्याची आणि त्या आधारे व्यवस्थेची व जीवनाची रचना शरद जोशी कशी करतात याचे विश्लेषणही आहे. त्यातून लेखिकेची तात्त्विक समज दिसून येते.

शरद जोशी व लेखिका यांची करुणा, संवेदनशीलता आणि चिंतनशीलता यांवर रंगलेली चर्चा हे या पुस्तकाचे सुवर्णपान ठरावे. त्यांनी करुणा म्हणजे नेमके काय, चिंतनशीलतेतून संवेदनशीलता आली, की संवेदनशीलतेतून चिंतनशीलता यांसारख्या प्रश्नांना दिलेली उत्तरेही असामान्य आहेत; पूर्ण आहेत. त्या उत्तरांपलीकडे प्रश्न पूर्णपणे संपतो. त्यासाठी ते अॅडम स्मिथच्या नैतिक भावनांचा सिद्धांत (Theory Of Moral Sentiments) या पुस्तकाचा आधार घेताना दिसतात. तेथे माणसांच्या प्रेरणांचा शोध मुळापासून घेतला जातो आणि ते निःस्वार्थ वाटणारी वागणूक हीदेखील दीर्घकालीन व्यापक स्वार्थाचीच असते, अशा अंतरिम निष्कर्षाला अत्यंत रोखठोकपणे येतात.

पुस्तकात NGO आणि कार्यकर्ते यांच्या विषयीची त्यांची मते मोकळेपणाने येतात. ती मते इतकी परखड आहेत, की त्यांच्या तराजू-काट्याने सामाजिक क्षेत्रातील देशभरातील कार्यकर्ते मोजण्यास घेतले, तर हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेदेखील उत्तीर्ण व्हायचे नाहीत. हे पुस्तक वाचून एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे, त्यांचे विचार जसेच्या तसे स्वीकारणे भारतीय समाजाला कठीणच आहे; समजण्यास देखील भगीरथ प्रयत्न करावे लागतील. लेखिकेने त्यासाठी एक दणदणीत सुरुवात करून दिलेली आहे.

_Sharad_Joshi_3.jpgत्यांचे वक्तृत्व, एखाद्या परिस्थितीतील किंवा संकल्पनेतील विरोधाभास शोधून तो अधिक सोपा आणि स्पष्ट करून सांगण्याची त्यांची अभिजात अध्यापकाची वृत्ती, कार्यकर्त्यांना माणूस म्हणून जोडून घेण्याची त्यांची क्षमता हे सारे लेखिकेने अनुभवलेले आहे. विशेष म्हणजे लेखिकेचे मराठी व उर्दू भाषांवरचे प्रभुत्व या सर्व प्रसंगांमध्ये रंजकता आणून वाचकाला खिळवून ठेवते. कवितांचे आणि निदा फाझलीच्या गझलांचे जागोजागी दिलेले दाखले समर्पक आहेत. हे पुस्तक म्हणजे एका योद्ध्याला माणूस म्हणून जवळून पाहण्याचाच नव्हे तर त्याची कडकडून गळाभेट घेण्याचा अद्भुत अनुभव आहे.

प्रत्येक लोकोत्तर व्यक्तीत एक जिता-जागता माणूस असतो. त्याला समजून घेऊन लोकांपर्यंत पोचवणे आवश्यक असते, पण ते समजून घेणारी व्यक्ती प्रत्येक महान व्यक्तीला मिळत नाही. शरद जोशी आणि लेखक यांच्यातील संवाद हा त्या अर्थाने लोकोत्तर व्यक्ती समजून घेण्यातील पथदर्शी संवाद ठरावा. लेखिकेने ज्या आंतरिक तळमळीने जोशी यांना एक माणूस म्हणून सादर केलेले आहे, त्याविषयी त्यांचे विशेष आभार आणि त्यांना शुभेच्छा!

शरद जोशी : शोध अस्वस्थ कल्लोळाचा
लेखिका वसुंधरा काशीकर-भागवत
राजहंस प्रकाशन, पुणे
पृष्ठ संख्या – 153
किंमत : 200 रुपये

– निखिल कुलकर्णी, nskulkarnigmail.com

(साधना, 29 सप्टेंबर 2018 वरून उद्धृत)

About Post Author

Previous articleकरवंटीपासून कलाकृती – सुनील मोरे यांचे कसब
Next articleगणदेवी (गुजरात) – राम गणेश गडकरी यांचे जन्मगाव
निखिल कुलकर्णी सध्या कॅलिफोर्नियातील सॅन होजेमध्ये 'क्रोनिकेअर हॉस्पिस' या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी बीट्स पिलानी, राजस्थान येथून मास्टर्स आणि इलिनाॅईस विद्यापीठातून एमबीए असे शिक्षण पूर्ण केले. निखिल मराठी भाषेचे व साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात महाराष्ट्र आणि शेजारच्या कर्नाटकमध्ये अनेक प्रतिष्ठित वादविवाद व वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतला. याच स्पर्धांच्या माध्यमातून त्यांना अनेक प्रसिद्ध लेखक, कवी, संपादक आणि राजकारण्यांना भेटण्याची संधी मिळाली. लेखकाचा दूरध्वनी 309 - 868 – 1960

1 COMMENT

  1. महान व्यक्तीमत्त्व…
    महान व्यक्तीमत्त्व
    शेतकऱ्यांचा आधारवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here