पैठणचे जायकवाडी धरण शेवगावपासून (नगर जिल्हा) अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर आहे. त्या धरणाचा नावलौकिक आशिया खंडातील मातीचे सर्वात मोठे धरण असा आहे. त्या धरणामुळे शेवगाव तालुक्यातील पन्नासहून अधिक गावे जलमय झाली. त्यांत घेवरी, चांदगाव, दहिफळ, ताजनपुर, एरंडगाव, लाखेफळ, आगर नांदूर अशा खेड्यांचा समावेश होतो. जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयाचा पाणी फुगवटा (Back Water) शेवगाव तालुक्यात येऊन पोचला आहे. त्या जलाशयाचे अनुषंगिक लाभही दिसून येतात. त्या पाणवठ्यावर हजारो स्थलांतरित पक्षी दरवर्षी येत असतात. म्हणजे पक्षी निरीक्षणासाठी आवश्यक ती भौगोलिक परिस्थिती तेथे, शेवगावापासून हाकेच्या अंतरावर तयार झाली आहे. तिचा लाभ सभोवतालच्या खेड्या-शहरांतील लोक आनंदाने घेत असतात. खरे तर, नाथसागर जलाशयाचा सर्व भाग हा पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. शेवगावजवळ नवीन दहिफळशिवाय विजयपूर, एरंडगाव, बोडखे ही ठिकाणे पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहेत.
मी माझ्या विद्यार्थ्यांना शाळेत विज्ञान विषय शिकवतो. त्या विषयात जैव विविधता, पक्षीशास्त्र हे विषय बऱ्याचदा येतात. माझ्या पक्षी निरीक्षण छंदाची झलक त्यावेळी मुलांना कळते. माझा तो छंदच मुख्यत: या पाणवठ्यावर जोपासला गेला. ज्येष्ठ पक्षी निरीक्षक सुधाकर कुऱ्हाडे यांच्या सहवासात मला पक्षी निरीक्षणाचा छंद लागला. कुऱ्हाडे हे नगरच्या कॉलेजात प्राध्यापक होते. आम्ही मित्र रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी नवीन दहिफळ या मुबलक पाणवठा असलेल्या गावी पक्षी निरीक्षणाच्या हेतूने जात असतो.
ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात जायकवाडीच्या जलाशयावर अनेक पक्षी थेट ऑस्ट्रिया, सायबेरिया, नेपाळ, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका येथून येत असतात. त्यात रोहित, मत्स्यगरुड, रंगीत करकोचे, लालसरी बदक, तुतारी, कालाशेराटी, स्वर्गीय नर्तक, चमचा, सातभाई असे अगदी अपरिचित पक्षी असतात. ते पक्षी तेथेच का येतात? तर त्या पाणवठ्यावर त्यांना आवश्यक असलेले दलदल, शेवाळ, पाणवनस्पती, मासे, किटक हे घटक विपुल प्रमाणात आहेत.
आम्ही मित्रांनी खानापूर या गावी पक्षी निरीक्षणासाठी एका जानेवारीच्या थंडीत सुट्टीच्या दिवशी जाण्याचे ठरवले. आम्ही सूर्योदयापूर्वी खानापूर गावी पोचलो. तेथे आमच्या बाईक ठेवून चार-पाच किलोमीटर अंतर पायी चालत गेलो. आम्ही पाणवठ्यावर पोचलो. सूर्योदय झालेला नव्हता. सगळीकडे निरव शांतता आणि थंडी पसरलेली होती. कहार समाजाचे लोक त्या पाणवठ्यावर मासेमारीसाठी राहतात. त्यांच्या मदतीने आम्ही आमच्या पावलांचा आवाज न करता पक्षी निरीक्षण करता येईल अशा मोक्याच्या जागा शोधून, तेथे जाऊन बसलो. समोरच्या पाण्यात आणि काठावर अनेक पक्षी उतरत होते. आम्ही त्यांच्यातील विविधता, त्यांच्या हालचाली, त्यांचा त्यांच्या भाषेत परस्परांशी सुरू असलेला संवाद अनुभवत होतो, कॅमेऱ्यात टिपत होतो. धुके पडलेले असल्याने फोटो टिपताना बरीच कसरत करावी लागत होती. मी पाणकावळे, हळदकुंकू बदक, तुतारी, चमचा, जांभळी, पाणकोंबडी असे फोटो एकापाठोपाठ एक टिपत पुढे जात होतो. दरम्यान, सूर्य उगवला. सूर्यकिरणे पाण्यावर पडून पाणी चमकू लागले. आसपास वर्दळ सुरू झाली, वाहनांचा आवाज ऐकू येऊ लागला. तसे पक्षी दूर पाण्यात जाऊ लागले. नजरेत येईनासे झाले. आम्हीही माघारी निघण्याची तयारी करू लागलो.
मासेमारीसाठी तेथे वस्ती करून राहिलेल्या- कहार समाजाच्या काहींची मुले माझ्या हातातील कॅमेऱ्याकडे कुतूहलाने पाहत होती. आम्ही त्यांचे फोटो काढले तेव्हा ती मुले आनंदून गेली. आम्ही चर्चा करत- गप्पा मारत खानापूरला आलो. तेथून आमच्या बाईक घेऊन शेवगावला घरी परतलो. निसर्गाच्या सान्निध्यात मन आणि मेंदू यांमधील ‘जंक क्लिअर’ होऊन गेला होता, ताजेतवाने वाटत होते. विविध प्रकारचे पक्षी पाहण्यास मिळाल्याचा आनंद मनात होता.
मी दुपारी जेवण आणि विश्रांती झाल्यानंतर कॅमेरा संगणकाला जोडून एकेक फोटो उत्सुकतेने पाहू लागलो. आणि एका फोटोजवळ दचकून थांबलो. तो फोटो झूम करून पाहिला तर त्या फोटोत पक्ष्यासोबत एका महाकाय मगरीचे शेपूट दिसत होते. अंगावर सर्रकन काटा आला आणि मला सकाळी आम्ही पाणवठ्यावर पोचलो तेव्हा भेटलेल्या ‘कहारा’ने दिलेला इशारा आठवला. तो म्हणाला होता, “काठावरून लई म्होरं जाऊ नगा… मोठाल्या मगरी आहेत पाण्यात…!”
आम्ही पक्ष्यांचे फोटो काढताना भान हरवून पुढे जात होतो. ती मगर त्या धांदल-धावपळीत त्यावेळी दिसली नव्हती. त्या फोटोत दिसणारी मगर वास्तवात माझ्यापासून अवघी पन्नास फूटांच्या अंतरावर असावी…! मी अज्ञानात होतो. मला त्यावेळी मगरीचे जवळचे अस्तित्व जाणवले नव्हते. फोटो अनेकदा पुन:प्रत्ययाचा आनंद देतात, त्यामुळे आपण हरखून जात असतो. पण मी जेव्हा जेव्हा तो फोटो पाहतो तेव्हा तेव्हा मला भीतीची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही !
– कन्हैयाकुमार भंडारी 9860403036 sham.bhandari2002@gmail.com
द्वारा – आरती तागडे aratitagade@gmail.com
—————————————————————————————————————————————