मे महिना संपत आला तरी या, 2020 साली पाणीटंचाईच्या, गावागावांना टँकरने पाणी पुरवल्याच्या बातम्या आलेल्या नाहीत! त्यांची जागा कोरोनाने व्यापली आहे हे खरे; परंतु त्याचप्रमाणे, पाऊस 2019 साली सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत रेंगाळला होता. काही प्रदेशांत तर महापुराने थैमान घातले होते. ते जमिनीत मुरलेले पाणी 2020 साली जून आला तरी पुरत आहे. त्याखेरीज, काहीशे गावे तरी जलसंधारणाच्या कामांमुळे जलसंपन्न झालेली आहेत. विजयअण्णा बोराडे, अंबाजोगाईचे व्दारकानाथ लोहिया यांनी सुरू करून दिलेले अनेकानेक वैयक्तिक प्रयत्न गावागावांत झालेले आहेत. पैकी, सुरेश खानापूरकर यांच्या शिरपूर पॅटर्नने बऱ्याच गावांना सुजलाम-सुफलाम करून टाकले आहे. माझी आणि खानापूरकर यांची माहितीची बरीच देवाणघेवाण गेला आठवडाभर झाली. त्यास निमित्त झाले माझा जलसंवाद मासिकातील लेख. मी त्या लेखात जलसंधारणाच्या कामांची राज्यातील वस्तुनिष्ठ नोंद नसल्यामुळे पाणी प्रश्नाचा नीट अंदाज येत नाही असे म्हटले आहे. त्यात खानापूरकर यांच्या शिरपूर पॅटर्नबाबत एकच ओळ आहे आणि तीदेखील त्यांच्या कामाचा खट्याळपणे उल्लेख करते असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांचा चिडून फोन आला. तसे, शिरपूर पॅटर्न व खानापूरकर यांच्याबाबतचे लेखन ‘थिंक‘वर पूर्वी प्रसिद्ध झालेले आहे. आम्हा दोघांच्या या नव्या गप्पा पुन्हा पाच-सात वर्षांनी सुरू झाल्या. मग त्या वारंवार होत राहिल्या.
सुरेश खानापूरकर
सुरेश खानापूरकर यांचा दावा आहे, की त्यांचे धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील जलसंधारणाचे काम शास्त्रशुद्ध असल्याने तेथील खेड्याखेड्यांत मुबलक पाणी आहे. तेथे पाऊस तीन वर्षे बरसला नाही तरी पाणीटंचाई जाणवणार नाही. शेतकरी वर्षाला तीन पिके घेऊ शकेल. जालना शहरात भीषण पाणीटंचाई काही वर्षांपूर्वी खूपच त्रस्त करून गेली होती. ती जबाबदारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खानापूरकर यांच्यावर सोपवून दिली. मला तो झी चोवीस तासच्या पडद्यावर झालेला उदय निरगुडकर व खानापूरकर असा सामना आठवतो. खानापूरकर यांनी दहा कोटी रुपयांत जालन्याची पाणीटंचाई दूर करण्याचे आव्हान स्वीकारले. पृथ्वीराज सरकारने आठ कोटी व स्थानिक संस्थांनी दोन कोटी रुपये त्यांना उपलब्ध करून दिले. खानापूरकर म्हणतात, त्यास साताठ वर्षे झाली. जालन्यात उन्हाळ्यात पाण्याचा टँकर आणावा लागलेला नाही! खानापूरकर यांच्या पाण्याच्या अशा यशोगाथा बऱ्याच आहेत. ते म्हणतात, की शिरपूर तालुक्यात दोनशेहून जास्त गावांत काम झाले आहे व ती गावे बारा महिने सदाहरित असतात. ते काम फक्त स्थानिक सूतगिरणीने देणगी दिलेल्या पन्नास कोटी रुपयांत होऊ शकले. हजारो शेतकरी व राजकीय पुढारीदेखील त्यांचे काम पाहून जात असतात.
खानापूरकर भूगर्भशास्त्रज्ञ आहेत. त्यांचे म्हणणे असे, की पाणी निर्माण करणे हे हौसचे काम नाही, शास्त्राचे आहे. त्यामुळे ‘पाणी फाउंडेशन’, ‘नाम’ यांसारख्या संस्थांनी उत्साह निर्माण करावा, त्यांनी प्रेरित करावे आणि जलसंधारणाचे काम भूगर्भशास्त्रज्ञ व अभियंते यांच्यावर सोपवावे. पाणी जमिनीत जितके खोल खणून मुरवू तेवढे ते त्या परिसरात झऱ्यांमधून बाहेर येऊ लागेल. शहरात नळाला एखाद्या दिवशी पाणी येणार नाही अशी सूचना मिळाली तर कुटुंबे पुढील तीन दिवस पुरेल इतके पाणी कुंड्याभांड्यांत भरून ठेवतात. त्यांना वाटते, न जाणो नंतरही एकादा दिवस पाणी आले नाही तर! तसेच, पुढील तीन वर्षे पाऊस पडणार नाही असे कल्पून जमिनीत पाणी मुरवले पाहिजे तर ते गाव, तो परिसर पाण्याने भरपूर होणार!
गावे व्यक्तिगत जलसंधारणाच्या कामाने नमुनेदार बनवलेली उदाहरणे महाराष्ट्रात ठिकठिकाणी आहेत, परंतु खानापूरकर यांच्या तंत्रामध्ये पाणी चळवळ होण्याचे सामर्थ्य आहे. तरी तो लोकांचा कार्यक्रम का होत नाही? खानापूरकर यांचे म्हणणे असे, की त्यांच्या कामाची प्रसिद्धी व प्रचार भरपूर झाले आहेत मग अडते कोठे? तर राजकारण हे एक कारण आणि नोकरशाही व समित्या हे दुसरे. खरे तर, खानापूरकर संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक, पण फडणवीस यांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेमध्ये खानापूरकर यांचा सल्ला घेतला नाही, कारण त्यांच्या कल्पनांना पृथ्वीराज यांचा पाठिंबा आहे! फडणवीस इतके हट्टी की त्यांनी संघचालक भागवत यांनी खानापूरकर यांच्या कामाची प्रशंसा करूनदेखील त्यांचे ऐकले नाही. खानापूरकर यांचे तंत्र सरकारमार्फत अंमलात येण्यात दुसरी मेख म्हणजे सरकारी तज्ज्ञ समितीची पाण्यासाठी जमीन किती खोदावी याबाबतची तीन मीटर मर्यादेची शिफारस. सरकारने तसा ठराव साताठ वर्षांपूर्वी करून ठेवला आहे. तो जीआर म्हणजे राज्याच्या हद्दीत वेदवचन मानले जाते आणि त्याचा अडथळा सर्व कामांत येतो. उलट, खानापूरकर सांगतात, की जमिनीचा पोत पाहून तेथे पाणी किती खोलपर्यंत मुरवण्याची गरज आहे ते ठरवायला हवे. त्यांनी त्यांच्या कामात, पाणी साठवण्यासाठी काही ठिकाणी आठ-दहा मीटर खोल खणले आहे. ते म्हणतात, आपल्या जुन्या विहिरी पाच-सात पुरुष खोल सर्रास असतातच की!
खानापूरकर यांचे काम भारतभर चर्चिले जाते. त्यांना तिरुपती देवळापासून अनेक ठिकाणी पाण्याच्या शोधात कन्सल्टन्सीसाठी बोलावले जाते. ते म्हणाले, की अहो, मी जाणारच. कारण माझा जन्मच जगाला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी झाला आहे! नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातील एका खेडेगावात आठवीत शिकत असताना, एक लेख वाचून मी भूगर्भशास्त्रज्ञ होण्याचे का ठरवले असावे? मॅट्रिक झाल्यावर वडिलांना शक्य नव्हते तरी पेपर घरोघरी टाकण्यासारखी कामे करून, शिष्यवृत्ती मिळवून मी स्वतः एम एस्सी-टेकपर्यंतचे शिक्षण घेतले. तेथेही विशेष अभ्यासासाठी पाणीच माझ्या वाट्याला आले! खानापूरकर यांनी राज्य सरकारमध्ये उच्चपदी नोकरी केली. तेथेही योग असा, की त्यांना नोकरीच्या शेवटच्या दोन वर्षांत सरकारी योजनांतून चार कोटी रुपये उपलब्ध झाले आणि त्यांना त्यांच्या तंत्राने, हिकमतीने व क्लृपत्यांनीही साठ गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करता आली. ते निमित्त झाले आणि पुढे, या संघ स्वयंसेवकाने धुळ्याचे काँग्रेस आमदार व मंत्री अमरीश पटेल यांच्या सूतगिरणीच्या निधीच्या सहाय्याने ‘शिरपूर पॅटर्न‘ विकसित केले. त्यांच्या त्या संबंधातील कथा म्हणजे सुरेशपुराण वाटेल अशा चमत्कार कथा आहेत. पण त्यांचा आधार पक्का शास्त्रीय आहे आणि खानापूरकर यांची जलनिष्ठा दैवी वाटावी अशी आहे. खानापूरकर असे सांगतात, की महाराष्ट्राच्या वीस जिल्ह्यांतील पाचशे गावांत त्यांचे काम पसरले आहे. सुरेश जोशी या जलकार्यकर्त्याने पुण्यात शिरपूर पॅटर्नच्या कार्यकर्त्यांचा मेळावा तीन वर्षांपूर्वी योजला. त्यास दोनशेहून अधिक लोक जमले होते.
खानापूरकर यांना दोन मुलगे व एक मुलगी. ती मंडळी त्यांच्या त्यांच्या नोकरी-व्यवसायात सुस्थित आहेत. खानापूरकर यांची पंच्याहत्तरी 2021 साली होईल तरी त्यांची जल’कन्सल्टन्सी’ चालू आहे. ते सध्या पूर्व विदर्भातील एखाद्या खार भूमिजल प्रश्नावर मूलभूत योजना घेऊन वेगवेगळ्या मंत्र्या-पुढाऱ्या-तज्ज्ञांना भेटत आहेत. त्यांना त्यांच्या त्या प्रयत्नात यश यावेच; परंतु इकडे पुऱ्या महाराष्ट्रात शिरपूर पॅटर्नची पाणी चळवळ होऊन मराठवाड्यासह सारे राज्य ‘विपुल जला’ने भरुन जावे.
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.