नगरच्या अजित कुलकर्णीला सिनेनट आमीरखान याच्याबरोबर अर्धा-पाऊण तास घालवण्यास मिळाला होता. अजितला आमीरखानचे उमदेपण आवडले, तो सभोवतालचे जीवन जिव्हाळ्याने पाहतो व उत्सुकतेने प्रश्न विचारतो हेही जाणवले. त्याला आमीरखान आवडला, परंतु तो आमीरखानच्या भेटीमुळे एक्साईट झाला नाही. ही गोष्ट तीन-चार वर्षांपूर्वीची. नगरच्या ‘स्नेहालय‘ संस्थेला आमीरखानने त्याच्या सत्यमेव जयते कार्यक्रमातून जवळजवळ दीड कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले. त्यामधून जी इमारत उभी राहिली तिच्या उद्घाटनानिमित्त आणि ‘स्नेहालय’चे कार्य पाहण्यासाठी आमीरखान नगरला पोचला होता. अजितच्या उत्तराने मी सतर्क झालो. जो माणूस आमीरखानबरोबर दोन-चार तास घालवतो, त्याला आमीरखानची सुसंस्कृतता जाणवते, पण त्या भेटीचे अप्रूप वाटत नाही? मी तसे कुतूहल दाखवले, तेव्हा अजित म्हणाला, की “मी आयुष्यात फक्त एका व्यक्तीला भेटून ‘एक्साईट’ झालो, ती व्यक्ती आहे नगरच्या ‘स्नेहालय’ संस्थेचे संस्थापक-प्रेरक गिरीश कुलकर्णी.” अजित त्यांचा उल्लेख गिरीश’बाबा’ कुलकर्णी असाच करतो.
‘स्नेहालय‘ हे समाजसेवेचे मोठे नेटवर्क आहे. त्याचा दबदबा गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रभर निर्माण झाला आहे, त्याचे कारण गिरीश कुलकर्णी यांचे पारदर्शी, प्रामाणिक, विनम्र व्यक्तिमत्त्व आणि त्यांनी चार दशकांपूर्वी आरंभलेले वेश्या पुनर्वसनाचे कार्य. गिरीश व्यवसायाने प्राध्यापक आहेत. बाबा आमटे यांच्यापासून प्रेरणा घेऊन एक पिढी समाजकार्यात उतरली. गिरीश त्यांपैकी एक. त्यांनी आमटे यांच्यापेक्षा वेगळे संघटन उभे केले. ‘स्नेहालय’भोवती वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या संस्था असे कोळ्याच्या जाळ्यासारखे स्नेहालयचे संस्थात्मक स्वरूप आहे. अजित हा त्या जाळ्यातील एक कोळी!
‘अनामप्रेम’मधील मुले
अजितने ध्यास घेतला आहे दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनाचा, त्यांना त्यांचे शिक्षण, त्यांच्या ‘करिअर’ शोधण्याच्या प्रयत्नात त्यांना मदत करण्याचा. अजितचे वय आहे फक्त तीस वर्षांचे, पण त्याला आठ-दहा वर्षांत अनुभव प्राप्त झाला आहे अवघे जीवन जगल्याचा. अगत्य, विनयशीलता ही ‘स्नेहालया‘ची ब्रँडेड वृत्ती आहे, ती अजितच्या ‘अनामप्रेम’ या संस्थेतदेखील दिसते. त्यांचे एक वसतिगृह नगर शहरात मध्यवस्तीत आहे आणि दुसरे, नगरपासून आठ किलोमीटर दूर, निंबळक येथे माळावर. ते गेल्या दोन वर्षांत उभे राहिले आहे. ती दोन मजली इमारत आहे. तेथे जागा विस्तृत असल्यामुळे आणखीही वेगवेगळ्या इमारती आहेत व तेथे वेगवेगळी कामे चालतात.
अजित मूळ सोलापूरच्या माढा तालुक्यातील. त्याचे वडील स्टॅम्प व्हेंण्डर. घरची गरिबी. तरीही अजितला समाजसेवेचे डोहाळे लागले. तो बारावीत असतानाच आनंदवनला श्रमसंस्कार छावणीत गेला. ही गोष्ट 2004 सालची. त्यानंतर दोन-तीन वर्षे तो छावणीत जात राहिला. तरी इकडे माढ्याला युक्रांदच्या कार्यात सहभागी झाला. असे विविध संस्कार घेत त्याचे शिक्षण झाले. त्याच ओघात त्याला नगरच्या स्नेहालयची व गिरीश कुलकर्णी यांची माहीती 2008 साली कळली आणि त्याने बाडबिस्तरा आईवडिलांसह नगरला हलवला. त्याला ‘करियर’ समाजसेवा क्षेत्रात करायचे होते. म्हणून तो गिरीश कुलकर्णी यांना भेटला व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाला. दरम्यान अजितने त्याचे शिक्षण पूर्ण केले(बीए, बीएड) व नगरच्या समर्थ विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. त्याने 2009 ते 2014 या काळात शिक्षकाची नोकरी व स्नेहालयचे काम या दोन्ही गोष्टी सांभाळल्या. तो म्हणतो, सकाळी सात ते बारा शाळा आणि दुपारी बारा ते रात्री बारा स्नेहालय असे माझे वेळापत्रक होते. तरीही स्नेहालयच्या कामाचा लोड वाढला तेव्हा मी शाळेची नोकरी सोडून दिली. महाराष्ट्रातील साऱ्या कार्यकर्त्यांचे होते तसेच अजितचे झाले आहे. त्याचे स्फूर्तिस्थान बाबा आमटे झाले आणि त्याची कार्यवृत्ती ‘आनंदवन‘च्या श्रमसंस्कार छावणीत घडली. त्याचे रचना व संघर्ष हे व्रत बनले. मी त्याला विचारले, की घर संसार करायचा आहे की नाही? तर तो म्हणाला, शोध चालू आहे; बायकोचा, नव्हे साथीदाराचा!
अजितने समाजविकास कार्यात पडण्याचे एकदा ठरवल्यानंतर, मुंबईच्या एस पी जैन इन्स्टिट्यूटमधून त्या विषयात एमबीए केले. त्या अभ्यासक्रमाची रचनाच अशी आहे, की पंधरा दिवस प्रशिक्षण आणि दीड महिना क्षेत्रीय कार्य. अजित क्षेत्रीय कामात नगरला आधीपासून गुंतला होताच. तो सध्या कायद्याचे पदवी शिक्षण घेत आहे.
व्यंग्य, अपंग, विशेष, दिव्यांग… नाव कोणतेही ठेवा त्या व्यक्तींचे जीवन खडतर असते. ते घडवण्याचे काम अजित व त्याचे साथीदार निष्ठेने करत आहेत. त्यातून सहा वर्षांत साडेनऊशे तरुण-तरुणी जीवनमार्गास लागले आहेत. त्यांचे स्वतःचे उत्पन्न सुरू झाले आहेच, परंतु त्यांच्यातील छंद-कला विकसित होऊन ते गुणविशेष प्रकट होऊ लागले आहेत. त्या मंडळींचा वाद्यवृंद आहे. पाथर्डीचा अंध निलेश शिंदे याने पदव्युत्तर शिक्षण घेतले, तो बँक ऑफ इंडियात नोकरी करतो आणि गाण्याच्या ओढीने संगीत विशारद झाला आहे. रेणुकावाडीचा एकाक्ष ज्ञानेश्वर गडाख शेती करतो. त्याने परिसरात चारशे झाडे जगवली आहेत. अजित बोलू लागला, की त्याच्या तोंडून अशी नावेच नावे व त्यांचे गुणविशेष यांची इंद्रधनुष्ये तयार होतात. नोंदी किती कराव्या? आणि वाचकांना, श्रोत्यांना ते वाचण्या-ऐकण्यास वेळ आहे कोठे?
अजितच्या अनामप्रेम संस्थेने विशेष मुलामुलींसाठी पहिली ते सातवीपर्यंतची विशेष शाळा तयार केली आहे. त्यांचे वसतिगृह आहे. त्याचे नावही ‘हिंमत भवन’ आहे. ती मुले नियमित अभ्यासक्रमाबरोबर व्यवसायशिक्षण घेत असतात. कौशल्यविकास हा त्यामागील हेतू असतो. त्यांनी सध्याच्या कोरोनाकाळात शिलाई मशीनवर मास्क शिवले, चेहऱ्यावरील प्लॅस्टिक आवरणे बनवली. शाळेची स्वतःची व्यवसाय शिक्षणाची साधनसामग्री आहे. ‘अनामप्रेम’चे अॅक्टिव्हिटी सेंटर सुरू करावे या दृष्टीने पुण्याच्या अरविंद पित्रे यांच्यासह प्रयत्न सुरू आहेत.
राहत केंद्र
‘स्नेहालय‘शी जोडलेला माणूस एकेक कार्य विशेषत्वाने करत असला तरी प्रसंग उद्भवला, की ते सारे एकत्र येऊन त्या प्रसंगाला सामोरे जातात. कोरोनाकाळात मजूर रस्त्याने चालत त्यांच्या त्यांच्या गावी जाऊ लागले तेव्हा त्यांच्यासाठी नगरजवळ सर्वांनी मिळून राहत केंद्र सुरू केले आहे. त्यात अजित होताच. त्याने तेथील कार्य चालू असताना, भेटणार्या मजुरांचे अनुभव लिहून काढले व सोशल मीडियावरून प्रसृत केले. अजित माढ्याला असताना पत्रकारिता शिकला होता आणि त्याने ‘सकाळ’ वृत्तपत्रासाठी कामदेखील केले होते. धडपडी माणसे जगात वेगळीच असतात. ती आयुष्याचा प्रत्येक क्षण टिपत असतात व सार्थकी लावत असतात. आपणा वाचकांसाठी कोरोनाचा काळ कोट्यवधी क्षणांनी मागे पडत चालला आहे! वाचकांनी याकाळातील त्यांचे सार्थकी लागलेले क्षण ‘थिंक महाराष्ट्र‘कडे जरूर ‘शेअर’ करावेत!
अजित कुलकर्णी 9011020174 ajitbkul@gmail.com
– दिनकर गांगल 9867118517dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम‘ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत.)
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.
अशी माणसे महाराष्ट्रात आहे हीच महाराष्ट्राची खरी संपत्ती आहे. अधिकात अधिकाधिक लोकांपर्यंत हे काम जायला हवे. खूप लहान वयात खूप चांगलं काम होते आहे श्री अजित कुलकर्णी यांच्याकडून
आम्हाला वाचायला वेळ आहे …ज्यांनी आयुष्याचा सारा वेळ समाजासाठी दिला अशा लोकासाठी वेळ नसेल तर समाजाला गति कशी मिळेल …हेच संचित माणुसकीचे महाराष्ट्राचे आणि ते कवेत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या थिंक महाराष्ट्राचे …धन्यवाद
अशी माणसे महाराष्ट्रात आहे हीच महाराष्ट्राची खरी संपत्ती आहे. अधिकात अधिकाधिक लोकांपर्यंत हे काम जायला हवे. खूप लहान वयात खूप चांगलं काम होते आहे श्री अजित कुलकर्णी यांच्याकडून
खूप छान आणि प्रेरणादायी कार्य.
आम्हाला वाचायला वेळ आहे …ज्यांनी आयुष्याचा सारा वेळ समाजासाठी दिला अशा लोकासाठी वेळ नसेल तर समाजाला गति कशी मिळेल …हेच संचित माणुसकीचे महाराष्ट्राचे आणि ते कवेत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या थिंक महाराष्ट्राचे …धन्यवाद
फार चांगले कामआहे.श्री. अजित यांच्यासारखी माणसे ही समजाची संजीवनी आहेत.सौ.अनुराधा म्हात्रे. पुणे.
Ajit we r proud of you
अनामप्रेम संस्था सर्वांसाठी एक आदर्श झाली यात अजित चा सिंहाचा वाटा आहे. दीव्यांग साठी टोकाचा विचार करणारा अजित आमचा अभिमानाचा विषय आहे
Apratim Kam.