यवतमाळ जिल्ह्यात ओंकार हराळ या शिक्षकाने पारधी मुलांना शंभर टक्के दाखल करून घेऊन शिक्षणाची इतकी गोडी लावली, की शाळेमध्ये वर्षभर शंभर टक्के हजेरी होती!
इंदापूरच्या दिलीप काळे या शिक्षकाने गावातून स्थलांतर करणार्या भटक्या-विमुक्तांच्या कुटुंबातील मुले थांबवून धरली. लासुर्णे येथील टकलेवस्तीतील या शाळेत सत्तर टक्के मुले वैदू समाजाची आहेत. त्यांना मराठीतून शिक्षण दिले जाते.
असे अनेक उपक्रमशील शिक्षक आणि त्यांची ही कहाणी……..
शाळाबाह्य मुलांचा शिक्षणाकडे कल वाढवण्यासाठी राज्यातील विविध भागांत लहानमोठ्या स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. या मुलांना शाळेत आणण्यासाठी त्यांच्या आर्थिक परिस्थितीपासून विविध प्रश्नांचा मागोवाही त्यामध्ये घ्यावा लागतो. या गोष्टी शिक्षणाच्या रूढ साच्याबाहेर असतात. अनेक शिक्षकांनी भटक्या जमातींतील मुलांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वीही झाले. शिक्षकदिनानिमित्त अशा काही प्रयत्नांवर टाकलेली ही नजर…
यवतमाळ जिल्ह्यात ओंकार हराळ या शिक्षकाने पारधी मुलांना शंभर टक्के दाखल करून घेऊन शिक्षणाची इतकी गोडी लावली, की शाळेमध्ये वर्षभर शंभर टक्के हजेरी होती! एका विद्यार्थ्यांचे वडील वारले तरी तो विद्यार्थी त्या दिवशीही अंत्यसंस्कार झाल्यावर शाळेत येऊन बसला! तहसीलपासून चार किलामीटर अंतरावर असलेल्या पारधीपूर-मुकुंदपूर या गावात 1996 साली केवळ पारधी समाजासाठी सुरू झालेल्या या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरतात. दरवर्षी या शाळेत चाळीस मुले शिक्षण घेतात. या मुलांना शिक्षणाची एवढी गोडी लागलेली आहे की रविवार असो वा इतर कोणताही दिवस, शिक्षक दिसले की मुले शाळेत येतात. या शाळेत शिकून एका मुलाला नोकरी लागली आहे. दहा ते बारा मुले बारावीला आहेत. सात मुलांनी बी. ए. फर्स्ट इयरला प्रवेश घेतलेला आहे. या परिसरात एकही शाळाबाह्य विद्यार्थी नाही.
त्याच जिल्ह्यात, वसंत देशमुखांनी सालगडी म्हणून काम करणारी मुले शाळेत आणली. या मुलांना शेतीचे महत्त्व अधिक असल्याने त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या मुलांना राजीव गांधी संधीशाळा आणि महात्मा फुले शिक्षण केंद्र अभियानांतर्गत तात्पुरत्या शाळांमध्ये दाखल करवून त्यांना शिक्षणाची गोडी लावण्यात आली. त्यानंतर त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामिल करून घेण्यात आले. सालगड्यांची अशी पंच्याऐशी ते नव्वद मुले शाळांमध्ये दाखल करण्यात आली आहेत. अनेक मुले दहावी पास झाली असून काही बारावीपर्यंत शिक्षण घेत आहेत. शिक्षणामुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल पाहण्यास मिळत आहेत.
इंदापूरच्या दिलीप काळे या शिक्षकाने गावातून स्थलांतर करणार्या भटक्या-विमुक्तांच्या कुटुंबातील मुले थांबवून धरली. लासुर्णे येथील टकलेवस्तीतील या शाळेत सत्तर टक्के मुले वैदू समाजाची आहेत. त्यांना मराठीतून शिक्षण दिले जाते. भटकंती करणा-या पालकांना शिक्षणाचे महत्त्व आणि शिक्षणामुळे आयुष्यात पडणारा फरक समजावून सांगण्यात आला. कोणीच पालक आपल्याबरोबर भटकायला मुलांना नेत नाही. हा मोठा परिणाम साधला गेला आहे. विशेष म्हणजे या शाळेची दहा मुले शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्ह्यातील गुणवत्ता यादीत आली असून त्यांतील तीन मुले वैदू समाजाची आहेत. या कार्यासाठी दिलीप काळे यांचा शिक्षकदिनानिमित्त पुण्यात सत्कारही करण्यात आला.
अकोले (जि. अहमदनगर) तालुक्यात शाळाबाह्य मुलांना दाखल करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली आहे.
संबंधित लेख
शाळाबाह्य मुले- यशोगाथा आणि आव्हाने
सरकारी शाळा, इंग्रजी शाळा आणि आपण…
जीवनच गुरूकूल व्हावे