करवीर म्हणजे कोल्हापूर हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक संस्थान. अशी पाचशेपासष्ट संस्थाने भारतात होती. शाहू महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत करवीर संस्थानामध्ये जे कार्य केले, त्यामुळे ते संस्थान स्मरणात राहिले आहे. त्याबरोबरच बडोदा आणि म्हैसूर ही संस्थानेसुद्धा तशाच प्रकारे स्मरणात आहेत. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज आणि म्हैसूरचे वाडियार हेदेखील त्यांनी केलेल्या कार्याबद्दल ओळखले जातात. शाहू महाराजांचे कार्य इतके प्रभावी आणि महत्त्वपूर्ण होते, की स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करताना शाहू महाराजांनी केलेल्या कार्याची नोंद घटना समितीला घ्यावी लागली ! शाहू महाराजांनी समाज सुधारणा, शिक्षण, दलितांचा उद्धार, जाती निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन अशा काही क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.
महाराजांनी करवीर संस्थानातील प्रत्येकाला शिक्षण मिळाले पाहिजे असा विचार प्रथम केला आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा 30 सप्टेंबर 1917 रोजी केला. त्यानुसार ‘पालकांनी त्यांची मुले शाळेत पाठवलीच पाहिजेत’ असा आग्रह होता. जे पालक त्यांच्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना एक रुपया दंड केला जाईल अशी घोषणा त्या कायद्यात होती ! शाहू यांनी ज्या मुलांना दिवसभरात शाळेत येता येणे शक्य नाही अशांसाठी रात्रशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. महाराजांनी पाचशे ते एक हजार वस्तीसाठी एक प्राथमिक शाळा असावी असे धोरण आखले. त्यांनी प्राथमिक शाळांतून अभ्यासक्रम कसा असावा हे ठरवण्यासाठी समिती गठित केली.
त्यांच्या धोरणावरून पहिल्या वर्षभरात शहाण्णव प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या. पहिली शाळा 4 मार्च 1918 रोजी सुरू झाली. त्यांनी शाळेची इमारत, शिक्षकांचा पगार व इतर खर्च यांसाठी संस्थानाच्या अंदाजपत्रकात तरतूद केली. त्यांनी अभ्यासक्रमाबरोबर नियमावलीही तयार केली. राज्याने राज्यातील जनतेला सुशिक्षित करण्याची जबाबदारी घेण्यास हवी, शिक्षणावर खर्च करण्यास हवा, अशी क्रांतिकारक भूमिका घेणारे शाहू महाराज हे भारतातील पहिले संस्थानिक.
त्यांनी प्राथमिक शिक्षण हा एकूण शिक्षणाचा पाया असल्याने त्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे हा विचार मांडला आणि तो कृतीमध्ये आणला. ग्रामीण भागातील मुले त्यामुळे प्राथमिक शिक्षण घेऊ लागली. त्या मुलांना त्यांच्या माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी शहरात येणे गरजेचे होते. प्रश्न होता तो जेवणाचा-राहण्याचा खर्च. तो सर्वांना झेपेलच अशी परिस्थिती नव्हती. महाराजांनी कोल्हापूरात येऊन शिकणाऱ्यांसाठी वसतिगृहे सुरू केली. त्यांनी वेगवेगळ्या धर्मांच्या आणि जातींच्या मुलांसाठी वसतिगृहे सुरू करून ग्रामीण भागातील गरीब व होतकरू मुलांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले. त्यामुळे करवीर संस्थानाबरोबर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती घडून आली.
शाहू महाराजांना समतेवर आधारित न्याय आणि बंधुता या तत्त्वांवर पुढे जाणारा समाज निर्माण करण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम आहे असे वाटे. म्हणून त्यांनी शैक्षणिक क्रांती करण्यावर भर दिला.
– आनंद मेणसे 9448347452 samyawadiweekly@gmail.com