शाळाबाह्य मुलांची उमेद वाढवणारा संकल्प !

0
24

आई-वडिलांची बळजबरी आणि भीती यापोटी सिग्नल, रेल्वे स्थानक, मॉल अशा ठिकाणी आणि अगदी रस्त्यावरदेखील कित्येक लहान मुले फुगे, गजरे, खेळणी विकताना; तसेच, भीक मागताना दिसतात. मंगेशी मून या महिला कार्यकर्तीने तशा मुलांसाठी मुंबईतून ‘उमेद संकल्प’ संस्थेअंतर्गत कामाला सुरुवात 2015 साली केली. त्यानंतर अवघ्या दहा वर्षांत, त्यांनी त्यांच्या वडिलांच्या विदर्भातील वर्ध्यात ‘रोठा’ या गावी अकरा एकरांमध्ये वसतिगृह बांधले. तेथे राहून निराधार सत्तर मुले पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. त्याखेरीज पुण्याच्या कोथरूड भागात भाड्याच्या इमारतीत तसेच वसतिगृह आहे. तेथे मुलेमुली राहतात.

भीक मागणाऱ्या मुलांचे पालक मुलांनी भीक मागत फिरावे यासाठी त्यांच्या मागे असतात. कधी-कधी, मुलांना त्यांच्या पाठीत धपाटे घालून जबरदस्तीने भीक मागण्यास लावली जाते. ती मुले या तथाकथित पालकांची स्वतःची असतातच असेही नाही. काही वेळा, त्यांनी दुसऱ्यांची मुले पैसे देऊन दिवसभरासाठी भाडोत्री घेतलेली असतात. मंगेशी मून यांनी तशा मुलांना शिक्षणमार्गी लावावे म्हणून कामाला मुंबईत सुरुवात केली. त्यांच्या लक्षात असे आले, की त्या मुलांचे आई-वडील मुलांना शाळेत न पाठवता; भीक मागण्यास प्रवृत्त करतात व त्या प्रकारे मुलांनी आणलेले पैसे पालक (वडील) दारू पिऊन, जुगार खेळून उडवतात. मुले आई-वडिलांचा मार खाण्याच्या भीतीने रोज ते कर्म करत राहतात. काही वेळा, मुलांना त्या फुकट खाण्याची, ऐदीपणाची चटकदेखील लागते. त्यांची ती सवय होऊन जाते. मुले मोठी झाल्यावर चोऱ्यामाऱ्या, रेल्वेत पाकिटमारी असे उद्योग सुरू करतात.

मंगेशी मून या अशा मुलांना शोधून त्यांच्या पालकांपर्यंत गेल्या. मंगेशी यांनी त्यांच्या घरांत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांच्या मुलांना शिक्षणाचा दरवाजा उघडून दिला!

मंगेशी यांचे पालकांना सांगणे असे, की “तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांना माझ्याकडे द्या ! त्यांच्यात सुधारणा दिसली नाही तर तुम्ही त्यांना पुन्हा तुमच्याकडे घेऊन जाऊ शकता !” मंगेशी काही वेळा मुलांच्या पालकांना सांगत, “तुमच्या दोन-तीन मुलांपैकी एक मूल मला द्या ! त्याच्यात परिवर्तन दिसले तर आणखी दोन मुले द्या !” त्यांच्या अशा पाठपुराव्यामधून पहिल्या वर्षी काही मुले जमा झाली. त्या मुलांमधील बदल पाहून अन्य पालक मंगेशी यांचा पत्ता शोधत त्यांच्या मुलांना मंगेशी यांच्याकडे घेऊन आले.

मंगेशी यांना लवकरच मुंबईत जागा कमी पडू लागली. तसेच, मुले मुंबईत त्या ठिकाणी टिकणार नाहीत अशीही भीती मंगेशी यांच्या मनात चमकून गेली. त्यांनी त्यांचे काम वर्ध्याला हलवले. त्यांच्या वडिलांची ‘रोठा’ या गावी अकरा एकर जमीन होती. तेथे त्यांनी ‘उमेद संकल्प’ या नावाने संस्थेची सुरुवात केली ! त्या स्वत: मुंबई सोडून वर्ध्याला गेल्या. त्यांनी मुलांकरता वसतिगृह बांधले. त्यासाठी स्वतःकडील सोने गहाण ठेवून व राहत्या घरावर कर्ज घेतले. त्यांच्या अकरा एकर शेतीतून जे उत्पन्न येत होते, ते त्या मुलांच्या नित्य खर्चासाठी वापरू लागल्या. वसतिगृह सतरा मुलांना प्रवेश देऊन सुरू झाले. त्यांपैकी बरीच मुले विदर्भातील होती. प्रकल्पाची सुरुवात 2017 साली झाली. मग मंगेशी मुंबई, पुणे येथे विदर्भातील तशा मुलांचा शोध घेऊ लागल्या. सध्या सत्तर मुले वसतिगृहामध्ये राहून स्थानिक शाळांत शिक्षण घेत आहेत. मंगेशी यांनी त्या मुलांना भीक मागण्यापासून परावृत्त केले व शिक्षणाच्या प्रवाहात आणले ! मोठी मुले शेतीत कामे करून त्यांना लागणारे धान्य, भाज्या व फळे पिकवण्यास व विक्रीस मदत करतात.

आरंभी, वर्ध्यातील काही शाळांनी या मुलांना प्रवेश देण्यास नकार दिला होता. एका शाळेने तर तीस मुलांना शाळेतून काढून टाकले होते. मंगेशी यांना त्यांच्या प्रवेशासाठी कायदेशीर लढाई लढावी लागली. शाळाचालकांचे म्हणणे होते, की त्या मुलांमुळे इतर मुले बिघडतील ! पण मुलांनी चांगले वर्तन व अभ्यासातील प्रगती दाखवून सिद्ध केले, की तीही इतर मुलांपेक्षा कमी नाहीत. त्यामुळे पूर्वीचा विरोध मावळून त्या मुलांना शाळांमध्ये मानाने प्रवेश दिले गेले. मंगेशी यांना त्या लढाईतून मुले जेव्हा इतर मुलांसारखी राहतील, तेव्हाच त्यांचा विकास होईल – त्यांच्यात परिवर्तन होईल हा विश्वास मिळाला.

आता मंगेशी यांना मदतनीस कार्यकर्ते आहेत. संस्थेच्या कार्यकर्त्यांना शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मुले सापडतात. त्याकरता जेथे मुले भीक मागतात अशा सिग्नल्सवर, रेल्वे स्थानक, झोपडपट्ट्या, फुटपाथ, उड्डाण पूल अशा ठिकाणी त्यांचा शोध घेतला जातो. संस्था प्रतिनिधी मुलांच्या पालकांशी संवाद साधतात, त्यांचा विश्वास संपादन करतात. त्यांना संस्थेच्या कामाची माहिती देतात.

‘उमेद’चा नवीन प्रकल्प पुण्यातील कोथरूड येथे एका इमारतीतील भाड्याच्या जागेत दोन वर्षांपूर्वी (2023) सुरू झाला आहे. मंगेशी यांची कन्या ऋत्विजा हिने तिच्या वयाच्या एकोणिसाव्या वर्षी तेथे पस्तीस मुलांची जबाबदारी घेतली आहे. तिचे कॉलेज शिक्षण चालू आहे. ऋत्विजाने मुलांना शाळेत प्रवेश मिळावा म्हणून त्यांची प्रवेश परीक्षेची तयारी करून घेतली. मुलांचे जन्मदाखले नसल्यामुळे त्यांची कागदपत्रेही तयार करून घ्यावी लागली. ती मुले डेक्कनच्या बाल शिक्षण मंदिर व विजयाबाई गरवारे शाळेत जातात. संस्था त्यांची राहण्याची व त्यांच्या भोजनाची जबाबदारी पार पाडत आहे. ऋत्विजाला तिचा भाऊ ऋताज मदत करत असतो.

मंगेशी यांच्या अडुसष्ट वर्षांच्या आई कमल पुसाटे या वर्ध्याचा उमेद प्रकल्प सांभाळतात. तेथे चार ते चौदा वर्षांपर्यंतची सत्तर मुले आहेत. त्या कामात मंगेशी यांचे भाऊ व वहिनी त्यांना मदत करतात. ज्या मुलांवर लहानपणापासून चांगले संस्कार झालेले नसतात त्यांना ई-लर्निंगच्या माध्यमातून विविध गोष्टी शिकवल्या जातात. 

‘उमेद संकल्प’ प्रकल्पातील मुलांना शिक्षणासोबत त्यांना पुढील आयुष्यात उपयोगी पडतील असे स्वयंशिस्तीचे धडे दिले जातात. त्यांच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी सर्व मुलांकडून सकाळी योग व व्यायाम करवून घेतला जातो. मुलांना शेतीविषयीची सर्व माहिती करून दिल्यामुळे त्यांच्यासाठी लावलेल्या शेतातील फळे व भाजीपाला पिकवण्याची कामे मोठी मुले करतात. स्वयंपाक करणाऱ्या बाई ज्या दिवशी नसतील किंवा आजारी असतील, तेव्हा मोठ्या मुली स्वतःहून स्वयंपाकाची जबाबदारी घेतात. काही मोठ्या मुली प्रकल्पातील लहान मुलांना सांभाळतात.

प्रकल्पात ज्या मुलांमध्ये चांगले कलागुण आहेत, ते शोधून त्यांच्या वाढीसाठी प्रयत्न केले जातात. काही मुले खो-खो छान खेळतात, काही मुलांना चित्रकलेची आवड आहे. काही मुलांना मल्लखांब या खेळाची आवड असल्याने वर्ध्यातील एका स्पोर्ट्स क्लबतर्फे जिल्हा पातळीवरील प्रशिक्षण तेथे सुरू करण्यात येत आहे. 

‘उमेद संकल्प’ हा प्रकल्प स्वखर्चातून आणि लोकसहभागातून चालवण्यात येतो. मुंबई-पुण्याहून वर्धा येथे येणारे पर्यटक प्रकल्पाला भेट देतात. त्यांची प्रकल्पात राहण्या-खाण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे मुलांना नव्या मंडळींच्या सहवासात नवनवीन गोष्टी शिकण्यास मिळतात व प्रकल्पाला आर्थिक मदत होते. प्रकल्पात वृद्धाश्रम आहे. प्रकल्पातील मुला-मुलींना आजी-आजोबा असावेत असा त्यामागील उद्देश आहे. सध्या आश्रमात सहा ‘आज्या’ राहत असून त्यांच्यात ‘नातवंडां’बद्दल जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. स्वतः मंगेशी, मुलगी ऋत्विजा, आई कमल पुसाटे, शीतल चौहान आणि संगीता पुसाटे हे संस्थेत पदाधिकारी आहेत. संस्थेचा वार्षिक अर्थसंकल्प छत्तीस लाख आहे.

मंगेशी यांनी प्रकल्पाचे काम समर्थपणे व यशस्वीपणे सुरू ठेवले आहे. त्यांनी समाजापासून दूर असणाऱ्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करून दाखवले आहे. मंगेशी मून यांना ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’, ‘लायन्स क्लब’चा असे काही पुरस्कार मिळाले आहेत.

मंगेशी मून 7499416413 mangeshirm@gmail.com
– सुरेश चव्हाण 9867492406 sureshkchavan@gmail.com

About Post Author

Previous articleआठवणीतले वाटूळ
सुरेश चव्हाण यांनी एम ए मराठीचे शिक्षण घेतले आहे. ते चाळीस वर्षे मुक्त पत्रकार आहेत. ते रिझर्व बँकेत कार्यरत होते. त्यांनी नाट्य समीक्षक, संशोधक, परीक्षक म्हणून कार्य केले आहे. त्यांनी ‘नमन-खेळे’ या लोककलेवर संशोधन करून नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शन केले. त्यांनी ‘देवदासी’ विषयावर यल्लमाच्या दासी हा व अन्य सामाजिक महत्त्वाच्या विषयांवर माहितीपट तयार केले आहेत. ते मुंबईतील ‘ग्रंथाली’ आणि ‘प्रभात चित्र मंडळ’ आणि कोसबाडची ‘नूतन बाल शिक्षण’ या संस्थांशी संलग्न आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here