शहा हे गाव नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वसलेले आहे. ते सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील वावी गावापासून उत्तरेला आठ किलोमीटर अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या अडीच ते तीन हजारांच्या आसपास आहे. गावात काळभैरवनाथाचे प्राचीन मंदिर आहे. ते ग्रामदैवत होय. त्याचप्रमाणे, राममंदिर, खंडोबा, बिरोबा, हनुमान, महादेव अशी मंदिरे गावात आहेत. गावातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. तसेच, तेथील लोक शेतमजुरी करतात. गावात लहान गावात किराणा मालाचे दुकान, लघुउद्योग आहेत.
गावाची यात्रा चैत्र-पौर्णिमेच्या आदल्या दिवशी असते. यात्रेत काळभैरवनाथाची पालखी निघते. गंगेवरून आणलेल्या पाण्याची कावड हिचीही मिरवणूक असते. यात्रेत काही मनोरंजक गोष्टी असतात. काही खेळांचे आयोजन दुसर्या दिवशी केले जाते. गावात श्रावण महिन्यात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. गावात सर्व उत्सव आणि सणसमारंभ साजरे केले जातात.
गावात येण्यासाठी एसटीची व्यवस्था आहे. गावात सिन्नर तालुक्याच्या गावाहून एसटी येते. गावात गुरूवारी आठवडा बाजार भरतो. बाजारात आजुबाजूच्या गावातील व्यक्तीही येतात.
गावात प्राथमिक, माध्यमिक शाळा आहेत. गावात इंग्लिश मिडियमची शाळाही आहे. बारावीपर्यंत शाळा गावात आहे. पुढील शिक्षणासाठी तेथील विद्यार्थी कोळपेवाडी या आठ किलोमीटरवर असणार्या गावी; तसेच कोपरगाव, सिन्नर आणि संगमनेर या तीस किलोमीटर अंतरावरील गावांत जातात. शहा परिसरातील गावांमध्ये उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण आहे. अशा भागात बाळासाहेब मराळे या शेतकऱ्याने शेवग्याची शेती करून रोहित-एक नावाचे वाण शोधून काढले आहे. त्याच प्रकारे, त्यांनी वैविध्यपूर्ण सुधारणा केल्या आहेत.
गावाचा परिसर अवर्षणग्रस्त आहे. तेथे कोरडे हवामान असते. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी आहे. गावात काही गावतळी आहेत.
गावाच्या जवळपास पुतळेवाडी, विधनवाडी, झापेगाव, विरगाव, पंचाळे ही गावे आहेत.
माहिती स्रोत : बाळासाहेब मराळे – 9822315641.
– नितेश शिंदे