वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें …

2
460

जगभरच्या अनेक संस्कृतींमध्ये वृक्षांना देवत्व बहाल करून त्यांची पूजा, आराधना केली जाते. वृक्ष अनेक मानवी गरजा पूर्ण करतात हे तर खरेच पण त्याचबरोबर काही वृक्षांमध्ये विशेष शक्ती असून ते इच्छित कार्यात मदत करतात, मनोकामना पूर्ण होण्यासाठी सहाय्य करतात अशाही समजूती आढळतात. ग्रीक संस्कृतीत ऑलिंपिकमध्ये विजयी झालेला माणूस हा वृक्षदेवतेचा प्रतिनिधी आहे असे मानले जात असे. भारतीय संस्कृतीत अनेक वृक्ष पवित्र मानले गेले आहेत. वड, पिंपळ, कडूनिंब, बेल, शमी; अशा अनेक झाडांची वेगवेगळ्या कारणांसाठी पूजा होते.

ग्रामदेवतेची मूर्ती स्थापन न करता दरवर्षी एका फणसाच्या झाडात ग्रामदेवतेला पाहणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावातील अनोख्या वृक्षपूजेविषयी सांगत आहेत सानिका म्हसकर.

‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

– सुनंदा भोसेकर

वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं वनचरें…

वृक्षपूजेचा जन्म जगण्यासाठी साहाय्य करणाऱ्या वृक्षांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून झाला. जंगलात राहणाऱ्या आदिवासी जमातींमध्ये आदिम काळापासून वृक्षपूजा अस्तित्वात होती. माणसाला आसरा देणारे, सावली आणि फळे देणारे, शस्त्र बनवण्यासाठी, जळणासाठी लागणारे लाकूड देणारे, वृक्ष त्याला देवाप्रमाणे वाटले यात आश्चर्य असे काही नाही. वृक्ष- वनस्पती हे सजीव आहेत अशी जी समजूत होती ती पुढे विज्ञानाने सिद्ध केली. त्या समजूतीतूनच झाड तोडण्यापूर्वी किंवा त्याची फांदीही तोडण्यापूर्वी, झाडाची परवानगी मागणारा, त्याची क्षमा मागणारा एक विधी रूढ होता असे शरदिनी डहाणूकर यांनी त्यांच्या ‘वृक्षगान’ या पुस्तकात म्हटले आहे.

वृक्षपूजा जगभरच्या संस्कृतींमध्ये रूढ आहे. ग्रीक संस्कृतीत ऑलिंपिकमध्ये विजयी झालेला माणूस हा वृक्षदेवतेचा प्रतिनिधी आहे असे मानले जात असे. भारतीय संस्कृतीत अनेक वृक्ष पवित्र मानले गेले आहेत. वड, पिंपळ, कडूनिंब, बेल, शमी; अशा अनेक झाडांची पूजा होते. अनेकजण गुरुवारी केळ्याच्या झाडाची पूजा करतात. अश्वत्थाच्या म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले म्हणून त्या झाडाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गौतम बुद्धाची प्रतिमा अस्तित्वात येण्यापूर्वी त्याची प्रतीक रूपात आराधना केली जात होती. यात दोन पावले आणि बोधी वृक्ष ही प्रमुख प्रतीके होती. उंबराच्या झाडाला दत्तात्रयाचे प्रतीक मानले जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केली जाते तर दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा होते. अशी अनेक उदाहरणे देता येतील.

वृक्षांची पूजा-अर्चा करून, प्रार्थना करून किंवा त्यांना देवाचे स्वरूप मानून त्यांची आराधना केली जाते. वृक्षसंपदा ही व्यक्तिगत व सामाजिक जीवनाचा अंगभूत भाग असल्याचे मानले जाते. ‘नक्षत्रवृक्ष’, ‘इष्टवृक्ष’ अशा संकल्पना या समजूतीपोटी जन्माला आल्या असाव्यात. या संकल्पनांप्रमाणे प्रत्येक माणसाला आयुष्यात त्याचा ‘नक्षत्रवृक्ष’, ‘इष्टवृक्ष’ असलेल्या एका तरी झाडाची पूजा करून, त्याचे संगोपन करायला, त्याच्या सहवासात वेळ घालवायला सांगितलेले असते. त्यामुळे एकेका माणसामागे एकेका झाडाचे संगोपन होते. झाडे खरोखरी ‘वृक्षवल्ली आह्मां सोयरीं वनचरे’ झालेली दिसून येतात. याखेरीज काही झाडांमध्ये विशेष शक्ती असल्याचे मानले गेले. त्यांना लोकांच्या धार्मिक जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. प्रयागक्षेत्राचा अक्षयवट, नाशिकची पंचवटी, उज्जैनचा सिद्धवट, आळंदीचा अजानवृक्ष, गयेचा बोधीवृक्ष, वृंदावनचा वंशीवट ह्या वृक्षांसंबंधी लोकांच्या मनात अतूट श्रद्धा आहे. पुराणांमध्ये वृक्षांना देवता, लोकदेवता मानले गेल्याचे उल्लेख येतात. स्कंदपुराणात ‘पंचवटी’ म्हणजेच पाच सावली देणाऱ्या वृक्षांच्या वैशिष्ट्यपूर्ण लागवडीचा उल्लेख येतो. त्यानुसार वड, पिंपळ, आवळा, बेल व अशोक वृक्ष कसे, कोणत्या दिशेने, क्रमाने, अंतराने व कशा प्रकारे लावावेत यांचे वर्णन आहे. कोकणात गावोगावी दिसून येणाऱ्या देवराया हेही वृक्षपूजेचे उदाहरण आहे. यामुळे पर्यावरणाचे संरक्षण तर होतेच पण त्याचबरोबर जैवविविधतेचेही जतन होते.

वृक्षपूजेविषयी एका अनोख्या प्रथेविषयी आणि ती जपणाऱ्या गावाविषयी मी आज माहिती देणार आहे. अनेक गावांमधून वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती पाहतो, विशेषतः महाराष्ट्रात पाषाणाच्या मूर्तींचे दर्शन घडते मात्र याला अपवाद असे एक गाव म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील सांगेली. तेथे ग्रामदेवतेची मूर्ती अर्थात गिरिजनाथाची मूर्ती ही पाषाणाची नसून फणसाच्या झाडापासून तयार केलेली असते. दरवर्षी फणसाचे नवीन झाड देवाच्या रुपात आणले जाते. या प्रथेची सुरुवात कधी झाली किंवा तिच्याविषयी ठोस आख्यायिका सांगता येत नाही. हा पूर्वापार चालत आलेला उत्सव विशेष असतो.

दरवर्षी, महाशिवरात्रीच्या दिवशी ग्रामसभा भरते. तेरा फूट उंचीचे फणसाचे झाड ज्यांच्याकडे आहे ते सगळे जण त्यांची नावे कळवतात. त्यानंतर सामंजस्याने, सर्वानुमते एक झाड निवडले जाते. झाड ठरल्यानंतर सगळ्यात आधी त्या झाडाची पूजा केली जाते. त्यानंतर पंधरा दिवसांचा शिमग्याचा उत्सव सुरू होतो. त्यामध्ये भजन, कीर्तन, गायन, दशावतारी नाटके असे विविध कार्यक्रम सादर केले जातात. होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी ठरलेले फणसाचे झाड तोडले जाते. त्यावेळी तेथे आजूबाजूच्या अनेक गावांतून जवळ जवळ दोन ते तीन हजार लोक उपस्थित असतात. ते झाड फणसाच्या झाडाच्या आतल्या कोवळ्या भागापर्यंत सोलले जाते. गावातील मेस्त्रीकाम करणारी सगळी मंडळी एकत्र जमून झाड तासण्याच काम करतात. रात्री सुमारे बारा वाजता त्या संपूर्ण सोललेल्या झाडाची मिरवणूक गावातील गिरिजनाथाच्या मंदिरापर्यंत काढली जाते. ते झाड ढोल ताशांच्या गजरात पहाटे देवळात आणले जाते.

होळीचा दिवस सुरू होतो. मंदिरात नवीन मूर्तीच्या प्रतिष्ठापनेची तयारी सुरू होते. जुने झाड उतरवून नवीन झाड त्याठिकाणी ठेवले जाते. त्यावर देवाचा मुखवटा चढवला जातो. त्या नवीन झाडाला आंब्याच्या डहाळ्यांनी सजवले जाते. झाड तोडून ते तासलेले असले तरीही कालांतराने त्याला पाळ फुटतात आणि गिरिजानाथाच्या मूर्तीची उंची वाढलेली दिसते. गावकरी दर्शनासाठी रांगा लावतात. त्या दिवशी संपूर्ण गावात दूध शेवया हे पक्वान्न करतात. महाराष्ट्रामध्ये बहुतेक ठिकाणी, होळीच्या दिवशी पुरणपोळी करण्याची प्रथा आहे मात्र सांगेली गावात त्या दिवशी दूध शेवया हे पक्वान्न केले जाते. घरोघरी तांदळाच्या पिठाच्या उकडून शिरवळ्या (शेवया, राइस नुडल्स) करतात. नारळाच्या दुधात गूळ घालून तयार केलेल्या रसात या शेवया बुडवून खाण्याची मज्जाच काही निराळी असते. शिरवळ्या तयार करण्याची पद्धतही पारंपरिक आहे. लाकडाच्या साच्यातून ह्या शेवया तयार करतात. अजूनही साच्यावर दाब देण्याचे काम घरातील पुरुष मंडळी करतात तर बाकी इतर कामे महिला करतात. कौटुंबिक वातावरणात सर्वांनी मिळून तयार केलेले हे पक्वान्न चविष्ट तर असतेच त्याचबरोबर ते करताना घराघरातले वातावरण उत्साहाने ओसंडून जात असते.

कोणाला असेही वाटेल की सांगेली गावाच्या ह्या परंपरेमुळे निसर्गाची हानी होते. मात्र ते तसे नाही. वर्षानुवर्ष तेथे फणसाच्या झाडाचा देव केला जातो. दरवर्षी एक झाड तोडतात मात्र अजूनही गावातील फणसाच्या झाडांची संख्या कमी झालेली दिसत नाही. किंबहूना आपल्या बागेतल्या झाडाचा देव व्हावा या भाबड्या भावाने लोक फणसाची अधिकाधिक झाडे लावतात. देव मानणे, श्रद्धा असणे हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते मात्र देव कोठेही पाहता येतो, अनुभवता येतो, जाणता येतो. निसर्गाच्या एका घटकाची देव म्हणून पूजा करणार हे सांगेली गाव कुतूहलाचा विषय होते. गिरिजनाथाची ती मूर्ती अत्यंत प्रसन्न भासते.

अनेक गावांमध्ये अशा वैशिष्ट्यपूर्ण प्रथा, परंपरा असतात. सांगेली गावच्या वृक्षपूजेच्या प्रथेबद्दल मला विशेष ममत्व वाटते कारण हे माझे आजोळ आहे.

– सानिका म्हसकर 8793447782 manasimhaskar1974@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

  1. वृक्षवल्ली आम्हा….
    या लेखातली माहिती उद्बोधक!
    सांगेली गावच्या प्रथेबद्दल अप्रुप तर वाटलंच्..पण वृक्ष
    तोडी बद्दल थोडा विषाद ही वाटला… तसं तर कोकण वृक्ष संपदेनं समृद्ध आहेच् पण त्यात एका वृक्षाचा बळी जाणं…हळहळ ही जाणवणारंच्….
    असो…देवाक् काळजी….तोच.बगतलो..झाडापेडांचो रक्षण करणारा तोच्!

  2. खूप छान माहितीपूर्ण लेख.. सांगेली गावातील प्रथा रोम मधील मॅज्जिओ फेस्टीवल शी मिळतीजुळती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here