Home कला वीरगळ – इतिहासाचे अबोल साक्षीदार

वीरगळ – इतिहासाचे अबोल साक्षीदार

carasole

ग्रामदेवतांच्या, शिवलिंगांच्या (शिवमंदिरांच्या) ठिकाणी मंदिराच्या मागील बाजूस, दीपमाळेजवळ शतकानुशतकांपासून ऊन-पाऊस-वारा सोसत, झिजत असलेले वीरगळ ही इतिहासाची मोठी साक्ष आहे. पण ते काय घटना सांगतात याचा अभ्यास होण्याऐवजी ती ‘पूजास्थाने’ बनवली गेली आहेत! काही ठिकाणी, तो पूर्वजांच्या शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. त्या कलाप्रकाराला छत्राची, निवाऱ्याची गरज आहे. मात्र त्यांना ‘बारापाच’ (बारा जातींच्या बलुतेदारांनी एकत्र येऊन ग्रामदेवतेच्या मंदिरात पंचमहाभूतांची पूजाअर्चा करणे) म्हणून गंध, अक्षता व फुले वाहिली जातात! त्यात कोरलेल्या पूर्वजांच्या प्रतिमा आणि प्रतीके यांचा शोध घेतला जाणे हे ऐतिहासिक दस्तावेजांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. एखाद्या शूरवीरास काही कारणास्तव वीरगती प्राप्त झाली तर त्याचे चित्रही त्या शिलेवर शिल्पांकित केले जाते. त्या शिलेस ‘वीरगळ’ असे म्हणतात. त्याला इंग्रजीत ‘हिरोस्टोन’ तर भारताच्या उत्तरेकडील भागात ‘वीरब्रह्म’, दक्षिणेकडील कर्नाटकात ‘कल्लू’ आणि केरळात ‘तर्रा’ असे म्हटले जाते.

मध्ययुगीन काळात छोटीमोठी युद्धे, आक्रमणे झाली. त्यात ज्ञात-अज्ञात शूर योद्धे, सरदार, सैनिक हे देश आणि धर्म यांसाठी धारातीर्थी पडले. त्याच वेळी तत्कालीन स्त्रिया, त्या काळच्या रुढीप्रमाणे, पतिप्रेम व अब्रुरक्षण यांसाठी त्यांचा देह अग्नीच्या स्वाधीन करून सती गेल्या. त्या सती गेलेल्या स्त्रियांची चित्रे, त्यांच्या शौर्यगाथा दगडी शिलांवर कोरल्या गेल्या. ती शिल्पे त्यांनी लोककल्याणार्थ केलेले कार्य समाजाच्या नजरेसमोर कायमस्वरूपी राहवे यासाठी उभारली गेली. परंतु ती नावरहित असल्यामुळे त्या शिल्पांमधून त्यांची चरित्रे लक्षात येत नाहीत. बरेच वीरगळ, स्मृतिशिल्पे; निसर्गामुळे व समाजाच्या अनास्थेने झिजून विद्रूप आणि भग्न झालेली आहेत. त्यांतील काही शिल्पांचा रेखीवपणा, सौंदर्य आजतागायत टिकले आहे.

वीरगळांवर योद्ध्यांची माहिती, तारीख किंवा सनावळी कोरण्याची प्रथा दिसून येत नाही; त्यामुळे वीरगळांच्या निर्मितीचा नेमका अभ्यास करता येत नाही. काही भागांतील स्थानिक गावकऱ्यांना, जुन्या जाणकारांना भेटून, त्यांनी दिलेले ऐतिहासिक संदर्भ आणि दंतकथा यांच्या आधारे शिल्पचित्रे वा वीरगळ बोलू लागले आहेत. परंतु इतिहासाचा साक्षीदार असलेला तो अस्सल पुरावा उपेक्षित आहे. ऐतिहासिक संशोधन करताना तो स्थानिक इतिहास मोठी मदत करतो.

पूर्वीच्या कुडाळ प्रांतात प्रत्येक देवळाजवळ ‘देवाची राई’ म्हणून एक जागा राखून ठेवलेली असे. त्या राईत चित्रे कोरलेला पाषाण आढळतो. त्यावरील पहिल्या ओळीत चंद्र व सूर्य यांची चित्रे असून, त्याच्या खालील ओळीत शिवलिंग, त्याची धूपारती करतानाचा पुजारी व त्यासोबत दुसरा एक नोकर असतो. त्याच्या खालील ओळीमध्ये पालखी दिसते. त्या पालखीत बसलेला राजपुरुष आणि ती पालखी वाहून नेणारे भोई; तसेच, पालखीच्या मागेपुढे शिपाई दिसतात. त्याच्या खालील ओळीत हातात ढाल-तलवार घेतलेले घोडेस्वार. त्याच्या खालील ओळीत हाती ढाल-तलवार असलेले पायदळ असा हा शिल्पचित्रांचा क्रम. त्याचप्रमाणे त्या राईत दुसराही पाषाण सापडतो. त्यात इतका फरक आहे, की पाषाणावरील तिसऱ्या ओळीत पालखीतील राजपुरुष, घोडेस्वार, पायदळ अशा राजसत्तासूचक शिल्पचित्रांऐवजी ध्यानस्थ पुरुष, त्याच्या खालील ओळीत स्त्रियांची ध्यानस्थ चित्रे, उजव्या बाजूस वरुण देवतेचा खांब अशी चित्रे कोरलेली आहेत .ती चित्रे कुडाळ प्रांतातील राजवैभव दर्शवणारी बारा श्रद्धास्थळे आहेत. जैन धर्मावर विजय मिळवून वैदिक संस्कृतीच्या देवतांची स्थापना करण्यात आली, त्यांसारखे अनेक विषय त्यातून दर्शवलेले आहेत.

अशा संदर्भाचे उत्तम उदाहरण देणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात असलेला मठ गावचा शिलालेख हा एक वेगळाच रंजक आणि अभ्यासपूर्ण असा विषय आहे. मठगावचा शिलालेख हा जिल्ह्यातील यादवकालीन मराठीचा उत्तम नमुना असून मराठी भाषेच्या इतिहासातील शिलालेखांमधील तो मैलाचा दगड ठरला आहे. शके १३१९ (इसवी सन १३९५) चा तो शिलालेख. कुडाळ-वेंगुर्ला रस्त्यावर कुडाळपासून सोळा किलोमीटर व वेंगुर्ल्‍यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले मठ हे गाव. त्या गावातील स्वयंभू देवळाच्या शेजारी छोटे देवालय आहे. त्यास मांगल्याचे देऊळ म्हणून ओळखतात. त्या देवळात सहा पाषाण भिंतीला टेकवून उभे ठेवले आहेत. त्यातील एका पाषाणावर शके १३१९ (इसवी सन १३९५) चा शिलालेख दिसून येतो. तोच मठगावचा शिलालेख. इतिहास संशोधक वि.का.राजवाडे यांनी तो १९०३ मध्ये प्रथम वाचला. त्यानंतर त्याचे वाचन अनेक संशोधकांनी केले. चंदगड अधिपतीच्या वतीने होडावडे परगण्याचे कारभारी मांग सावंत होते. मांग सावंत मठ गावातील मुस्लिम सरदाराबरोबर लढताना धारातीर्थी पडले. मांग सावंत आणि त्यांच्या सती गेलेल्या सहा बायका यांचे स्मारक – रूपपाषाण म्हणजे मांगल्याचे देऊळ. त्याचप्रमाणे त्यात भडखांब किंवा देवालयाची घंटा बांधलेली नाही. त्या सहा वीरगळांपैकी तिन्हांवर लेख कोरलेले आहेत. त्या तीन शिळांपैकी एक शिळा उत्तम काळीथर दगडाची आहे. त्यामुळे त्यावरील लेख पाचशे वर्षांनंतरही सहज वाचता येतात.

कोकणात भिल्ल, कातकरी, वारली, ठाकर जमाती आदिम काळापासून राहत आहेत. आदिवासी संस्कृतीमध्ये मृत व्यक्तीचे स्मारक बनवून, त्यास देवतेचा दर्जा देऊन पूजन करण्याची रुढी आहे. प्रथमत: मूर्ती निराकार दगडाच्या रूपाने पुजली जायची. कालांतराने, दगड कोरून चंद्र, सूर्य, मानवाकृती, पशू यांची रूपे दाखवली जाऊ लागली. पश्चिम महाराष्ट्रात त्यांना ‘वीर’ म्हणतात.

कोकणात जे वीरगळ आढळतात, ते अकराव्या ते अठराव्या शतकादरम्यानच्या आठशे वर्षांतील आहेत. त्या सर्वांमध्ये एकाच साच्यातून बनवल्याप्रमाणे उभ्या दगडात कोरून दोन किंवा तीन खणांत (भागात) चित्रे कोरलेली आढळतात. त्यात तळ भागात धारातीर्थी पडलेला वीर, मधील भागात मोक्ष प्राप्त झाला, त्याचे चित्र (उदाहरणार्थ, रणांगणाच्या पार्श्वभूमीबाबतची कोरलेली दृश्ये), वरील भागात शिवलिंगाची पूजा करताना पुजारी, राजपुरुषास वीरगती मिळाल्याचे सूचित केलेले असते. शेवटी, सूर्य-चंद्र यांची प्रतीके म्हणजे ‘यावत् दिवाश्चंद्र कीर्ती’ म्हणजे जगात सूर्य, चंद्र असेपर्यंत कीर्तीचा डंका वाजत राहील हे सूचित करण्यासाठी असतात. सर्व वीरगळांतील सारखेपणामुळे व वीरांची नावे आणि तिथी यांचा उल्लेख नसल्यामुळे त्यांचा इतिहास, घटना यांचे संदर्भ जुळवणे अशक्य होते. मात्र वीरांच्या पदांनुसार वीरगळ लहानमोठे असतात. जेवढा वीरगळ जास्त मोठा, तेवढा तो मोठा विख्यात ‘खांडेराय’ (राज्यकर्ता किंवा जहांगीरदार) असा लौकिक असे. मठगावच्या शिलालेखात सेनापती, अधिकारी पुरुष आणि सैनिक यांचे वीरगळ अनेक दिसतात. वीराच्या शवासोबत त्याच्या जेवढया स्त्रिया सती जातात, तेवढे वीरगळ त्यांच्या स्मारकासाठी तयार करत असत.

वीरगळ सहसा शिवमंदिराच्या जवळ, क्वचित शेतात व रणभूमीच्या आसपास आढळतात. लोकभावना अशी आहे, की मृतात्मा प्रथम शिवगणात सामील होऊन नंतर तो मोक्षास जातो. त्यामुळे तशी स्मारके शिवमंदिराच्या आजुबाजूस उभी केली जातात किंवा ठेवली जातात. त्यावर शिवलिंगाची पूजा ठळकपणे दाखवली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवमंदिरे जास्त असल्यामुळे देवस्थानच्या आसपास दिसणाऱ्या वीरगळांची संख्या जास्त आहे.

चित्रमय स्मृतिशिल्पात बोरिवली येथील एकसार वीरगळ हा संपूर्ण महाराष्ट्रात अद्वितीय असा वीरगळ आहे. तो शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असून त्यावर बारकाईने कोरण्यात आलेल्या शिल्पांमधून तत्कालीन युद्धदलाचा वापर दर्शवण्यात आला आहे. त्यावर कोरलेली अक्षरे पुसट झालेली असली तरी पाश्चात्त्य पुरातत्त्ववेत्ता कझिन्स यांच्या मते, तो वीरगळ श्री (ठाणे) स्थानकाचा शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वर व देवगिरीचा राजा महादेव यादव यांच्या कालखंडातील (इसवी सन १२६५) आहे. त्यावर पायदळ, घोडदळ, गजदल आणि नाविक दल यांचा वापर करून झालेले घनघोर युद्ध; तसेच, सोमेश्वराचे हौतात्म्य या घटनांचे शिल्पचित्रण आहे. सोमेश्वर समुद्रातील नाविक युद्धात बुडून मेला. त्याचे वर्णन हेमाद्रीने ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ या ग्रंथात केले आहे. ते वाक्य असे, “सोमेश्वराने महादेव राजाच्या क्रोधाग्नीपेक्षा समुद्रातील वडवानलाला तोंड देणे पसंत केले असावे.” त्यामुळे त्या वीरगळाला लिखित वाङ्मयाची पुष्टी मिळते. त्या युद्धात शिलाहारांचे राज्य नष्ट झाले. सोमेश्वराचे अग्निसंस्कार समुद्राकाठच्या एकसर गावात करण्यात आले. त्या जागी त्या महायुद्धाचे वीरगळरूपी चित्रमय स्मारक उभारण्यात आले.

रायगड जिल्ह्यातही देगावच्या मराठ्यांविरुद्ध सुलतानशाहीच्या युद्धात कामी आलेल्या अनाम वीरांच्या स्मारकशिला पसरल्या आहेत.

वीरगळांना वेगवेगळी नावे आहेत. ज्या चित्रशिल्पात गाईबैलांची खिल्लारे दाखवतात व जो योद्धा गोपालांच्या रक्षणार्थ लढता लढता वीरगतीस प्राप्त झाला, त्याला ‘गोवर्धन वीरगळ’ म्हणतात. योद्धा युद्धात धारातीर्थी पडला व त्याची पत्नी त्याच्याबरोबर सती गेली, तर त्या चित्रात ती पालखीत बसवलेली दाखवतात, अशा स्मारकांना ‘पालिया’ म्हणतात. स्मारकांत खालील दालनात ध्यानस्थ साधू बसलेला किंवा झोपलेला दाखवतात. ती साधु-महात्म्यांची ‘समाधिशिला’ होय.

सती गेलेल्या स्त्रीच्या ‘सतिशिला’ कोकणात बऱ्याच ठिकाणी दिसतात. त्या पाषाणात कोपरातून दुमडलेला हात व हाताचा पंजा असतो. हातात कांकणाचा चुडा भरलेला दाखवतात. एखादा राजा, सेनापती, सैनिक या मृतांच्या सती गेलेल्या स्त्रियांच्या त्या ‘सतिशिला’ होत. (संदर्भ-विखुरल्या इतिहासाच्या खुणा).

असाच एक खजिना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील हिवाळे गावातील धनगरवाडीच्या सड्यावर आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल गावावरून ते अंतर आठ ते दहा किलोमीटर आहे. त्या एक हेक्टर भागात पंधरा रेखाटने आढळतात. नक्षीदार चौकटीत कोरलेली, झोपलेल्या अवस्थेतील मानवी आकृती – जिचे डोके, हात, धड, पाय, ढोपरापर्यंतचा भाग शाबूत आहे! दुसऱ्या शिल्पाकृतीत चार नक्षीदार चौक आहेत. त्यातील चित्रलिपीशी साधर्म्‍य साधणारा मजकूर मात्र वाचता येत नाही. त्यावर बैल, शिकारी, माणूस अशी काही चिन्हे आहेत. कातळाच्या अन्य भागांत रिंगण, चंद्रकोर, वृक्ष आदी कलाकृती आहेत. माशांच्या कोरलेल्या दोन चित्रांपैकी एक उठावदार आहे तर दुसऱ्यात डोळे, कल्ले, शेपूट हे सर्व कोरलेले भाग स्पष्ट दिसतात; तसेच, एकमेकांकडे पाठ केलेल्या पक्ष्यांच्या जोडीचे चित्रही स्पष्ट दिसते.

वालावल गावी गिऱ्याच्या राईत असलेला वीरगळ हा गावडे नावाच्या मराठ्याचा आहे. वालावल देवस्थानाच्या उत्तर दरवाज्याच्या तटाच्या बाहेरही वीरगळ आहे. पाट-परूळे, म्हापण, वालावल, होडावडे, कोचरे, कुडाळ, हिंदळे, रेडी, आरोंदे, तेंडोली, नेरूर या सर्व गावांना प्राचीन इतिहास आहे. सिंधुदुर्गात सर्वात प्राचीन शिलालेख वेतोरे (ता. वेंगुर्ला) येथील सोमेश्वर मंदिरयेथे आहे. तो पूजेचा पाषाण म्हणून पूजला जातो. तो सुमारे इसवी सन ११५५मधील असून जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. संशोधक डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी तो १९६३ मध्ये उजेडात आणला. त्या संशोधित शिलालेखाच्या आठ ओळींपैकी तीन ओळींचे वाचन शक्य झाले आहे. त्याचा सारांश असा, “सोमेश्वर देवाची स्थापना नारायणदेवाच्या सोमदेव नामक आश्रिताने शके १०७७ चैत्र शुद्ध युवा नाम संवत्सरात केली.” इंग्रजी कालगणनेनुसार ती तारीख सहा मार्च ११५५ अशी येते. लेख एक फूट आठ इंच लांब आणि एक फूट रुंद ओबडधोबड शिळेवर कोरला आहे. शिळेच्या वरच्या भागात चंद्र, सूर्य, खड्ग, शिवलिंग, दोन शिपाई व उभा असलेला नंदी या आकृती आहेत. मंदिराच्या परिसरात एक चौकोनी ताशीव दीड फूट लांब व सहा इंच रुंद स्तंभ आहे. तो शिकारीचा असावा. त्याच्या वरील भागात सूर्य व चंद्र यांच्या प्रतिमा असून स्तंभाच्या मध्यभागी वराहदृश्य, पाण्याचे चित्र कोरले आहे. तो तेथे का, हे कोडे आहे. गाभाऱ्याच्या मागील बाजूसही वीरगळ आहेत. संगमेश्वरमधील श्रीकर्णेश्वर मंदिराच्या परिसरातही वीरगळ दिसतात. तसेच, दक्षिण द्वाराजवळील एका खांबावर ब्राह्मी लिपीत शिलालेख खोदला आहे.

– प्रकाश नारकर

(मूळ लेख, ‘दैनिक प्रहार’ १९ व २६ मार्च २०१४)

Last Updated on – 27th Jun 2018

About Post Author

13 COMMENTS

  1. भिमा कोरेगाव येथे खरोखरची वा
    भिमा कोरेगाव येथे खरोखरची वा विरगळ आहे. इंग्रजानी सन 1820 ला ती उभारली.1818 च्या पेशव्यांच्या सोबतच्या 5000 सैन्यासोबत फक्त 500 महार बटालियनने दिलेल्या गौरवशाली विजयाचा हा विजयस्तंभ आहे. एखाद्या मंदिरात असावा असा काल्पनिक मुळीच नाही.म्रुत तसेच जखमी विराचे नावे कोरलेली आहेत. बाबासाहेब दरवर्षी 1 जाने ला तिथे जाऊन या विजयी विराना सलामी देत.

  2. छान माहिती.प्रत्येक असे वीरगळ
    छान माहिती.प्रत्येक असे वीरगळ आढळतात!

  3. virgal ya mahatvachya
    virgal ya mahatvachya sadhanachi walakh karun dili. hi bab itihasachya samashodhanas prerak bharel.

  4. खूप छान माहिती मिळाली आणि हो…
    खूप छान माहिती मिळाली आणि हो आमच्या पिंपळवंडी गावा मध्ये महादेव मंदिर आहे त्या ठिकाणी पण वीरगळ आहे आणि संपूर्ण गावात पण 6,7 वीरगळ आहेत.

  5. वीरगळांविषयी कुतूहल तर होतेच…
    वीरगळांविषयी कुतूहल तर होतेच… आमच्या गावी, आणि आजोळी दोन्हीकडेही वीरगळ आहेत.विशेष म्हणजे ते दोन्हीकडील वीरगळ हे मारुतीच्या मंदिराजवळच आहेत.

  6. खुप छान माहिती दिली, धन्यवाद…
    खुप छान माहिती दिली, धन्यवाद सर,

  7. फार छान माहिती आहे. धामारी…
    फार छान माहिती आहे. धामारी ता.शिरुर,पुणे या माझ्या गावात सतीची घोड्यावर बसलेली,हाती तलवार ढाल आणि त्यातच एका कोपर्यात सतीचा हात असणारी मूर्ती आहे.

  8. सुंदर
    रायगड जिल्हा
    पनवेल…

    सुंदर
    रायगड जिल्हा
    पनवेल तालुका
    गाव वाजे आणि वाजेपूर या ठिकाणीही वीरगळ आहे पण त्याबद्दल संशोधन झाले आहे की नाही हे माहीत नाही.
    अश्या प्रकारच्या अजून माहितीची गरज तर आहेच सोबतच याविषयीचे शिक्षण घेण्यासाठी मुलांमध्ये जिज्ञासा निर्माण करण्याचेही तितकेच गरजेचे वाटते.

  9. माझे गाव कलंबिस्त व…
    माझे गाव कलंबिस्त व आजूबाजूच्या गावात अशा प्रकारच्या विरगळा अस्तिवात आहेत पण मला त्या विषयी फारसी माहिती उपलब्द नाही आपण जी माहीती प्रस्तूत केली ती खूप छान आहे धन्यवाद
    १/१/२०२१
    यशवंत मधूकर पास्ते

Comments are closed.

Exit mobile version