Home वैभव प्रतीक लाखेचा चुडा

लाखेचा चुडा

लाख मोलाचा लाखेचा चुडा
मोत्यांची नथणी, भरजरी पैठणी
लाखेचा चुडा, कुंकवाचा करंडा
चांदीची पैंजण, सोन्याचं डोरलं
केसाचा अंबाडा, मोगऱ्याचा गजरा

भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या साज-शृंगाराला असे महत्त्व आहे. पण त्यापेक्षाही सौभाग्यवती स्त्रीच्या लेखी लेण्यांना महत्त्व जास्त आहे. म्हणजे कपाळाचे कुंकू, मंगळसूत्र व लाखेचा चुडा!

यम धर्माचा दूत कुणीही खुशाल राहो खडा,
धन्य हा सावित्रीचा चुडा!
भरदरबारी पांचालीचे, सत्त्व लुटावे चारित्र्याचे,
सखा श्रीहरी आभरणांचा अखंड घाली सडा,
धन्य हा सावित्रीचा चुडा!!

भारतीय स्त्रियांमध्ये मकर संक्रातीला अखंड सौभाग्याचा वसा घेण्यासाठी लाखेचे चुडे घालण्याची प्रथा होती. वेगवेगळ्या प्रदेशांत चुड्याचा रंग बदलतो. महाराष्ट्रात हिरवा चुडा, लाखेचा लाल चुडा, उत्तरेत पांढरा-लाल चुडा, तर बंगालमध्ये हस्तिदंताच्या बांगड्या असतात. महाराष्ट्रात तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, लाखेचा चुडा घालणे शुभ मानले जाते.

सौभाग्यवती स्त्रिया पंढरपुरला श्री पांडुरंग व रुक्मिणी माता यांचे दर्शन घेतल्यावर लाखेचा चुडा घालतात. त्यामुळे पंढरपुरात संतपेठेत तो मोठा व्यवसाय काही कुटुंबाचा झाला आहे.

रुखमादेवी म्हणे देई चूडेदान!
संरक्षी रे प्राण भरताराचा!

तुगा तुमचे माझ्यावर किती उपकार झाले म्हणून तुम्ही मला चूडेदान दिले!

पंढरपूरमध्ये दररोज हजारो व यात्राकाळात (वारी) लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यांमधील स्त्री भाविक रुक्मिणीमातेचा आशीर्वाद म्हणून लाखेचा चूडा घालतात. पंढरीची वारी चुड्यांशिवाय पूर्ण होत नाही. बहुसंख्य भाविक स्त्रिया गरीब असतात. त्या पाटल्या, बिल्वर यांची हौस लाखेच्या चुड्यावर पूर्ण करतात. त्या हौसेबरोबर चुड्यांवर अखंड सौभाग्यासाठी श्रद्धादेखील असते.

पंढरपुरी लाखी चुडा हा सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपुर परिसरात गृहोद्योग होऊन गेला आहे. केवळ देवस्थानामुळे हे महात्म्य बांगड्यांच्या त्या साध्या संचाला लाभले आहे. सौभाग्यलेणे म्हणून संक्रांतीच्या काळात पंढरपुरी लाखी चुडा स्त्रिया हळदीकुंकवाचे वाण देवीला वाहतात. हा पंढरपुरात निर्माण केल्या जाणाऱ्या बांगड्यांचा वापर तीर्थस्थान असल्याने व लोक स्वाभाविकच तेथे येत असल्याने वाढला.

पंढरपूरमध्ये लाखेपासून चुडा तयार करण्याचा लकेरी समाजाचा परंपरागत व्यवसाय आहे. लकेरी समाजास पूर्वी लाखेरी असे म्हणत. काळाच्या ओघात ते नाव अपभ्रंशित झाले असावे. त्या समाजाचे मूळ स्थान मारवाड. तेथे त्यांचा उल्लेख लखेरा असा केला जातो. त्यांची वस्ती महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात या प्रदेशांमध्ये असते. ते लोक स्वतःला राजपूत व कायस्थ म्हणवतात. मारवाडातील लखेरा समाजात हिंदू आणि मुसलमान असे दोन्ही धर्माचे लोक आढळतात. लखेरा स्त्रीया फक्त लाखेच्या बांगड्या घालतात. अन्य हिंदू स्त्रीयांप्रमाणे त्या नाक टोचून घेत नाहीत. या समाजात झाडावर लाख पेरण्या‍चा स्वतंत्र विधी असतो. तो विधी बहुधा अश्विन महिन्या‍त केला जातो. पूर्वीच्‍या काळी लाखेरी माणूस तो विधी करताना रात्री नग्नावस्थेत एका द्रोणात लाखेचे किटक घेऊन ते झाडावर पेरत असे. मग त्या झाडाला कुंपण घालून कुणालाही त्या झाडास स्पर्श करू दिला जात नसे. एखाद्या विधवेला झाडावर लाख पेरायची असल्यास ती स्वतःच्या मुलाला कडेवर घेऊन तो द्रोण त्याच्या डोक्यावर ठेवी आणि काडीने लाख झाडाला लावी. या समाजातले लोक पाय रंगवण्यासाठी लाखेत भिजवलेला रंगीत कापूस विकतात. त्यास ‘माहुरकी गुलेली’ असे म्हणतात. ते कडदोरे, राख्या व अनंताचे दोरे विकण्याचा व्यवसाय करतात.

हल्ली लाखेच्या चुड्यांचा व्य‍वसाय लकेरी समाजापुरता मर्यादित राहिला नसून इतर समाजातील मंडळीही त्या व्यवसायात पडली आहे. पंढरपुरातील संतपेठ भागात लाखेचा चुडा करणारी पन्नास-साठ कुटुंबे असून, तेथे घरगुती पद्धतीने चुडे तयार केले जातात. तो व्यवसाय काही घरांतून पिढ्यान् पिढ्या केला जात आहे. संत पेठ या भक्तिमार्गावरील पेठेत बाळासाहेब अरविंद सोनवणे आणि विशाल बाळासाहेब सोनवणे हे पितापुत्र व त्यांचे संपूर्ण कुटुंब तो चुडा करण्याच्या व्यवसायात आहेत. स्त्रियांना तर इतका सराव झालेला आहे, की दिवसभरात दहा-बारा स्त्रिया पाच हजारपर्यंत नग तयार करतात.

चुड्यासाठी लागणारी सुटी लाख विदर्भातील गोंदियातून आणली जाते. चुडा निर्मितीसाठी लाख, रांजा, पिवळी माती, चौफडा, लाखदाना, बेगडपान, लाकडाचे शैल्य, ठसा शैल्ये, मिडल पिवडी, रंग पाचशे टक्के, गुलाबी, केशरी, नारंगी, दगडीतळ्या, कोळसा, थापी, पितळी डाय (ठसा) इत्‍यादी साहित्‍याची आवश्‍यकता भासते. चुडा तयार करताना तीन किलो लाख आणि एक किलो रांजा पातळ होईपर्यंत शिजवला जातो. त्‍यानंतर त्‍या मिश्रणात दोन किलो पिवळी माती मिसळली जाते. तयार झालेल्या मिश्रणाचा गोळा केला जातो. त्‍यानंतर त्‍या लगद्याची एकेक रिंग तयार केली जाते. त्‍यावर बेगड पान लावले जाते. लाखेच्या बांगड्यांवरील नक्षीकाम पितळी साच्याचा उपयोग करून साधले जाते. पितळी डायचा ठसा बांगड्यांच्‍या कडांवर उमटवला जातो. त्‍यानंतर त्‍यावर दाब देऊन बांगड्या सुकवण्‍यासाठी ठेवल्‍या जातात. त्यानंतर बांगड्यांचे पॅकिंग केले जाते. त्‍या बांगड्यांची हजारी अथवा डझनाच्या दरात विक्री केली जाते. व्यवसाय जवळ जवळ वर्षभर चालतो. संक्रांतकाळात चुड्याला सर्वाधिक मागणी असते.

लाखेचा चुडा पंचवीस नग पन्नास रुपये दराने विकला जातो. लाखेच्या चुड्यांना महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतून मागणी होत असते. मराठवाड्यातून चुड्याच्या मागणीचे प्रमाण जास्त आहे. तर महाराष्ट्राबाहेरून कर्नाटक व आंध्रप्रदेश या राज्यांतून चुड्यांना मागणी असते. वारीच्या काळात लाखेचे चुडे लाखोंच्या घरात व्यापारी उलाढालीला कारणीभूत ठरतात. कष्टाच्या मानाने मोबदला कमी मिळत असल्याने तरुण वर्ग या व्यवसायापासून दूर चालला आहे. गरज आहे, ती या चुडा व्यवसायाला कुटिरोद्योगाचा दर्जा देऊन शासकीय निधी उपलब्ध करून दिला पाहिजे अशी कारागीरांची मागणी आहे.

बदलत्या युगात बांगड्यांचे जसे नवनवे प्रकार बाजारात आले आहेत त्याप्रमाणे लाखेच्या चुड्यांचेही प्रकार बाजारात येऊ पाहत आहेत. लाखेच्या आकर्षक बांगड्या, ब्रेसलेट, कडे बाजारात उपलब्ध आहेत.

लाखेच्या चुड्याचे व्यावसायिक – नागेश लकीरी (7768957077), विशाल बाळासाहेब सोनवणे – 58/1/1, संत पेठ, भक्तीमार्ग, पंढरपूर.

(संदर्भ – भारतीय संस्कृतिकोश, खंड आठवा)

– अरुण बाबर

About Post Author

2 COMMENTS

Comments are closed.

Exit mobile version