वि.का. राजवाडे – विद्वान संशोधक (V.K. Rajwade – Researcher)

1
205
-v.k.-rajwade

इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे महाराष्ट्रीय विद्वान होते. त्यांनी संशोधन व लेखन इतिहास, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा बहुविध विषयांसंबंधी केले. तसेच, त्यांनी त्यांचे लेखन आग्रहाने मराठीतून केले. त्यांनी भारत इतिहास-संशोधक मंडळाची स्थापना 7 जुलै 1910 रोजी केली; त्यांनी ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ ह्या ग्रंथमालेचे संपादन केले. ते ऐतिहासिक साधनांच्या आणि प्राचीन साहित्याच्या शोधात हिंडत सतत राहिले होते. ते दऱ्याखोऱ्यांतून प्राचीन अवशेष पाहत व कोनाकोपऱ्यांतून जुनी दप्तरे गोळा करत फिरत असत. त्यांचे लेखनकार्यही अव्याहतपणे चालू असे.      

राजवाडे ह्यांनी स्वतः ‘भाषांतर’ हे नियतकालिक 1894 पासून चालू केले. त्यांनी त्याखेरीज कोल्हापूर येथील ‘समर्थ’; तसेच, ‘ग्रंथमाला’, ‘विश्ववृत्त’, ‘सरस्वती मंदिर’, ‘प्राचीप्रभा’ इत्यादी नियतकालिकांतून भरपूर लेखन केले. त्यांनी दिवस अत्यंत गरिबीत काढले. त्यांचे निष्कांचन असेच वर्णन केले जाई. मात्र तशाही परिस्थितीत ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ ह्या शीर्षकाने अस्सल मराठी साधनांचे बावीस खंड (1898 -1917) संपादून प्रसिद्ध केले.

राजवाडे यांचा जन्म 24 जून 1863 रोजी वरसई येथे झाला! त्यांच्या वडिलांचा अंत ते तीन वर्षांचे असताना झाला. म्हणून त्यांची आई मोठा भाऊ वैजनाथ व विश्वनाथ यांना घेऊन परत वरसईस त्यांच्या वडिलांच्या घरी गेली. त्या दोन्ही भावांचे शिक्षण मात्र पुण्यासच झाले. विश्वनाथ यांचे प्राथमिक शिक्षण नगरपालिकेच्या शनिवार पेठेतील तीन नंबरच्या शाळेत झाले. त्यांनी दुय्यम शिक्षणासाठी बाबा गोखले यांच्या शाळेत प्रवेश घेतला. ते नंतर काही काळ वामनराव भावे व काशीनाथपंत नातू यांच्या शाळेत होते, त्यांनी त्यांचे दुय्यम शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, मिशन स्कूल असे करत संपवले. राजवाडे 1882 साली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले.

त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात नाव दाखल केले; पण ते घरच्या गरिबीमुळे जेमतेम एक सहामाही कॉलेजमध्ये जाऊ शकले. त्यांनी त्यानंतर द्रव्यार्जनाचे साधन म्हणून पुण्यास पब्लिक सर्व्हिस सेकंडग्रेड परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरू केला. त्यात थोडी प्राप्ती झाल्यावर, त्यांनी त्यांचे नाव पुन्हा डेक्कन कॉलेजमध्ये घातले. त्यांचे मोठे बंधू वैजनाथ यांनाही तेथे फेलोशिप मिळाली होती.

वि.का. यांनी शालेय किंवा कॉलेजमधील अभ्यासक्रमात नेमलेल्या पुस्तकांकडे फारसे लक्ष कधी पुरवले नाही. शालेय शिक्षक, कॉलेजमधील प्राध्यापक त्यांच्या कुशाग्र व विशाल बुद्धीला पुरेसे खाद्य पुरवण्यास असमर्थ होते. मात्र त्यांना डॉ.रा.गो.भांडारकर, न्यायकोशकार म.म. झळकीकर यांच्यासारख्या काही विद्वान, भारतीय कीर्तीच्या प्राध्यापकांच्या शिकवणीचा लाभ मिळाला. त्यांनी ग्रंथांनाच गुरू समजून इतिहास, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, समाजशास्त्र, वनस्पतिशास्त्र अशा विविध शास्त्रांतील अनेक ग्रंथांच्या अभ्यासानंतर 1891 साली बी ए ची पदवी संपादन केली. त्यांनी तत्कालीन शिक्षणसंस्थांसंबंधी मते “मी केवळ विद्यार्जन करण्याचा हेतू बाळगणारा, नोकर तयार करण्याच्या गिरणीत जाऊन पडलो” अशा कडक शब्दांत व्यक्त केली आहेत. त्यांनी त्यांचे प्राथमिक v_k_rajwadeशिक्षणापासून कॉलेजमधील उच्च शिक्षणासंबंधीचे विचार ‘कनिष्ठ, मध्यम व उच्च शाळांतील स्वानुभव’ या निबंधाद्वारे ग्रंथमाला मासिकातून समाजापुढे ठेवले. त्या निबंधात राजवाडे लिहितात, “मला एकही पंतोजी शास्त्रीय रीत्या शिक्षण देणारा भेटला नाही. सर्व पंतोजी येथून तेथून पोटभरू, इकडची पाटी तिकडे उचलून टाकणाऱ्यांपैकी. माझ्या आयुष्यातील अडीच वर्षें नूतन ज्ञानसंपादनाच्या दृष्टीने अगदी फुकट गेली. शिवाय, नैतिक व धार्मिक दृष्ट्या माझा किती तोटा झाला, तो तर सांगवतच नाही.” ते त्या निबंधात पुढे म्हणतात, “बारान् बारा वर्षें शिक्षण द्यायचे नोकरीचे आणि पदवीदान समारंभाच्या वेळी परीक्षा पास झालेल्या सेवार्थी उमेदवारांना उपदेश करायचा, स्वतंत्र धंदा करण्याचा किंवा सरस्वतीच्या एकान्त उपासनेचा. मला ह्या मानभावीपणाचा बहुत तिटकारा आला. वाजवीच आहे, की मी त्या भाडोत्री शिक्षकांच्या गुलामगिरीच्या नोकऱ्यांच्या कंटाळवाण्या परीक्षांपासून पराङ्मुख झालो व पुस्तकालयातील ग्रंथांकडे एकदिलाने वळलो.” त्यांची विद्यार्थिदशेपासून सुरू झालेली ज्ञानसाधना आयुष्याच्या अंतापर्यंत चालू राहिली.

त्यांनी ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थळांना वारंवार भेटी दिल्या. त्या वास्तू त्यांच्याशी बोलू लागल्या. त्यातून अमूल्य माहिती गोळा झाली. त्यांनी तेथील जनजीवन, त्यांची भाषा, चालीरीती, वाङ्मय यांचा समाजशास्त्रीय दृष्टीने अभ्यास करून निष्कर्ष काढले. धोतर, लांब काळा कोट, डोक्याला पागोटे, स्वतःचे अन्न शिजवून खाण्यासाठी मोजक्या भांड्यांची पडशी असा त्यांचा संसार. त्यांना जुनी दप्तरे मिळण्यासारखी एखाद्या ठिकाणी आहेत असा सुगावा लागला, की ते तो सरंजाम घेऊन तिकडे हजर होत. दप्तरे मिळवण्यासाठी जिवाचे रान करत. फटकळ वि.का. तशा वेळी नम्र होत आणि मिनतवाऱ्या करून कागद हस्तगत करत आणि त्यावर तुटून पडत. त्यांचा संदर्भ अहोरात्र परिश्रम करून लावत व पदरमोड करून त्यास प्रसिद्धी देत. कागदपत्र देण्यास सरदार घराण्यातील किंवा संस्थानिकांकडील वारस खळखळ करू लागले, की राजवाडे संतापून म्हणत “ज्यांच्या पराक्रमावर ऐश्वर्य भोगत आहेत ते संस्थानिक झोपले आहेत, जहागिरदार डुलक्या खात आहेत, म्हणून हा खटाटोप आम्हाला करावा लागत आहे.”

राजवाडे यांच्या तपश्चर्येत धुळीची पुटे बसलेली, भिजून चिखल झालेली… अशी दप्तरे हस्तगत करण्यात आलेल्या अडचणींनी खंड पडला नाही. त्यांना थकवा जाण्यापुरती थोडी झोप पुरे. ते स्वतःचे अन्न स्वत: शिजवून खात, तेवढी सवड त्यांना हवी असे. त्याशिवाय त्यांचा सर्व वेळ वाचन, लेखन, मनन-चिंतन यांत जाई. त्या सर्व तपाचे फळ म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचे प्रसिद्ध केलेले बावीस खंड हे होत. त्याशिवाय, त्याहून अधिक असा अप्रकाशित संग्रह राजवाडे यांच्याजवळ मृत्युसमयी होता. त्यांना एकनाथपूर्वकालीन ज्ञानेश्वरीची प्रत त्या भ्रमंतीतच मिळाली. ती त्यांनी संपादित करून प्रसिद्ध तर केलीच, शिवाय ‘ज्ञानेश्वरीतील मराठी व्याकरण’ हा भाषाशास्त्रीय दृष्ट्या मौलिक ग्रंथ लिहिला. त्यातून ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांना नवे मार्गदर्शन लाभले. ‘राधामाधवविलासचंपू’ हा जयराम पिंड्येकृत शहाजी-चरित्रावरील काव्यग्रंथ व ‘महिकावतीची बखर’ हे राजवाडे यांनी संपादित केलेले आणखी दोन ग्रंथ. त्या दोन्ही ग्रंथांच्या प्रस्तावना मौलिक आहेत. राजवाडे यांनी महाराष्ट्र वसला कसा? त्याचे समाजजीवन यासंबंधी जो अभ्यास केला, त्यातून जे निष्कर्ष काढले त्याचे प्रतिबिंब त्या त्या प्रस्तावनेत उमटले आहे.

राजवाडे यांच्या कामगिरीचा भाग निव्वळ इतिहासविषयक नसून त्यांनी बजावलेल्या मराठी भाषाशास्त्रातील कामगिरीचाही म्हणून आहे. ‘राजवाडे धातुकोश’ व ‘राजवाडे नामादिशब्दव्युत्पत्ती कोष’ हे दोन ग्रंथ उल्लेखता येतील, ते त्यांच्या सूक्ष्म व मूलगामी बुद्धिमत्तेचे निदर्शक आहेत. त्याचप्रमाणे ‘सुबन्त विचार’ व ‘तिड्कत विचार’ या दामले यांच्या व्याकरणावरील टीका-लेख व ‘संस्कृत भाषेचा उलगडा’ हा स्वतंत्र ग्रंथ त्यांच्या स्वतंत्र विचारसरणीचे निदर्शक ठरतात. त्यांनी त्या ग्रंथांत व्युत्पत्तींतून मानवाच्या इतिहासाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. राजवाडे यांनी महानुभव ग्रंथांच्या सांकेतिक भाषेचा केलेला उलगडा ही त्यांची फार मोठी कामगिरी आहे. त्या उलगड्याने _rajwade_itihasachisadhaneभाषाभ्यासाचे नवे दालन खुले झाले. त्यांनी विविध विषयांवर निरनिराळ्या मासिकांतून जे लेख व निबंध वेळोवेळी प्रकाशित केले, त्यांची संख्याही फार मोठी आहे. त्यांच्या सर्वस्पर्शी प्रतिभेने अनेक विषयांवर काही नवीन विचार व सिद्धांत मांडले आहेत. ते सर्व अविवाद्य व अचूक नव्हते, तरी त्यांनी ते मांडताना प्रमाणे देऊन ते सिद्ध करण्याची अवलंबलेली पद्धत शास्त्रीय होती. राजवाडे यांनी विचार, मनन, चिंतन यांना शब्दरूप देऊन ते लेखांच्या, ग्रंथांच्या रूपाने वारंवार प्रसिद्ध करण्याची तत्परता दाखवली.

राजवाडे यांचे धुळे शहरात 31 डिंसेबर 1926 रोजी निधन झाले. त्यांनी संशोधन क्षेत्रात केलेले काम अखंडितपणे सुरू राहवे म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बोलावलेल्या सभेतच (9 जानेवारी 1927 ) ‘इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळा’ची स्थापना झाली. राजवाडे यांनी जमवलेले ऐतिहासिक दस्तऐवज, ग्रंथसंपदा जतन करून ते साहित्य संशोधकांना उपलब्ध करून देण्याचे काम सुरू केले. ते कार्य सुरू आहे. त्यामध्ये राजवाडे यांनी लिहिेलेल्या ‘धातुकोश’ या ग्रंथाचे प्रकाशन सन 1938 मध्ये झाले. संशोधन मंडळात प्राचीन काळातील वस्तूंचा संग्रह, अभिलेखागार आहे.

– नितेश शिंदे
(आधार – समग्र राजवाडे, मराठी वाड्मयाचा इतिहास – स.गं. मालशे, शं.गो. तुळपुळे)

About Post Author

1 COMMENT

  1. विश्वनाथ काशिनाथ राजवाडे…
    विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचा इतिहासाचा हा अनमोल ठेवा आहे.

Comments are closed.