विस्ताराच्या विज्ञानाद्वारे मराठीकारण

मराठी भाषेतून संभाषण व संवाद करणे आधुनिक तंत्रज्ञानामुळे सोपे झाले आहे. त्यामुळे तसे प्रयत्न करावेत व मराठीचा विस्तार साधावा असा अभिप्राय पुण्यात मराठीकारणाचा हेतू समोर ठेवून भरलेल्या मान्यवर व्यक्तींच्या बैठकीत व्यक्त झाला. ‘एमकेसीएल’चे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांच्या पुढाकाराने ही मीटिंग झाली. त्यामध्ये नीती बडवे, अनिल गोरे, सतीश आळेकर, भानू काळे, आनंद काटीकर, विनोद शिरसाठ असे वीस-पंचवीस व्यक्ती-मराठी हितचिंतक-कार्यकर्ते उपस्थित होते.

दिनकर गांगल यांनी प्रारंभी निवेदन केले. चर्चेला आरंभ सावंत यांनीच मराठी भाषा प्रसाराच्या कार्यास वैज्ञानिक डूब देऊन केला. ते म्हणाले, की आपला हेतू मराठीतील संभाषण वाढवावे हा आहे. तर आपण विस्ताराचे विज्ञान जाणून घेऊया. त्यांनी सार्नॉफ, मेटकाफ आणि रीड्स या तीन पाश्चात्त तत्त्वज्ञांचे सिद्धांत मांडले. त्यातून त्यांनी चार तत्त्वे सुचवली. ते म्हणाले, की 1. मराठी बोलणाऱ्यांची संख्या अफाट व्हावी हे उद्दिष्ट 2. त्यासाठी त्यांचे संभाषण विविधतापूर्ण असावे, 3. त्यांच्यातील परस्पर संबंध वाढावे, 4. त्यांच्यातील संवाद मोकळेपणाने व्हावा- तो सुसंवाद ठरावा.

अनिल गोरे (मराठीकाका) यांनी मराठीविषयक चर्चेला प्रत्यक्ष आरंभ करून दिला. त्यांनी मराठी भाषा विस्ताराच्या शक्यता कशा आणि किती आहेत हे दाखवून दिले. त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती थक्क करणारी होती. ते म्हणाले, की महाराष्ट्रात सर्वत्र, अगदी उद्योगातदेखील मराठी भाषा चालू शकते. फक्त त्या त्या प्रत्येक उद्योग व्यवहारापुरते शंभरएक शब्द मराठीत नसतात. तेवढ्या शब्दांचा कोश त्या त्या उद्योगाने स्वत:चा म्हणून करावा. महाराष्ट्रात त्र्याण्णव टक्के ग्राहक मराठी भाषी आहेत हे विक्रेत्यांना जाणवून दिले तर तेदेखील मराठी भाषेतच धंदा करू लागतील, कारण त्यांना हिंदी भाषेचे कौतुक नसते, त्यांना व्यवसाय हवा असतो. उद्योग आणि व्यापार या दोन क्षेत्रांना भाषेच्या मुद्यावर बिचकून राहण्याचे काहीच कारण नाही असा त्यांचा अभिप्राय होता.

नीती बडवे म्हणाल्या, की 1. प्रत्येक भाषेत विविधता असते – प्रदेशानुसार भाषा बदलते. प्रत्येक भाषेत अनेक बोली असतात. तरी काही निकषांवर कोणती मराठी शाळेत शिकवावी ती सबंध भाषा समाजासाठी सारखी असावी. 2. प्रत्येक जिल्ह्यात मराठीसाठी शिक्षकांचे प्रशिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. 3. मराठीच्या प्रसार-विकासासाठी मराठीबद्दल आत्मीयता, अभिमान, अस्मिता निर्माण झाली पाहिजे. मराठीला प्रतिष्ठा निर्माण झाली, मराठीच्या अभ्यासाने रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात ह्याचा प्रचार झाला तर मराठी शिकण्याची गरज निर्माण होईल, मराठी शिकावीशी वाटेल.

विनया खडपेकर यांनी कार्यवाहीची अडचण प्रतिपादन केली. त्या म्हणाल्या, की कोणत्याही क्षेत्रात विचार मान्य झाले तरी अडचण नेहमी कार्यवाहीची असते. तेच मराठी भाषेच्या बाबतीतही घडते. इंटरनेटवर लिहिताना अनेकजणं मराठी भाषा देवनागरीऐवजी रोमन लिपीत लिहितात. कारण देवनागरीचे कीबोर्ड वापरात बरेच आहेत. इंग्रजीचा कीबोर्ड जगभर एकच आहे. मराठीचे कीबोर्ड वेगवेगळे असल्यामुळे एकाचा दुसऱ्याला चालत नाही. कनव्हर्जन करावे लागते. मग नकोच ते, म्हणून सोपा मार्ग अवलंबला जातो – रोमन कीबोर्ड. त्यामुळे इंग्रजी लेखनाला व प्रकाशन व्यवसायाला संगणकाचा जितका फायदा होतो, तितका तो मराठी लेखकांना व प्रकाशन व्यवसायाला होत नाही. युनिकोड सर्वत्र असावा हा प्रयत्न आहे. पण तो यशस्वी झालेला दिसत नाही.

गिरीश घाटे यांनी मराठीत ‘टूल्स’ नाहीत ही अडचण सांगितली. त्यामुळे प्रमाणीकरण अवघड होते, 2. व्हॉइस टायपिंगचे शिक्षण जमत नाही, 3. कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान मोठे आहे. तसेच 4. मराठीत चांगला, बिनचूक व शुद्ध मजकूर कसा उपलब्ध करावा असा प्रश्न आहे.

आनंद काटीकर यांनी मराठी प्रसाराची अवस्था हत्ती आणि सात आंधळे अशी झाली असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की तंत्रज्ञान वेगाने प्रगती करत आहे आणि त्यात सर्व भारतीय भाषांचा समावेश होत आहे. जुनी पुस्तके ऑनलाइन उपलब्ध आहेत, युनिकोडमधून विविध पुस्तके आणि नियतकालिके प्रकाशित होणे आवश्यक आहे, म्हणजे मराठी भाषेची आणि साहित्याचीही ऑनलाईन उपलब्धता मोठ्या प्रमाणावर वाढेल. भाषांतराची विविध साधने मोठ्या प्रमाणावर तयार झालेली आहेत. केंद्र सरकारने भाषिणी हे मोबाईल ॲप तर अनुवादिनी हे संगणकीय साधन तयार करून खूप मोठा टप्पा गाठलेला आहे.

वैशाली पेंडसे-कार्लेकर यांनी कोश कार्यावर भर दिला. त्या म्हणाल्या, की ऑनलाइन शब्दकोश आवश्यक आहे. ‘मराठी भाषा डॉट ऑर्ग’वर तो उपलब्ध आहे. तरीही एकभाषी शब्दकोशाची आवश्यकता भासते. मराठीत सध्या अनेक इंग्रजी शब्द किंवा इतर बोलींमधून आलेले शब्द वापरात आहेत. त्यांचा समावेश असलेला सर्वसमावेशक कोश असण्याची आवश्यकता आहे. त्यात या शब्दांची व्याकरण माहितीही असेल. उदाहरणार्थ ई-मेल हा शब्द मराठीतही वापरतो. पण तो स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी हे माहीत नाही, कारण त्याची कोठेच दखल घेतलेली नाही. ऑक्सफर्डच्या धर्तीवर मराठीतही एखादा सतत अद्ययावत होणारा कोश तयार झाला पाहिजे.

सतीश आळेकर यांनी शालेय शिक्षणात मराठी माध्यमांच्या शाळांनी पुण्याच्या ‘अक्षरनंदन’ किंवा मीना चंदावरकर यांनी तयार केलेल्या पध्दतींचा (अभिनव विद्यालय) वापर चाळीस वर्षांहून अधिक काळ चालू आहे. त्या पध्दतींचा वापर करता येईल का? बोली भाषांवर जास्त भर द्यावा. त्यासाठी आकाशवाणीवर रोजच्या प्रादेशिक बातम्या विविध बोली भाषांमधून सुरू करता येतील का? काही काळ प्रमाण भाषेपासून फारकत घ्यावी. नाट्यकलेत प्रमाणभाषेतून फारकत घेतलेला कलाकार प्रेक्षक आनंदाने अभिनयाच्या जोरावर स्वीकारतात. उदाहरणार्थ मकरंद अनासपुरे, तमाशा वग नाट्यातील सोंगाडे इत्यादी. 1. राज्याबाहेर महाराष्ट्र संस्कृतीविषयी माहीती केंद्रे दिल्लीप्रमाणे अन्य राज्यांतून सुरू करता येतील का? 2. परदेशात शनिवार-रविवारी मराठी शिकवणाऱ्या अनौपचारीक केंद्रांचे (यात हजारो लहान मराठी मुले येत असतात)! अधिकृत  जाळे (Network) करता येईल का? त्यांना काही मदत करता येईल का?

विनोद शिरसाठ म्हणाले, की मराठी भाषेच्या विकासासाठी व विस्तारासाठी पूर्वी कधी नव्हे इतकी अनुकूलता आज आहे. याचे मुख्य कारण तंत्रज्ञानात झालेले बदल आणि सुलभ व जलद असा डिजिटल मीडिया. मुलाखती, शब्दांकन व भाषांतर या माध्यमांतून खूप जास्त नवा मजकूर मिळवायला वाव आहे, त्याद्वारे अनेक नवे विषय व लेखक पुढे आणता येतील. शिवाय व्हॉईस टायपिंग आणि ओसीआर तंत्राद्वारे मोठ्या प्रमाणावर नवा जुना मजकूर कमी वेळेत, कमी श्रमात व कमी खर्चात उपलब्ध करून देता येईल. मात्र हे सर्व साध्य करण्यासाठी मजकुराची चांगली समज असणारे, मजकूर तयार करू शकणारे, संपादन करू शकणारे लोक मोठ्या प्रमाणात निर्माण करावे लागतील, त्यांची आज बरीच कमतरता आहे. गुणात्मक वाढ आणि संख्यात्मक वाढ (Quality quantity) या दोन्ही आघाड्यांवर काम करण्याची गरज आहे.

शमसुद्दीन तांबोळी यांनी उर्दू भाषिक मुलांची आकडेवारी सांगितली. ते म्हणाले, की महाराष्ट्रात उर्दू माध्यमाच्या चार हजार नऊशे शाळा आहेत. त्यात तेरा लाख विद्यार्थी शिकतात. त्याशिवाय वीस लाख मुले मदरशांत शिक्षण घेत असतात. त्यांना मराठी भाषेत प्रशिक्षण देणे शक्य आहे. तशी व्यवस्था संजीने वालेद्दिन (उर्दू पालक शिक्षक संघटना) व उर्दू जिल्हा परिषद शाळा अशा सारख्या संस्थेमार्फत करता येऊ शकेल.

भानू काळे म्हणाले, की मी अशा असंख्य बैठकींना उपस्थित राहिलो आहे पण अपेक्षित तशी कार्यवाही होऊ शकलेली नाही, मराठीच्या एकूण स्थितीवर आपल्या बैठकींचा फारसा परिणाम का होत नाही याचा खोलात जाऊन अभ्यास करायला हवा. आपण सर्व नक्कीच मराठीप्रेमी आहोत, आपले विचारही योग्य आहेत. पण एकूण नव्वद टक्के किंवा अधिक समाजाला तसे वाटते का हा खरा प्रश्न आहे. समाजाला जे हवे असते त्यानुसार तो वागतो. प्रत्यक्षात मराठीच्या स्थितीबद्दल एकूण समाजाला काळजी वाटते का? मराठी भाषा हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे का याचा अभ्यास करायला हवा.

नामदेव माळी म्हणाले, की शाळांमध्ये मराठी भाषा ‘शिकवली’ जात नाही. फक्त धडे वाचून दाखवले जातात. मराठी भाषा बोलण्यातील आनंद त्या मुलांना कसा होऊ शकेल? चर्चेमध्ये वंदना बोकील, मिलिंद परांजपे, संदीप तापकीर, वीणा सानेकर, दीपक पवार यांनीही सहभाग घेतला.

प्रणव बापट यांनी ‘मराठी बोली’ शिकवण्याचे छोटे अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने ‘एमकेसीएल’चे प्रयत्न काय चालू आहेत ते सांगितले. तर सुकृत कुलकर्णी यांनी ‘साहित्यसृष्टी डॉट कॉम’ या वेबसाइटचा नमुना सादर केला. त्यावर मराठी पुस्तकांशी संबंधित असा सर्व डेटा सादर करण्याचा संकल्प आहे असे ते म्हणाले. वीणा सानेकर यांनी 1. इंटरनेटवरील मराठी, 2. शिक्षणातील मराठी, 3. प्रशासन आणि प्रचार गट, 4. मराठी जाणीवजागृतीसाठी कला व संस्कृती गट असे गट करता येतील त्यात अधिकाधिक जणांनी सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले.

– थिंक महाराष्ट्र

About Post Author

1 COMMENT

Leave a Reply to Vishakha vijay pophali Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here