Home गावगाथा विराट विरार

विराट विरार

2

विरार या एकेकाळी लहानशा असलेल्या गावाचे विराट नगरीत रूपांतर झाले आहे. हा लेख साधारणत: पाऊणशे वर्षांपूर्वीच्या विरारच्या गतस्मृतींमध्ये वाचकाला रमवतो. त्यावेळचे गावपण, परस्परांविषयीचा आपलेपणा व माणुसकीचा गहिवर, संस्कृतीच्या पाऊलखुणा झरझर डोळ्यांसमोरून तरळून जातात. भेदभावरहित अशी ती गावे शिक्षणाच्या विस्फोटाने, शहराच्या बंदिस्त जीवनशैलीने, आधुनिक सुविधा आणि श्रीमंतीने हरवून गेली आहेत…

पश्चिम रेल्वेची सुरुवात झाली आणि विरारचे पूर्व-पश्चिम (पालघर जिल्हा व वसई तालुका) असे विभाजन झाले. विरार या लहानशा गावाचे विराट नगरीत रूपांतर झाले आहे. मला समजू लागल्यापासूनच्या (1945 पासून) विरारच्या स्मृती मनात दाटू लागतात आणि ते ‘मनातले गाव’ उलगडू लागते. विरारच्या पश्चिमेला जीवदानी डोंगर, बारोंडा डोंगर व त्यांच्या दक्षिणेकडे लांबच लांब डोंगररांगा पसरलेल्या आहेत. पावसाळ्यात डोंगरावरून येणारे पाणी मोठमोठ्या ओहोळांमधून पूर्वेकडून वाहत असे. तसे अनेक ओहोळ पश्चिमेकडे येऊन खारजमिनीतील खाड्यांतून वाहत असत. तत्कालीन ग्रामीण भाषेत ओहोळाला ‘वीरा’ म्हणत. विऱ्याचे गाव म्हणून ‘विरार’ हे गावाचे नाव रूढ झाले असावे.

विरारमध्ये पश्चिमेला प्रथमपासून रहिवासी असलेल्या आगरी समाजाचा डोंगरपाडा. त्याला लागून असलेली तेलीआळी, तेथे बैलांच्या सहाय्याने चालणाऱ्या घाण्यांवर (कोलू) तेल काढले जाई. वाडवळ समाजाच्या चोरघेआळी, राममंदिर आळी, तळेआळी व राऊतवाडी अशा चार आळ्या होत्या. स्टेशनच्या परिसरात मोजकीच गुजराथी, मारवाड्यांची किराणा व गुरांच्या खुराकाची दुकाने होती. स्टेशनला लागून असलेला गावठाण हा कुडाळांची वस्ती असलेला भाग. राममंदिर आळीमध्ये (माजी आमदार व मंत्री) अण्णासाहेब वर्तक यांचे घर व त्यांचे आजोबा हिरा गोविंद वर्तक यांनी इसवी सन 1894 मध्ये बांधलेले श्रीराम मंदिर सर्वपरिचित होते. पन्नास वर्षांपूर्वी अण्णासाहेबांच्या शेतकरी कुळांकडून खंडाचे भात घेऊन येणाऱ्या बैलगाड्यांची रांग लागलेली असे. विरार स्टेशनच्या समोरच वामन रोड्या पाटील यांचे हॉटेल होते. त्यांच्या हॉटेलचे आकर्षण म्हणजे शुद्ध तुपातील बदामी हलवा व मालपुवा. स्टेशन भागात उत्तर भारतीय भय्यांची वस्ती होती. मुनेश्वरबाबा मिश्रा हे त्या समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्व होते. त्या भागात उत्तर भारतीयांची केळ्याची मोठी बाजारपेठ होती. विरारच्या बाहेर आगाशी मार्गावर विरारमधील पहिले टुअरिंग थिएटर आकडेबाज मिशीवाले दामू पाटील, मुंबईचे सावे यांच्या भागीदारीत चालवत असत. थिएटरच्या परिसरात विष्णू वामन ठाकूर यांचे कँटीन होते. त्या ठिकाणी आता वुडलँड थिएटर आहे. त्यापलीकडे सर्वदूर खारजमीन, खाड्या व त्यावर तिवरांच्या झुडुपांचे साम्राज्य होते. खाडीत मासेमारी चाले व खारजमिनीत रात्या (लाल) भाताची पेरणी केली जात असे. तेथे आता सिमेंट काँक्रीटचे जंगल फोफावले आहे. दक्षिणेकडे रेल्वेच्या दुतर्फा ताडवाडी होती. ताडांची पुष्कळ झाडे असल्याने ताडवाडी हेच त्या भागाचे नाव रूढ झाले असावे. विरारच्या पश्चिम भागात व्यापार अधिक होता आणि शेती-बागायत होती ती प्रामुख्याने पूर्वपट्टीत. पश्चिमेस राहणाऱ्या बहुसंख्य शेतकऱ्यांची शेती व बागायत पूर्वेस होती. मनवेलपाडा हा भातशेतीचा भाग होता. त्याला लागूनच फुलपाडा होता. तेथे गावठी गुलाब, चिनी व बदामी गुलाब, पिवळी-लाल झेंडूची फुले, सोनचाफा, सब्जा, मोगरा, नेवाळी अशी विविध प्रकारची फुलशेती केली जाई. निवासी संकुलाच्या आक्रमणाने फुलशेती मावळल्यात जमा आहे. पूर्व विभागाच्या उत्तरेकडे विरारमधील पहिला कारखाना म्हणजे नागेश कामत यांची फुगा फॅक्टरी. त्याच्या शेजारी दगडाची खाण होती. त्या खाणीवर अजईबेग मुन्शी हे पेशावरी मुसलमान काम करत. खाणीवरून पायवाटेने पुढे गेल्यावर डोंगरावर जीवदानी देवीचे मंदिर आहे. चिमाजी आप्पांच्या सरदाराने जिंकलेल्या ‘जीवधन’ किल्ल्यावरून डोंगराला जीवदानीचा डोंगर असे नाव पडले. डोंगरावरील देवीच्या दर्शनासाठी पूर्वी पायवाट होती. हे मंदिर सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचे असावे असा ‘ठाणे गॅझेट’मध्ये उल्लेख आहे. या देवस्थानाचा कायापालट झाला असून ते महाराष्ट्रातील लोकांचे श्रद्धास्थान आहे.

विरारमध्ये गौरी-गणपतीच्या काळात ‘पदीची गौर’ मानाची मानली जात असे. फुलांच्या वेण्या बनवण्यात सिद्धहस्त असलेली पदीबाई डोक्यावर गौर घेऊन नाचवायची. डॉ. प्रधान, डॉ. अमृत सामंत व डॉ. सुंदरकांत पुरंदरे ही त्यागी व सेवाभावी डॉक्टर मंडळी होती. आजच्या ब्युटी पार्लरच्या युगात त्यावेळचा परशा न्हावी काही कमी कारागीर नव्हता. तत्कालीन बलुतेदारांना गावातील घरोघरची इत्यंभूत माहिती असायची. गाव म्हणजे एक कुटुंबच होते. पश्चिम विभागातील हिरा विद्यालय ही 1880 मध्ये स्थापन झालेली शाळा. त्यानंतर राऊतवाडीजवळ कन्याशाळा सुरू झाली. पूर्वीची व्हर्नाक्युलर फायनल (सातवी) परीक्षा द्यायला मात्र वसईस जावे लागे.

अण्णासाहेबांचा प्रशस्त बंगला, माझे काका रामचंद्र जीवन पाटील यांची बंगली आणि वामन रोड्या पाटलांची माडी वगळली तर बहुसंख्य घरे चौमाळी-दुमाळी अशी मंगलोरी कौलांची होती. बैलगाडी व टांगा ही वाहतुकीची साधने होती. विरारमध्ये अनेक वर्षे पाण्याचे दुर्भिक्ष होते. उन्हाळ्यात विहिरीतून पोहऱ्याच्या साहाय्याने जेमतेम ओंजळभर पाणी मिळत असे. असे म्हणतात, की त्यामुळे विरारमध्ये मुलीची सोयरीक करण्यास आईवडील धजावत नसत. बहुजन समाज शेतीवर गुजराण करत असे. फुलशेतीवाले मध्यरात्री दोन वाजता उठून कंदिलाच्या उजेडात फुले तोडून 3.25 च्या लोकलने चर्नीरोडजवळील भुलेश्वर फुलगल्लीत फुले विकण्यास जात. विरारला ग्रामपंचायत होती. रस्ते कच्चे, पण रोज सफाई व्हायची. रात्री रस्त्यावर दिवाबत्ती असायची.

जात, धर्म, पंथ असे भेदभाव नव्हते. मला आठवते ती खातुनबाय. तेलीआळीत तिचा घाणा होता. ती त्यावर खुरासणीचे तेल काढायची. ती बाटलीभर तेल घेऊन सरळ आमच्या स्वयंपाकघरात घुसायची. मग माझी आई आणि तिची चहाचे घुटके घेत व विडी ओढत बातचीत चालायची. त्यावेळी एकमेकींचा धर्म कधी आड आल्याचे माझ्या पाहण्यात नव्हते. तेली मुस्लिमांचे ताबूत निघत तेव्हा आमच्या आळीतील कितीतरी आया त्यांच्या लेकरांना घेऊन ताबूताखालून जात असत. विरारमध्ये व्हीन्सेंट यांचे एकमेव ख्रिस्ती कुटुंब राहात होते. गावात मशीद होती, पण चर्च नव्हते. आता मनवेलपाड्यात चर्च बांधले आहे. विरार गावाने महाराष्ट्राला अण्णासाहेब वर्तक, भाऊसाहेब वर्तक, तारामाई वर्तक असे तीन मंत्री दिले. विरारमध्ये लहानाचा मोठा झालेला गोविंद अरुण आहुजा हा अभिनेता ‘गोविंदा’ म्हणून नावारूपाला आला. विशेष म्हणजे तो अभिनेत्याचा नेता बनून खासदार म्हणून लोकसभेतही दाखल झाला. गोविंदाच्या आई प्रसिद्ध गझल व ठुमरी गायिका निर्मला आहुजा हे विरारचे सांस्कृतिक वैभवच होते. चांगले-वाईट असे सगळे दिवस पाहिलेली, प्रसंगी विरारमध्ये चाळीतही येऊन राहिलेली ती कलाकार स्वभावाने अतिशय नम्र, शालीन आणि धार्मिक वृत्तीची होती. त्या संगीतप्रेमींनी स्थापन केलेल्या ‘संगीतसंगम’ या संस्थेच्या अध्यक्ष होत्या. पंडित मनोहर चिमोटे उपाध्यक्ष होते व मी कार्यवाह होतो. तेव्हा निर्मलादेवींच्या शब्दाला मान देऊन अतिशय जुजबी बिदागी घेऊन पंडित वसंतराव देशपांडे, सुधीर फडके, परवीन सुलताना अशा दर्जेदार कलाकारांनी विरारमध्ये त्यांची कला सादर केल्याचे मला स्मरते.

लोकनेते अण्णासाहेब वर्तक, पंढरीनाथ चौधरी, कमलाकर चौधरी यांच्यासारखे स्वातंत्र्य सैनिक विरारच्या मातीत जन्मले. लग्न समारंभ व धार्मिक विधीच्या वेळी तेलीआळीतील कासीम ताशेवाल्याची उपस्थिती हमखास असे. गरगरीत पोटाचा कासीम ताशा वाजवत असताना चक्क डुलकी घेत असे. नानू सोनार पांढरेशुभ्र धोतर नेसून उघड्या अंगाने त्याच्या सोन्याच्या पेढीत पुठ्ठयाच्या पंख्याने वारा घेत बसे. त्याच्या कलाकुसरीपेक्षा त्याचे ढेरपोटच अधिक लक्ष वेधून घेई. लहान मुलांचे कान टोचताना त्याच्या भोकाडाकडे दुर्लक्ष करून स्थितप्रज्ञासारखे कान टोचावेत ते नानू सोनारानेच. डोंगरपाड्यातील कुंभारआळीत वामन कुंभाराचा मडक्यांचा आवा पेटत असे. त्याच्याच शेजारी नारायणचा गणपतीचा छोटासा कारखाना होता. आम्ही मुले गणपती बनवण्याची माती पळवण्यासाठी तेथे जात असू. तळेआळीच्या दक्षिणेकडील बंडू जोशी यांच्या घराच्या खालच्या भागात ढगे नावाचा एक शिंपी होता. तो रहाटाला बैल जोडल्यानंतर त्याच्या डोळ्यावर बांधायची डोपेंडी सुंदर शिवायचा. तो बोळिंज, नंदाखाल भागात राहणाऱ्या कुपारी पुरुषांच्या लाल रंगाच्या टोप्या शिवण्यात वाकबगार होता. चोरघेआळीच्या पलीकडे आत्माराम कोथमिरे, सावळाराम जाधव व गणपत घोलप ही खाटिकांची तीन कुटुंबे होती. त्यांच्या शेजारीच पांचाळ समाजातील दिवल्या लोहाराची धमणी होती. तेथे विळे, कुऱ्हाडी, कोयती बनवणे व त्यांना धार देण्याचे काम चाले. ऐरणीच्या देवाचा पुजारी किरकोळ प्रकृतीचा दिवल्या बैलगाडीच्या चाकांवर पाटा बसवण्यात तरबेज होता. धमणीच्या हवेने धगधगणाऱ्या कोळशाने लालभडक झालेला पाटा पाण्यात टाकल्यावर त्याचा चर्रर्र असा आवाज होई. रेल्वेलगत विरार पूर्वेला राहणारा नागो मेस्त्री हा एकमेव सुतार. बैलगाडीची चाके, रहाट व खाटा त्याच्याशिवाय बनतच नसत. त्यावेळी विरार हे पाच ते दहा हजार वस्तीचे गाव होते. त्यामुळे प्रत्येकाचा व्यक्तिगत परिचय असायचा. परस्परांविषयी आपलेपणा व माणुसकीचा गहिवर होता. विरार ‘विराट’ झाले आहे. शिक्षणाच्या विस्फोटाने, सिमेंट काँक्रिटच्या जंगलाने, आधुनिक सुविधांनी आणि श्रीमंतीने गावपण हरवले आहे. आजही मन गतस्मृतीत जाते तेव्हा आठवते ते विटीदांडू, लगोरीसारखे खेळ आणि शांत, स्वच्छ व निसर्गरम्य असे मनातले गाव.

नंदन पाटील 9850478402

———————————————————————————————————————————————–

About Post Author

2 COMMENTS

  1. माहितीपूर्ण लेख आहे .जुन्या विरारच्या रहिवाशांना जुन्या आठवणी आणि स्मरणरंजनात नेणारा असा हा लेख आहे. लेखाला flow पण चांगला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version