अहिंसा आणि मानवी हक्क यावर नितांत विश्वास असलेले विनोबा भावे. त्यांना लोकांनी आचार्य ही पदवी दिली. ते त्यांच्या लेखणातून त्यांच्या जीवनाचे, आयुष्याचे त्यातील अनेक अंगाचे स्वरूप दाखवून आपल्याला विचारमग्न करतात, विचारांचा रस्ता दाखवतात. त्यांचे विचार आजच्या काळातही सोप्या भाषेत, उदाहरणे देऊन आपल्याला एक शिकवण देतात. विनोबाजी यांच्या विचारांचा मागोवा हेमंत मोने यांनी त्यांच्याबरोबर पत्ररूप संवादाने घेतला आहे, तो वाचूया.
-अपर्णा महाजन
विनोबा– स्वरूपातून विश्वरूप !
अकरा सप्टेंबर हा विनोबांचा जन्मदिवस. त्यांच्यासारख्या माणसाचं असणं हेच किती महत्त्वाचं होतं, आहे याची सर्व पातळ्यांवरील विलक्षण गर्तेच्या आजच्या काळात प्रकर्षाने जाणीव होते. त्यांच्याशी साधलेला हा पत्ररूप संवाद.
पूज्य विनोबा, आम्हाला तुमचं स्मरण नेहमीच होत राहील, कारण तुमचं आयुष्य हीच तुमची शिकवण आहे. आम्ही तुमच्या कार्यात आणि शिकवणुकीत असलेल्या एकरूपतेमुळे तुमच्यापुढे नतमस्तक होतो. खरी निरहंकारिता कर्मात आहे असं तुम्ही म्हणता. तुमची उदाहरणं आणि दृष्टांत देण्याची पद्धत खूप छान आहे ! ती नुसती भाषा नव्हे, हृदयाची भाषा आहे. सूर्य रोज उगवतो, नदी सतत वाहते. तिला कोणता अहंकार आहे असा प्रश्न विचारून कार्यरत असणं म्हणजेच अहंकारी नसणं हे तुम्ही आम्हाला शिकवलं. तुम्ही तुमच्या भूदानाच्या मोहिमेत सत्तेचाळीस लाख एकर जमीन भूमिहीनांना मिळवून दिलीत; नव्हे, लोकांनी ती स्वेच्छेने तुमच्या पदरात टाकली. अहिंसेचा सार्वजनिक प्रयोग यशस्वी केलात. कार्यमग्नतेचे आणखी दुसरे उदाहरण कोणते? एवढेच नव्हे तर त्या जमिनीतील कणभर मातीही तुम्ही अंगाला लावून घेतली नाहीत. कर्मयोगाने तुमच्या कृतीने मूर्तरूप धारण केले.
कार्यशून्यता आणि आळस झाकण्यासाठी निरहंकारितेची ढाल पुढे करू नका हे तुमच्याशिवाय कोण सांगणार? परमेश्वराचं दर्शन घ्यायचं असेल तर व्यक्तीमधल्या गुणांचं दर्शन घ्या असा सोपा मंत्र तुम्ही आम्हाला दिला आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे आणि स्वत:चेसुद्धा गुण पाहा असं तुम्ही म्हणता. तुमच्या प्रत्येक विचारामागे आध्यात्मिक आणि तार्किक बैठक असते. गुण आत्म्याचे आणि दोष देहाचे आहेत, त्यामुळे नेहमी गुणदर्शन, गुणग्रहण आणि गुणस्तवन करा असं तुम्ही सांगता. तुमची ही साधी शिकवण प्रत्यक्षात आणली तर व्यक्ती–व्यक्तीत सौहार्द निर्माण होईल, भीती दूर होईल. व्यक्ती-व्यक्तीमधील आश्वासकता वाढेल. पण लक्षात कोण घेतो? शरीरात स्वास्थ्य निर्माण व्हायला हवं असेल, समतोल साधायचा असेल तर वात, पित्त, कफ यांचं संतुलन साधलं गेलं पाहिजे हा दृष्टांत देऊन साम्ययोगाचं महत्त्व समाजासाठी किती आहे, हे तुम्ही तुमच्या खास शैलीत पटवलं आहे. अतिगरिबी किंवा अतिसमृद्धी यांतून अनेक प्रकारची पापं निर्माण होतात. म्हणून जास्त सुख नाही आणि जास्त दु:ख नाही अशा अवस्थेत चित्त प्रसन्न राहते असं तुम्ही सांगता.
सुख आणि समाधान यांत महदंतर आहे. एकाचा संबंध शरीराशी तर दुसऱ्याचा मनाशी आहे. पण आज आम्हाला फक्त शरीराची जाणीव आहे आणि त्यामुळे सुखाची तृष्णा आहे. समाधान हरवल्याचं यत्किंचितही दु:ख नाही. बरं, सुखाचा विचारसुद्धा किती संकुचित. त्यामुळे सुख फक्त मला एकट्याला मिळावं ही इच्छा आणि तशी अपेक्षा सुखाला दु:खात फिरवते असं तुम्ही म्हणता ते किती सार्थ आहे ! तुम्ही तो विचार योग्य शब्दांत मांडलात. सर्वांसाठी जो सुखाची इच्छा करील तो स्वत:ही सुखी होईल. जो स्वत:साठीच सुख इच्छील तो स्वत:ही दु:खी होईल आणि इतरांनाही दु:खी बनवील. चूक सुखाची इच्छा बाळगण्यात नाही तर स्वत:साठी सुख इच्छिण्यात आहे. तुम्ही नुसते एवढे सांगून मोकळे झाला असतात तर तो कोरडा उपदेश ठरला असता. तुम्ही भूदान, ग्रामदान यांतूनही तो विचार प्रवाहित केलात, कृतीत आणलात, म्हणून तुमच्या साध्या सांगण्यालाही खूप किंमत आहे. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करण्याचा करंटेपणा करता कामा नये म्हणून तुमचे स्मरण, चिंतन आवश्यक आहे.
विनोबा, तुमचं सगळं कसं सूत्रबद्ध असतं. अगोदर हृदय परिवर्तन, मग कृतीत परिवर्तन आणि सरतेशेवटी समाज परिवर्तन हा सोपान समाजाचे प्रश्न सोडवील अशी तुमची धारणा. तुमची भूदान मोहीम हा या गोष्टीचा पुरावा आहे. तुमच्या कृतीत जे भावतं तेच आमच्यासाठी मार्गदर्शक ठरतं. असं भाग्य फार थोड्या लोकांना लाभतं. नाही तर उपदेश आणि कृती यांत फारकत झाली की उपदेश हा फक्त उपचार ठरतो. कायदेमंडळ, संसद या संस्था सार्वभौम आहेत आणि ते समाज परिवर्तनाचं एकमेव माध्यम आहे हा विचार तुमच्या शब्दांत सांगायचा तर ‘मतलबी राजकारण्यांनी मुद्दाम पसरवला’ आहे. ज्याला अनेक पळवाटा असतात तो कायदा अशी कायद्याची वेगळी व्याख्या करता येईल. पण कायद्याच्या व्याख्येपेक्षा त्याची परिणामकारकता अधिक महत्त्वाची आहे. हृदय परिवर्तनाच्या अभावी कायदा दुबळा ठरतो आणि कायदा करणारे अजूनच दुबळे होतात. तुमचं स्मरण परिवर्तनाचा मार्ग दाखवील.
तुम्ही जीवनाचे तीन प्रकार भिक्षा, धंदा आणि चोरी असे तुम्ही सांगितले आहेत. कमीत कमी मोबदला घेऊन काम करणे म्हणजे भिक्षा. भिक्षा म्हणजे न मागणे. भिक्षेत परावलंबन नाही, ईश्वरावलंबन आहे. समाजाच्या सद्भावनेवर श्रद्धा आहे. यदृच्छा लाभ, संतोष आहे. कर्तव्यपरायणता आहे. फलनिरपेक्ष वृत्तीचा प्रयत्न आहे. चोरी म्हणजे समाजाची कमीत कमी सेवा करून किंवा सेवा केल्याचे नाटक करून समाजापासून जास्तीत जास्त भोग मिळवणे. ज्यांना प्रतिष्ठा आहे अशी बरीच मंडळी या वर्गात मोडतात, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. विनोबा तशा वस्तुस्थितीला सामोरे जाताना तुमची फार तीव्रतेने आठवण होते. भिक्षेची गोष्ट सोडाच, परंतु मी समाजाची सेवा करताना योग्य मोबदल्यापेक्षा जास्त काहीही घेणार नाही, अशी ‘धंदा’ या दुसऱ्या वर्गात मोडण्याची सद्बुद्धी तरी तुम्ही आम्हाला द्याल का?
स्वरूप आणि विश्वरूप यांचं तुम्ही केलेलं विश्लेषण तर फारच सुंदर आहे. तुमचा तो उपदेश परोपदेशे पांडित्य नाही. तुम्ही स्वरूपाचा मध्यबिंदू घट्ट पकडलात आणि विश्वरूपाच्या परिघालाही स्पर्श केलात. सूतकताई, वीणकाम, शरीरश्रम, भंगीकाम या गोष्टी तुम्ही स्वत: केल्या आहेत. ब्रह्मचर्य, शरीरश्रम, अपरिग्रह, स्पर्शभावना, स्वदेशी या व्रतांना शब्दबद्ध करून तुम्ही शब्दांचे नुसते फुगे फुगवले नाहीत. फक्त तेवढ्यावर थांबला असतात तर विधान परिषदेत दिसला असतात. पण तुम्ही पडलात तप:पूत ऋषी. तुम्ही ही व्रते तुमच्या आचरणात तंतोतंत उतरवलीत. तुमची उंची आकाशाला जाऊन भिडणारी. आम्हाला त्या उंचीकडे मान वर करूनही नीट बघता येत नाही. आता विश्वरूप तर सोडाच, पण स्वरूपाचा बिंदूही आम्ही पुसट केला आहे. घरातला कचरा भिंतीच्या पलीकडे टाकला की आमची स्वच्छता संपते हे आमच्या स्वच्छतेचे स्वरूप. पूर्वी लोक शेजार शोधत. शेजार महत्त्वाचा, घर वगैरे त्यानंतर. या मानसिकतेत स्वरूपाबरोबर विश्वरूप सांभाळण्याचं बीज होतं. आता उरला आहे तो नुसता व्यवहार. ‘कसं दिसेल’ या लौकिकाची भीड. ममत्वाची भाषा संपली आहे. विनोबा, तुमच्या स्मरणानं स्वरूपाचा मध्यबिंदू ठळक झाला तरी जीवन पुष्कळ सुकर होईल. तुमच्या म्हणण्याप्रमाणे विश्वरूपाची काळजी घेण्यास ईश्वर समर्थ आहे. विज्ञान आणि राजकारण यांच्या अभद्र युतीचं फलित सर्वनाशात होईल याची सत्यता पटवणारी उदाहरणे हरघडी दिसत आहेत.
विज्ञान + अध्यात्म = सर्वोदय हे तुमचं समीकरण मूर्त स्वरूपात यायला थोडा अवधी आहे. तुमच्या इतकी उंची गाठणारा माणूस आमच्या अवतीभवती आम्हाला दिसत नसला तरी तुम्ही तुमचे गुण निरनिराळ्या माणसांमध्ये पेरून ठेवले आहेत. तुमच्याच शब्दांत सांगायचे तर अशा गुणी माणसांच्या नरसमुदायाची नारायणी शक्ती आज ना उद्या जागृत होईल. विज्ञान आणि अध्यात्म यांची युती पाहण्याचं तुमचं स्वप्न क्षितिजाखाली दडणार नाही. तुमच्या स्मरणाने, आशीर्वादाने त्याचा उदय होईल.
–हेमंत मोने 9820316315 hvmone@gmail.com
सुरेख लेख. विनोबाजींचे विचार अतिशय समर्पक स्वरूपात मांडले आहेत.
उत्तम लेख.
पत्र स्वरूपात लिहिल्याने अधिक भावते.
पवनार आश्रम वाचत असताना डोळ्यासमोर उभा राहिला.
संध्या जोशी