विधवा स्त्री ही तर पूर्णांगिनी ! – परिसंवाद

0
315

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘स्त्री: स्वातंत्र्य, प्रथा आणि कायदे’ या विषयावर ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’तर्फे ऑनलाइन परिसंवाद आयोजित केला होता (21 ऑगस्ट 2022). त्या परिसंवादाचा वृत्तांत …

आपण सगळे खरेच स्वतंत्र आहोत का? स्त्रीचे अबला हे विशेषण गेले आहे का? ती तिला हवे तसे जगण्यासाठी, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यासाठी मुक्त आहे का? समाजाचा, कुटुंबाचा त्यात अडसर येतो का? ती सुरक्षित आहे का? तिला असुरक्षित वाटते, याला जबाबदार ती की आणखी कोणी? त्यासाठी कायदा आहे का? तो स्त्रीला किती आणि कशी मदत करू शकतो? असे प्रश्न प्रखर आहेत. उलट, स्वतंत्र भारताची वर्षे जशी वाढू लागली आहेत तशी या विषयाची मुळे अधिक खोल जाऊ लागली आहेत. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या प्रमोद झिंजाडे यांनी सुरू केलेल्या ‘विधवा प्रथा निर्मुलना’बाबतचे लेख वाचले. एका बाजूने स्त्रीच्या मनाचा विचार केला जात आहे, हे खरे असले तरी केवळ विधवांना कुंकू लावण्यास, जोडवी-मंगळसूत्र घालण्यास ‘परवानगी’ देणे, तसे स्टॅम्प पेपरवर लिहून देणे म्हणजे या प्रथेचे निर्मूलन नाही अशा विचाराने मनात काहूर माजले आणि हा परिसंवाद घेण्याचे योजले.

परिसंवादासाठी त्या त्या विषयावर अभ्यास करणारे वक्ते आले होते. एक संपूर्ण पिढी ज्यांचे लेखन वाचून जाणतीनेणती झाली अशा ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले; समाजातील तो, ती आणि ते या सर्व घटकांमध्ये सुसंवाद घडावा या हेतूने ‘मिळून साऱ्याजणी’रूपाने चालवलेल्या चळवळीच्या संपादक गीताली वि. मं.; पुणे विद्यापीठातील संज्ञापन विभागाच्या प्रमुख उज्ज्वला बर्वे; कायद्यांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी कायदेतज्ज्ञ मुकुल इनामदार आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी त्यांची मते परिसंवादामध्ये मांडली.

‘स्त्रीची (अ)सुरक्षितता’ या विषयावर बोलताना, ‘बाई’ या शब्दाच्या आवरणाखाली स्त्रीला आधी असुरक्षितपणाची भावना वाटते. स्त्री ही योनीशुचिता, पारतंत्र्याची भावना, पुरुषी हुकूमत यांमुळे मानसिक आणि शारीरिक दडपणाखाली सतत वावरत असते. त्यामुळे ती अधिकाधिक असुरक्षित होते. अब्रू हे काचेचे भांडे नाही आणि बलात्काराला स्वतःवरील कलंक समजू नये अशा परखड भाषेत गीताली वि.मं यांनी त्यांचे विचार मांडले.

‘आदर्श स्वातंत्र्य कसे असावे?’ या विषयावर बोलताना मंगला गोडबोले म्हणाल्या, की स्वातंत्र्य ही प्रत्येक स्त्री-पुरुषाची जबाबदारी आहे. त्यामुळे ते पेलणे अवघड आहे. स्वातंत्र्य अटींवर आधारित असता कामा नये. कोणत्याही व्यक्तीला हवे ते करता आले पाहिजे, स्वीकाराचे स्वातंत्र्य सोपे आहे, नकाराचे आणि निवडीचे स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यामुळे शांतता आणि त्यामुळे प्रेम निर्माण व्हायला पाहिजे.

‘स्त्री स्वातंत्र्य: वास्तव आणि आभास’ हा विषय विषद करताना उज्ज्वला बर्वे म्हणाल्या, “आपण स्वातंत्र्याची व्याख्या तपासून पाहिलेली नाही. परवानगी मिळणे म्हणजे स्वातंत्र्य मिळणे असे समजले तर विचारांत गफलत होते. एखादी स्त्री जेव्हा म्हणते, की मला कोणतीही भाजी आणण्याचे आणि करण्याचे स्वातंत्र्य आहे, तेव्हा ती स्वातंत्र्याच्या आभासात असते ! सर्वांनी विचार करण्याची क्षमता आणि विवेकबुद्धी जागृत ठेवली पाहिजे. मासिक धर्म, रूढी, परंपरा या संकल्पनांचे भय बाळगून आयुष्य ताणाचे करणे सोडून देण्यास हवे. स्त्रीला काय पाहिजे ते तिने करावे हे म्हणणे व तिने परवानगी घेऊन एखादी गोष्ट करणे यांत फरक काय आहे? स्त्रीच्या अंगावर नको असताना दागिने घालण्याची सक्ती करणे आणि तिला नको असताना ते उतरवण्यास लावणे ही कृती हीनतेचे दर्शन घडवणारी आहे. तिचा नवरा गेल्यानंतर त्या स्त्रीला खरेच नेमके काय वाटत आहे आणि समाजासाठी, समाजाच्या चौकटीसाठी तिला काय दाखवावे लागते यामध्ये सुद्धा अनेक थर आहेत. विधवांची मुक्ती ही त्या स्त्रीला वाटणारी मुक्ती, इतरांच्या व्याख्येत बसणारी मुक्ती नव्हे.”

अॅडव्होकेट मुकुल इनामदार यांनी सांगितले, की ज्या गोष्टी करण्यासाठी चळवळ केली जात आहे, त्या कायद्याने बांधल्या गेलेल्या नाहीतच. पुरुषांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिल्याने काहीही फरक पडत नाही. कायद्यामध्ये केलेल्या तरतुदी, धर्मानुसार असणारे कायदे, प्रथांनी (Customs) बांधले गेलेले कायदे, कोठल्या समुदायात कोठले कायदे मान्य आहेत हे प्रत्येक व्यक्तीने समजून घेणे आवश्यक आहे. स्वातंत्र्याकडे जाण्यासाठी कदाचित हे छोटे पाऊल असेल !

करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी सांगितले, की “विधवा प्रथेचे निर्मूलन करावे यासाठी पहिले पाऊल मी उचलले आहे. याचा अर्थ ती प्रथा नष्ट झाली असा होत नाही. विधवांपेक्षा, समाजाचे वैचारिक पातळीवर प्रबोधन होणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष संवाद, कृती, त्याबद्दल असलेला स्नेहभाव, त्यातून निर्माण होणारा आत्मविश्वास अशा अनेक पायऱ्या साध्य गाठण्याकरता पार करण्याच्या आहेत.”

कार्यक्रमात प्रत्येक वक्त्याला बोलण्यासाठी सात-सात मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. त्याप्रमाणे प्रत्येक वक्ता दोनदा बोलले. काही प्रश्नही विचारण्यात आले, त्यांची उत्तरे वक्त्यांनी थोडक्यात दिली.

कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी बोलताना अपर्णा महाजन म्हणाल्या, “एकदा स्वतःच्या विचाराने, निडरपणे, बिनचेहेऱ्याच्या समाजाच्या प्रतिक्रियांचा विचार न करता, आपल्याला खरंच काय हवं आहे? आपल्याला कसं जगायचं आहे? हा विचार करणं म्हणजेच ‘फ्री विल’. या अनुषंगाने विचार केला, तर आपोआप, स्वतःमध्ये आत्मविश्वास आणि सामर्थ्य येतं. विधवा हा शब्द त्या स्त्रीला किंवा त्या परिस्थितीला अधिक दयनीय करतो, लग्नानंतर स्त्रीला पतीची अर्धांगिनी म्हणतात. ‘मिळून साऱ्याजणी’च्या एका अंकात दिलशाद मुजावर यांनी पती गमावलेल्या स्त्रियांना ‘विधवा’ असा शब्द न वापरता जी नवऱ्याशिवाय कुटुंबाचे पूर्ण अंग आहे तिला ‘पूर्णांगिनी’ असे म्हटले आहे. तो शब्द स्वागतार्ह वाटतो. शेवटी, या परिसंवादामध्ये जे ऐकले, ते अंतर्मुख करणारे होते. आपण आपल्या क्षमतेनुसार, स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करणे, आलेल्या आव्हानांना संधी समजून तोंड देणे आणि येणारा उद्या आजच्यापेक्षा वेगळा असेल असा आशावाद मनाशी बाळगणे हे गरजेचे आहे.”

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या पोर्टल तर्फे कार्यक्रम संयोजक अपर्णा महाजन, निवेदक अश्विनी भोईर आणि नितेश शिंदे यांचा कार्यक्रमात सहभाग होता. नितेश शिंदे यांनी सुरुवातीला ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ आणि या वर्षी हाती घेतलेल्या माहिती संकलन मोहिमेची व विविध उपक्रमांची माहिती दिली. अश्विनी भोईर यांनी सूत्रसंचालन केले आणि वक्त्यांच्या परिचयासोबतच त्या त्या विषयावरील प्रश्नही विचारले. कार्यक्रमाच्या अखेरीस, अपर्णा महाजन यांनी उपस्थितांचे, कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

अपर्णा महाजन 9822059678 aparnavm@gmail.com

—————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here