महिलेला पतीच्या निधनानंतर भेडसावणारी खरी समस्या आर्थिक बाबतीतील असते. तिला अलंकार घालण्याची मुभा देणे ही केवळ वरवरची मलमपट्टी आहे. एखाद्या सरकारी परिपत्रकामुळे तिच्यावरील अन्यायाची चौकट खिळखिळी होणार नाही. विधवांना आर्थिक स्थैर्य व त्यांचे सांपत्तीक हक्क मिळवून देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्यक्ष संवाद, प्रसारमाध्यमे, वैयक्तिक वागणुकीची उदाहरणे अशा वेगवेगळ्या मार्गांनी समाज परिवर्तनाचे प्रयत्न करावे लागतील…
ग्रामपंचायतींचे विधवा प्रथाबंदीचे ठराव एकामागोमाग एक होत आहेत. पण ते ठराव विधवांच्या खऱ्या समस्यांना हात घालण्याऐवजी केवळ ‘कॉस्मेटिक’ पातळीवर राहण्याची मोठी शक्यता दिसते. भारतातील बहुसंख्य सर्वसामान्य स्त्रियांच्या शिक्षणाची आणि श्रमशक्तीमधील सहभागाची अवस्था बघितली तर कोठल्याही महिलेला पतीच्या निधनानंतर भेडसावणारी समस्या ही आर्थिक बाबतीतील असते. अनेकदा, शहरातील स्त्रियांनासुद्धा त्यांच्या पतीचा पगार, कामाचे ठिकाण, त्यांनी केलेली गुंतवणूक यांबद्दल माहिती फारशी नसते. गावातील महिलांना तर पतीच्या नावे असलेली संपत्ती आणि त्याच्या मृत्यूनंतर पत्नीला आणि मुलांना मिळणारा वाटा याविषयी क्वचितच माहिती असते.
स्त्रियांना जमिनीचे हक्क मिळावे यासाठी गुजरातमधील ‘वर्किंग ग्रूप फॉर वूमन अॅण्ड लँड ओनरशिप’ ही संस्था एकोणीस वर्षे काम करत आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये विधवा प्रथाबंदीचे ठराव करण्यात आले, त्यांपैकी किती गावांनी त्यांच्या गावातील विधवांना संपत्तीचे अधिकार मिळवून देण्याचा उल्लेख ठरावात केलेला आहे? या निमित्ताने जारी केलेल्या सरकारी आदेशातही विधवांच्या आर्थिक हक्कांची काळजी घेतली जावी अशी सूचना दिसत नाही.
विधवांना सौभाग्यचिन्हे वापरण्यास मनाई असणे हे पितृसत्तेचे प्रतीक आहे, त्यामुळे ती मनाई नाकारणे हे पुरोगामीपणाचे लक्षण आहे असा भास होऊ शकतो ! विधवांनी कुंकू, मंगळसूत्र वापरू लागण्याने त्यांची पितृसत्तेच्या पिंजऱ्यातून सुटका होऊ शकत नाही. कुंकू, मंगळसूत्र, जोडवी, सवाष्ण भोजन, वटपौर्णिमा, हळदीकुंकू समारंभ, सुवासिनीचा मान, पुत्रवती असण्याचे महत्त्व अशा सगळ्या गोष्टी पुरुषकेंद्री विचारसरणीतून आलेल्या आहेत.
विधवांनी रंगीत कपडे किंवा अलंकार, प्रसाधने वापरू नयेत असे बंधन असते; त्याचप्रमाणे, नवरा जिवंत असलेल्या बाईने कुंकू, बांगड्या, मंगळसूत्र यांसारखे अलंकार घातलेच पाहिजेत – अगदी एखाद्या मेडलप्रमाणे मिरवले पाहिजेत असेही सांस्कृतिक दडपण त्यांच्यावर असते. ते जसे तिच्या अंगावर लग्न होताना समारंभपूर्वक चढवले जातात, तसे नवऱ्याच्या मृत्युपश्चात कोर्टमार्शल केल्याप्रमाणे, तिच्या अंगावरील ती सौभाग्यलेणी हिसकावून घेतली जातात. समाज जोपर्यंत सौभाग्यवती असणे ही सन्मानाची बाब आहे असे मानतो, तोपर्यंत नवरा गेल्यावर तो सन्मान गेला असेच मानले जाणार ! विधवा बाईला अलंकार घालण्यास मिळणे हा तिचा सन्मान आहे ही कल्पनाच मुळात फोल आहे !
कुंकू, सिंदूर, जोडवी, मंगळसूत्र यांसारखी अनेक प्रतीके किंवा लग्नानंतर मुलीचे नाव-आडनाव बदलण्यासारख्या अनेक प्रथा म्हणजे पितृसत्तेने स्त्रियांवर लादलेल्या दुय्यमतेची चिन्हे आहेत. पण कुंकू हे केवळ एक प्रसाधन आहे, तसे मंगळसूत्र-बांगड्या हे फक्त दागिने आहेत अशा वस्तुनिष्ठपणे त्यांच्याकडे बघण्याची आणि निवड करण्याची संधी नवरा जिवंत असलेल्या किंवा नसलेल्या बाईला पितृसत्तेमध्ये मिळत नाही. विधवेचे अलंकार हिरावून घेऊन पुरुषप्रधान समाज तिच्यावर जो अन्याय करतो, त्यावर उपाय म्हणून तिला ते अलंकार घालण्याची मुभा देणे म्हणजे पुरुषप्रधान चौकटीतील ती फक्त वरवरची मलमपट्टी होय. ही पुरुषप्रधान चौकट अशा उपायांमुळे खिळखिळी होणार नाही. उलट, पितृसत्तेने लादलेली प्रतीके नाकारण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांवरील सांस्कृतिक दडपण वाढण्याची शक्यता आहे. खोलवर रुजलेली ही पुरुषकेंद्री मानसिकता केवळ एखाद्या सरकारी परिपत्रकामुळे बदलणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष संवाद, प्रसारमाध्यमे, वैयक्तिक वागणुकीची उदाहरणे अशा वेगवेगळ्या मार्गांनी समाज परिवर्तनाचे प्रयत्न करावे लागतील.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पनवेल शाखेतील कार्यकर्त्यांनी त्या बाबतीत सुरू केलेले काम महत्त्वाचे आहे. त्या मंडळींनी वटपौर्णिमेच्या आधी आठ दिवसांपासून ‘हो, मी समतावादी’ हे अभियान सुरू केले. ते त्या अभियाना अंतर्गत वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी लोकांना भेटत होते. त्यांच्याशी वटपौर्णिमा, सौभाग्यलंकार आणि विधवा प्रथाबंदी या तिन्ही विषयांवर छोट्या, अनौपचारिक गटांमध्ये चर्चा घडवून आणत होते. कुंकू-मंगळसूत्र यांसारखे अलंकार घालण्याचा किंवा न घालण्याचा ‘चॉईस’, त्यातून स्त्रियांवर लादलेले भेदाभेद आणि नवऱ्याच्या अस्तित्वावर स्त्रीची प्रतिष्ठा अवलंबून असणे या मुद्यांवरही चर्चा होत होती. चर्चेनंतर ज्यांनी अनुकूल मते व्यक्त केली त्यांना त्याच मुद्यांवर आधारित एक शपथपत्र दिले गेले.
त्याचसोबत त्यांनी एक प्रश्नावली गूगल फॉर्मच्या रूपात तयार केलेली आहे. तीदेखील विविध पार्श्वभूमीच्या लोकांशी ऑनलाईन शेअर केली. सुशिक्षित तरुण मुला-मुलींनी त्यांच्या त्यांच्या कोशातून बाहेर येऊन परिवर्तनाच्या मुद्यांवर विचार केला पाहिजे. ते विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी वेळ खर्च करणे, लोकांना विचारप्रवृत्त करणे, बांधिलकी निर्माण करणे हे फार महत्त्वाचे आहे.
– वंदना खरे 8879487557 vandanakhare2014@gmail.com
—————————————————————————————————————————————