विद्यार्थ्यांत दडलेला भावी शिक्षक!

0
37
_VIdyarthhyat_Dadalela_Shikshak_1.jpg

‘शिक्षक आणि विद्यार्थ्यांत फरक एकच असतो…

कधीकाळी शिक्षकसुद्धा विद्यार्थी असतो !’

त्याचे नाव प्रशांत. नावात ‘शांत’ हा शब्द असल्यामुळे की काय, तो खरेच शांत स्वभावाचा होता. आमच्या एका शिपायाने त्याला भौतिकशास्त्र विषयाची काही पुस्तके असतील तर द्यायला सांगितली. आम्हा शिक्षकांना प्रकाशकांकडून वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके संदर्भासाठी मिळतात. तसेच दरवर्षी अभ्यासक्रमात काही जास्त फरक पडत नाही. म्हणून मग आम्ही नवीन पुस्तके गरजवंताला देतो! त्या निमित्ताने प्रशांतची ओळख झाली. प्रशांत अकरावीतून बारावीत गेला. सगळे व्यवस्थित चालू होते. सायन्सच्या विद्यार्थ्यांना ‘थियरी’ आणि ‘प्रॅक्टिकल’, दोन्ही ठिकाणी उपस्थिती लावणे आवश्यक आहे. ‘थियरी’चे वर्ग दुपारी साडेबारानंतर चालू होतात तर प्रॅक्टिकल मात्र सकाळी साडेआठ वाजता सुरू होतात. प्रशांतला एकदा प्रॅक्टिकलला येण्यास  जवळ जवळ तासभर उशीर झाला, तेव्हा मी त्याच्यावर रागावले. परंतु त्याच्या चेहऱ्यावरील एकही रेषा हलली नाही. मला हे काहीतरी वेगळेच प्रकरण आहे याची जाणीव झाली. मी प्रशांतला आपुलकीने विचारल्यावर त्याच्या भावनांचा बांध फुटला आणि तो बोलू लागला –

“आई गेली, घरात दोन लहान भावंडे. मोठा भाऊ कामावर जातो. वडील पाणीखात्यात म्युनिसिपालिटीमध्ये कामाला असतात. मला बाईमाणसासारखे किराणा आणण्यापासून स्वयंपाक करण्यापर्यंत, भावंडांचे डबे भरण्यापासून त्यांना शाळेत पोचण्यापर्यंत, सगळीच कामे करावी लागतात. मी कसा काय साडेआठला कॉलेजमध्ये पोचणार? मी संध्याकाळी दोन-तीन मुलांच्या शिकवण्या घेतो, जेणेकरून कॉलेजच्या वह्या-पुस्तकांचा खर्च निघतो त्यात.”

भावनेच्या भरात बोलला खरा, पण तडक निघूनही गेला. तो कॉलेजला दोन-चार दिवस आलाच नाही. मग मी शिपायाला त्याच्या घरी पाठवून त्याला परत कॉलेजमध्ये बोलावून घेतले. म्हटले, “उशीर झाला तरी चालेल. परंतु प्रॅक्टिकल बुडवू नकोस. काही मदत हवी असेल तर नि:संकोचपणे सांग”

त्या दिवसानंतर, तो भौतिकशास्त्राची कठीण गणिते घेऊन माझ्याकडे अधूनमधून यायचा, खूप बोलायचा. एक दिवस पालक-शिक्षक सभा होती. त्याचे तास कमी भरले होते. त्यामुळे त्याच्या घरीही सभेचे पत्र गेले. प्रशांत आला, पण सोबत पालक नव्हते. त्याबद्दल, आमच्या कॉलेजच्या एका सरांनी त्याला कठोर शब्दांत अपमानित केले. प्रशांत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सायन्स शिकत होता. तो पुन्हा हिरमुसला आणि त्याने कॉलेजकडे पाठ फिरवली. मी त्याला पुन्हा शिपायाकरवी बोलवून घेतले. मोठ्या प्रयासाने त्याला तासभर समजावून सांगितले. प्रशांत ‘मला शिकायचेच नाही’ हे पालुपद घेऊन आला होता. मात्र ‘मला खूप शिकायचे आहे’ हे ब्रीदवाक्य घेऊन परतला. तो पहिल्याच प्रयत्नात बारावी पास झाला. पेढे घेऊन मला भेटण्यास आला, तेव्हाची त्याच्या डोळ्यांतील चमक आठवत आहे. प्रशांतने आमच्याच कॉलेजमध्ये बी.एस्सी.साठी अॅडमिशन घेतले. दरम्यान, त्याच्या मोठ्या भावाचे लग्न झाले, त्यामुळे घरातील जबाबदारी संपली. त्याने त्याचे लक्ष शिकण्यासाठी आणि शिकवण्या घेण्यासाठी वळवले. तो मला फुले आणि शुभेच्छापत्र घेऊन प्रत्येक शिक्षकदिनाच्या दिवशी आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी यायचा, पाया पडायचा.

प्रशांत असाच एकदा खूप दिवसांनंतर जानेवारी महिन्यात आला, म्हणाला,

‘मॅडम, तुम्ही माझ्याकडे नुसते ‘येते येते’ म्हणता, पण येत नाही. उद्या, तुम्ही माझ्याबरोबर पाच वाजता यायचे, मी तुम्हाला घ्यायला येतो आहे’.

मी नाही म्हणायचे काही कारणच नव्हते. प्रशांत ठीक पाच वाजता आला. मला त्याच्या घरी घेऊन गेला. पहिल्या माळ्यावर एक छोटी खोली होती. तेथे घेऊन जाणारा जिना अवघड होता. परंतु खोली छान सजवलेली होती. तीस-पस्तीस मुले दाटीवाटीने बसली होती. समोरच्या फळ्यावर माझे नाव प्रमुख पाहुणे म्हणून लिहिले होते. सर्वांनी मी आत जाताच टाळ्या वाजवल्या. मला ते सगळे अपेक्षित नव्हते. नियमितपणे त्याच्या क्लासला येणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार माझ्या हस्ते झाला. मला भाषण करण्यास सांगितले – प्रशांत किती प्रतिकूल परिस्थितीतून गेला आहे आणि तरीही तुमचा आवडता शिक्षक म्हणून माझ्यापुढे उभा आहे. हे सांगितल्यावर प्रशांतसहित तेथे उपस्थित असलेल्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले. ते विद्यार्थीही त्यांच्या आवडत्या शिक्षकाविषयी भरभरून बोलले. तेव्हा मला झालेला आनंद मी लिहिलेल्या कवितेच्या ओळी सार्थ ठरल्याचा प्रत्यय देत होत्या-

शिक्षक आणि विद्यार्थ्यांत अगदीच फरक नसतो

खूप काही शिक्षकही विद्यार्थ्यांकडून शिकतो

एक शिक्षक लाखो विद्यार्थी घडवतो

पण… नेहमी विद्यार्थ्यांत ‘भावी शिक्षक’ शोधतो

– प्रतिभा सराफ

pratibha.saraph@gmail.com

About Post Author

Previous articleसाहित्य संमेलन आणि सुसंस्कृत समाज
Next articleउर्जा, उत्साह आणि उपक्रम
प्रतिभा सराफ या देवनार, मुंबई येथील रहिवासी. त्यांनी एम.एस्सी. (भौतिकशास्त्र), बी. एड. (विज्ञान)चे शिक्षण घेतले आहे. त्या भौतिकशास्त्राच्या व्याख्यात्या आहेत. त्यांचा परिचय कवयित्री म्हणून अधिक आहे. त्यांची ‘मात्र एक नाही’, ‘मातीत पूर्णत्वानं रुजण्यापुर्वी’ हे काव्यसंग्रह, ‘दु:ख माझे कोवळे’ (गझलसंग्रह), ‘माझा कुणीतरी’ (ललित लेखसंग्रह), ‘सलग पाच दिवस’ (कथासंग्रह) व ‘कादंबरी जगताना’ (कादंबरी) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सराफ यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा ‘आश्वासक नवोदित साहित्यिक पुरस्कार’, मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा ‘वृत्तपत्र लेखन विशेष उल्लेखनीय पुरस्कार’ यासह चौतीस विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. लेखकाचा दूरध्वनी 98925 32795