विद्यार्थ्यांच्या निर्मितिक्षमतेला आवाहन – प्रेरणाचा प्रयत्न

0
30
_vidyarthyanchya_nirmitikshamatela_1_0.jpg

प्रेरणा धारप आणि त्यांची अकरावीत असलेली मुलगी नक्षत्रा यांचे नाते वेगळे आहे. म्हणजे त्या मायलेकी तर आहेतच; पण प्रेरणा या नक्षत्राची मैत्रीण आहेत आणि मार्गदर्शक गुरूही आहे. उलट, प्रेरणा त्यांचे लहानपण व शिक्षण बहुधा नक्षत्राच्या विद्यार्थिजीवनामध्ये पाहतात आणि तिच्या यशाने समाधान पावतात. नक्षत्रा बुद्धिमान आणि प्रतिभावान मुलगी आहे. तिचा इंग्रजी कवितांचा संग्रह – अदर साईड ऑफ सनशाइन – तिच्या शाळेतर्फे काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झाला. त्यातील कविता परिपक्व बुद्धीच्या आहेत, आश्चर्य म्हणजे त्यांवर दुःखाचे सावट आहे. नक्षत्रा अनेक समकालीन सामाजिक-सांस्कृतिक विपरीत घटनांवर विषादाने लिहिते. तिने तिच्या जन्माच्या कितीतरी आधीच्या आणीबाणीवर एका कवितेत भाष्य केले आहे, तर ती दुसऱ्या कवितेत सध्या होणारा लेखनस्वातंत्र्याच्या कोंडमाऱ्याबद्दल लिहिते – तेव्हा अचंबा वाटतो.

प्रेरणा सांगतात, की त्यांनी व राहुल ह्यांनी पालक म्हणून नक्षत्राचे लेखनकौशल्य हेरले आणि तिला लिहिण्यास प्रोत्साहन दिले. नक्षत्रा शाळेत असताना तिच्या कविता इंग्रजी नियतकालिकांत छापून आल्या. त्यामुळे ती लेखन अधिक गांभीर्याने करते. तसेच, ती आसुसून वाचते. नक्षत्राचे हे लेखन वाचून पाहून प्रेरणा यांना स्वतःचे लहानपणीचे दिवस आठवतात. त्या म्हणतात, “मीदेखील शाळेत असताना कविता करायची. पण त्या काळात पालकांना मुलांच्या विविध गुणांना चालना देण्याची जाणीव नव्हती. त्यामुळे माझ्या कविता मजकडेच राहिल्या.” प्रेरणा माहेरच्या अरोरा-पंजाबी कुटुंबातील.

प्रेरणा यांच्या मनाचा मोठेपणा असा, की त्यांनी स्वतःच्या मुलीचे यश व्यापक रूपाने अनेक मुलांमध्ये पाहण्यास सुरुवात केली. त्या म्हणाल्या, की मुले खूप गुणवान असतात, त्यांच्या अंगी नाना कला असू शकतात, परंतु पालक त्यांना इंजिनीयर-डॉक्टर अशा ठरावीक साच्यात बसवू पाहतात. त्यामुळे मुलांची बुद्धी चाकोरीत अडकते. ती खुलून-फुलून येत नाही. त्या उलट मुलामुलींची बुद्धी त्यांना अनुकूल अशा व्यवसायाभिमुख रीतीने विकसित होऊ दिली तर ते मूल तो अभ्यास ओढीने करील. त्या संबंधातील अनेक संधी शोधेल.

प्रेरणा त्यापुढे जाऊन सांगतात, की मुलाला शाळेत असतानाच उत्पन्नाचे साधन प्राप्त झाले तर तो अथवा ती झपाट्याने वाढत जातात. प्रेरणाचा स्वतःचा अनुभव तसा आहे. प्रेरणा शाळेत दहावीत असतानाच, लहान मुलांच्या शिकवण्या घेत असत. त्या मुलांना घेऊन निसर्गात जात, संग्रहालयात जात व तेथे विषय मुलांना समजावून द्यायच्या. आनंददायी शिक्षणाचा नवा फंडा आला आहे, तो तेच सांगतो. प्रेरणा यांचे शिक्षण झेवियर्स व नॅशनल कॉलेजांमधून झाले. त्यांनी मानसशास्त्र घेऊन बीए केल्यानंतर ‘गांधी शिक्षण मंडळा’च्या कॉलेजमधून बीएड केले. त्यानंतर त्यांनी ‘आर्य विद्यार्थी मंडळा’च्या शाळेत आठ-दहा वर्षें शिक्षिका म्हणून काम केले. त्यांनी तेथे जागतिक स्तरावर चमक दाखवली. त्यांनी प्रथम त्या शाळेला ‘ब्रिटिश कौन्सिल’चे इंटरनॅशनल स्कूल सर्टिफिकेट मिळवून दिले. नंतर त्यांनी स्वतःचा दीर्घ निबंध ऐंशी देशांच्या स्पर्धेत निवडला गेला. निबंधाचा विषय होता –‘शिक्षण जीवनभरासाठी!’

प्रेरणा यांनी शाळेत शिक्षिका असतानाही मुलांच्या विविध गुणांना, त्यांच्या संशोधनबुद्धीला वाव मिळेल असे पाहिले. त्या सांगतात, की एका छोट्या मुलाने पावले टाकता टाकता ऊर्जा कशी निर्माण होऊ शकते याची मांडणी केली होती. त्याच्या शोधक बुद्धीला चालना मिळेल असेच पाहिले.

_vidyarthyanchya_nirmitikshamatela_2_0.jpgतोच वसा, आता, प्रेरणा यांनी विशाल बालसमुदायासमोर सादर करण्याचे ठरवले आहे. त्याकरता त्यांनी ‘इन्व्होक इन्स्पायर’ नावाची संस्था निर्माण केली आहे. संस्थेतर्फे मुख्यतः मुलांसाठी शाळेबाहेर कार्यशाळा घेतल्या जातात. तशा तीन कार्यशाळा गेल्या दोन महिन्यांत घेतल्या गेल्यादेखील. तेथे प्रत्येक मुलामुलीमधील कोणताही गुण व्यक्त करण्यास वाव असतो. मुले पाककृतीसुद्धा बनवू इच्छितात असे प्रेरणा यांनी कौतुकाने सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, की त्या मुलांना पालकांनी ‘शेफ’ बनण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. कार्यशाळांमध्ये विविध विषयांचे मार्गदर्शक (मेंटॉर) येऊन मुलांना त्या त्या विषयाचा आवाका आणि त्यातील शक्यता उलगडून सांगतात.

मुले संवेदनशील असतात, निर्मितिक्षम असतात, त्यांच्या त्या ऊर्जेला व्यक्त होण्याची संधी मिळायला हवी हा प्रेरणाच्या कामामागील ध्यास आहे. त्यामध्ये त्यांच्याबरोबर दर्शन अमृते हा त्यांचा कॉलेजसोबती आहे. प्रेरणा व दर्शन कॉलेजमध्ये असताना ‘आकांक्षा’ संस्थेमार्फत गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांना शिकवण्याचे काम सेवाभावाने करत. दर्शन हे उत्तम वक्ता व ख्यातनाम प्रशिक्षक आहे. त्यांना शिकवण्याचीच आवड आहे. तिसऱ्या केटी बागली. त्या इंग्रजीतून मुलांसाठी लेखन करतात. त्यांना लेखनकौशल्य समजावून सांगण्याची हातोटी आहे. त्यांची चौथी भिडू आहे सोनाली सरकार. सोनाली ह्या एका पर्यटन व्यवसायात माहितीलेखन क्षेत्रात काम करतात.

‘इन्व्होक इन्स्पायर’चा भर मुलांचे लेखनगुण व्यक्त व्हावेत यावर सध्या जास्त आहे. त्यांनी मुलांसाठी कथास्पर्धा घेतली आहे. सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला आहे. त्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे कथा ‘पंचतंत्रा’च्या धर्तीवर प्राणिजीवनावर बेतलेल्या असाव्यात. मुलांवर उत्तम संस्कार तशा कथांमधून होतात असा प्रेरणा व त्यांचे सहकारी यांचा भरवसा आहे. त्यासाठी त्या ससा-कासवाच्या गोष्टीचे उदाहरण देतात. त्या म्हणतात, की त्या गोष्टींचा बोध खोलवर व दीर्घकाळ टिकणारा असतो.

मुलांमध्ये विज्ञानवृत्ती बाणावी यासाठी वेगळ्या कार्यशाळा घेण्याचा ‘इन्व्होक इन्स्पायर’चा बेत आहे. विविध कार्यशाळांमध्ये जे विद्यार्थी संस्थेबरोबर जोडले जातात त्यांना एका ‘नेटवर्क’मध्ये सामावून घेतले जाते. त्यामुळे कार्यशाळा संपली, की विद्यार्थ्यांशी संबंध संपला असे होत नाही. विद्यार्थी त्याच्या-तिच्यासमोर येणारा प्रश्न/अडचण ‘नेटवर्क’पुढे केव्हाही मांडू शकतो. त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तीकडून ती अडचण सोडवली जाते. कार्यशाळा मुलांना ओझे वाटेल इतक्या दीर्घ वेळेच्या मोठ्या नसतात, साधारण दोन-तीन तासांच्या असतात. मुलांना तेथे प्रेरणा मिळते, पुढे ती संस्थेशी कायम जोडली राहवीत असे अभिप्रेत असते. ते नाते कायम टिकणारे आहे.

_vidyarthyanchya_nirmitikshamatela_3.jpg‘इन्व्होक इन्स्पायर’ने येत्या फेब्रुवारीत फार महत्त्वाकांक्षी कार्यक्रम योजला आहे. तो आहे विद्यार्थ्यांच्या ‘ग्लोबल युनायटेड युथ कॉन्फरन्स’चा. सूर्य रमेश हा असा विद्यार्थी आहे, की त्याला ‘जिओपॉलिटिक्स’मध्ये रस आहे. त्यांच्या पुढाकाराने परिषदेस गती लाभली आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघाची आदर्श अशी रचना कशी असू शकेल? त्यासाठी विविध विषयांच्या समित्या कशा असू शकतील? असा सारा विचार त्या परिषदेत होणार आहे. तो ‘इव्हेंट’ ठाण्याच्या ‘सी पी गोयंका शाळे’च्या सहकार्याने होणार आहे आणि त्यामध्ये अडीचशे मुले तरी सहभागी होतील असा अंदाज आहे. प्रेरणा म्हणातात, की नव्या तंत्रयुगातील शिक्षण कसे असेल हा साऱ्या जगाला भेडसावणारा प्रश्न आहे. त्याबाबत त्या परिषदेत मुलेच जेव्हा बोलतील तेव्हा नवीनच काहीतरी सामोरे येण्याची शक्यता आहे. युनेस्कोची 2030 सालापर्यंत सर्वांसाठी शिक्षण अशी योजना आहे. त्या योजनेचा भारत सरकारतर्फे अंमल होईलच. त्यास पूरक म्हणून शिक्षकांची तयारी करण्याच्या दृष्टीने ‘टीचर्स टास्क फोर्स’ निर्माण करण्याची प्रेरणा धारप यांची कल्पना आहे. तशीच प्रेरणा यांची अपेक्षा परिषदेच्या संकल्पित ‘आर्ट फॉर चेंज कमिटी’कडून आहे. त्या म्हणतात, की तेथेही सामाजिक परिवर्तन आणि कला यांच्या संबंधात अफलातून काही पुढे येण्याची शक्यता आहे.

प्रेरणा या धडाडीच्या कार्यकर्ती आहेत – त्यांच्या संस्थेला काही महिनेच झाले आहेत. पण त्यासाठी पार्श्वभूमी कित्येक वर्षांची, त्यांच्या शालेय काळापासूनची आहे. त्यामुळे त्यांनी त्या अल्पकाळातच मुलांच्या प्रज्ञाप्रतिभेला जगाशी जोडून घेण्याचे व त्याचबरोबर बदलत्या काळातील वैश्विक प्रश्नांना भिडण्याचे आव्हान स्वीकारले आहे.

प्रेरणा धारप – 92210 87716
(इन्व्होक इन्स्पायर – 306, स्कायलार्क, प्लॉट नं 63, शाहबाज गाव, सेक्टर 11, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, महाराष्ट्र 400614.) info@invokeinspire.com

– नितेश शिंदे, info@thinkmaharashtra.com

About Post Author