विठोबाचे नवरात्र

0
187
_navaratratil_vadajai_carasole

पुण्याच्या विठ्ठलवाडी येथील मंदिरातील छायाचित्रआषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी, माझी एक मैत्रीण माझ्याकडे आली होती. गप्पांच्या ओघात, ती मला म्हणाली, ‘आज आषाढ शुध्द नवमी. माझ्या आईकडचे विठोबाचे नवरात्र उठले असेल!’

‘विठोबाचे नवरात्र?’ असे मी आश्चर्याने विचारले. मी विठोबाचे नवरात्र हा विधी प्रथमच ऐकत होते. नवरात्र देवीचे, रामाचे, चंपाषष्ठीचे, बालाजीचे, शाकम्बरीचे, नरसिंहाचे वगैरे माहीत आहेत. त्यामुळेच विठोबाच्या नवरात्राचे नवल वाटले.

मैत्रीण मूळची उस्मानाबाद जिल्ह्यातील धारूरची. तिचे माहेरचे आडनाव देशपांडे. पण त्यांना धारूरचे म्हणून धारूरकर-देशपांडे असे म्हणतात. सर्व धारूरकर-देशपांड्यांचे मूळ आडनाव ‘निरंतर’ असे आहे. त्या सर्वांचे धारूर येथे कसब्‍यावर वास्‍तव्‍य होते. त्‍यांना वतनदारी मिळाली होती, म्‍हणून त्‍यांचे नाव देशपांडे असे झाले. वतन आसपासच्‍या दहा-पंधरा गावांचे होते. काहींना इनामी जमीन/शेतीही मिळाली. वतने महात्‍मा गांधींच्‍या हत्‍येच्‍या वेळेस खालसा झाली. पण त्‍यांना मिळालेली जमीन/शेती त्‍यांच्‍याकडे तशीच राहिली. काही लोक शेती करत आहेत. परंतु काहींनी आपली शेती विकून शहराकडे प्रयाण केले आहे.

वतने खालसा झाल्‍यानंतर काही धारूरकर- देशपांड्यांनी आपले मूळचे निरंतर हे आडनाव लावण्‍यास सुरूवात केली. काहीजण वतने मिळाल्‍यानंतरही निरंतर हेच आडनाव लावत होते. काहीजण वतने खालसा झाल्‍यानंतरही ‘धारूरकर-देशपांडे’ असेच आडनाव लावत आहेत. पुण्‍यात वास्‍तव्‍यास असणा-या वेदमूर्ती अंबादास निरंतर यांना भेटल्‍यानंतर मला ही माहिती मिळाली.

वेदमूर्ती अंबादास निरंतर हे मूळचे धारूरचे. त्‍यांचे वास्‍तव्‍य पुण्‍यात बिबवेवाडी येथे गेल्‍या वीस वर्षांपासून आहे. त्‍यांनी असे सांगितले, की ‘श्री विठ्ठल सहस्रनाम’ स्‍तोत्र हे अत्‍यंत दुर्मीळ व खूपच कमी लोकांना माहीत असणारे स्‍तोत्र त्‍यांच्‍यापाशी आहे.

पुण्यातील विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिरातील छायाचित्र. सोबत वेदमूर्ती, त्यांची पत्नी आणि दोघे बंधूधारूरकर-देशपांडे मंडळींचे ‘विठोबा’ हे कुलदैवत आहे. मैत्रिणीचा माहेरचा परिवार अंबेजोगाई तालुक्यातील ‘होल पिंपरी’ येथे राहतो. तेथे कुलदैवताची -विठोबाची- पूजा, नवरात्र, सर्व यथासांग पार पडते. ती म्हणाली, की पंढरपूर येथे राहणार्‍या काही लोकांचे कुलदैवतही विठोबा आहे. त्याशिवाय महाराष्‍ट्रातील इतर काही लोकांचे ‘विठोबा’ हे कुलदैवत आहे. पुण्‍यातील प्रसिद्ध जादुगार रघुवीर भोपळे यांचेही कुलदैवत विठोबा हे आहे. भीमा-कोरेगावच्‍या कुलकर्णींचे कुलदैवत विठोबा हे आहे.   नवरात्र म्हटले की कुलधर्म, कुलाचार आला. विठोबाचे नवरात्र वर्षातून दोन वेळेस, म्हणजे आषाढी व कार्तिकीला असते. ते आषाढ शुध्द प्रतिपदा ते आषाढ शुध्द नवमीपर्यंत, तसेच कार्तिक शुध्द प्रतिपदा ते कार्तिक शुध्द नवमीपर्यंत असे नऊ-नऊ दिवस असते. नवरात्र बसण्यापूर्वी अर्थातच संपूर्ण घराची स्वच्छता केली जाते. विठोबा-रखुमाईच्या मूर्ती देव्हार्‍यात असतात, नेहमीप्रमाणे; पण त्यांना नवरात्रात नऊ दिवस हलवायचे नाही, त्यालाच घट बसले असे म्हटले जाते. मात्र देवीच्या नवरात्राप्रमाणे, विठोबाच्या नवरात्रात घट, माळ, धान्य पेरणे हे नसते. फक्त नंदादीप चोवीस तास जळत ठेवायचा असतो. देवाला नवीन वस्त्र आणले जाते. रोज साग्रसंगीत पूजा, भरपूर सुवासिक फुले वाहून केली जाते, बुक्का तर हवाच. नवरात्र सुरू झाल्‍यानंतर पहिल्‍या दिवशी म्‍हणजे प्रतिपदेला व नवरात्राच्‍या शेवटच्‍या दिवशी म्‍हणजे नवमीला, पंचसुक्‍त पवमानाचा अभिषेक करायचा असतो. समजा, पंचसुक्‍त पवमान म्‍हणू शकणारे ब्राम्‍हण मिळाले नाहीत, तर निदान श्रीसुक्‍त व पुरूषसुक्‍त हे प्रत्‍येकी पंधरा वेळा म्‍हणायचे. देवाला गोडधोडाचा नैवेद्य रोज दाखवला जातो. सवाष्ण, ब्राह्मण रोज जेवायला असतात. आरती रोज दोन्ही वेळेला केली जाते. पारणे नवमीच्या दिवशी असते. त्या दिवशी गावातील प्रतिष्ठीत लोकांना जेवायला बोलावले जाते. त्याचप्रमाणे नवमीला हरिकीर्तन असते. त्यामुळे कीर्तन करणार्‍या लोकांना, तसेच गावातील टाळकरी-वारकरी मंडळींनासुद्धा जेवायचे आमंत्रण असते. थोडक्यात, गावजेवणच!

घरातील एकाने नवरात्रात नऊ दिवस उपवास करायचा असतो. पारणे नवमीला पार पडले की दशमीला पंढरपूरच्या वारीला जायचे. घरातील ज्यांना जमेल ते, विशेष करून पुरुष मंडळी जातात. त्यांनी दशमी ते पौर्णिमा या काळात पंढरपूर येथे मुक्काम करायचा. मुक्काम आपल्या उपाध्यायांच्या घरी करायचा असतो. पंढरपुरात वंशावळी असतात. त्यात आपले उपाध्ये कोण हे पाहायला मिळते. उपाध्यायांच्या घरी विठोबाचा नैवेद्य बनवला जातो, त्यासाठी आपला शिधा द्यायचा. तो घेऊन, देवळाच्या उत्तरेकडील दरवाजाने थेट गाभार्‍यापर्यंत जाता येते. तिथे विठोबाला नैवेद्य दाखवून, दर्शन घेऊन परतायचे. हाही कुलाचाराचा भाग आहे.

विठोबा हे कुलदैवत असल्यामुळे, पंढरपूरला दरवर्षी चार वार्‍या कराव्या लागतात. त्यांपैकी नवरात्रातील आषाढी, कार्तिकी या दोन वार्‍या आणि चैत्री व माघी म्हणजे चैत्र आणि माघ या दोन महिन्यांत दोन वार्‍या. मैत्रिणीचे वडील होते तोपर्यंत धारूरकर-देशपांडे लोक सर्व कुलधर्म, कुळाचार, पाळत होते. चार वार्‍या करत होते. पुढच्या पिढ्या त्यांपैकी जसे जमेल तसे करतात.

विठोबाचे नवरात्र असते त्यावेळी पंढरपूरला विठोबाच्या देवळातील राजोपचार बंद असतात, पण भक्तगण दर्शनासाठी चोवीस तास येऊ शकतात.

एरवी, राजोपाचारात पहाटे ३ वाजता काकडारती- देवाला उठवण्यासाठी असते. त्यानंतर पंचामृती स्नान. मग देवाला-विठोबाला वस्त्रे परिधान केली जातात. त्यानंतर मध्यान्हपूजा असते. तेव्हा परत वस्त्रे बदलली जातात. संध्याकाळी आरती केली जाते. त्यानंतर रात्री परत शेजारती करून देवाला झोपवले जाते. चैतन्यमहाराज देगलुरकर यांनी या माहितीस दुजोरा दिला.

‘बडवे’ हे विठोबाचे पूजक असतात व ते अधिकारी असतात. रुक्मिणीच्या पूजकांना ‘उत्पात’ असे म्हणतात.

विठोबाचे राजोपचार करणारे सात सेवेकरी असतात.

१) पुजारी – हे मुख्य पूजेच्या वेळी असतात. विठोबाचे दागिने, फुले, माळा, चंदन उतरवणे. स्नानांनतर पुन्हा दागिने, वस्त्रे, फुले माळा घालणे व आरती करणे हे त्यांचे काम.

२) बेनारी – हे पूजा चालू असताना मंत्र म्हणत असतात.

३) परिचारक – हे चांदीच्या भल्यामोठ्या भांड्यातून पूजेसाठी पाणी आणण्याचे काम करतात. त्याचप्रमाणे आरतीसाठी सामान आणतात.

४) हरिदास – हे गाभार्‍याबाहेर उभे राहून, पदे-भजने गाऊन विठोबाला आळवत असतात.

५) डिंगरे – विठोबाला वस्त्रे घातल्यानंतर, दागिने घातल्यावर आरसा दाखवतात.

६) डांगे – डांगे म्हणजे चोपदार

७) दिवटे – (मशाल) दिवटी घेऊन उभे असतात.

मैत्रिणीचे वडील होते, तोपर्यत विठोबाच्या नवरात्रासंबंधीचे सर्व कुळधर्म, कुळाचार, चारवाक्या, सर्व काही ते करत असत. पुढची पिढीही ते बरेचसे करते. पण सध्याच्या बदलत्या काळानुसार, त्यात थोडेफार बदल झालेले आहेत. तरी पण महत्त्वाचे सर्व काही केले जाते. कधी चार वार्‍या करणे जमत नाही मग निदान दोन वार्‍या, नवरात्राच्या निमित्ताने केल्या जातात.

पद्मा कर्‍हाडे
९२२३२६२०२९
padmakarhade@rediffmail.com

पंढरपूर मंदिरातील रूक्मिणीमातेची मूर्ती अश्विन महिन्यातील नवरात्रानिमित्ताने पंढरपूर येथील रुक्मिणीमाता मंदिरात केले जाणारे धार्मिक विधी –

  • पहाटे 5 वाजता रुक्मिणीमातेच्या अलंकारांची पूजा (दररोज मूर्तीवरील अलंकार बदलतात)
  • रुक्मिणीमातेला दररोज वेगळा वेष घातला जातो. त्या त्या तिथीनुसार हा वेष बदलला जातो.
  • ऋग्वेदा तील पवनसूक्ताचे पठन केले जाते.
  • सकाळी ६ ते ८ प्रवचन होते. प्रामुख्याने संत एकनाथांच्या ‘रुक्मिणीस्वयंवर’ काव्यावर ते आधारलेले असते.
  • नंतर त्याच ग्रंथाचे सामुहिक पारायण केले जाते.
  • दुपारी भजनी मंडळाच्या वतीने स्त्रियांची भज़ने होतात.
  • दुपारी चार वाजता पुन्हा दासगणू महाराजांच्या मठातर्फे त्यांच्या भक्तांचे भजन असते, कधी कधी किर्तन आयोजित केले जाते.
  • रात्री शास्त्रीय गाण्यापूर्वी रुक्मिणीचे पुजारी उत्पात बंधूंची भजने असतात. कधी कधी उशीरा होतात.
  • नंतर शास्त्रीय गाण्याचे कार्यक्रम: महाराष्ट्रातील नामवंत गायकांना निमंत्रित केले जाते. प्रारंभीच्या काळात पंढरपूरातील बाळकृष्ण उत्पात, पंचवाडकर भगिनी, अप्पा मंगळवेढेकर यांचे गायन होत असे.नंतर पारंपरिक गोंधळ सादर केला जातो. सध्या सोनवणे करतात.
  • उत्पात मंडळींचे भजन (रात्री ८ ते ९)
  • शेवटी धुपारती होऊन दिवसाचा धार्मिक विधी संपतो असे नऊ दिवस हे विधी आयोजित केले जातात.

द.ता.भोसले
हॉटेल नागालँडमागे, पंढरपूर, जि. सोलापूर
९४२२६४६८५५

About Post Author