विजय पाठक म्हणजे उत्तम राजगिरा लाडू हे समीकरण आता समस्त सोलापूर जिल्ह्यास माहीत आहे. त्यांचे चाहते प्रेमाने म्हणतात, “असा राजगिरा लाडू कोणी बनवूच शकणार नाही!” त्यातील प्रेमाचा भाग सोडला तरी खरोखरच, विजय पाठकांचा ‘अमोल’ राजगिरा लाडू चितळे यांच्या बाकरवडीएवढी प्रतिष्ठा आणि नावलौकिक मिळवण्याच्या टप्प्यावर आहे.
विजय पाठक यांचे सोलापूरमध्ये ‘योगायोग’ हे घर आहे. राजगिरा व गूळ एवढाच कच्चा माल! पण त्यातून घडणारी त्यांची पाककृती हे ‘ट्रेड सिक्रेट’ आहे. पण त्याची कोणी कॉपी करेल ही भीती त्यांना वाटत नाही, कारण ते त्यांचे लाडू तयार करण्याचे ‘सिक्रेट’ जे सांगतात ते राजगिरा लाडू तयार करण्याचे, त्याचे मिश्रण बनवण्याचे वा लाडू वळण्याचे नाहीच तर त्यातील कौशल्य, त्यांची सूक्ष्म दृष्टी आणि कामाच्या प्रत्येक टप्प्यावरील एकूण कटाक्ष हे आहे. ते त्यांच्या यशाचे गमक होय.
पाठक यांच्यातील उद्योजक कसा घडला ते सांगताना विजय पाठक दोन दशके मागे गेले. ते म्हणाले, “मी एका कारखान्यात नोकरी करत होतो. माझा विवाह नुकता झाला होता. छान चालले होते. आईवडिलांचे छत्र होते. चिंता काहीच नाही. काही निमित्त झाले आणि माझा कारखाना बंद पडला. माझा संसार उघड्यावर पडला होता असे नव्हे. मी आईबाबांच्या जवळ राहत होतो. त्यामुळे उद्या काय? हा प्रश्न नव्हता, पण ‘बेकार झालो आहोत’ ही भावना चैन पडू देत नव्हती.”
पाठक यांनी नोकरीतील अनिश्चितता अनुभवल्यामुळे त्यांनी पुन्हा नोकरी शोधायची नाही हे पक्के ठरवले. मग त्यांचा व्यवसाय कोणता करावा हा विचार सुरू झाला. त्यांना व्यवसाय असा हवा होता ज्यासाठी यंत्रसामग्री, मोठे भांडवल आवश्यक नव्हते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोलापूरसारख्या गिरणगावात चालेल अशा वस्तूची निर्मिती करायला पाहिजे हे त्यांच्या डोक्यात पक्के होते. त्या वस्तूची ग्राहक सर्वसामान्य परिस्थितीतील व्यक्ती असली पाहिजे हेही त्यांनी मनात धरले. शिवाय तयार केलेली वस्तू त्याच्या गरजेची असली पाहिजे… अशा या विचारमंथनातून ‘राजगिरा लाडू’चे रत्न बाहेर आले.
विजय पाठक यांनी लाडू ट्रायल आणि एरर पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे बनवून पाहिले. अखेर, त्यांना योग्य फॉर्म्युला सापडला. पदार्थ नव्याने शोधायचा नव्हता. अनेक व्यक्ती व कारखानदार लाडू बनवत होते, तरी पाठक यांनी त्या स्पर्धेत स्वत:चे स्थान निर्माण केले. त्यामागे त्यांचा विचार कारणीभूत होता. ‘मी माझ्या आईवडिलांना हा पदार्थ खाण्यास देणार आहे, त्यामुळे तो पदार्थ तेवढा चांगला रुचकर असायला पाहिजे’ असा विचार त्यांच्या मनात असे. त्यातही तो उपवासाला लागणारा पदार्थ आहे. काहीजण तर केवळ दोन लाडू व कपभर दूध एवढ्यावर दिवसभर राहतात. त्यांनी या गोष्टींचा विचार करून लाडू त्या दर्ज्याचे तयार करण्याचे ठरवले.
पाठक यांनी लाडू तयार करण्याची कृती सांगितली. प्रथम राजगिऱ्याच्या लाह्या बनवल्या जातात. त्यांनी गॅसवर एका कढईत मुठभर राजगिरा टाकला. ते त्यास फडके गुंडाळलेल्या दांडीने हलवत होते. मुठभर राजगिऱ्याच्या पांढऱ्या शुभ्र लाह्या झाल्या. मला पटकन तोंडात टाकण्याचा मोह झाला. मी तसे केले. खमंग खुसखुशीत लाह्या खाण्यास मजा आली. मग पाठकांकडे काम करणाऱ्या पथकांनी गूळ घेऊन त्याचा पाक करणे आरंभले. त्याचा गोड सुवास नाक व मन सुखावून गेला. त्यानंतर लाह्यांत गुळाचा पाक टाकण्यात आला. खरे कौशल्य त्या क्रियेतच आहे. त्यावर लाडूचा दर्जा अवलंबून असतो. पथकांनी त्याच क्षणी गुळाच्या पाकातील राजगिऱ्याच्या लाह्या हाती घेऊन लाडू वळण्यास सुरुवात केली. पाठक यांचा कच्चा माल उत्तम दर्ज्याचा असतो. ते त्यात तडजोड करत नाहीत. ठोक बाजारात गुळाच्या अनेक प्रकारच्या प्रती असतात. पाठक सर्वोत्तम असेल तोच गूळ घेतात. राजगिराही चांगल्या प्रतीचा खरेदी केला जातो.
खरे तर, लाडू खात असताना ‘पाठकांच्याच लाडूला एवढी मागणी का?’ या प्रश्नाचे उत्तर मिळाले. पाठक यांच्या लाडूनिर्मितीच्या व्यवसायात त्यांचे पूर्ण कुटुंबीय सहभागी आहेत. त्यांची पत्नी अलका त्या व्यवसायाची व्यवस्थापकीय प्रमुख आहे. मुलगा अमोल त्याला कळू लागल्यापासून मदत करत आहे. त्यांची सून पूजा सोलापुरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. तीदेखील जमेल तेवढी मदत करते.
पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोट यांच्या केंद्रस्थानी असलेल्या सोलापुरातील वातावरण धार्मिक आहे. त्यामुळे पाठक यांच्या लाडूला चांगली मागणी असते.
– अविनाश बर्वे
Last Updated On 20th August 2017