विचार महत्त्वाचा की नाव आणि हेवेदावे?

0
29
_father_dibrito_sahitya_sanmelan

उस्मानाबाद येथील नियोजित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला विश्व हिंदू परिषदेने विरोध दर्शवला आहे. मला ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या कामानिमित्ताने वसईच्या फादर कोरिया यांना भेटण्याचा योग आला. कोरिया हे दिब्रिटो यांचे समकालीन, सहकारी. ते जीवनदर्शन केंद्राच्या (वसई) मासिकाचे संपादक आहेत. ते स्वतः लेखक-संशोधक आहेत. त्यांच्या भेटीमुळे मला त्या वादासंबंधातील एक चर्चाही ऐकण्यास मिळाली. त्यामुळे माझा योगायोगाने त्या वादाशी संबंध आला आणि मला त्यावर हसावे की रडावे हे कळेना! हिंदू परिवारात अतिरेकी मतांचे लोक आहेत याचा अंदाज अधूनमधून येणाऱ्या बातम्यांवरून व वक्तव्यांवरून होता, पण त्या अतिरेकींना हिंदू संघटनांचे लोक थांबवत वा रोकत का नाहीत असेही वेळोवेळी वाटते. यावेळी तर साहित्य-संस्कृतीचा प्रश्न आहे. दिब्रिटो हे सौम्य प्रकृतीचे लेखक आहेत. दिब्रिटो यांची साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड ही साहित्य-संस्कृतीच्या दृष्टीने निकोप गोष्ट आहे. अरुणा ढेरे-दिब्रिटो ही नव्या अध्यक्षीय निवड पद्धतीतील परंपरा तशीच विकसित होणार आहे, ती जपली जावी – असा विश्वास वाटत आहे. ही निवडपद्धत यापेक्षा निर्दोष पद्धत निर्माण होईपर्यंत जपली जाणे आवश्यक आहे. 

मी एक सर्वसामान्य युवा वाचक आहे; मराठी विषय घेऊन एम ए करत आहे. मला दिब्रिटो हे सर्वसमावेशक विचारांचे वाटतात. त्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या साहित्याचा अभ्यास केलेला आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात, विश्वचि माझे घर! तर त्यामध्ये सर्वधर्मीय लोक येणारच. त्यामुळे नावाकडे पाहून विरोध करणे हे मला पटत नाही. माणूस जात-धर्म घेऊन जन्मत नाही. त्याला व्यक्तिगत पातळीवर जातधर्म यांमुळे समाधान मिळतही असेल, ते त्याने जरूर मिळवावे. पण त्यामुळे त्याने समाजजीवन दूषित का करावे? तो ज्या समाज-संस्कृतीत जन्म घेतो त्या समाज-संस्कृतीमुळे त्याला नाव प्राप्त होते. त्यामुळे माणसाने विवेकबुद्धीने, सांगोपांग विचार करून समाजहिताच्या दृष्टीने चूक काय व बरोबर काय ते ठरवावे आणि तसेच वागावे असे मला अभिप्रेत आहे.

मी फादर कोरिया यांच्यासोबत ‘न्यूज१८ लोकमत’ आयोजित ‘बेधडक चर्चा’ पाहिली, ऐकली. त्या चर्चेत फादर कोरिया, नाशिकचे महंत सुधीरदास, माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस आणि विहिंपचे नितीन वाटकर हे  सहभागी झाले होते. विहिंपच्या विरोधामुळे राज्यात नवा वाद निर्माण होऊ लागला आहे. (सुदैवाने निवडणुकीच्या राजकारणाने तो मागेही पडला आहे.) मिलिंद भागवत यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला विहिंपने दिब्रिटो हे सक्तीने धर्मांतरण करतात आणि हिंदू संतांना विरोध करतात असे मत मांडून त्यांना विरोध केला आहे; दिब्रिटो यांचे साहित्यिक योगदान काय असाही प्रश्न विचारला जात आहे अशी मांडणी केली. मिलिंद भागवत यांनी फादर कोरिया यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि वाद हा नेहमीच चर्चेचा विषय असतो, त्यावर तुमचे मत काय? असे विचारले असता, कोरिया गमतीने म्हणाले, “वाद व्हायलाच पाहिजेत. आजकाल वादांमुळेच प्रसिद्धी मिळते. वाद करायचे असल्यास ते कोणत्याही मुद्यावरून निर्माण होऊ शकतात, त्याला कारण लागत नाही. आज वाद ‘फादर’ या नावावरून होत आहे. उद्या, उस्मानाबाद या नावावरूनही तो घातला जाऊ शकतो”. कोरिया यांना उस्मानाबादला एक गट धाराशीव असे म्हणतोही हे ठाऊक नसावे. कोरिया पुढे म्हणाले ते वाक्य मार्मिक आहे. “आपल्याला जर इतिहास उगाळत बसायचे असेल तर अशा गोष्टी निर्माण होतच राहणार!”

हे ही लेख वाचा –
साहित्य संमेलन आणि सुसंस्कृत समाज
जलसाक्षरतेच्या जाणिवा तीक्ष्ण करणारे जल साहित्य संमेलन
साहित्य संमेलनांचे अध्यक्ष – नाण्याची दुसरी बाजू

चर्चेचे रेकॉर्डिंग होण्यापूर्वी महंत सुधीरदास यांचे फादर कोरिया यांच्याशी बोलणे झाले. तेही मला महत्त्वाचे वाटले. महंत यांनी सांगितले, की “फादर दिब्रिटो यांची निवड झाल्याचे कळल्यावर मी पहिली व्यक्ती असेन, _Sahityasanmelan_charcha_nitesh_shindeकी जिने त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या! “मी जेव्हा त्यांच्या निवडीबाबत अभिनंदन व्यक्त करणारी पोस्ट फेसबूकवर टाकली तेव्हा त्या पोस्टला हजारो कमेंट आल्या. त्यात दिब्रिटो यांचे साहित्य हे अनुवादित (ट्रान्सलेटेड) आहे. ते त्यांचे मूळ साहित्य नाहीच अशा प्रकारच्याही कमेंट होत्या”. गंमत अशी, की मी त्यांची पोस्ट फेसबूकवर वाचली तेव्हा त्या पोस्टवर फक्त बारा कमेंट दिसून आल्या आणि त्या सर्व दिब्रिटो यांचे अभिनंदन करणाऱ्या आहेत! ते म्हणाले, “मी आणि दिब्रिटो तीन-चार वेळा विविध चर्चांत सहभागी होतो. मात्र मी चर्चेच्या या कार्यक्रमात दिब्रिटो यांच्या विरुध्द बोलणार आहे”. सुधीरदास हे नाशिक येथील काळाराम मंदिराचे पुजारी आहेत. त्यांना मागील कुंभमेळ्या दरम्यान महंत ही पदवी देऊन गौरवण्यात आले. त्यांना ते राजघराण्याची स्पॉन्सरशीप म्हणून पन्नास लाख रुपये देणे असल्याच्या आरोपात दुबई येथे स्थानबद्ध करण्यात आले होते. सुधीरदास यांची आठ महिन्यांनंतर न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. सुधीरदास हे नाशिक येथे नऊ सप्टेंबरला परतले. ते संघाचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर सरसंघचालक, मुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाच्या व्यक्ती यांच्या सोबतचे फोटो शेअर केले आहेत.

श्रीपाल सबनीस म्हणाले, की ज्या एकोणीस व्यक्तींनी दिब्रिटो यांची निवड केली. ते एकोणीस लोक विद्वान आहेत. त्यांनी दिब्रिटो यांची निवड त्यांची साहित्यिक कामगिरी लक्षात घेऊन एकमताने केली आहे आणि महंत अनुवादाचे म्हणत असतील तर अनुवादाला एकूण सांस्कृतिक आदानप्रदानात फार महत्त्व आहे. अनुवाद हा साहित्यकलेचा महत्त्वाचा प्रकार आहे. दिब्रिटो यांची निवड धार्मिक स्तरावर झालेली नाही. साहित्याला धर्म नसतो. दिब्रिटो यांना महाराष्ट्र शासनाचा ‘ज्ञानबा-तुकाराम’ हा पुरस्कार मिळाला आहे. शासनाने त्यांची नेमणूक बालभारतीच्या मंडळावरही केली आहे. 

विहिंपचे जिल्हाध्यक्ष नितीन वाटकर यांनी कार्यक्रमात वेगळेच प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, की रोमन कॅथलिक चर्चची जीवनमूल्ये आणि हिंदू संस्कृतीची जीवनमूल्ये यांत फरक आहे. दिब्रिटो यांची निवड ते संत साहित्याचा अभ्यास करतात म्हणून केली गेली असे ऐकिवात आहे. त्यांनी ज्ञानेश्वर, तुकाराम यांचा अभ्यास केला, पण त्यांनी तो विचार चर्चमध्ये मांडला का? वाटकर पुढे इतिहासात घुसले. ते म्हणाले, चर्चचा पूर्वेतिहास हा रक्तरंजित आहे, पूर्वी चुकीच्या पद्धतीने  धर्मांतरण  केले गेले होते, त्याला दिब्रिटो यांचा विरोध आहे का? 

त्यावर फादर कोरिया म्हणाले, “मी अशा आरोपांचे खंडन करण्यासाठी येथे उपस्थित नाही. परंतु या विषयावर अनेक दशकांपासून चर्चा चालू आहेत. मी पूर्वी येथे चर्चेला आलो असताना, मदर तेरेसा यांच्या विषयीदेखील असेच आक्षेप घेतले गेले होते. ख्रिस्ती व्यक्तींवर असे आरोप सर्रास केले जातात. ख्रिस्ती परंपरेला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. त्याकाळात भारतातील फक्त दोन टक्के लोकांचे धर्मांतरण झाले आहे. फादर कोरिया म्हणाले, “मी व दिब्रिटो, आम्ही दोघे लहानपणापासून एकत्र वाढलो. दिब्रिटो हे मागील साठ वर्षांपासून साहित्याची उपासना करत आहेत. त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षापासून पुण्याच्या ‘सकाळ’ ते ‘लोकसत्ता’पर्यंत विविध वर्तमानपत्रांत सदरे लिहिली आहेत. त्यांचे लिखाण हे उपजत आहे. ते जर भाषांतरीत लेखन करत असते तर त्यांच्या लेखमालांचा गौरव अनेकांनी केला नसता; त्यांची स्तुती केली नसती. त्यांचे लेखन ‘साधना’ मासिकात अनेक वर्षांपासून प्रसिद्ध झाले नसते. त्या सर्वच मान्यवर संपादकांचा बुद्धिभेद झाला आहे का?” फादर कोरिया हे विलक्षण शांत व्यक्ती जाणवले. चर्चेत अन्य सर्वजण हमरीतुमरीची भाषा बोलते होते. ते सर्व बोलण्यास आसुसलेले होते, पण फादर एकदम शांत आणि ते त्यांना जेव्हा बोलण्यास सांगितले तेव्हाच बोलले. हा स्वभाव सर्वांकडे नसतो.

मिलिंद भागवत यांनी वादाच्या मूळ प्रश्नावर येत, कोरिया यांना विचारले, “फादर हे बिरूद दिब्रिटो यांनी काढले तर नितीनजी यांचा विरोध मावळेल. तर तुम्ही तुमच्या बालपणीच्या मित्राला तसा सल्ला देऊ शकाल का, की त्यांनी फक्त फ्रान्सिस दिब्रिटो हे नाव लावावे?” त्यावर कोरिया म्हणाले, की “फादर ही उपाधी नावाआधी ते आणि मी मागील पन्नास वर्षांपासून लावतो. ती पद्धत बदलावी कशासाठी याचे प्रयोजन कळत नाही”. कोरिया यांनी ‘महंतांच्या सहवासात’ हे पुस्तक लिहिले आहे. ते त्याच नावाने संघाच्या पेपरमध्येही लिहित असत. त्यांचे ते लेखन तीन खंडांत प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी धर्मातराबाबत मूलभूत विचार मांडला. ते म्हणाले, “फसवून केलेले धर्मांतरण हे धर्मांतरण नाही. माणसाचे मन्वंतर होते त्याला धर्मांतरण म्हटले जाते. इतिहासात फसवून, सक्तीने धर्मांतर केल्याचे काळे ढग असतीलही, पण आता ते वारंवार उच्चारण्यात काय हशील आहे? दिब्रिटो यांनी तसे धर्मांतरण केले आहे असे कोणाला वाटत असेल तर त्यांनी ते ‘प्रूव्ह’ करायला हवे. त्यासाठी ते अध्यक्ष होण्याची वाट पाहण्यास _charcha_fatherdibritoनको होती. दिब्रिटो यांना पूर्वीच विरोध व्हायला हवा होता”. कोरिया यांच्या मते, दिब्रिटो यांचे लेखन उदारमतवादी व सर्वधर्म समभावाचे आहे.

ती चर्चा औपचारिक रीत्या संपल्यानंतरही कोरिया व महंत एकमेकांशी अनौपचारिक गप्पा मारत राहिले. कोरिया यांनी महंतांना त्यांचे ‘नवयुगाच्या प्रेषिता’ हे पुस्तक दाखवले. वसईच्या चर्चमधील अडतीस घंटा चिमाजी अप्पाने वसई जिंकल्यानंतर महाराष्ट्रातील विविध हिंदू मंदिरांत लावल्या गेल्या आहेत, त्याबाबत सांगितले. त्यावर महंत म्हणाले, की ते त्यांना माहीत आहे. त्यांनी तशा घंटा नाशिक येथील मंदिरात पाहिल्यादेखील आहेत. कोरिया यांनी त्यांच्या पुस्तकात सिद्धांत असा मांडला आहे, की त्या घंटांच्या माध्यमातून चर्च व मंदिरे यांचे, म्हणजे दोन उपासनापद्धतींचे  मीलन घडवून आणले गेले आहे! त्यामुळे त्यांनी म्हणजे हिंदू व ख्रिश्चन यांची परस्परांच्या प्रेम व आदर या भावना जाणल्या पाहिजेत.” फादर कोरिया यांनी बोलता बोलता सांगितले, की त्या प्रत्येक बेलचा अर्थ हा वेगळा आहे. सांस्कृतिक आदानप्रदान त्यामुळे झालेले आहे. ते सर्वानी मान्यही केले आहे. महाराष्ट्र आपलाच आहे. त्यामुळे जुन्या गोष्टींत रममाण होण्यात काहीही अर्थ नाही. त्या टाळल्या तर वाद होणार नाहीत व मानवता वाढेल. फादर कोरिया यांच्या प्रतिपादनात ठामपणा व पक्का प्रागतिक विचार जाणवला. बाकीच्यांचा केवळ भावनाक्षोभ होता. 

गंमत अशी वाटली, की महंत मध्येच फोनवर जेव्हा बोलले तेव्हा त्यांनी त्यांच्या मित्राला फादर हे चर्चेत आणि चर्चेनंतरही कसे आपुलकीने बोलतात याचीच उदाहरणे दिली!

– नितेश शिंदे
info@thinkmaharashtra.com

About Post Author