Home कला वासुदेवाच्या नाचण्यातील खुशी

वासुदेवाच्या नाचण्यातील खुशी

2

वासुदेव ही एक लोककला आहे. त्याचे रूपडे मोठे आकर्षक असते. डोक्यावर मोरपिसांची शंकूच्या आकाराची टोपी, अंगात पांढराशुभ्र झब्बा, सलवार, कंबरेला बांधलेला शेला आणि त्यात खोचलेला पावा, काखेला झोळी, गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, हातात तांब्याचे कडे, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे, हातात चिपळ्या आणि मुखात भगवंताचे नाम. पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात वासुदेवाचा मधुर स्वर कानावर पडला, की मनाला शांतता वाटे व परमेश्वराची ओढ निर्माण होत असे. जुन्या काळी वासुदेव भल्या पहाटे घरच्या अंगणात येई. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असे आणि त्याचवेळी वासुदेवाची गाणी कानावर पडत; तो टाळ-चिपळ्यांच्या तालावर फेर धरू लागे. बालगोपाळ उठून अंगणी गर्दी करत आणि घरातील लक्ष्मी सुपातील दाणे वासुदेवाच्या झोळीत टाके. तो सकारात्मक ऊर्जेने भरलेले आचारविचार वाटत गावोगावी फिरतो. त्या बदल्यात त्याला कपडे, धान्य, पैसे मिळतात; कधी कधी रिकाम्या हातानेही परतावे लागते. ती जुनी प्रथा आहे.

वासुदेवाच्या तोंडी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत संक्रमित झालेली मौखिक परंपरेतील गाणी असत. वासुदेव स्वतःच्या विशिष्ट लकबीत ओव्या, अभंग, सादर करतो.

वासुदेव ही एक भिक्षेकरी जमात आहे. त्या लोकांना धुकोट असेही नाव आहे. ते त्यांचा उदरनिर्वाह गावोगाव हिंडून भिक्षा मागून करतात. मुलगा भिक्षा मागण्याजोगा झाला, की त्याला भिक्षा मागण्याची दीक्षा देतात. ते लोक दक्षिण महाराष्ट्रात सर्वत्र आढळतात. ते त्यांची उत्पत्ती एका ब्राह्मण ज्योतिषाला कुणबी स्त्रीपासून झालेल्या सहदेव नावाच्या मुलापासून झाली असल्याचे सांगतात. ते मराठा कुणबी लोकांप्रमाणे दिसतात व त्यांचे रीतिरिवाजही त्यांच्यासारखेच आहेत. काही वासुदेव शेतीही करतात.

दीक्षा देण्याचा समारंभ असा –शुभ दिवस पाहून उपाध्याला घरी बोलावले जाते. मग उपाध्या मुलाला वासुदेवाचा वेष परिधान करण्यास सांगतो आणि मंत्रोच्चारपूर्वक त्याच्या कपाळी चंदनाचा टिळा लावतो. एवढे झाले, की दीक्षाविधी संपतो. मग उपाध्याला विडा-दक्षिणा देऊन निरोप दिला जातो आणि सर्व ज्ञातिबांधवांसह भोजन करतात.

वासुदेव त्याला कसली कसली भिक्षा हवी, त्याची यादी भिक्षा मागताना गाण्यातून सादर करतो –

 

तुम्ही आयाबायांनो द्या वासुदेवणीला चोळी
अहो लहान मुलींच्या द्या अंगींची काचोळी
घडी पाटावें लुगडीं तुम्ही द्यावी याच वेली
अहो पाटीलबाबा हो द्या शेला कृपा करून
डोईचे मुंडासे द्या आपुले हाते करून
आणि शाल-दुशाला टाकाव्या अंगावरून

वासुदेवाच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून लोक जेव्हा त्याला काहीतरी दान देतात, तेव्हा तो एकदम खूश होतो व गतीने नाचत दान पावल्याची पावती देतो–

दान पावलं दान पावलं
पंढरपुरामंदी इट्टोबारायाला
कोंढणपुरामंदी तुकाबीला
जेजुरीमंदी खंडोबारायाला
सासवडामंदी सोपानदेवाला

तो महाराष्ट्रातील बहुतेक छोट्यामोठ्या देवतांची नावे घेऊन त्यांना दान पावल्याचे सांगतो व एक गिरकी घेऊन पावा वाजवतो. मग पुढच्या घरी निघून जातो. वासुदेव ही जमात केव्हा उदय पावली, ते निश्चित सांगता येत नाही. तथापी, ती हजार-बाराशे वर्षांइतकी जुनी आहे.

शिवाजी राजांनी वासुदेवाच्या कलेचा उपयोग चातुर्याने केला. त्यांनी वासुदेवामार्फत मावळ्यांच्या घरी निरोप पाठवले. तसेच, वासुदेवाचा हेरगिरीसाठी उपयोग करून शत्रूंच्या गोटातील बातम्याही मिळवल्या.  

वासुदेवाची गाणी हा लोकसाहित्यातील महत्त्वाचा प्रकार मानला जातो. दैनंदिन व्यापातून मनाला प्रसन्न करणारी भावना त्यात आहे. वासुदेव म्हणतो,

रामनामाच्या पारी
आली वासुदेवाची स्वारी
ज्याच्या बापाने केला धर्म
मुलगा जाणितो त्याचे वर्म
वासुदेवाच्या चिपळ्या चाळ
गळा माळी नि पायी घोळ
वासुदेवाचा घुमतो टाळ
सुखी राहतील तुमचे बाळ

-vasudev - varnanसद्यस्थितीचे प्रश्न गाण्यातून लयबद्ध पद्धतीने मांडण्याचे कसब निराळेच आहे. वासुदेव नुसते प्रश्न मांडून थांबत नाही तर तो त्याची उत्तरेदेखील सांगतो. तो त्याच्या वाडवडिलांकडून घेतलेले बाळकडू पुढील पिढीला सांगून हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा जोपासत असतो.

वासुदेव नैतिक मूल्यांची पाठराखण करतो. वासुदेवाचे जगणे भटके आहे. त्याला गावोगावी मैलोन् मैल भटकताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
पूर्वी दानधर्म करण्याचा संस्कार होता.

अहो हरिनाम बोला
दारी वासुदेव आला
आईशिवाय माया नाई 
बापाशिवाय जन्म नाई
ज्याच्या वंशाला जन्मावं
अहो हरिनाम बोला 
दारी वासुदेव आला
धर्म केला कोटी न कोटी
धर्म जिवाच्या संगती
नाव त्याचंच सांगावं
किती कमावलं कोटी न कोटी
सगळं राहतं रे धर्तीच्या पोटी 

ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्या साहित्यात वासुदेवावरील रूपके आढळतात –

गातों वासुदेव मी ऐका ।
चित्त ठायीं ठेवून ऐका ।
डोळे झांकून रात्र करूं नका । 
काळ करीत बैसला असे लेखा गा ॥
राम राम स्मरा आधीं ॥ ॥ 
वासुदेव हरी वासुदेव हरी |
सकाळच्या पारी आली वासुदेवाची स्वारी |
सीता सावली माना दान करी वासुदेवा |
श्रीकृष्ण घ्या सखा नाही होणार तुला धोका ||

वासुदेवाची गाणी ऐकण्यासारखी असत. ‘चांगुणाच्या घरी शंकर आले भोजनाला’, ‘सत्त्वशील माउली टाळूनी वचनाला’, ‘स्वस्थ बसा स्वामी मन करूनी धीर..’ अशा गाण्यांमधून देवादिकांच्या कथा सांगितल्या जात. ‘पंढरीच्या विठोबाला, कोंढणपुरात तुकाबाईला, सासवडमंदी सोपानदेवाला, जेजुरीमंदी खंडोबाला, आळ्या बेल्यात ग्यानबाला, भीमाशंकरी महादेवाला, मुंगी पैठणात नाथमहाराजाला..’, अशा गाण्यांतून देवादिकांचे नामस्मरण होई. ‘तुळस वंदावी वंदावी, मावली संतांची सावली’, ‘तुळसी ऐसे लावता रोप, पळूनी जाती सगळे दोष’ अशी आरोग्यदायी तुळशीची महती सांगितली जाई. ‘रामहरी भगवान, भजावे मुखी राम, खोटी वासना सोडूनी द्या, पन देवाचे चरण धरा, आई बाप घरची काशी मानुनी त्यांचे चरण धरा..’ अशी मानवी जीवनाला आवश्यक अशा उत्तम प्रकारच्या सद्विचारांची महती सांगितली जाई.

वासुदेवाचे वर्णन महानुभाव पंथाच्या साहित्यात आढळते. त्याचा अर्थ ती कला नऊशे ते हजार वर्षें जुनी आहे. वासुदेव हा कृष्णभक्त आहे. मोरपीस आणि पावा हे त्याचे प्रतीक मानले जाते.

वासुदेवाची गाणी विविध प्रकारची आहेत. त्यांत जसे बालकृष्णाचे चरित्रवर्णन आहे, तसाच निखळ भक्तीचा महिमाही गायला आहे. काही गाण्यांत प्रपंचाचे स्वरूप रेखाटून, तो नेटका करण्याची नीती सांगितली आहे, तर काही गाण्यांत सरळ सुबोध भाषेत वेदांताचे मर्म विशद केले आहे.

आधुनिकतेचे वारे गावोगावी पोचले आहे. वासुदेवाची कला त्या प्रवाहात लोप पावत चालली आहे.

संतोष दिवे,

santoshdive32@gmail.com
 

 

About Post Author

2 COMMENTS

  1. अतिशय सुंदर माहीती…
    अतिशय सुंदर माहिती. इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टीकोन पहा.
    वासुदेव, पिंगळा, कडकलक्ष्मी, कुडमुडे, जोशी, चित्रकथी, नंदीबैलवाले हे लोकांच्या दारात पहाटे जाऊन न्याय नीतीची चरित्रं गात. इतिहास कथा सांगत, रामायण महाभारत पुराणं वाचायला कष्टकऱ्यांना उसंत नसे. ही मंडळी समाजाची अशी नैतिक भूक भागवत असत. इस्लामी आक्रमणानंतर मंदीरांवर गंडांतर आलं देवळात जाणं मुश्कील झालं समाजने ही पर्यायी व्यवस्था उभी केली देवच लोकांच्या दारी पहाटे नेला.

    त्याबद्दल कृतज्ञता म्हणुन समाज त्यांचा सन्मान करी. भीक घालत नव्हता.
    ख्रिस्ती राजवटीने येथील आर्थिक घडी उसकटली (हे सर्वमान्य आहे) त्यात लोकं भिकेला लागले, त्यांच्यावर अवलंबुन असलेला हा सर्व समाज भिक मागणारा म्हणुन कोषात नोंदला गेला. पण लोकांना धर्म न्याय नीती चारित्र्य सांगणाऱ्या या अभ्यासू वर्गाचा उल्लेख, नोंद भिकारी म्हणुन झाला तो वेदनादायक वाटला म्हणून लिहीले क्षमा असावी.
    चंद्रकांत जोशी

  2. मी जेव्हा जेव्हा वासुदेव…
    मी जेव्हा जेव्हा वासुदेव दिसतो. तेव्हा मनोमन नतमस्तक होतो. एवढ्या भीषण हजार वर्षांच्या गुलामगिरीत जसे वारकरी संप्रदायाने संस्कृतिरक्षणाचे काम केले तसेच, कार्य वासुदेवांनी केले आहे. त्याला दारावर आल्यावर लोक जा म्हणून सांगतात. तेव्हा मनाला वेदना होतात. मला कोठेही वासुदेव दिसला, की स्वतः जाऊन वीस-पन्नास रुपये देतो. पण त्यांचा इतिहास आज कळला. शतशः आभार.

Comments are closed.

Exit mobile version