Home लक्षणीय फ्लोरा फाउंटन मुंबई फोर्टचे वास्तुवैभव

फ्लोरा फाउंटन मुंबई फोर्टचे वास्तुवैभव

0

फ्लोरा फाउंटन या शिल्पाकृतीचे समाजमनातील स्थान दीडशे वर्षें कायम आहे. त्याचे ‘हुतात्मा चौक’ असे नामकरण साठ वर्षांपूर्वी झाले. तरी तो चौक फ्लोरा फाउंटन या नावानेच ओळखला जातो. त्याची निर्मिती करण्यामागे धारणा काय होती? सत्ताधारी ब्रिटिश अधिकारी, त्यांची कुटुंबे आणि अन्य नागरिक त्यांच्या मायभूमीपासून हजारो मैल दूरवर वेगळ्या संस्कृतीच्या देशात वावरत होते. त्यांना त्यांच्या मातृभूमीची याद येणे स्वाभाविक होते. त्याच भावनेने मुंबईतील बऱ्याच वास्तू, शिल्पाकृती यांची निर्मिती मूळ ब्रिटिश वास्तूंच्या धर्तीवर झाली. फ्लोरा फाउंटनची निर्मिती इंग्लंडच्या प्रख्यात, सुशोभित ‘पिकॅडली सर्कस’च्या धर्तीवर असावी असे वाटते. त्यामुळे ब्रिटिश नागरिक आणि त्यांचे परिवार यांना ते विरंगुळ्याचे आकर्षक स्थळ ठरले.

ते आकर्षक शिल्प उभारण्यासाठी कर्सेटजी फर्दुमजी पारेख या माणसाने देणगी 1864 मध्ये उपलब्ध करून दिली. त्यानंतर ‘ऍग्रो हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया’ या प्रख्यात वास्तू विशारद संस्थेने ते शिल्प उभारण्याचे आव्हान स्वीकारले. त्या शिल्पाकृतीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी नेत्रदीपक कारंज्यांची निर्मितीही झाली. ते कारंजे मुंबई नगरी वसवणारे कलाप्रेमी गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांच्या स्मरणार्थ बांधले गेले. ते कारंजे म्हणजे जलव्यवस्थापनाबरोबर जलअभियांत्रिकी तंत्रज्ञानातील आश्चर्यच आहे. कारंजे आरंभीच्या काळात फ्रियर फाउंटन या नावाने ओळखले जाई.

शिल्पाकृती सुमारे पंचवीस फूट उंच आहे. तिच्या सर्वोच्च भागी ‘फ्लोरा’ ही पुष्पदेवता आहे. फ्लोरा ही रोमन देवता. त्या फाउंटनच्या शिखरावरील फ्लोरा देवतेमुळे ‘फ्लोरा फाउंटन’ हे नाव देण्यात आले. ते फाउंटन रचनेत रोमन देवता, डॉल्फिन मासे, शिंपल्याच्या आकारातील अलंकृत कुंड, मध्यवर्ती गोलाकार कारंजे व मानवी आकारातील विलोभनीय शिल्पांचा अनोखा संगम असलेले मुंबईतील एकमेव वास्तुशिल्प असावे. कारंज्यातील पाण्याचा प्रवाह रोमन देवतेच्या पायाशी अल्लडपणे रेंगाळणाऱ्या लोभस डॉल्फिन मत्स्याच्या मुखातून सुरू होतो व शिंपल्यातून तिसऱ्या टप्प्यातील कुंडावरील सिंहमुखातून गोलाकार हौदामध्ये पाण्याचे निर्गमन होते. त्या क्रमवारीत पाण्याचा भिंतीला स्पर्शही होणार नाही याची काळजी घेतली आहे. तसेच शिल्पाच्या मध्यभागातील चक्राकार कारंजेही लक्ष वेधून घेते. कारंज्यासाठीचा पाणीसाठा नऊ इंच रुंदीच्या बिड नलिकेस जोडलेल्या प्रेशर व्हॉल्व्हद्वारे रिसायकल केला जातो, हेदेखील या कारंज्याचे वैशिष्ट्य आहे. त्याखालील चौरस आकारातील भिंतीत चारही दिशांना बसक्या आकारातील शोभिवंत कमानी आहेत. त्या कमानीच्या वरचा भाग विस्तृत भुजा, पाने व फुलांच्या नाजूक आकारातील वेलबुट्ट्यांनी अलंकृत केला आहे. चारही कोपऱ्यांत संगमरवरी दगडात बनवलेली मानवी आकारातील महिला शिल्पे अलंकृत केलेल्या अर्धगोलाकार खोबणीत चपखलपणे बसवली आहेत. त्यात विदेशी व भारतीय धाटणीतील महिला शिल्पे दोन्ही देशांतील पौराणिक कथांवर आधारित आहेत, ते वेशभूषेतून दिसून येते.

एकूण रचनेतील मानवी शिल्पे, समुद्री डॉल्फिन, शिंपले, कमानीवरील पाने-फुले व पाण्याचा वापर या नैसर्गिक घटकांमुळे शिल्पात जिवंतपणा आला आहे. कला-सौंदर्याने फुलवलेल्या, मन प्रसन्न करणाऱ्या वास्तुशिल्पास बसवलेले सुरक्षाकवचही एकूण सौंदर्यात भर घालते. त्या गोलाकार लोखंडी सुरक्षाकवचात ठराविक अंतरावरील काळसर रंगातील कळी-पुष्पाकार व उभ्या दंडावरील सोनेरी गोलाकार शिल्पाच्या भारदस्ततेत भर घालतात. सुरक्षाकवच आकारास पूरक ठरणारे इतर आकारही एकूण शिल्पसौंदर्य खुलवण्यास पुष्टी देणारे आहेत, हे विशेष. युरोपमधील शहरात कल्पनेशी सुसंगत मोहक आकार व रंगसंगती असलेल्या कल्पक शिल्पांची रेलचेल जागोजागी आढळते. जणू काही ती शहरे शिल्पासाठीच वसवली आहेत की काय असा प्रश्न पडतो!  

मूळ फ्लोरा फाउंटन ‘रिचर्ड नॉर्मन शॉ’ या वास्तुविशारदाने निओ गॉथिक आणि निओ क्लासिकल शैलीत आरेखित केले आहे. ती शैली विदेशी असूनही ते भारतीय वळणाचे दिसावे याचा पुरेपूर प्रयत्न दिसून येतो. कारंज्यातील मानवी शिल्पे कला-संवेदनशील स्कॉटिश शिल्पकार जेम्स फोर्सिथने घडवली आहेत. त्या शिल्पामुळे स्थानिक दगडात बांधलेल्या वैविध्यपूर्ण शैलीतील इमारतींचे कलासौंदर्य वाढले आहे. ते प्रथम ग्रेडचा दर्जाप्राप्त झालेले कारंजे ‘दी अॅग्री-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया’ने बांधले आहे. त्यासाठी झालेल्या एकूण सत्तेचाळीस हजार रुपये खर्चापैकी वीस हजार रुपयांचा निधी कर्सेटजी फर्दुनजी पारेख या धनाढ्य व्यापाऱ्याने दिला होता. त्या संदर्भातील कोरीव नोंद शिल्पतळपट्टीवर आढळते. तत्कालीन ब्रिटिश राजवटीत बांधलेले ते शिल्प सर्वांत महागडे असल्याची नोंद आहे.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर, 1961 साली त्या शिल्पाकृतीशेजारी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांचे स्मारक उभारले गेले व त्या परिसराचे ‘हुतात्मा चौक’ असे नामकरण करण्यात आले.

‘फ्लोरा फाउंटन’ शिल्पाची रया दीडशे वर्षांनंतर जात चालली होती. शिल्प इंग्लंडमधील ‘पोर्टलॅण्ड’ स्टोन या खास दगडातून साकारले आहे. त्याचा मूळ पोत व रंग आहे तसा ठेवला आहे हे विशेष. मध्यंतरीच्या काळात, शिल्पाचा रंग व पोत याचा विचार न करता पांढऱ्या ऑइलपेंटमध्ये संपूर्ण शिल्प रंगवण्याचा हास्यास्पद प्रकार स्थानिक प्रशासनाने केला होता. त्यातील मूर्तींचे अवयव तुटल्याने ते केविलवाणे भासत होते, त्यांनी पूर्ववत करण्यासाठी पोर्टलॅण्ड स्टोनशी मिळताजुळता ‘पोरबंदर’ स्टोनचा वापर केला गेला आहे.तो प्रयोग म्हणजे शिल्प-कला-सौंदर्यकल्पना मोडीत काढण्याचाच प्रकार होता. ते मुंबई शहराचे सौंदर्य व पर्यावरण जपण्यासाठी धडपडणाऱ्या सुज्ञ व कला-संवेदनशील शहरवासीयांचे दुर्दैव आहे. महापालिकेने त्याच्या देखभालीचे काम हाती घेऊन ते शिल्पवैभव जतन करण्याचा आव्हानात्मक प्रयत्न केला आहे.

मूळ फ्लोरा फाउंटनचे उद्घाटन दिनांक 18 नोव्हेंबर 1869 रोजी झाले होते. तांत्रिक कारणामुळे कारंजे सन 2017 सालापासून बंद होते. तब्बल दोन वर्षांनंतर दिनांक 24 जानेवारी 2019 रोजी फ्लोरा फाउंटन पुनश्च सुरू झाले. कारंज्याच्या पुनरुज्जीवनाचे काम संवर्धन वास्तुविशारद विकास दिलावरी यांनी केले आहे. ज्या तांत्रिक कारणामुळे कारंजे बंद ठेवले होते, ते उद्दिष्ट पूर्णपणे साध्य झाले की नाही, ते सांगणे कठीण आहे. कारण, कारंज्यात समाविष्ट असलेल्या सर्व मुखांतून पाणी समान दाबात वाहत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे भिंती ओल्या व काळपटही दिसतात. दुसरी खटकणारी बाब म्हणजे सुरक्षा. लोखंडी चौरस पाइप व संगमरवरी दगड सांधेजोड कमी दर्जाची झाली आहे. ती बाब दृष्टीआड करणे अवघड आहे. तिसरी व तेवढीच महत्त्वपूर्ण बाब म्हणजे कारंज्याच्या भोवताली बसवलेली ओबडधोबड दगडी फरसबंदी. फ्लोरा फाउंटनसारखे कला-सौंदर्यपूर्ण शिल्प न्याहाळताना दर्शकांना व विशेषकरून टोकदार सँडल वापरणाऱ्या महिलांना फरसबंदीवरून काळजीपूर्वक चालावे लागते. ते व्यवस्थित करणे फारसे कठीण नाही. पुरातन शैलीतील कास्ट आयर्न विद्युत खांबाचा वापर पुरातन शिल्पाशी मिळताजुळता आहे; पण ते ज्या तळखड्यावर बसवले आहेत ते विजोड वाटतात. शिल्पाच्या आवारात अल्पकाळ बसण्यासाठी केलेली व्यवस्था नेटकी, पण आधुनिक वळणाची आहे.

फ्लोरा फाउंटन जंक्शनचे खास वैशिष्ट्य म्हणजे काळानुसार वाहनतळाचा सतत बदलत जाणारा आकार. यात आजतागायत अनेक वेळा सन 1864पासून बदल केले गेले आहेत. ते जुन्या छायाचित्रात दिसून येते. असे असूनही फ्लोरा फाउंटन परिसरातील सौंदर्यात किंचितसाही फरक जाणवत नाही हेच त्या कला-सौंदर्याने नटलेल्या शक्तिस्थानाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे! आपल्या पूर्वजांनी बांधलेल्या इमारतींचा वारसा कला-संवेदनशीलतेने जपला, तरच पुढील पिढी त्या शाश्वत आनंदाचा हिस्सा बनून राहील. अनेक वर्षांपासून मुंबईतील वारसा स्थळे शहरव्यवस्था व सौंदर्याचा अविभाज्य घटक बनून राहिली आहेत. तत्कालीन वास्तुरचनाकारांनी त्या परिसरातील जडणघडणीत तडजोडीचा पर्याय न स्वीकारता, वास्तू उपयुक्तता व कला-सौंदर्याच्या निकषांवर इमारतींचे आरेखन केले होते, हे त्या त्या इमारतींच्या वैशिष्ट्यातून समजून येते.  

-flora-fountain‘फ्लोरा फाउंटन’च्या सभोवताली गोलाकृती स्वरूपाच्या जागी पर्यटक, प्रेक्षक यांना निवांतपणे बसणे आता शक्य होणार आहे. मूळ स्वरूप पुन्हा प्राप्त करून देणे हे वास्तुरचनाकारांना एक खडतर आव्हानच होते. तीन टप्प्यांतील या आकर्षक कलाकृतीतील दोन्ही बाजूंकडून सिंह आणि डॉल्फिन यांच्या शिल्पांतून सतत पाण्याचा सुखद वर्षाव होई. मात्र त्यात बिघाड होऊन 2007 पासून जलप्रवाह बंद झाला होता. तो प्रवाह पूर्ववत करण्यासाठी जल अभियंत्यांना बराच शोध घ्यावा लागला. दगडी बांधकामाच्या अंतर्गत लपवून ठेवलेल्या जलवाहिन्यांचा शोध घेण्यासच तीन महिने लागले. आता, ते आव्हानात्मक काम दोन टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यासपूर्वक वापर करून त्या शिल्पाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी मूळ रंगांचे थर हटवण्यासाठी उष्ण पाण्याचे फवारे मारावे लागले. तेथे खोदकाम करावे लागले तेव्हा मुंबईकरांची एकेकाळी जीवनवाहिनी असलेल्या ट्रामगाडीचे लोखंडी रूळ सापडले. ट्राम1964 साली बंद झाली. त्या अवशेषांचे ऐतिहासिक मोल ध्यानी घेऊन वारसा जतन विभागाने त्यांचा योग्य उपयोग करण्याचे योजले आहे.
दोन-अडीच शतकांचा ऐतिहासिक – सांस्कृतिक वारसा लाभलेल्या मुंबई महानगरातील काही वारसा वास्तूंची वर्तमान स्थिती उपेक्षित, केविलवाणी आहे. ‘फ्लोरा फाउंटन’पासून त्यांचे संवर्धन करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होत आहे. 

– अरुण मळेकर
arun.malekar10@gmail.com

मुंबईच्या वारसा वस्तू संशोधनात विशेष आस्था असलेले वास्तुशिल्पी चंद्रशेखर बुरांडे यांच्या मते मात्र ‘फ्लोरा फाउंटन’ आणि लंडनमधील ‘पिकॅडली’ यांचा वास्तुविशेष या अंगाने काहीही संबंध नाही. 

(अधिक माहिती संकलन – चंद्रशेखर बुरांडे)

 

About Post Author

Previous articleअविनाश बर्वे – उत्स्फूर्त उपक्रमशीलता
Next articleवासुदेवाच्या नाचण्यातील खुशी
अरुण मळेकर ठाणे येथे राहतात. त्यांनी ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये समाजशास्त्र, मराठी, विज्ञान विषयांचे अध्यापन केले आहे. मळेकर यांनी 'महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा'त प्रसिद्धी खात्यात माहिती सहाय्यक पदावर काम केले. त्यांनीू तेथेच सहल व्यवस्थापन व प्रत्यक्ष भेटींवर आधारित पर्यटन स्थळांवर लेखन करण्याची जबाबदारी पार पाडली. त्यांचे ‘अरण्यवाचन’, ‘विश्व नकाशांचे’, ‘गाथा वारसावास्तूंची’ ही पुस्तके प्रकाशित आहेत. मळेकर गेली चाळीस वर्षे ‘लोकसत्ता’, ‘सकाळ’, ‘तरुण भारत’, ‘सामना’ व ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तपत्रांतून लेखन करत आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘गुणवंत कामगार पुरस्कार’ (1990) आणि 'ठाणे महानगर पालिका' पुरस्कृत ‘जनकवी पी सावळाराम साहित्यविषयक पुरस्कार’ (2015) प्राप्त झाला आहे. लेखकाचा दूरध्वनी 8369810594

Exit mobile version