भक्तिमार्गाचा अधिकार त्रैवर्णीकांना वारकरी संप्रदायाने दिला. सिन्नर तालुक्यात हरिनाम सप्ताह गावागावांत होत असतो. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, भारदेबुवा यांच्यासारखे श्रेष्ठ प्रवचनकार, कीर्तनकार तेथे पोचत असत. सिन्नर तालुक्यातून वारक-यांच्या दिंड्या पंढरपूरला जातात.
महाराष्ट्रभर संत विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारे वावीचे रामगिरी महाराज म्हणजे जणू संतच. श्री. रामगिरी महाराज वावीकर यांचा जन्म १९२० साली धानोरी (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथे झाला. त्यांचे पिताश्री भाऊगिरी नारायणगिरी गोसावी व मातोश्री सरूबाई. त्यांचे प्राथमिक शिक्षण धानोरी गावी होत असतानाच ते तिसऱ्या इयत्तेत, मुळातच अध्यात्माच्या ओढीमुळे गंगागिरी महाराज (सरला बेट, ता. वैजापूर) या ठिकाणी घरामध्ये कोणालाही न सांगता निघून गेले. तेथे त्यांना श्री. कोंडाजीकाकाक ऊर्फ सोनेश्वर गिरीजी महाराज यांचा अनुग्रह लाभला.
तेथे त्यांनी ज्ञानेश्वरी, गाथा, श्रीमद्भगवतगीता या ग्रंथांचे; मृदुंगवादन, शास्त्रीय गायन या कलांचे व कीर्तन आणि प्रवचन या कौशल्याचे अध्ययन केले. त्यामुळे काका त्यांना त्यांच्यासोबत कीर्तनाच्या कार्यक्रमाला घेऊन जात. प्रवासाच्या दरम्यान, कोंडाजी काकांनी रामगिरी महाराज यांची वावी संस्थानासाठी नियुक्ती केली.
त्यांनी १९६७ साली बहादपुरा या गावी पहिला नारळी सप्ताह आयोजित केला आणि शेवटचा रौप्यमहोत्सवी सप्ताह वावी या कार्यभूमीत केला. त्यांनी श्रद्धेने, निष्ठेने व भक्तिभावाने वारकरी संप्रदायाचा अभ्यास केला. त्यांनी अनुभवसिद्ध ज्ञानाचा वापर जनजागृतीसाठी केला. त्यांनी आध्यात्मिकतेला सामाजिक परिमाण दिले. अनेकांचे संसार सुखी व्हावे, माणसाची व्यसनाधिनता जावी, समाजातील वाईट सवयी जाऊन समाज स्थिर व्हावा. संस्कृती सुधारावी यांसाठी पोटतिडकीने प्रयत्न केले. त्यांनी समाजाला समजेल अशा बोलीभाषेत उपदेश केला.
त्यांनी साठ वर्षे सतत वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन महाराष्ट्रभर संत वाङमयाचा प्रचार, प्रसार व समाजप्रबोधन हे कार्य केले.
त्यांच्या निस्पृह कार्याची कृतज्ञता म्हणून भाविकांनी नाशिकरोड या ठिकाणी महाराष्ट्राचे विधानसभेचे माजी सभापती बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते १९९३ साली एकसष्टी कार्यगौरव साजरा केला. रामगिरी महाराज यांचे पुत्र पांडुरंगगिरी महाराज पुढे त्यांना सामील झाले. ते पितापुत्र समाज प्रबोधनासाठी व माणसाच्या मनाची मशागत व्हावी म्हणून अखंड हरिनाम सप्ताहाचे उपक्रम राबवत आले आहेत.
बाबांनी ३१ डिसेंबर २००३ ला आत्मचिंतन करत सर्वांचा निरोप घेतला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मेघराजानेही अवकाळी हजेरी लावली. वावीसारख्या दुष्काळी गावात जेथे पावसाळ्यात पाऊस येत नाही. तेथे जणू काही अवकाळी मेघराजाचे दुःखाश्रू कोसळले.
– पुनम कैलास गोसावी
(‘लोक परंपरेचे’ या पुस्तकामधील लेख, सुधारित स्वरूपात)
Last Updated On – 28th August 2016
Khoop chan….
Khoop chan….