शासनाने लाखो रुपयांची यंत्रणा त्या ठिकाणी कार्यान्वित केलेली आहे. त्यांच्या देखभालीसाठी व निगराणीसाठी सध्या खलाशी म्हणून नानासाहेब पारवे यांना तेथे नेमण्यांत आलेले आहे. केंद्रामार्फत कोपरगांव तालुक्यातील हवामानविषयक नोंदी दररोज सकाळी व संध्याकाळी घेण्यात येतात. केंद्रावर बाष्पीभवन, स्वयंचलित पर्जन्यमान, साधे पर्जन्यमान, तापमान, आर्द्रतादर्शक, वायुवेग मापन, वायू दिशादर्शक, सूर्यप्रखरता मापक, तापमान मोजमाप करणारी अशी विविध यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. केंद्रामार्फत हवामानविषयक अहवाल दर महिन्याला नाशिक येथे जलसंपदा विभागाला कळवला जातो.
केंद्राजवळ गोदावरी नदीकाठी पाण्याची घनता व पूर प्रवाहाचा वेग मोजण्यासाठी डिझेल इंजिनवर चालणांरा रोप-वे च्या धर्तीवर पाळणा उभारण्यात आलेला आहे. गोदावरी नदीला जेव्हा पाणी येते तेव्हा नदीतील पाण्याची उंची, प्रवाहाचा वेग आदी मोजमापे तेथील यंत्रणेद्वारे घेतली जातात. केंद्रावर विसर्गमापन (हंगामी), तसेच हवामानविषयक नोंदी बारमाही घेतल्या जातात.
कोपरगांव तालुक्यातील जेऊरकुंभारी येथे अशा प्रकारचे हवामान केंद्र कार्यरत असताना देखील त्या परिसरातील नागरिकांना त्याची फारशी माहिती नाही. हवामान केंद्राची सर्व यंत्रणा तेथील एकमेव कर्मचारी नानासाहेब पारवे हे पाहतात. कार्यालयात संपर्क यंत्रणा नाही. बरीचशी यंत्रणा व टॉवर गंजले गेले आहेत. कोपरगांव संगमनेर रस्त्यावर असलेल्या हवामान खात्याच्या फलकाची दुरवस्था झालेली आहे.
या परिसरातील पाणी, हवामान यांचा अभ्यास झाल्यास त्याच्या अनेक गोष्टींचा येथील शेतक-यांना फायदा होऊ शकतो. शाळा-महाविद्यालयांनी तेथे भेटी देऊन माहिती घेतल्यास त्यांच्या ज्ञानात भर पडेल. तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. त्याची माहिती अवगत करण्यासाठी कौशल्य पणाला लावावे लागते. सन २००६ च्या ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान जो महापूर आला त्याची व्यापकता या हवामान केंद्राने अनुभवली आहे. तालुक्यातील हवामान, वा-याची दिशा, वेग आदि येथे तंतोतंत समजत असले तरी दुर्लक्षामुळे हवामान केंद्राच्या पदरी उपेक्षाच पडली आहे.
– महेश जोशी
(‘असे होते कोपरगांव’मधून उद्धृत)