वाचन कसे आणि का शिकायचे?

1
172

मूल शाळेत येते पण शिकत नाही यास पालक निश्चितच जबाबदार नाहीत. शिक्षणव्यवस्थेने मुलांच्या शिकण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे शिक्षणव्यवस्था मुलांच्या शिकण्या-न शिकण्यास जबाबदार आहे. मूल नॉर्मल दिसते, शाळेतही रोज येते, मात्र शिकत नाही किंवा त्याला शिकवू लागल्यास समजत नाही, ते इतर मुलांसारखे शाळेचा अभ्यास करत नाही, शाळेत दोन-चार वर्षांपासून येते पण त्याला अजून वाचता-लिहिता येत नाही- याचा अर्थ त्या मुलाच्या शिकण्यात दोष असेल असे नसून मुलाला समजून घेण्यात दोष असू शकतो हे लक्षात घ्यावे. मूळ समस्या वाचता-लिहिता न येणे ही नाही. समस्या मुलांना व्यक्त होता येत नाही ही आहे. सर्वसामान्य दिसणारे एक मूल, घरी सर्व काही बोलते मात्र शाळेत बोलत नाही, सर्वसामान्य दिसणारे एक मूल आजुबाजूच्या व्यक्तींना ओळखते, सर्वसामान्य क्रिया करते, खेळांमध्ये वगैरे भाग घेते आणि तरीपण त्यास वाचन-लेखन शिकण्यात अडचण येते. असे जर होत असेल तर मुलाचा (मुलगा आणि मुलगी दोन्हींसाठी हा शब्द वापरला आहे) आय क्यू तपासण्याऐवजी त्याला शिकवणाऱ्यांचे कोठे चुकत आहे का ते तपासून बघावे.

मला शिक्षक विचारतात, की त्यांच्या वर्गामध्ये अशी मुले आहेत की ज्यांना कितीही वेळा एकच गोष्ट सांगितली तरी, ती त्यांच्या लक्षात राहत नाही. अशा मुलांसाठी काय करावे?

एक शिक्षक म्हणाले, “माझ्या वर्गात एक मुलगा आहे. त्याला कितीही सांगितले तरी तो विसरून जातो. मी त्याला ‘अजय घर बघ’ हे वाक्य वाचून दाखवले तर तो ते तेवढ्यापुरते म्हणतो, मग थोड्या वेळाने विचारले तर तो ते वाचू शकत नाही. त्याला ते एकच वाक्य पानभर लिहिण्यास सांगितले तर तो ते लिहितो, पण काय लिहिले आहे हे तो विसरून जातो! काय उपाय करू?”
मी त्यांना विचारले, त्या मुलाला/मुलीला आजूबाजूच्या माणसांची, प्राण्यांची, झाडांची, वस्तूंची ओळख आहे का? त्यांनी ‘हो’ असे उत्तर दिले. मग मी विचारले, ते त्यांच्या दैनदिन उपयोगात येणाऱ्या वस्तूंचा वापर योग्य करतात का? ते ‘हो’ म्हणाले. मी पुढे विचारले, ते नॉर्मल बोलतात का? ते ‘हो’ म्हणाले. मी विचारले, मग अडचण कोठे आहे? ते म्हणाले, “त्याला शिकवलेले आहे त्याची त्याला आठवण राहत नाही.”

मी त्या मुलाला इतक्या साऱ्या माणसांचे चेहरे आठवत आहेत, त्यांची नावे आठवत आहेत, घरातील वस्तू – ताट, वाटी, ग्लास, कप, चटई, टेबल, खुर्ची, बेड, चादर, उशी, गाय, बैल, कुत्रा, मांजर, अगदी चित्रात पाहिलेले वाघ, सिंहही आठवत आहेत. मग त्या पन्नास अक्षरांचीच आठवण कशी काय राहत नाही? माझ्या या प्रश्नावर मला उत्तर सहसा कोणाच शिक्षकाकडून मिळत नाही. मग मी पुढे सांगते, त्याला जे काही माहीत आहे ते त्याने प्रत्यक्ष पाहिले व अनुभवलेले आहे. तो घरातील माणसांची नावे व त्यांचे चेहरे ओळखतो. कारण त्याने ते प्रत्यक्ष पाहिलेले आहेत व तो त्यांच्यासोबत वावरलेला आहे. तो घरातील, परिसरातील वस्तू ओळखतो, कारण त्याने त्या प्रत्यक्ष पाहिल्या आहेत व त्याने त्यांच्याशी आंतरक्रिया केलेल्या आहेत. त्याने त्या नुसत्या प्रत्यक्ष पाहिल्या म्हणून आठवत नाही आहेत; तर ती माणसे त्याच्यावर प्रेमही करत आहेत. त्याने त्या वस्तू नुसत्या पाहिल्या म्हणून नाही तर त्यांची ओळख झाली, त्या वस्तूंची नावे त्याच्यासोबत राहणाऱ्यांनी त्याला ती माहीत व्हावीत म्हणून प्रेमाने, कौतुकाने सांगितली व ती आजुबाजूची माणसे त्या वस्तूंचा वापर सातत्याने करतात म्हणून त्या बाळाला त्यांची नावे व आकार, रंग, रूप माहीत आहेत. म्हणून तो त्या साऱ्या ओळखतो. तो त्या वस्तू, नावे, चेहरे ओळखू लागल्यावर त्याच्यासोबतची माणसे त्याचे कौतुक करतात व त्यामुळे, मूल त्याला हुरूप येऊन इतर गोष्टी आणखी वेगाने शिकते.

शिक्षकबंधूंनी मुलाला जे ‘अजय घर बघ’ असे पानभर लिहिण्यास नि वाचण्यास सांगितले. त्या वाक्याशी त्याच्या भावना कोठे जुळलेल्या आहेत? मग ज्यात मुलाच्या भावना जुळलेल्या नाहीत अशी गोष्ट आठवण म्हणून त्याच्या मनात राहवी असा शिक्षकबंधूंनी अट्टाहास का धरावा? त्यापेक्षा त्या मुलाच्या विश्वात शिरून त्याला काय आवडते, त्याचा आनंद कशात आहे ते जाणून घेऊन, त्याच्याशी अनौपचारिक संवाद साधून तो जे बोलतो तेच त्याला लिहून द्यावे. तेच वाचून दाखवावे. त्यामुळे त्याला आनंद होईल. त्याला हे कळेल, की जे बोलले जाते तेच लिहिले जाते. त्याने बोललेले वाक्य जर शिक्षकाने त्याला लिहून दिले तर तो ते विसरेल का? माझा अनुभव असा आहे, की  शिक्षकांकडून या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे येते.

ज्ञानरचनावादात आधीच्या ज्ञानावर आधारित पुढील ज्ञान मुलाने स्वतः तयार करणे किंवा जाणून घेणे म्हणजे आधीच्या ज्ञानाचा आधार घेऊन पुढील ज्ञान स्वत: मेंदूत तयार होणे ही प्रक्रिया घडते. समजा, शिक्षकाने मुलाने वाचन शिकावे या उद्देशाने ‘अजय घर बघ’ हे वाक्य किंवा तत्सम इतर वाक्य शाळेत पहिल्या वर्गात दाखल झालेल्या मुलाला प्रेमाने जरी वाचून दाखवले; कार्डांवर लिहून, त्याची योग्य ती रचना करून, विविध खेळ घेऊन जरी वाचून दाखवले; तरी ते मूल ‘अक्षरवाचन किंवा शब्द्ववाचन’ या कौशल्याशी तोपर्यंत अपरिचित आहे, त्यामुळे त्याच्या आधीच्या ज्ञानाचा संबंध तेथे जोडला जात नाही. कारण ते वाक्य त्याच्यासाठी परके असते. त्यामुळे त्याला त्या वाक्याची आठवण राहत नाही. परंतु मुलाने ज्या गप्पा शिक्षकाशी केल्या त्यांतील एखादे वाक्य मुलाच्या पाटीवर, वहीत लिहून दिले तर ज्ञानरचनावाद कसा काम करतो ते कळून येईल, की त्या मुलाला बोलण्याचे कौशल्य प्राप्त झालेले असेल, त्याच्याजवळ काही शब्दसंपत्ती आहे, त्याला वाक्यरचना करण्याचे कौशल्य प्राप्त झाले आहे! म्हणजे ती कौशल्ये, ज्ञान त्याच्यापाशी आहे! आता, त्याच्यापाशी असलेल्या त्या ज्ञानाला आणखी पुढे नेण्यासाठी त्याच्यासोबत त्याच्यापेक्षा थोड्या अधिक गोष्टी, माहिती, कौशल्ये माहीत असलेली एक व्यक्ती शिक्षक म्हणून त्याच्यासोबत आहे. त्या शिक्षकाचे काम हे आहे, की त्याने बोलण्याचे जे कौशल्य प्राप्त केले आहे त्या कौशल्याच्या आधाराने ते बालक त्यापुढील ‘वाचन’ हे कौशल्य शिकणार आहे. शिक्षक एक अभिभावक म्हणून, सुलभक म्हणून त्याच्या सोबत आहे. त्याने बोललेलेच वाक्य शिक्षकाने त्याच्यासमोर त्याला लिहून दिले तर त्याला हे कळते, की हे जे काही लिहिले गेले आहे ते त्याच्याकडूनच घेतले गेले आहे. ते त्याचेच आहे. त्याने बोललेले, म्हटलेले ते वाक्य असल्यामुळे ते त्याच्या लक्षात राहते व ते तो सहजतेने वाचतो. तो ते वाक्य विसरत नाही. वाचताना अक्षरांचा परिचय होत जातो. त्याने वाचल्यानंतर त्याचे कौतुक केले, की त्याला प्रेरणा मिळते व तो पुन्हा नवे वाचून पाहण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी मूल त्याच्या शिक्षकांना पुन्हा नवे वाक्य सांगतो व लिहून मागतो आणि मग ते वाचण्याचा सराव करतो. अशा रीतीने त्याचा वाचन या कौशल्याशी सहजपणे परिचय होतो व ते त्याला आवडू लागते. हाच ज्ञानरचनावाद आहे. साहित्य, खेळ, साधनांसहितचे खेळ, विशिष्ट आकृत्यांची रचना करून वाचनाचे खेळ खेळणे, शब्दकार्डे, अक्षरकार्डे, वाक्यकार्डे, पुस्तके ही सगळी वाचन शिकण्यास सहाय्यक ठरणारी साधने आहेत.

अभिव्यक्ती ही माणसाची मूलभूत गरज आहे. म्हणून ज्ञानारचनावादाची पहिली पायरी देखील ‘अभिव्यक्ती’ हीच आहे. मूल शिक्षकाशी गप्पा मारते तेव्हा ते अभिव्यक्त होत असते. मूल त्याच्या शिक्षकासोबत कितीतरी गोष्टी त्यावेळी शेअर करत असते, मुले अभिव्यक्तीला वाव न मिळाल्यास कोमेजतात व अभ्यासात मागे पडतात. काही मुले धीट असतात किंवा दुसऱ्यांशी पटकन संवाद साधणारी असतात. म्हणून मग तशी मुले शिक्षकाचे शिकवणे लवकर आत्मसात करताना दिसतात. काही मुले बुजरी किंवा लाजरी असतात. त्यांनाही त्याच्या शिक्षकांशी, इतरांशी बोलण्याची इच्छा असते, पण ती त्यांच्या स्वभावामुळे ती इतरांशी पटकन संलग्न होत नाहीत. त्यांच्या मनात काही विचारप्रक्रिया सुरू असतात. त्यामुळे त्यांचे लक्ष शिक्षक काय बोलत आहेत याकडे नसते व ती शिक्षकाने सांगितलेली गोष्ट करू शकत नाहीत. तशी मुले शिक्षकांना समस्याप्रधान वाटतात व मग शिक्षकांचा दृष्टिकोन त्या मुलांकडे पाहण्याचा बदलून जातो. तशी मुले अध्ययनअक्षम किंवा गतिमंद वाटू लागतात.

मुले विविध माध्यमातून अभिव्यक्त होऊ पाहतात – बोलण्यातून, कृतीतून, कलेतून, खेळातून. मुलांना तशा प्रत्येक माध्यमातून व्यक्त होऊ द्यावे. मुलांचे बोलणे उत्साहाने, आस्थेने, हावभावांसह ऐकून घ्यावे. त्याला प्रतिसाद द्यावा. त्यांपैकी चित्र काढणे हे अभिव्यक्ती माध्यम सर्व मुलांचे आवडते आहे. म्हणून मुलांना मनसोक्त चित्रे काढू द्यावीत. मुलांच्या मनात विविध गोष्टी, कल्पना, विचार असतात. त्या गोष्टी, विचार, कल्पना ते चित्राच्या माध्यमातून व्यक्त करत असतात.

मुलांना शाळेत मोकळीक हवी असते. नुसतीच मोकळीक असून चालत नाही; तर मुलांना चित्रे काढण्याचे साहित्यदेखील – कागद, पेन्सिल, रंग – सहजपणे उपलब्ध झाले पाहिजे. चित्रे काढण्यासाठी वर्गात मुलांना भिंतीवर जागा असायला हवी. मुलाच्या मनात चित्र काढण्याची इच्छा झाली तेव्हा चित्र काढण्याची संधी मिळायला हवी. मुलांचे कल्पनाविश्व चित्रे काढण्यामुळे विस्तारत जाते; रंगांचे, रंगसंगतीचे ज्ञान वाढत जाते. मूल त्याने काढलेले चित्र त्याच्या शिक्षकाला समजावून सांगते. मुले त्या चित्राची गोष्टही तयार करतात. मुले त्या चित्रासंदर्भात जे काही सांगतात किंवा बोलतात ते शिक्षकाने त्या चित्राजवळ लिहून द्यावे. मूल ते सहजपणे वाचते, कारण ती त्याचीच निर्मिती असते. अशा प्रकारे मूल सहजपणे आणि आशयपूर्ण वाचन करू लागते. शिक्षकाने मुलांना अक्षर आणि स्वरचिन्ह यांचा परिचय त्याच प्रवासात अलगदपणे समोर मांडायचा असतो.

चित्रे काढल्यामुळे मुलांना पेन्सिलवर पकड मिळवणे, स्नायू मजबूत होणे, हात हवा तसा फिरवता येणे या सर्व गोष्टी साध्य होतात. मुलांना आपोआपच सर्व प्रकारच्या रेषा व गोल काढणे जमू लागते. शिक्षकाने चित्रे काढण्यासाठी मुलांना वेगवेगळी माध्यमे उपलब्ध करून द्यावीत – वाळूत चित्रे काढणे, जमिनीवर बोटाने किंवा काडीने चित्रे काढणे, रांगोळीने चित्र काढणे वगैरे…
मुलांना साचेबद्ध चित्रांमध्ये अडकवू नये, अमकेच चित्र काढ असे सांगू नये. मुलांना चित्रे मुक्तपणे काढू द्यावीत. मुले त्यांच्या कल्पना, भावना चित्रांतून व्यक्त करतात. त्यांना ते करू द्यावे. शिक्षकांनी मुलांनी काढलेल्या चित्रांबद्दल त्यांच्याशी बोलावे, चित्रात काय काढले आहे हे त्यांच्याकडून जाणून घ्यावे व ते त्या चित्राजवळ लिहावे. मुले चित्रांच्या गोष्टी तयार करतात, तर कधी गोष्ट ऐकून त्यानुरूप चित्रे काढतात. मुलांच्या गोष्टींची व चित्रांची हस्तलिखिते बनवावीत. ती मुलांना वाचून दाखवावीत. मुलांसाठी ते परिणामकारक वाचन साहित्य बनते. मुलांना ते वाचण्यास आवडू लागते. कारण त्यातील चित्रे, गोष्टी, वर्णने त्यांचे स्वतःचे असते. ते त्यांच्या परिचयाचे असते, त्यामुळे मुलांना ते लवकर वाचता येते. मुले त्यातील शब्द, वाक्ये विसरत नाहीत. त्यातूनच त्यांना लिपीपरिचय होत जातो. मुलांना तो/ती जे बोलतो/ते, जे करतो/ते ते लिहिता येते ही गोष्ट कळत जाते. त्यातून अनेक गोष्टी साध्य होतात. मुख्य गोष्ट घडून येते ती म्हणजे, मुलांना अभिव्यक्त होता येते व वाचणे आणि लिहिणे शिकणे ही गोष्ट कष्टमुक्त होते, आनंदमयी होते. अभिव्यक्त होता येणे हे मानवी जिवाच्या विकासप्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचे असते.

मुलांनी वाचायला शिकावे असे वाटत असेल तर त्याला त्याच्या आजुबाजूला वाचन दिसण्यास हवे. वाचनाचे नमुने त्याच्यासमोर सादर व्हावेत. मुलांना वाचून दाखवणे फार महत्त्वाचे आहे. मूल सहजपणे बोलण्यास शिकते, कारण ते जन्मल्यापासून त्याच्या आजुबाजूला माणसे बोलत असतात, त्याच्याशी बोलत असतात. तेव्हा ते मूल सुरुवातीला बोलणाऱ्याकडे बघतही नसते. नंतर बघू लागते, पण म्हणून काही ते त्याच्यासोबत लगेच संवाद साधत नाही आणि म्हणून त्याचे आप्तस्वकीय काही त्याच्यावर नाराज होत नाहीत किंवा असेही म्हणत नाहीत, की आम्ही एवढे बोलत आहोत, पण हे मूल अजून बोलत नाही. कारण त्यांना माहीत असते, की ते बोलणार आहे! बोलणे ही गोष्ट दैनंदिन जीवन जगताना अपरिहार्य आहे. मात्र वाचन ही गोष्ट अपरिहार्य नाही, म्हणून ती मुद्दामहून मुलांसमोर आणावी लागते. त्यांना आवडेल, त्यांच्या भावविश्वाशी जुळेल, त्यांच्या परिसराशी जुळेल, ज्यात मजकुराशी संबधित भरपूर चित्रे असतील ती चित्रे लिखित मजकुराचा अर्थ लावण्यास सहाय्यभूत होत असतील असे साहित्य मुलांना वाचून दाखवावे. ओघवते, प्रभावी कसे वाचावे, वाचताना कोठे थांबावे, वाचनाचा अर्थ कसा लावावा-वाचल्यानंतर विचार करावा या सर्व गोष्टी मुलांना कळायच्या असतील तर शिक्षकाने मुलांसमोर वाचण्यास हवे.

वाचनातील चढउतार, आरोह-अवरोह मुलांना दिसण्यास हवेत. त्यामुळे शिक्षकांनी मुलांसमोर वाचण्यास हवे. शिक्षक वाचत असताना मुले त्यांच्या समोर असलीच पाहिजे असा आग्रहदेखील प्रत्येक वेळी धरू नये. मुले फार काळ एका गोष्टीकडे अवधान ठेवू शकत नाहीत. शिक्षकाने स्वतःसाठीदेखील अधुनमधून वाचत बसावे. मुलांना ते दिसते व त्यामुळे ‘वाचायचे’ असते हे मुलांना समजू लागते. हे असे एकट्याने वाचत असताना कधी प्रकट वाचावे. मुले खेळत असतील तरी त्यांचे लक्ष शिक्षकाकडे असते. कधी मूकवाचन करावे त्यामुळे मुले मूकवाचन या गोष्टीशी परिचित होतात. मुलांचा लिखित साहित्याशी परिचय वर्गात चालणाऱ्या अशा या सर्व व्यवहारातून होत जातो. लिखित साहित्य त्याला खुणावू लागते. मूल त्याकडे आकर्षित होते; स्वतः पुस्तक धरून ते अवलोकू लागते. पुस्तकातील चित्रे बघून त्याला गोष्टीची कल्पना येऊ लागते. शिक्षकाने वाचून दाखवलेली गोष्ट त्याला आठवू लागते. त्याला स्वतःला ते वाचण्याची प्रेरणा होऊ लागते व त्या प्रेरणेतून ‘वाचन’ करणे ही त्याची गरज बनते; मग ते अक्षर, स्वरचिन्हे माहीत करून घेण्याकडे लक्ष देऊ लागते. मुले स्वतः अशी वाचनासाठी प्रेरित झाल्यामुळे वाचन ही त्यांची गरज बनते व वाचनाची प्रक्रिया आनंददायी बनते.

वाचणे व लिहिणे अभिव्यक्त होत होत शिकणे, वाचनाचा आनंद लुटत शिकणे, विचार-कल्पना करत करत शिकणे हे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी मुलाला दोन वर्षें लागली तरी त्याबद्दल शिक्षकाने न्यून बाळगण्याचे कारण नाही. कारण मुलांना लिपीवाचन शिकवायचे नाही; तर मानवाच्या व विश्वाच्या अखिल जीवनात चालणाऱ्या क्रियाकलापांविषयी व त्या क्रियाकलापांचे अर्थ, त्यामागील विचार, प्रेरणा, त्यानुसार वाचकाच्या मनात निर्माण होणाऱ्या भावना, त्यानुरूप घेण्याचे निर्णय हे त्या साहित्यातून समजून घेण्यास शिकवायचे आहे. मुलाला वाचल्यानंतर त्याचा अर्थ समजून घेता येण्यास हवा, त्यावर विचार करता येण्यास हवा, योग्य-अयोग्य असा निर्णय घेता येण्यास हवा. वाचलेल्या साहित्याचा त्याचे वैयक्तिक व सामाजिक जीवन समृद्ध करण्यासाठी, अधिक प्रगत करण्यासाठी लाभ घेता येण्यास हवा. सामुदायिक जीवनातदेखील वाचून-समजून निर्णय घेता येण्यास हवे. उदाहरणार्थ, त्याला ‘नो पार्किंग’चा बोर्ड वाचल्यानंतर तेथे गाडी लावायची नाही हा निर्णय घेता येण्यास हवा. ‘ येथे थुंकू नये’ अशी पाटी वाचल्यानंतर तेथे न थुंकण्याची भावना त्याच्या मनात येण्यास हवी. तिरका क्रॉस काढलेल्या हॉर्नची खुण बघून तो भाग हॉर्न वाजवण्यास मज्जाव असलेला आहे हे कळण्यास हवे आणि हे सगळे समजायचे तर शिक्षकांनी वाचन शिकण्याची सखोल प्रक्रिया समजून घेण्यास हवी.  

– वैशाली गेडाम, 8408907701, gedam.vai@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. अप्रतिम लेख,विद्यार्थांच्या…
    अप्रतिम लेख,विद्यार्थांच्या वाचन विकासास प्रेरक

Comments are closed.