वाघबारस – आदिवासींचे जीवन होते पावन!

0
301
_waghbaras_san

दिवाळी सणाची सुरुवात ‘वसुबारस’ या दिवसापासून होते. परंतु आदिवासी भागात दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे ‘वाघबारस’. आदिवासींच्या जीवनात त्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. तो त्यांनी वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा मोठा दिवस असतो. अकोले तालुक्याच्या अतिदुर्गम भागात तर ‘वाघबारस’ साजरी करण्याची परंपरा अनोखी आहे. आदिवासी बांधवांनी ती जपलीही नेकीने आहे.

अकोले तालुक्यातील अनेक गावांत, वाड्या-वस्त्यांवर वाघोबाची मंदिरे आहेत. आदिवासी बांधव वाघाला देव मानतात. गावच्या वेशीवर वाघ्याच्या मंदिरात जाऊन पूजा केली जाते. तेथे सर्वजण एकत्र येऊन नवसपूर्ती करतात. जंगलातील हिंस्र प्राण्यापासून पाळीव प्राण्यांचे गाईगुरांचे रक्षण व्हावे, यासाठी कोंबडा, बोकड यांचा नैवैद्य दाखवला जातो. काही भागात डांगर, तांदळाची खीर यांचाही नैवद्य दाखवला जातो.

अन्य आदिवासी भागांतही काही ठिकाणी वाघदेवाची मंदिरेही आहेत. सह्याद्रीतील घाटरस्त्यांना वाघोबाच्या मूर्ती व ओट्यांवर असलेली मंदिरे पाहण्यास मिळतात. वाघोबाची मंदिरे जुन्नरला तळमाची येथे, ठाणे-इगतपुरी-आंबेगाव तालुक्यात पोखरीजवळ वैदवाडी येथे आहेत. काही ठिकाणी लाकडावर वाघाच्या चित्राचे कोरीव काम करून, त्यावर शेंदूर लावून ती चित्रे ठेवलेली आढळतात.

‘वाघबारस’ अकोले तालुक्यात पिंपरकणे, बिताका, शेणीत, खिरविरे, रतनवाडी, घाटघर, हरिचंद्रगड पायथा, पेठ्याचीवाडी, देवगाव, म्हैसवळण घाटात, झुल्याची सोंड भागात साजरी होत असते. पेठेच्या वाडीजवळील भैरवनाथाच्या कलाड गडावर गावकरी जातात. तेथे प्रत्येकाचा अथवा कुटुंबाचा एक कोंबडा कापून नैवेद्य दाखवला जातो. पाचनईजवळ कोड्याच्या कुंडातील झऱ्याजवळही तशाच पद्धतीने ‘वाघबारस’ साजरी होते.

_waghbaras‘वाघबारसे’च्या दिवशी तेथील प्रत्येक घरातून अथवा कुटुंबातून वाघाला एक कोंबडा नैवेद्य म्हणून बळी द्यावा लागतो. कबूल केलेला कोंबडा दिला नाही, तर वाघ रात्रीच्या वेळी घरी येऊन कोंबडा पळवतो अशी समजूत. त्याचबरोबर कुटुंबातील कोणाही व्यक्तीने वाघाच्या बनातून लाकूडफाटा आणला, तर त्याला वाघोबा काहीतरी शिक्षा म्हणून त्याच्या दारात येऊन गुरगुरतो किंवा त्याच्या पाळीव प्राण्यावर हल्ला करतो, अशा कथा जुन्याजाणत्या लोकांकडून ऐकण्यास मिळतात.

वाघबारसला गुराखी प्रत्येक घरातून तांदूळ, गूळ व थोडे पैसे गोळा करून संध्याकाळी गावातील सर्व गुरे वाघोबाच्या मंदिराजवळ एकत्र आणतात. त्या ठिकाणी गावातील प्रमुख जाणकार मंडळी, मुले, मुली एकत्र येतात. वाघोबाच्या मंदिराच्या संपूर्ण परिसरात गाईच्या शेणाचा सडा व गोमूत्र शिंपडून जागा पवित्र केली जाते. रांगोळी घातली जाते. फुलांच्या माळा लावल्या जातात. देवांना शेंदूर फासला जातो. गावातील मारुतीच्या व गावदेवाच्या देवळासमोर शेकोटी पेटवली जाते. गुराखी मुले, काहीजण अस्वल तर काहीजण कोल्हा अशी रूपे घेऊन खेळ खेळतात. त्यात एखाद्याला वाघ बनवले जाते. त्या वाघाला पळण्यास लावून ‘आमच्या शिवारी येशील का?’ असे विचारले जाते. वाघ झालेला गुराखी ‘नाही नाही’ म्हणत पुढे पळतो. असा खेळ खेळला जातो.

आदिवासी वाघोबा बसवलेल्या ठिकाणी जाऊन त्याच्या समोर कोड्या लावतात. नारळ फोडून पूजा करत देवाच्या पाया पडून आराधना करतात. ‘आमचे, गव्हाऱ्यांचे, गोरा – ढोरानचे खाडया, जनावरांपासून रक्षण कर, आम्हाला चांगले पीक दे, आजारांना दूर ठेव’ असे मागणे मागितले जाते.

रात्री व पहाटे एकाच्या हातात दिवा व त्याच्या बाजूने मोराची पिसे व झेंडूच्या फुलांची सजावट केलेली असते. रात्रीच्या व पहाटेच्या मंगलमयी वातावरणात ते सर्व बांधव तालासुरात “दिन दिन दिवाळी, गाय म्हशी ओवाळी, गायी-म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या”! अशी गीते वेगवेगळ्या तालात म्हणून प्रत्येकाच्या घरी जाऊन सण मागतात.

_waghbars2सायंकाळी घरच्या गोठ्याच्या बाहेरही रांगोळी काढली जाते. तेलाचा किवा तुपाचा दिवा लावला जातो. सर्व प्राण्यांची पूजा केली जाते. त्यांना गोडधोडाचा नैवद्य खाऊ घातला जातो. आदिवासी तरुण व तरुणी रंगेबीरंगी कपडे घालून, एकत्र जमून तारपकऱ्याच्या तालावर नाचण्यासाठी त्यांच्या वाडीवस्तीत निघतात. ते त्यांच्या परिसरात बेधुंद नाचतात. तारपकरी त्याच्या तारप्यावर वेगवेगळी चाली वाजवून मजा आणतो. प्रत्येक चालीचा नाच वेगवेगळा असतो. त्या चाली वेगवेगळया नावाने परिचित आहेत. मोराचा = मुऱ्हा चाली, बदक्या चाली, लावरी चाली बायांची, देवांची, रानोडी, टाळ्यांची, नवरदेवाची चाल अशा प्रकारच्या चाली असतात.

कालौघात ‘वाघबारस’ ही प्रथा नैवेद्यापुरती मर्यादित राहण्यासारखी परिस्थिती आहे. कारण आता, निसर्गातच वाघ संपले आहेत; आणि त्यासोबतच त्यांची… भीतीही संपली.

– रवि ठोबांडे 8390607203 thombade.ravi@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here