वसईतील मराठी ख्रिस्ती विवाह-विधी (Weddings of Marathi Christians in Vasai)

1
209

करवली) यांच्या साक्षीने धर्मगुरू चर्चमध्ये विवाह लावतात

नाताळचा सण येऊन गेला, की वसईच्या ख्रिस्ती समाजात लग्नाचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे शहरभर जल्लोषाचे नि उत्साहाचे वातावरण असते. तो उत्साह 2020साली कोरोनाचे सावट असल्याने झाकोळून गेला. उत्तर वसईत कादोडी बोलीभाषा बोलणारा सामवेदी बोली असलेला कुपारीख्रिस्ती समाज राहतो. त्या समाजाच्या नंदाखाल, आगाशी, नानभाट, निर्मळ, गास, भुईगाव येथे छोट्यामोठ्या वस्त्या आहेत. त्यांची एकूण लोकसंख्या पन्नास हजार असावी.

वसईतीलख्रिस्ती लग्ने आरंभी हिंदू संस्कृतीनुसार होत. उदाहरणार्थ, अंगाला हळद लावून नियोजित वधू-वरांना आंघोळ घालणे, आंब्याच्या पानांची तोरणे नि केळीची रोपे वापरून मंडप सजवणे इत्यादी. पण त्या प्रथा बंद झाल्या. आधुनिक पद्धतींनी नव्या जमान्यात शिरकाव केला आहे. नियोजित वधू-वरांना लग्नाआधी त्यांच्या विवाहाची धर्मग्रामातील धर्मगुरूकडे नोंदणी करावी लागते. धर्मगुरूविवाहविधीच्या महिनाभर आधी सतत तीन रविवारी, पवित्र मिस्साबळीवर त्या नियोजित विवाहाची घोषणा करतात आणि त्या विवाहाला समाजातील भाविकांचा विरोध नाही ना याची खात्री करून घेतात. लग्न नात्यात होत असल्यास तेही धर्मगुरूंच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन ते करतात. त्यास चिठ्ठी पडणेअसे म्हणतात. म्हणजे नियोजित विवाहास धर्मगुरूंची मान्यता मिळाली असे होते. मग नियोजित वधू-वरांना विवाहपूर्व मार्गदर्शन शिबिराला हजर राहून तसा दाखला घ्यावा लागतो.

आयेसहाडी-चोळी’ भेट

 

            विवाहसोहळा तीन दिवस चालतो. लग्न साधारणत: रविवारी असते. मांडव शुक्रवारी सकाळी घरासमोर उभा होतो. कुटुंबीय आणि जवळचे आप्त नि मित्र लग्नघरी शनिवारी गोळा होतात. त्या सायंकाळी मांडवात बँड वाजत असतो व नाचगाण्यांची धमाल सुरू असते. त्याच दिवशी, दुपारनंतर तीन मुख्य कार्यक्रम पार पडतात. वराच्या घरून त्याचे मामा, मावशे मुलीच्या घरी आयेस’ (वधूसाठी केलेले दागिने) घेऊन जातात. त्यानंतर सायंकाळी कार्यक्रम असतो साडी-चोळी’चा. वराच्या घरून पाहुणे नातेवाईक बँड वाजवत वरातीने त्यांच्या आजोळी जातात आणि वधूसाठी मामा-मामीने आणलेली खास साडी-चोळी घेऊन येतात. ते आल्यावर वराची मामाच्या मांडीवर बसवून मोयाकेला जातो. म्हणजेच आमंत्रित न्हावी घरची व जवळच्या नात्यातील पुरुषांची चकाचक दाढी करतो. तो मोठा गमतीजमतीचा मामला असतो.
नावळ (वरात)

 

          सुटाबुटातील नवरदेव त्याच्या बेस्टमनसह आणि नववधू वेडिंग गाऊन पेहरून तिच्या करवलीसह त्यांच्या त्यांच्या घरून रविवारी सकाळी वरातीने देवळात येतात. धर्मगुरू त्यांचा विवाह पवित्र मिस्साबळीच्या प्रार्थनेत भाविकांच्या साक्षीने लावतात. पुरोहित भाविकांच्या साक्षीने वधू-वराकडून एकनिष्ठ जगण्याची शपथ घेतात आणि जे देवाने जोडले आहे, ते माणसांनी तोडू नयेअसा आध्यात्मिक सल्ला देतात. वधू-वर एकमेकांना अंगठी त्यांच्या प्रेमाची साक्ष म्हणून घालतात; एकमेकांना सुखदु:खांत, आजारात साथ देण्याचे वचन देतात. मग रिसेप्शन असते. दोन्ही कुटुंबांकडून एकत्र वा वेगवेगळ्या जेवणावळी उठतात. वरात, फटाके, नाचगाणी असा धमालीचा उत्सव दिवसभर सुरू असतो. आप्त व गोतावळा यांच्यासाठी श्रमपरिहाराचा कार्यक्रम बर्‍याच ठिकाणी सोमवारच्या सकाळी असतो. लग्नाच्या दिवशी सायंकाळी वर वधूला वरातीत आणण्यासाठी तिच्या घरी जातो, तेव्हा वरातीच्या मागोमाग वधूकडील मंडळी तिचे कपड्यालत्त्याने भरलेले नवेकोरे लाकडी कपाट तिच्या सासरी आणतात. त्यातील बुजुर्ग मंडळी निरोप घेताना ‘नीरवनी’ करतात, म्हणजेच ‘आमच्या पोरीला सांभाळून घ्या’ अशी विनवणी करतात. आता तो प्रकार कालबाह्य होत आहे.

 

          सोयरीक पूर्वीच्या काळी जमवली जाई. मुलीच्या घरून निरोपजाई व संमती मिळाली, की दोन्हीकडील निवडक व्याही मंडळी एकत्र बसून त्या नात्यावर शिक्कामोर्तब करत. अलिकडच्या काळात अधिकतर लव्ह मॅरेज होतात आणि लग्ने एंगेजमेंट पार्ट्यांचे सोहळे होऊन त्यातही जमतात.

आयेस, मोवा, हाडीसोळी (साडीचोळी) या जुन्या पद्धती मध्यंतरी समाजधुरीणांनी बंद पाडल्या होत्या, कारण त्यामध्ये सक्ती, जबरदस्ती व लुबाडणूक होऊ लागली होती. पण त्या आता श्रीमंत, पैसेवाल्या व्यक्तींकडून उत्साहात, मजा करण्यासाठी उर्जित केल्या जात आहेत. मग सर्व समाज त्याचे हळुहळू अनुकरण करतो. आजकालच्या विवाह-सोहळ्यात इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. मात्र, काळ आणि वेळेचे भान ठेवून कानठळ्या बसवणार्‍या फटाक्यांना फाटा दिला जात आहे ही एक स्वागतार्ह बाब आहे. वधुवरांच्या घरी, मांडवात व वरातीत नृत्य असते. ते उत्स्फूर्त असते, कोठल्याही विशिष्ट पद्धतीने केले जात नाही. पूर्वी लग्नाच्या जेवणावळी त्यावेळच्या परिस्थितीनुसार भात, मटण व तेलात तळलेले वडे अशा असत. आता सर्व सोयी कॅटरर्स पाहतात. विवाह सोहळ्यात मद्यपान खाजगी स्वरूपाचे असते. पूर्वी बुजूर्गांना गावठी वाढली जाई. सध्याची तरुणाई गटागटाने इंग्लिश ढोसतात, अर्थात यजमानाच्या खर्चावर. हा विधी उत्तर वसईतील ख्रिस्ती लोकांचा आहे. दक्षिण वसईतील वाडवळ समाजात धार्मिक विधी हाच असतो पण काही विधी वेगळे असतात.

मिस्साबळी – चर्चमधील पवित्र वेदीवर होणारी सामूहिक प्रार्थना
श्रमपरिहार – लग्नसोहळ्यात सेवाकाम करणाऱ्या नातेवाईक व मित्र यांना कृतज्ञतेपोटी दिलेली मेजवानी.

टेलिग्राम

व्हॉट्सअॅप

फेसबुक

ट्विटर

जोसेफ तुस्कानो 98200 77836 haiku_joe_123@yahoo.co.in

जोसेफ तुस्कानो हे विज्ञान लेखक आहेत. ते ‘भारत पेट्रोलियम’ या राष्ट्रीय तेल कंपनीतून पश्चिम विभागाचे गुणवत्ता आश्वासन प्रबंधक म्हणून निवृत्त झाले. ते पर्यावरण आणि शिक्षण या संबंधित विषयांत कार्यरत आहेत. त्यांची विज्ञानातील नवे कोरे, विज्ञान आजचे आणि उद्याचे, आपले शास्त्रज्ञ, कुतूहलातून विज्ञान, ओळख पर्यावरणाची अशी अनेक पुस्तके प्रकाशित आहेत.   

—————————————————————————————————————————————————————–

 

———————————————————————————————————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

  1. लेख आवडला.कालमानानुसार बदल स्विकारायला हवे.रामदास स्वामी म्हणतात 'जनी वंद्य ते सेवाभावे करावे,जनी निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे'

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here