वसईचा टेहळणी बुरूज : हिरा डोंगरी (Vasai’s Hira Hill)

4
80

जोसेफ तुस्कानो यांच्या ‘गुणवत्ता आणि निसर्गमैत्री’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात (1996) उगवते नि मावळते संमेलनाध्यक्ष !

हिरा डोंगरी हा दक्षिण आणि उत्तर वसई यांना जोडणारा दुवा होय. ती शंभर-दीडशे फूट उंचीची टेकडी वसई तालुक्याच्या गिरीज आणि भुईगाव या दोन गावांच्यामध्ये उभी आहे. ते ठिकाण चिमाजी आप्पा यांनी सार्‍या वसईवर नजर ठेवण्यासाठी निवडले होते. ती गोष्ट इतिहासजमा झाली असली तरी तेथील उंचवट्यावरून सगळ्या वसईचे विहंगावलोकन करता येते. नायगावपासून विरारपर्यंतचा विविधरंगी भूप्रदेश डोंगरीच्या टोकावर असलेल्या दत्त मंदिरातून नजरेस पडतो. नजरेला मोहवणार्‍या हिरव्या वनराईसोबतच मन विषण्ण करणाऱ्या पिवळ्या इमारती जंगलाचे दर्शनदेखील तेथून होते!

 

दत्त मंदिर

 

काचेसारखे दगड

 

डोंगरीवर जरासे खणले, की काचेसारखे दगड सापडतात. त्यामुळे त्यास हिरा डोंगरी असे नाव पडले असावे. पेशव्यांनी त्याचा बुरूज म्हणून वापर केल्याने बुरूजगड हेही नाव त्या टेकडीला मिळाले आहे. तेथे पिंपळ, औदुंबर, कडुलिंब व करूच (Ghost Tree) असे वृक्ष आहेत. किंबहुना करुच वृक्ष हे त्या टेकडीचे वैशिष्ट्य आहे. तो वृक्ष फक्त डोंगरीवरच आढळतो. डोंगरी परिसरात विविध रानफुले मिळतात. दक्षिणेकडील पायऱ्यांवर गोगलगाईंचे प्राबल्य आहे. तो परिसर जैविक विविधतेने नटलेला आहे.

रानफुले

 

पूर्वी वसईत येणाऱ्या पाहुण्यांना फिरायला म्हणून हिरा डोंगरीवर नेले जाई. मला आठवते, खगोलशास्त्रज्ञजयंत नारळीकर सपत्नीक वसईभेटीला 1996 च्या ऑक्टोबर महिन्यात आले होते. डोंगरी चढताना मंगला नारळीकर यांना तेथील वनस्पतींचा वास लगेच जाणवला होता. त्यांना झाडाझुडुपांची बरीच जाण आहे. त्यांच्याकडून आम्हाला हिरा डोंगरीवरील पावसाळ्यात बहरलेल्या विविध तर्‍हेच्या झाडाझुडुपांची माहिती मिळाली होती. खरे तर, ते ठिकाण शास्त्रीय अभ्याससहलीचे स्थळ व्हायला हवे असा अभिप्राय मंगला नारळीकर यांनी व्यक्त केला होता. त्यावेळी ते वसईला माझ्या ‘गुणवत्ता आणि निसर्गमैत्री’ या पुस्तकाच्या प्रकाशना निमित्ताने आले होते.

जोसेफ तुस्कानो 98200 77836 haiku_joe_123@yahoo.co.in

जोसेफ तुस्कानो हे विज्ञान लेखक आहेत. ते भारत पेट्रोलियम या राष्ट्रीय तेल कंपनीतून पश्चिम विभागाचे गुणवत्ता आश्वासन प्रबंधक म्हणून निवृत्त झाले. ते पर्यावरण आणि शिक्षण या संबंधित विषयांत कार्यरत आहेत. त्यांची विज्ञानातील नवे कोरे, विज्ञान आजचे आणि उद्याचे, आपले शास्त्रज्ञ, कुतूहलातून विज्ञान, ओळख पर्यावरणाची अशी अनेक पुस्तके प्रकाशित आहेत.   

—————————————————————————————————————————————————————–

टेलिग्राम

व्हॉट्सअॅप

फेसबुक

ट्विटर

About Post Author

4 COMMENTS

  1. वाह.हे छायाचित्र मोलाचे आहेच पण आज त्याला वेगळेच मुली प्राप्त झालेय.खूप सुरेख.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here