वर्ष 2025 – अंधारातून प्रकाशाकडे

ज्योती शेट्ये या डोंबिवलीच्या कार्यकर्त्या जम्मू राज्यात जानेवारी 2022 पासून काम करत आहेत. त्या प्रथम ईशान्य राज्ये, नंतर अंदमान व आता गेली तीन वर्षे जम्मू या भागांत स्थानिक मुलांना शिकवण्यात मदत करत असतात. त्यांचा जम्मूचा मुक्काम अतिरेक्यांच्या सततच्या दडपणामुळे अस्वस्थ व असुरक्षित असतो. यावर्षी तर विशेषच. तशात पहलगाम घडले आणि त्यांना तो प्रदेश सोडून परत यावे लागले. त्यांनी त्या परतवारीची हकिगत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’साठी लिहिली आहे. या वर्षीच्या दिवाळीच्या प्रकाशामधील अंधार वाचकांना कसली कसली याद देत राहील !

मी जम्मू राज्यात जानेवारी 2022 पासून काम करत आहे. मी माझे स्वीकारलेले काम थोडे वेगळे आहे. मी जम्मूमध्ये एका स्थानिक कुटुंबात राहून मुलांच्या प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष देते. कधी, स्थानिक शाळांमध्येही शिकवते. मुलांना अभ्यासात रस निर्माण व्हावा म्हणून माझा प्रयत्न असतो. मी गेल्या तीन वर्षांत जम्मू राज्याच्या कठुआ, उधमपूर आणि भद्रवाह या तीन जिल्ह्यांच्या बनी, बसौली, रामनगर आणि बिलावर या तालुक्यांतील खेड्यांत काम केले आहे. मी या वर्षी मार्चमध्ये बिलावरमधील बदनोता या खेड्यामध्ये पोचले. तेव्हा अनुभवलेला प्रवास…

मला पठाणकोटकडे घेऊन जाण्यास गाडी संध्याकाळी पाच वाजता आली. त्यामुळे मी ज्या मुलांबरोबर खेळत होते, तो मुलांचा रंगत आलेला ‘लीडर लीडर’ हा खेळ मला थांबवावा लागला. त्यावेळी पाकिस्तानबरोबरच्या संभाव्य युद्धाच्या बातम्या येत होत्या व त्या पार्श्वभूमीवर माझे तेथून निघणे गरजेचे झाले होते. ते त्या मुलांसाठी आकस्मिक होते. माझे मनही त्यांचा निरोप घेताना जड झाले. मुले कष्टी झाली होती. मी त्याच दु:खी अवस्थेत प्रवासास निघाले. रस्ता कच्चा असल्यामुळे गाडी सावकाश चालली होती. मी साश्रू नयनांनी त्या सुंदर सृष्टीचा निरोप घेत होते. मनात संमिश्र भावना होत्या. मी या वर्षी जम्मूत दाखल झाल्यापासूनचा माझा प्रवास माझ्या नजरेसमोर येत होता.

-jammu-district-childrens-playing-and-drwaing
मी जम्मूमध्ये एका स्थानिक कुटुंबात राहून मुलांच्या प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष देते, ती मुले.

मी खडतर प्रवास करून कठुआ जिल्ह्याच्या बिलावर तालुक्यातील बदनोता येथे 28 मार्च 2025 ला पोचले होते. मी तेथे फक्त सहा-सात दिवस राहू शकले होते. कारण मला गावात बस शिरण्यापूर्वी, एका नाल्याजवळची जागा दाखवत मोहिंदरजी यांनी, त्या ठिकाणी भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्याबद्दल सांगितले होते. मोहिंदरजी हे कठुआ जिल्ह्याच्या बनी तालुक्यातील शिक्षक. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत ‘वनवासी कल्याण आश्रम’च्या जम्मू प्रांताचे प्रमुख आहेत. ते मला कठुआ येथे नेण्यास आले होते. भारतीय जवानांवरील हल्ल्याचा प्रसंग घडला होता तो असा, की सैनिकांची गाडी एका स्थानिक माणसाने थांबवली होती. त्यावेळी वरच्या बाजूने आतंकवाद्यांनी गोळीबार करून पाच भारतीय सैनिकांची क्रूर हत्या केली होती. ही घटना जुलै 2024 मध्ये घडली होती.

त्या हल्ल्यावेळी, आर्मीने गावातील उच्च माध्यमिक शाळेत तळ ठोकला होता. आताही तेथे आर्मीचा मोठा ‘बेस’ आहे. मी त्यांच्या समोरच्याच घरात राहण्यास होते. त्याच ठिकाणी तीन पोलिसांना हौतात्म्य 27 मार्चलादेखील प्राप्त झाले होते. तेथे स्थानिकांची फूस घेऊन असे हल्ले अतिरेक्यांकडून वारंवार होत असतात. आतंकवादी अंधारात सीमेजवळच्या गावातून नाल्यामधून येत असतात. त्यांना स्थानिक लोकांचा आश्रय कधी असतो. अतिरेकी स्थानिकांकडे राहतातही. त्यानंतर तेच स्थानिक लोक जाऊन सरकारला त्यांच्या अस्तित्वाची सूचना देतात ! पोलिस किंवा मिलिटरीवाले तेथे आले की दबा धरून बसलेले अतिरेकी त्यांच्यावर हल्ला करतात. आताही ते चालू आहे !

‘ते’ नाल्यामध्ये, शेतामध्ये दिसले, ‘त्यां’नी कोणाच्या घरात घुसून रोट्या पळवल्या, पैसे देण्याचा प्रयत्न केला, पाणी मागितले अशा बातम्या येत असतात, बऱ्याच वेळा त्या अफवाही असतात. पण वातावरण मार्च 25 पासून अधिकच तणावपूर्ण होत गेले. तेथे सकाळपासून रात्रीपर्यंत सतत ड्रोन फिरत असत. एकंदरीत, तेथील लोकांचे जगणे कष्टाचे आणि कठीण अशी चर्चा मात्र कोठेही होत नाही. स्थानिकांनी सगळे स्वीकारून त्यांचे जगणे सुरू ठेवले आहे. कोणीही रात्रीचे घराबाहेर पडू शकत नाहीत. मिलिटरीची गस्त सतत चालू असते. कॅम्पसच्या चारी दिशांना असलेल्या चौक्यांवर कडक पहारा रात्रंदिवस असतो.

तशा परिस्थितीत मी एकटीने तेथे राहणे गाववाल्यांना धोकादायक वाटले. शिवाय, माझी तेथे राहण्याची योग्य व्यवस्थाही नव्हती. आम्हा ‘वनवासी’ कार्यकर्त्यांना माघार घेणे क्रमप्राप्त होते. जम्मूत लोकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कल्याण आश्रम यांबद्दल फारशी माहिती नाही. मी येतानाचा बिलावर ते बदनोता असा बसचा सात तासांचा जिकिरीचा प्रवास आठवून, मी तो प्रवास परतताना कार किंवा सुमो या वाहनाने करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे बनीहून एकजण सुमो घेऊन आला. त्याला येण्यास उशीर झाला. त्याची गाडी मिलिटरीवाल्यांनी रस्त्यात अडवली होती, म्हणे. पण मी ज्यांच्या घरात राहत होते, त्यांनी मिलिटरी सेंटरवर फोनवरून संपर्क साधल्यावर ड्रायव्हर गाडी घेऊन वर येऊ शकला.

आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी सहाला निघालो, तेव्हा रात्रीची जंगलातील ड्युटी संपवून परतणाऱ्या जवानांनी आमची गाडी अडवली. खरे तर, मला गाडीतून उतरून त्या सैनिकांना त्यांच्या देशाप्रती असलेल्या निष्ठेसाठी सलाम करण्याची इच्छा होत होती. पण त्यांना ते पसंत पडेल की नाही; की ते उगाच संशय घेतील की काय असे वाटून मी त्यांना मनातल्या मनात सलाम केला. मी मागील पाच-सहा दिवस त्यांचे जीवन जवळून पाहत होते ना !

बदनोता मागे पडले. मला मी तेथून पराभूत होऊन, काम न करता परत चालले आहे असे वाटत होते. सभोवतालचा निसर्ग मात्र वसंत ऋतूचे नवेपण मिरवत होता. दूरवरील बर्फाच्छादित शिखरेही खुणावत होती. मी फोटो टिपत होते. तेथे रोडोडेंड्रॉनची लाल फुलांची झाडे अगणित होती. ती फुले खूप उंचीवर असतात. ते नेपाळचे राष्ट्रीय फूलही आहे. त्या फुलाचा औषधी म्हणून उपयोग होतो. माझा प्रवास पाईनच्या दाट जंगलातून वळणावळणाच्या रस्त्याने चालू होता. मी बिलावर या तालुक्याच्या ठिकाणी चार तासांत पोचले. तेथील अतिप्राचीन शिवमंदिराला भेट दिली.
                                                                X X X

मला पहेलगामच्या 22 एप्रिलच्या हल्ल्यानंतर असे वाटले, की मी महिन्यापूर्वीच किती मोठ्या धोक्यामधून तो प्रवास केला होता ! मला अशा प्रत्येक वेळी वाटले, की माझे काही झाले तरी चालेल. पण माझे बाईचे शरीर आणि मी एका चांगल्या संस्थेचे प्रतिनिधित्व करत असते हे मला विसरून चालणार नाही. त्या दिवशी, मी दुपारी चारच्या सुमारास बनीत पोचले.

‘मॅडम, तुम्ही चहा घेणार का?’ तो बसोली तालुका होता. तेथे माझ्या सोबतच्या ड्रायव्हरला आणखी एक साथीदार मिळाला. ते दोघेही गुजरातेत सुरतला ड्रायव्हरची नोकरी करतात. ते मूळचे जम्मूचे. कल्याण आश्रमाचे ‘नेटवर्क’ असे गुंतागुंतीचे आहे. किती तऱ्हतऱ्हेच्या कामांतील माणसे तेथे जोडली गेली आहेत. त्या दोघांना दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजताची ट्रेन पकडून सुरतला परत जायचे होते. त्यांनी प्रवास चालू ठेवला आणि मी विचारांत गुंग झाले.

मी आठ दिवस बनीत राहून, आराम करून 12 एप्रिलला कोट येथे पोचले. मी तेथे तिसऱ्यांदा आले होते. तेथे आमच्या कामाची गरज आहे आणि मी माझ्या तब्येतीच्या दृष्टीने आपल्या माणसांत, छोट्या दोस्तांबरोबर तेथे राहणे निवडले होते. तेथे सर्व काही ठीक होते, पण माझा शारीरिक थकवा वाढत चालला. म्हणून महाराष्ट्रात घरी परत जावे की राहवे हे द्वंद्व मनात चालू होते. मनरेला या गावात जून-जुलै या महिन्यात जायचे होते, म्हणून ते गावदेखील बघून आले होते. उत्साह वाढवण्याचा प्रयत्न मात्र सफल होत नव्हता. ‘आय नीड टू टेक ब्रेक’ असे वाटत होते.

आणि मी अशा द्विधा-त्रिधा अवस्थेत असताना श्रीनगरजवळ पहेलगाम घडले… सगळेच बदलले. मला केवळ युद्ध होईल या भीतीने मुळीच परतायचे नव्हते. पूर्ण भारत हा माझा परिवार आहे. त्यामुळे तेथील लोकांना सोडून मुंबईत परत जावे हे मला पटत नव्हते. पण जम्मूतील शाळा 4 मे पासून बंद झाल्या. तरी मुले आणि मी सकाळ-संध्याकाळ खूप धमाल करत होतो. गाणी, व्यायाम, श्लोक, अभ्यास, पाढे, गणिताचे खेळ, इतर खेळ यांमध्ये चार दिवस खूप छान गेले. तरी त्या टप्प्यावर मी जम्मू सोडण्याचा व परत घरी, डोंबिवलीला जाण्याचा विचार केला, पण आरक्षण मिळेना. मला एक तिकिट 20 मे चे मिळाले. मग मी जाईपर्यंत मुलांसाठी जेवढे काही करता येईल ते करायचे असे ठरवले.

पण भारताने पाकिस्तानवर चढाई 6-7 मे च्या दिवशी केली. मुंबई आणि इतर शहरांतील माझा मित्रपरिवार आणि माझे हितचिंतक एकदम सावध व चिंतातूरही झाले. मला फोन व मेसेज येऊ लागले. त्यांना काळजी वाटत होती. तेथील एका आर्मी ऑफिसरच्या वडिलांनी मला फोन करून ‘लगेच निघा’ असा सल्ला दिला. तेथील मुलांना, माणसांना सोडून तडकाफडकी निघून जाणे मला कठीण वाटत होते, पण मी 9 मे ला पठाणकोट ते दिल्ली हा प्रवास ट्रेनने आणि 10 मे ला दिल्लीहून मुंबई हा प्रवास विमानाने करावा असे ठरवले आणि तसे रिझर्वेशन मिळालेदेखील! मी त्या प्रवासासाठी कोट येथून 9 मे रोजी पाच वाजता निघाले. बसोली येथे पोचेपर्यंत उजेड होता. मला घेऊन जाण्याच्या इराद्याने दुपारी बनी येथून सुषमाजी-संतोषजी या कार्यकर्त्या आणि मोहिंदरजी आले होते. मी निघून जाणार ही बातमी त्यांना धक्कादायक होती. मी माझ्या अधांतरी मन:स्थितीमुळे आठ-दहा दिवस त्यांच्या संपर्कात राहणे टाळले होते. त्यांना मी जाणार हे आवडले नव्हते. ते तिघे काळजीपोटी आले होते. ते सारखे म्हणत होते, की आम्ही तुझी काळजी घेऊ. पण शाळा तर बंद करण्यात आल्या होत्या !

आम्ही जम्मूतील बसोली सोडल्यानंतर पंजाब आणि जम्मू-काश्मीर बॉर्डरवरील अटल सेतू पार करून पठाणकोटच्या दिशेने जाऊ लागलो. काळोख वाढत गेला आणि आजूबाजूला सगळे सुनसान झाले. सगळी दुकाने बंद, पूर्णपणे ब्लॅकआउट, रस्त्यावर एकही वाहन नाही अशी स्थिती होती. गाडी हळूहळू चालली होती. मी कोट येथे ज्यांच्या घरात राहत होते ते प्रदीपजी माझ्या सांगण्यावरून, सुरतहून निघाले होते. त्यांचा व्यवसाय सुरत-जम्मू असा चालतो. ते दोन बस बदलून पठाणकोटला रात्री नऊच्या सुमारास पोचणार होते. माझी पठाणकोट-दिल्ली ट्रेन रात्री 11 नंतर होती. ते मला पठाणकोट स्टेशनवर भेटणार होते. ड्रायव्हरने पठाणकोटला वाट बघत बसण्यापेक्षा सावकाश जात, तेथे उशिरा पोचुया असे ठरवले. त्यांना चहाही प्यायचा होता, पण युद्धाच्या छायेखाली सर्व काही बंद होते. रोज ती दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत उघडी असत. एक चहाचे दुकान 8 वाजता उघडे दिसले. ते दोघे चहा पिण्यासाठी गेले. मी गाडीतच होते. तेव्हा फटाके फुटू लागले ! ड्रोनची दिवाळी सुरू झाली होती! ते दोघे परतले आणि चेष्टा करत म्हणाले, मॅडम, आपण बसोलीला परत जाऊया. पुढे काही ठीक नसणार. मी म्हटले, मला स्टेशनवर पोचवा आणि तुम्ही लवकर लवकर परत जा. पठाणकोटवर आदल्या दिवशीही पाकिस्तानचे खूप हल्ले झाले होते. पण सर्व ड्रोन्स निष्प्रभ करण्यात आले होते. तरी लढाई चालू होती. पठाणकोट हा मोठा ‘मिलिटरी बेस’ आहे.

सर्वत्र अंधार, गाववाल्यांनी गाडीचे लाईट्सदेखील बंद करा असे सांगितले गेले. पौर्णिमा जवळ आली होती, म्हणून चंद्राचा प्रकाश होता. मला त्यामुळे त्या लोकांच्या परतीच्या प्रवासाची काळजी वाटू लागली.

पठाणकोट स्टेशन आले, स्टेशन पूर्ण अंधारात होते. हायवेवर एकही वाहन नव्हते. तेथून मागच्या बाजूने स्टेशनला जाण्याची वाट होती. रेल्वेलाईन क्रॉस करून जाता येत होते. माझी अंधारात तेथून जाण्याची इच्छा नव्हती. तेथे मालगाडी उभी होती. आम्ही खूप मोठा वळसा घालून मेन गेटने स्टेशनमध्ये शिरलो तेव्हा तेथे खूप माणसे दिसली. स्टेशनच्या बाहेरसुद्धा माणसे होती. पोटापाण्यासाठी तेथे आलेले परप्रांतीय लोक; त्यांनी लढाईच्या भीतीने घरी परतण्याचे ठरवले होते. रिझर्वेशन मिळत नव्हते, गाड्यांचा भरोसा नाही असे सगळे अनिश्चित वातावरण होते. फलाटावर माणसांची गर्दी खूप होती.

स्टेशनात गेलो तर तेथे मोबाईल टॉर्च लावण्यासदेखील बंदी होती. एकही लाईट नव्हता. पोलिसांचा बंदोबस्त कडेकोट होता. आम्ही प्रदीपजी यांना भेटणे सोपे जावे म्हणून प्रवेशद्वाराजवळ थांबलो. रात्रीचे 9 वाजून गेले होते. महिला प्रतीक्षालय शोधण्यास खूप प्रयास करावे लागले. ते दोघे ड्रायव्हर सामानाजवळ थांबले होते. तो मोठा दिलासा होता. आम्ही प्रदीपजी यांची वाट पाहत होतो. त्यांचा संपर्क फोनवरून सतत चालू होता. त्यांची बस स्टेशनपासून दोन-अडीच किलोमीटर अंतरावर कोठेतरी थांबली होती. बाजूचा हायवे बंद असावा. त्यांनी तेथून एकट्याने चालत येणे योग्य नव्हते. त्यांनी बसस्टँडवर जाण्याचा निर्णय घेतला. ते तेथून वाहन घेऊन रेल्वे स्टेशनवर येतो असे म्हणाले. पण बसस्टँडवर काहीच नव्हते. माणसेदेखील नव्हती. ते तिकडेच अडकून पडले.

रात्रीचे दहा वाजले. प्रदीपजी यांनी फोनवर सांगितले, “दीदी, उन लोगों को गाडी लेके यहा आने को कहो, हम यहीसे बसोली चले जायेंगे. आप अकेले जायेंगी ना?” मला पर्यायच नव्हता. त्यांच्या परत जाण्याची काळजीदेखील वाटत होती. पंजाब आणि जम्मू यांच्या बॉर्डरवर पोलिस बंदोबस्त होता. त्यांना अडवलेदेखील असते. मी प्रदीप यांना फोनवरून सांगितले, ‘ते गाडी घेऊन येतील. तुम्ही लवकरात लवकर बसोलीला परत जा.’

आता, मी अंधारात, अनिश्चित वातावरणात फलाटावर अगदी एकटी होते! तशी आजूबाजूला माणसे, बायका-मुले होती. गाड्या अंधारात येत-जात होत्या. पण गाडीतील लाईटसुद्धा बंद असत. अंधारात माझा डबा नेमका कोठे येईल ते कळत नव्हते. मी अंदाजाने एके ठिकाणी बसले होते. तेवढ्यात, अकराच्या सुमारास एक पूर्ण एसी स्पेशल ट्रेन आली. त्यानंतर फलाटावरची गर्दी बरीच कमी झाली आणि काहीसे लाईट लागले. माझा डबाही इंडिकेटरवर दिसू लागला. मी फोन घेणे टाळत होते. आता एकदा माझी गाडी येऊ दे, मी गाडीत बसले की हे सगळे संपू दे असे वाटत होते. प्रदीपजी आणि कंपनीदेखील सुखरूप पोचू देत अशी प्रार्थना देवाजवळ करत होते.

माझी गाडी सव्वाअकरा वाजता आली. माझ्याबरोबर गाडीत चढण्यास कोणी नव्हते. पण ‘गॉड इज ग्रेट’चा अनुभव मला आला. रिसिव्ह करण्यास आला आहे असे वाटावे असा खानपान सेवावाला सेवक खाली उतरला. तो काहीही न बोलता माझी बॅग गाडीत घेऊन गेला आणि त्याने ती माझ्या नंबरच्या सीटखाली नेऊन ठेवली. राजधानी ट्रेनमध्ये जेवण वगैरे देतात, त्यामुळे त्याला माझी सीट माहीत असावी. त्याने मला पाणीदेखील आणून दिले. गाडीत सर्वजण झोपले होते. मी एकटीच पठाणकोटला चढले होते. बऱ्याच सीटा रिकाम्या होत्या. रिझर्वेशन मिळत नव्हते, पण ऐनवेळी लोक आले नसावे. माझा अप्पर बर्थ होता, पण मला लोअर बर्थ मिळून गेला, म्हणून बरे वाटले. प्रदीप यांना कळवले, की मी गाडीत सुखरूप स्थानापन्न झाले आहे. तोपर्यंत बारा वाजले होते. ते लोकही बसोली येथे सुखरूप पोचले होते.

मग मी निद्राधीन झाले. दिल्ली येथे सकाळी सहा वाजता पोचणार होतो. पावणेसहा वाजता मला रिसीव्ह करण्यास येणाऱ्या रोहितचा फोन आला. तो दिल्ली स्टेशनवर पोचला होता. ऐकून बरे वाटले. पण नंतर गाडी दिल्लीबाहेरच खूप वेळ रखडली. माझ्या सहप्रवासींबद्दल हळूहळू बरीच माहिती कळली. त्या सगळ्या भारतीय शूर जवानांच्या पत्नी होत्या. त्या त्यांच्या त्यांच्या दोन-चार वर्षांच्या मुलांना घेऊन अखनुर (जम्मू) तळावरून घरी जाण्यास निघाल्या होत्या. त्यांचे सत्तर परिवारांचे संपूर्ण युनिट रिकामे करण्यात आले होते. आम्ही मुंबईच्या मैत्रिणी आणि स्थानिक मैत्रिणी अखनूरला जवानांना राखी बांधण्यास 2023 मध्ये गेलो होतो, ते मला आठवले. त्यांना एका स्त्री अधिकाऱ्याने लढाईच्या वातावरणात अखनूर येथून निघून जाण्यास सांगितले होते. त्यांचे दिल्लीपर्यंतचे रिझर्वेशन होते. त्यांनी ते ‘जास्त पैसे’ देऊन मिळवले होते. तशा परिस्थितीतही भारतातील हा दोन नंबरचा धंदा बंद नव्हता – जवानांच्या पत्नींनादेखील त्याची झळ लागली होती. त्यांच्यापैकी दोघीजणी पुणे व दौंडच्या होत्या. त्यांना पुढील प्रवासाचे रिझर्वेशन आग्रा येथून मिळणार होते. छोटी मुले आणि थोडेफार सामान घेऊन जाणे त्यांना जिकिरीचे होते. त्यांची जम्मूवरील हल्ल्यापासून झोप उडाली होती. त्यांना तीन दिवसांनी काल झोप मिळाली असे त्या सांगत होत्या.

त्या त्यांच्या यजमानांच्या संपर्कातही होत्या. आपल्या प्रिय व्यक्तीला सोडून येताना कशी स्थिती झाली असेल ! त्यांना त्यांचे माणूस परत दिसेल ना दिसेल. जवानांचा जीवही काळजी करत असणारच. पण ह्या कुटुंबीयांसाठी राष्ट्र हेच सर्वतोपरी हेच सत्य. अखनूर येथे परिस्थिती गंभीर होती. त्या धीराने प्रवास करत होत्या. दिल्लीला माहेरी जाणाऱ्या एकीच्या, चंदीगडच्या सासरघराजवळ स्फोट झाला होता. ती तो फोटो युट्यूबवर बघत होती. ड्रोन कोठपर्यंत पोचले, बघा ! मी सगळ्यांसाठी मनोमन प्रार्थना केली.

मी साडेसहानंतर दिल्लीला पोचले. संघ परिवारातील एका उच्चपदस्थ मराठी कुटुंबात मला नेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. छान, प्रेमळ, सुसंस्कृत आणि संपन्न घर होते. काल रात्रीचा भयानक अनुभव, जवानांच्या पत्नींचे अनुभव यांमुळे उदास झालेल्या मनाला दिलासा मिळाला. मी त्या घरात जेमतेम दीड तास होते. पण अंधारातून प्रकाशाकडे आल्यासारखे वाटले. त्या दिवशी दिल्लीत पाऊस खूप पडला होता. तेथून दुपारी तीन वाजता दिल्लीहून मुंबईत विमानाने पोचले !

ज्योती शेटये 9969480925 jyotishalaka@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here