लोकशाही सबलीकरण कार्यशाळा

2
54
_carasole_1

लोकशाही सबलीकरण अभियाननिवडणुका हा लोकशाही प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग. त्याला आपल्या देशातील साठ ते सत्तर टक्के नागरिक सरावले आहेत, हेच या गेल्या लोकसभेच्या निवडणुकांनी दाखवून दिले. निवडणुकीमध्ये भारतीय जनतेने लोकशाहीचा चमत्कार दाखवला. इतर अनेक देशांत सत्तापरिवर्तनासाठी रक्तरंजित लढे होत असताना आपल्या देशात हे परिवर्तन सहज शक्य झाले.

पण निवडणुकांनी दिल्लीतील सरकार बदलले तरी भारतीय जनता लोकशाहीला सरावली आहे, लोकशाही प्रजासत्ताक या व्यवस्थेचे मर्म तिने समजून घेतले आहे, अंगीकारले आहे असे दिसत नाही. निवडणुकांच्या माध्यमातून देशातील, राज्यातील सत्ताधारी आपण बदलू शकतो, हे भान आपल्याला आले आहे; पण आपल्या मनी या देशाचे खरे सत्ताधारी, राजा आपणच आहोत, निवडून दिलेले प्रतिनिधी आणि पगार घेणारे सनदी अधिकारी हे लोकसेवक आहेत, मालक नाहीत ही जाणीव फारशी रुजलेली नाही. या देशाच्या खऱ्या राजाला – म्हणजे सर्वसामान्य माणसाला त्याच्या अधिकारांची आणि कर्तव्यांची जाण आलेली नाही. त्यामुळेच सार्वजनिक अस्वच्छता, भ्रष्टाचार, अव्यवस्था या समस्या वाढत आहेत.

सरंजामशाही मानसिकता

याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, बौध्दकालातील गणराज्ये नष्ट झाल्यानंतर या देशात गेली अनेक शतके राजेशाही आणि सरंजामशाही राहिली आहे. त्यामुळे ‘राजा सांगेल ती पूर्वदिशा आणि भट सांगेल ती अमावस्या’ अशी आपली मानसिकता होती. सामान्य माणसाला राजा करणारी लोकशाही प्रजासत्ताक संकल्पना इंग्रज गेल्यानंतर साठ वर्षांपूर्वी आपण स्वीकारली, पण पिढ्यानपिढ्यांची मानसिकता बदललेली नाही. त्यामुळेच सर्व काही सरकारने करायचे, चांगले दिवस आणण्यासाठी आपली काहीच भूमिका नाही असे अजूनही आपल्याला वाटते. मोदींना निवडून दिले, आता त्यांनीच वाराणसी, गंगा आणि सर्व देश स्वच्छ करावा असे आपल्याला वाटते. पण लोकसहभागाशिवाय हे होणार नाही. प्रत्यक्षात हा लोकसहभाग मिळवायचा असेल, तर लोकशाहीचे मर्म सर्वसामान्य माणसाच्या मनात रुजणे आवश्यक आहे. लोकशाही केवळ निवडणुकांपुरती न राहता रोजच्या आयुष्यात उतरणे आवश्यक आहे. तसे होईल, तेव्हाच ती अधिक सशक्त व सबळ होईल. लोकशाही सबलीकरण ही मानसिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे.

या प्रक्रियेला गती मिळावी म्हणून व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन आणि कौटिल्यीय अर्थशास्त्र संशोधन प्रकल्प, तत्त्वज्ञान विभाग-मुंबई विद्यापीठ यांनी १३ व १४ सप्टेंबर रोजी मुंबई विद्यापीठाच्या आवारात लोकशाही सबलीकरण कार्यशाळा घ्यायचे ठरवले आहे. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ ही संस्था समाजातील चांगुलपणाचे व्यासपीठ म्हणून काम करते. त्याचा एक दृश्य भाग म्हणजे www.thinkmaharashtra.com हे वेबपोर्टल. येथे महाराष्ट्रातील गावोगावी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांच्या कर्तृत्वाची माहिती संकलित केली जाते. त्याचप्रमाणे गावोगावच्या परंपरा, उत्सव, ग्रामदैवत यांचीही नोंद ‘संस्कृती संचित’ म्हणून केली जाते. ही माहिती प्रसिध्द करण्यापूर्वी तिच्या सत्यतेची पडताळणी केली जाते. अशा प्रकारचे तेराशेपेक्षा जास्त लेख असणारी, मराठी भाषेतील ही एकमेव वेबसाईट असेल. तिचा उद्देश केवळ माहिती संकलन हा नसून त्या माध्यमाद्वारे सजग आणि सक्रिय माणसांचे एक प्रभावी नेटवर्क उभारणे हा आहे. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने असे नेटवर्क वेगाने विकसित होईल या विश्वासाने हे काम चालू आहे.

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’तर्फे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गांधीभवनच्या सहकार्याने पुणे येथे गांधीजींच्या ‘हिंदस्वराज‘ या पुस्तकातील विचारांवर दोन दिवसांची चर्चा झाली. त्यामध्ये आरोग्यस्वराज, ग्रामस्वराज, व्यक्तिस्वराज अशा संकल्पनांवर चर्चा झाली. या संकल्पना प्रत्यक्षात आणायच्या असतील तर चर्चेला, विचारप्रबोधनाला प्रत्यक्ष कृतीची व विधायक चळवळींची जोड मिळणे आवश्यक आहे, हे त्या वेळी अधोरेखित झाले. त्याचमुळे लोकशाही सबलीकरणासाठी वैचारिक प्रबोधन आणि विधायक चळवळींची आखणी, नियोजन अशा स्वरूपाची ही कार्यशाळा मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाच्या मदतीने होणार आहे.

महाराष्ट्राचा सहभाग

वैचारिक प्रबोधन आणि विधायक चळवळ यांचा समन्वय हे महाराष्ट्राचे ऐतिहासिक वैशिष्ट्य आहे. ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकरांपासून ही परंपरा सुरू झाली. हिंदू समाजातील दोष दूर करण्यासाठी महात्मा फुले यांनी वैचारिक मांडणी आणि मुलींसाठी शाळा अशा दोन्ही गोष्टी केल्या. न्यायमूर्ती रानडे यांनी नवविचारांच्या प्रसाराबरोबरच लोकशाही संकल्पनांचे बीज म्हणून अनेक संस्था व मराठी साहित्य संमेलनासारख्या नवीन प्रथा रूढ केल्या. डॉ. हेडगेवारांनी हिंदू संघटनाच्या तत्त्वज्ञानाला संघशाखा स्वरूपात कृतीची जोड दिली. डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी विचारांच्या प्रसारासोबत चवदार तळ्याच्या सत्याग्रहासारख्या अनेक चळवळी केल्या. सावरकरांनी समरस हिंदू समाजाच्या निर्मितीसाठी पुस्तके लिहिली. तसेच, रत्नागिरीत सहभोजन, मंदिरप्रवेश असे कार्यक्रम कृतीत आणले. अशा परंपरेमुळे देशाचे वैचारिक नेतृत्व महाराष्ट्राकडे राहिले होते. ‘लोकशाही सबलीकरण अभियान’ हा आधुनिक काळातील त्या परंपरेचा आविष्कार आहे असे म्हणता येईल.

कोणत्याही नवविचाराला कृतीची जोड नसेल तर केवळ चर्चा घडतात, विचारवंत प्रकाशझोतात येतात. पण त्याचा समाजात काहीच प्रभाव निर्माण होत नाही. विधायक कृती कार्यक्रमाची जोड नसलेले वैचारिक प्रबोधन पांगळे असते. याउलट कृती कार्यक्रमाला वैचारिक तत्त्वज्ञानाचा भक्कम पाया नसेल तर अशा चळवळी भरकटतात. वैचारिक प्रबोधनाची दृष्टी नसलेल्या चळवळी आणि कार्यक्रम आंधळे असतात.

कार्यक्रम

लोकशाही सबलीकरणाच्या या कार्यशाळेत प्रबोधन व कृती कार्यक्रम या दोन्ही पैलूंवर भर दिलेला आहे. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर कार्यशाळेचे उद्घाटन करणार आहेत. सशक्त लोकशाही प्रत्यक्षात येण्यासाठी लोकशाहीचे तत्त्वज्ञान आणि तिची उत्क्रांती समजून घेणे आवश्यक आहे. या वैचारिक प्रबोधनाची मांडणी आणि चर्चा मुंबई विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागाच्या मार्गदर्शक डॉ. शुभदा जोशी करणार आहेत.

ग्रीक तत्त्वज्ञानातील विचारांच्या आधाराने युरोपमध्ये लोकशाही उत्क्रांत होत गेली. त्यासाठी चार-पाचशे वर्षांचा कालावधी जावा लागला. तेराव्या शतकापासून युरोपमध्ये सुरू झालेल्या या परिवर्तनाची ओळख भारताला एकोणिसाव्या शतकाच्या शेवटीशेवटी होऊ लागली. निरंकुश राजसत्ता आणि असहिष्णू धर्मसत्ता यांच्या विरोधात बंड करत लोकशाही विकसित झाली, हा इतिहास लोकशाही सबलीकरणासाठी सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांना माहीत असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने काही सत्रांची योजना केलेली आहे. लोकशाही सबल करायची असेल तर विविध पातळयांवर समर्थ नेतृत्व विकसित होणे आवश्यक आहे. लोकशाहीतील नेतृत्वामध्ये काही विशेष गुण लागतात. आपल्या हाताच्या बोटांचे उदाहरण घेतले तर राजेशाहीतील नेतृत्व हे तर्जनीसारखे अंगठ्याजवळच्या बोटासारखे असते; आदेश देणारे असते. लोकशाहीत असे नेतृत्व यशस्वी होत नाही. तेथे ‘अंगठा’ यशस्वी नेता होतो. अनेकांशी संवाद साधून लोकसहभागाची मूठ बांधण्याचे काम त्याला करावे लागते. हे नेतृत्वगुण प्रशिक्षणाने विकसित करता येतात. भारतीय परंपरेत आर्य चाणक्य यांनी चंद्रगुप्ताच्या रूपात असे नेतृत्व विकसित केले होते. त्यांच्या ‘अर्थशास्त्र’ ग्रंथातील विचारांच्या आधाराने मुंबई विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभाग लोकशाहीतील नेतृत्व विकासाचा कार्यक्रम राबवत आहे. ‘कॉर्पोरेट चाणक्य’ या विषयातील अनेक लोकप्रिय पुस्तकाचे लेखक राधाकृष्णन पिल्लई हे त्या प्रकल्पाचे संयोजक आहेत. आपल्या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी आपण नेतृत्व विकासाची प्रक्रिया त्यांच्याकडून समजून घेणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी या प्रकल्पामधून प्रशिक्षित झालेल्या आणि मुंबईतील सामाजिक प्रकल्पात कार्यरत असलेल्या काही कार्यकर्त्यांचे अनुभव ऐकणार आहोत.

भारतात लोकशाही सबल करण्याची मार्गदर्शक सूत्रे आपल्या राज्यघटनेमध्ये आहेत. त्याचबरोबर माहितीचा अधिकार, ग्रामसभा, जनहित याचिका अशी काही साधने गेल्या साठ वर्षांत लोकचळवळींतून नागरिकांना मिळाली आहेत. एका सत्रात आपण आपल्या राज्यघटनेची वैशिष्टये आणि नागरिकांना मिळालेले अधिकार व साधने समजून घेणार आहोत.

ही साधने वापरून समाजात चांगले काम कसे उभे करता येते, याचे अनुभवकथन दुसऱ्या दिवशी होईल. ग्रामसभांचा उपयोग करून जव्हार, मोखाडा भागात ग्रामविकासाचे कार्य करणारे मिलिंद थत्ते यांच्याशी संवाद साधता येणार आहे. पर्यावरण, उद्योग आणि विकास यांचा लोकसहभागातून समतोल साधणे कसे शक्य आहे यासंबंधीचे विवेचन प्रसिध्द उद्योजक बी.बी.ठोंबरे करणार आहेत. त्याचबरोबर एखादी लोकचळवळ कशी निर्माण होते,विकसित होते याचे शास्त्रही दुसऱ्या दिवशी समजेल. या सर्व विचारमंथनातून प्रेरणा घेऊन आपण प्रत्यक्षात काय काम करू शकतो याबद्दलचे नियोजन एका सत्रात होईल. दिलीप करंबेळकर त्या सत्राचे संचालन करतील. या विधायक चळवळीला आजच्या काळात सोशल मीडियाचा आणि इतर प्रसारमाध्यमांचा कसा उपयोग करून घेता येईल, याबद्दलचे मार्गदर्शन त्या विषयातील तज्ज्ञ करतील. कार्यशाळेबाबतची अधिक माहिती www.thinkmaharashtra.com या वेबसाइटवर मिळेल.

दोन दिवसांची लोकशाही सबलीकरणाची कार्यशाळा ही वैचारिक प्रबोधन आणि विधायक चळवळ यांचा समन्वय घडवण्याच्या प्रक्रियेची नव्याने सुरुवात आहे. कालिना येथे ही कार्यशाळा होणार असून दोन्ही दिवशी दुपारच्या जेवणाची व्यवस्था तेथे आहे. त्या वेळी फक्त रु. दोनशे शुल्क आहे. सक्रिय काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ही एक सुसंधी आहे. सहभागींच्या जागा मर्यादित असल्याने कृपया त्वरित संपर्क साधावा. आपल्या सक्रिय सहभागातून आपल्या देशातील लोकशाही सबल होऊ शकते आणि आपला भारत परमवैभवात नेण्यासाठी असे अनेक प्रयत्न आवश्यक आहेत. (बाहेरगावाहून येणाऱ्यांना निवासाची सोय आपापली करावी लागेल.)

डॉ. यश वेलणकर
www.thinkmaharashtra.com
thinkm2010@gmail.com
yashwel@gmail.com
९४२२०५४५५१


स.न.

विषय : ‘लोकशाही सबलीकरण अभियान’

मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने १३ व १४ सप्टेंबर रोजी कार्यशाळा

गांधीजींच्या १९०९ साली प्रकाशित झालेल्या ‘हिंदस्वराज्य’ या पुस्तकाचे शंभर वर्षांनंतरही जाणवणारे महत्त्व काय स्वरूपाचे आहे हे स्पष्ट व्हावे म्हणून ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या वतीने, ऑक्टोबर २०१३ मध्ये पुण्यात एक परिचर्चा घेण्यात आली. महाराष्ट्रातील एकशेपस्तीस जाणकारांनी तीमध्ये सहभाग घेतला. त्या परिचर्चेचा रोख कृतीच्या अंगाने असावा असे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने वारंवार निर्देशित केले होते. परिचर्चेच्या आधी अण्णा हजारे, ‘आप’ अशी आंदोलने देशात होऊन गेली. परिचर्चेनंतर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतातील लोकशक्तीचे वेगळेच दर्शन घडून आले. त्या सर्व घटनाक्रमात, किंबहुना पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पश्चात भारतात लोक आंदोलने सशक्त असावी तरच लोकशाही खऱ्या अर्थाने नांदली जाईल असे वारंवार व्यक्त होई, तथापी ग्रामसभांचे काही प्रयोग आणि जयप्रकाश नारायण यांनी उभे केले त्या प्रकारचे राष्ट्रीय आंदोलन वगळता लोकआंदोलने हा नेहमी चर्चेचा व काही पुढाऱ्यांच्या मुलाखतींचा विषय राहिला. ‘आप’चा प्रयोग यशस्वी होणार असे वाटत असताना अभय बंग यांनी एका मुलाखतीत रास्तपणे बजावले होते, की देशात व राज्या राज्यांत सक्षम स्वरूपाच्या चळवळी, आंदोलने, विधायक कामे उभी राहिली व त्यांचे देशभर जाळे तयार झाले तरच ‘आप’सारखे प्रयोग यशस्वी होतील. नरेंद्र मोदी यांची निवड लोकांच्या विकासाच्या अपेक्षा व्यक्त करते व त्यामुळे मोदी हे अमिताभ बच्चनपेक्षाही मोठे आयकॉन बनतात, तेव्हा तर लोकशक्तीच्या दबावाची गरज अधिकच तीव्रतेने जाणवते.

या प्रासंगिक घटनांचे उल्लेख वगळून सर्वसाधारण परिस्थितीच्या संदर्भात बोलायचे तर गेल्या तीस-पस्तीस वर्षांत राजकारण मूल्यविचारविहीन झाल्यानंतर लोकशाहीतदेखील जे पुढारी निवडून आले/येतात ते जनतेचे प्रतिनिधी राहिलेले नाहीत. ते सरंजामशाहीतील सरदारांसारखे त्यांच्या त्यांच्या प्रदेशावर राज्य करू लागले आहेत. तसे पुढारी जिल्ह्या जिल्ह्यांत दिसतात. ते जनतेच्या इच्छाआकांक्षा जाणून घेऊन त्या फुलवण्याऐवजी जनतेला खूष ठेवण्याचा प्रयत्न करतात व स्वत:चे राज्य अबाधित ठेवतात. अफगाणिस्थानातील टोळ्यांचे सरदार व विधानसभेपर्यंत पोचलेले हे ‘लोकप्रतिनिधी’ यांच्यामध्ये गुणात्मक फरक फार नाही. त्यांच्या कारभारात लोकशाही तत्त्व आणायचे तर लोकांचा दबाव वाढला पाहिजे. त्यासाठी लोक ‘जागे’ व्हायला हवेत.

याच पार्श्वभूमीवर देशात, किमानपक्षी महाराष्ट्रात ‘लोकशाही सबलीकरण अभियान’ सुरू व्हावे असे प्रखरतेने वाटू लागले. त्यासाठी समविचारी इच्छुक व्यक्तींची एक कार्यशाळा घ्यावी असाही विचार मनात आला व तो ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या कार्यकारी समितीने व सल्लागारांनी एकमताने राबवण्याचे ठरवले. मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाचे कार्यशाळेच्या संयोजनात सहकार्य लाभले ही मोलाची गोष्ट होय.

कार्यशाळा शनिवार,१३ व रविवार,१४ सप्टेंबर २०१४ या दोन दिवशी मुंबई विद्यापीठाच्या कालिना परिसरात होणार आहे. तिचे उद्घाटन न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर करणार आहेत. बाकी वक्त्यांचे तपशील ठरत आहेत. तरीदेखील या पत्रासोबत कार्यशाळेची कार्यक्रमपत्रिका जोडत आहोत. त्यावरून ध्यानात येईल, की कार्यशाळेचे स्वरूप दुपदरी आहे. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी लोकशाहीच्या सबलीकरणासाठी कार्यकर्त्यांची ज्या तऱ्हेची बौद्धिक तयारी असायला हवी त्या तऱ्हेची व्याख्याने व चर्चा योजल्या आहेत. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी कृतीच्या अंगाने चर्चा पुढे न्यायची आहे. त्यावेळी काही प्रातिनिधिक आंदोलनांची माहिती करून घेतल्यानंतर लोकआंदोलनांसाठी काय प्रकारचे कार्यक्रम योजता येतील याबाबत चर्चा होणार आहे. गेल्या पंचवीस वर्षांतील तंत्रज्ञानातील बदल व त्यामुळे मुळापासून बदलून गेलेले जनमन हे आपल्या या प्रयत्नांसाठी जाणून घेणे गरजेचे आहे. तशाही प्रकारचे मुद्दे दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित केले जातील आणि एवढा खल केल्यानंतर काही संघटनात्मक बळ उभे करता येईल का याचीही चाचपणी केली जाणार आहे.

कार्यशाळेमध्ये फक्त साठ लोकांना सहभाग घेता येईल. कार्यशाळेस उपस्थित राहायचे असेल तर प्रतिनिधी म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी दोनशे रुपये शुल्क आहे. ही रक्कम ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’कडे वेळीच पाठवून तुमचा कार्यशाळेतील सहभाग निश्चित करावा ही विनंती. रक्कम पुढील दोन खात्यांत जमा करता येईल.

Cosmos Bank Account No. – 0121001015862 (IFSC Code : COSB0000012)

State Bank of India Account No. – 31759182464 (IFSC Code SBIN005352)

रक्कम जमा केल्याचे इमेलने (thinkm2010@gmail.com) अथवा पोस्टाने ( व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन, २२ मनुबर मॅन्शन, १९३ डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, चित्रा सिनेमासमोर, दादर (पूर्व), मुंबई ४०० ०१४ फोन (०२२) २४१८३७१०) वेळीच कळवावे. म्हणजे नावाची नोंदणी पक्की होऊन जाईल.

प्रतिनिधींना दोन्ही दिवस दुपारचे भोजन व दोन वेळचा चहा उपलब्ध असेल, मात्र निवासाची सोय करता येणार नाही. ती ज्याची त्याने करावी असे अपेक्षित आहे. कळावे.

आपला

यश वेलणकर

कार्यकारी संपादक, थिंक महाराष्ट्र डॉट कॉम


कार्यशाळेतील कार्यक्रमाची रूपरेषा

शनिवार, १३ सप्टेंबर २०१४

सत्र क्रमांक – १

१० ते १०.१० –       थिंक महाराष्ट्रची ओळख व स्वागत – यश वेलणकर

१०.१० ते १०.३० –   प्रास्ताविक – दिलीप करंबेळकर

१०.३० ते ११.०० –   उद्धाटन व भाषण- नरेंद्र चपळगावकर

११.०० ते ११.१५ –   चहापान

सत्र क्रमांक – २

११.१५ ते १२.१५ –  लोकशाहीतील नेतृत्व विकास आणि चाणक्यविचार – मांडणी व चर्चा

१२.१५ ते  १.०० –  ग्रीक तत्वज्ञानातील लोकशाही संकल्पना व तिची युरोपीयन प्रबोधन पर्वास प्रेरणा – मांडणी व चर्चा

१.०० ते २.०० –     भोजन

सत्र क्रमांक – ३

२.०० ते २.४५ –   युरोपमध्ये झालेला लोकशाही संकल्पनेचा विकास – मांडणी व चर्चा

२.४५ ते ३.३० –  भारतामधील लोकशाहीचा विचार आणि न्या. रानडे

३.३० ते ४.०० –   चहापान

सत्र क्रमांक – ४

४.०० ते ४.४५ – भारतीय राज्य घटनेचे स्वरूप – मांडणी आणि चर्चा

४.४५ ते ५.३० – लोकसक्षमीकरण आणि त्यासाठी उपलब्ध घटनात्मक साधने. उदा. माहितीचा अधिकार, ग्रामसभा, जनहित याचिका आदी.

रविवार, १४ सप्टेंबर २०१४

सत्र क्रमांक – १

१०.०० ते १०.४५ – चाणक्य इन्स्टियुट ऑफ पब्लिक लीडरशीप – सादरीकरण व चर्चा

१०.४५ ते ११.३० – माहितीचा अधिकार प्रभावीपणे वापरण्याचे अनुभव किंवा पर्यावरण आणि विकास यांच्यातील संतुलन – सादरीकरण व चर्चा

११.३० ते ११.४५ – चहापान

सत्र क्रमांक – २

११.४५ ते १२.३० –  ग्रामसभांचा परिणामकारक उपयोग – मिलिंद थत्ते

१२.३० ते  १.०० –   सहभागींचे अनुभवकथन

१.०० ते २.०० –     भोजन

सत्र क्रमांक – ३

२.०० ते २.४५ –  लोकचळवळीचे शास्त्र

२.४५ ते ३.३० –  लोकशाही सबलीकरणासाठी कृतीकार्यक्रम

३.३० ते ४.०० –  चहापान

सत्र क्रमांक – ४

५.०० ते ५.१५ –   खुली चर्चा

५.१५ ते ५.३० –   समारोप समारंभ

About Post Author

2 COMMENTS

Comments are closed.