‘लेखक’ कोणीही होऊ शकतो!

1
32

क्राऊडसोर्सिंग हा आजच्‍या युगाचा मंत्र! समूहाची शक्‍ती वापरून मोठ्या खटाटोपांची पायाभरणी करावी आणि त्‍याचे साम्राज्‍यात रुपांतर झाल्‍यानंतर त्‍यात गुंतवणूक केलेल्‍या लोकांचा फायदा व्‍हावा ही क्राऊडसोर्सिंगची कल्‍पना. मात्र क्राऊडसोर्सिंगमुळे बिझनेस जसे वाढले तशी समाजाची सांस्‍कृतिकता वृद्धिंगत होऊ शकेल का? ‘व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशन’ क्राऊडसोर्सिंगचा पॅटर्न ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’च्‍या माध्‍यमातून सामाजिक-सांस्‍कृतिक क्षेत्रात राबवण्‍याचा प्रयत्‍न करत आहे.

‘थिंक महाराष्‍ट्र’ या वेबपोर्टलची मूळ कल्‍पना जेवढी सोपी आहे तेवढाच तिचा आवाका मोठा आहे. ‘थिंक महाराष्‍ट्र’ हा समाजातील कर्तृत्‍ववान व्‍यक्‍ती, संस्‍थात्‍मक कामे, समाजाभिमुख उपक्रम आणि गावोगावच्‍या संस्‍कृतीच्‍या पाऊलखुणा अशी महाराष्‍ट्राची वैविध्‍यपूर्ण माहिती संकलित करण्‍याचा उपक्रम आहे. त्‍या उपक्रमातून गेल्‍या सात वर्षांत अडीच हजाराहून अधिक लेखांची निर्मिती झाली. त्‍यातून मराठी समाजाचे सामर्थ्‍य प्रकट होत असल्‍याने तो मराठी माणसाच्‍या न्‍यूनगंडाने पछाडलेल्‍या मानसिकतेवर उतारा ठरू शकतो.

‘थिंक महाराष्‍ट्र’ने माहितीसंकलनाकरता वेगवेगळ्या मार्गांचा वापर केला. कधी लेखकांना लिहिते केले, पूर्वी प्रसिद्ध झालेले लेख संपादित करून पुनःप्रसिद्ध केले आणि जिल्‍हा-तालुका पातळीवर माहितीसंकलनाच्‍या मोहिमा राबवल्‍या. ते सर्व मार्ग उपयुक्‍त ठरले, मात्र त्‍यांच्या मर्यादादेखील लक्षात येत गेल्‍या. आता ‘थिंक महाराष्‍ट्र’ ‘एमकेसीएल’ कंपनीच्‍या सहकार्याने क्राऊडसोर्सिंगचा पर्याय घेऊन लोकांसमोर येत आहे. सोबत आहे एक नवा मंत्र – Anybody can write!

‘थिंक महाराष्‍ट्र’ला राज्‍याचे समग्र चित्र निर्माण करण्‍यासाठी महाराष्‍ट्रभरातून किमान दीड लाख लेखांची आवश्‍यकता आहे. ते ध्‍येय गाठायचे तर बृहन्‍महाराष्‍ट्रातून अधिकाधिक व्‍यक्‍तींचा माहिती स्‍तरावर या प्रकल्‍पात सहभाग आवश्‍यक ठरतो. आपल्‍यापैकी प्रत्‍येक जण त्‍याच्या गावाबद्दल, तेथे होऊन गेलेल्‍या-असलेल्‍या व्‍यक्‍तींबद्दल, संस्‍थाबद्दल काही ना काही माहिती देऊ शकतो. त्‍या जोडीला किल्‍ले, लेणी, नदी, गावात घडलेली ऐतिहासिक घटना, दंतकथा, ग्रामदेवता, जत्रा, खाद्यपदार्थ, साहित्‍य, वन्‍यवैभव, प्राणी आणि पक्षी अशा नानाविध गोष्‍टींबद्दल सांगणेदेखील लोकांना शक्‍य असते. अशा प्रकारची कमी-अधिक प्रमाणातील माहिती असलेल्‍या माहितगार माणसांसाठी ‘थिंक महाराष्‍ट्र’ हे व्‍यासपीठ आहे. त्‍यावर त्‍यांच्‍याकडील माहिती नोंदवून ठेवण्‍याची व्‍यवस्‍था आहे. तीदेखील कायमस्‍वरूपी! त्‍यामुळे ज्‍यांच्‍याकडे माहिती पाठवण्‍याचा उत्‍साह आहे, तो आमच्‍यासाठी लेखक आहे. शिवाय लेखक म्‍हणजे हातात कागदपेन घेऊन लिहिणारा तो माणूस ही व्‍याख्‍या केव्‍हाच मागे पडली आहे. तुमच्‍या हाती स्‍मार्ट फोन असेल तर तुम्‍ही समोरच्‍या गोष्‍टी फोटो/ व्हिडीओ/ ऑडिओ या प्रकारे नोंदवून ‘थिंक महाराष्‍ट्र’कडे पाठवू शकता.

आपल्‍याकडे मुळातच डॉक्‍युमेण्‍टेशनची परंपरा नाही. त्‍यामुळेच इतिहासातील शिवाजीच्‍या जन्‍मतारखेपासून वर्तमानातील कार्यरत महारथींपर्यंतची खरी माहिती कोणाकडेच असत नाही. त्‍यातही मोठमोठ्या घटना तर सर्वत्र प्रसिद्ध होतात, मात्र गावखेडे पातळीवर घडणा-या सकारात्‍मक गोष्‍टी कोणाच्‍या खिजगणतीतही असत नाहीत. क्राऊडसोर्सिंगद्वारे आपल्‍या सर्वांना अगदी घरबसल्‍या मोबाईल-टॅबलेट-डेस्‍कटॉप यांच्‍या सहाय्याने आपल्‍या संस्‍कृतीच्‍या वारशाचे, समाजाने भूषवावीत अशा माणसांचे आणि सभोवताली घडणा-या सकारात्‍मक घटनांचे डॉक्‍युमेण्‍टेशन करणे शक्‍य आहे. आम्‍ही ते संस्‍कारीत करून पुढील पिढ्यांसाठी राखून ठेऊ. ते करताना गरज एकाच गोष्‍टीची आहे, ती म्‍हणजे तुमच्‍याकडे माहिती असणे आवश्‍यक आहे.

ही ‘थिंक महाराष्‍ट्र’च्‍या माहितीसंकलन मोहिमेची थोडक्‍यात ओळख आहे. त्‍या उपक्रमामागची विचारधारा, त्‍याची शक्यता, गेल्‍या सात वर्षांत या प्रयत्‍नांमुळे घडलेल्या गोष्‍टी, महाराष्‍ट्राच्‍या कानाकोप-यातून गवसलेली नवी माणसे, जागोजागच्‍या मोहिमांमुळे सर्वसामान्‍य जनजीवनाची गवसलेली नवी तत्त्व आणि क्राऊडसोर्सिंग अशा विविध गोष्‍टींबद्दलची सविस्‍तर माहिती ‘थिंक महाराष्‍ट्र’च्‍या नाशिक येथील कार्यक्रमात सादर केली जाणार आहे. येत्‍या शनिवारी 24 जून रोजी ‘संत श्री ज्ञानेश्वर संकुला’च्‍या स्‍वर्णिमा सभागृहात सकाळी अकरा वाजता सुरू होणा-या त्‍या कार्यक्रमात ‘एमकेसीएल’चे संचालक विवेक सावंत प्रास्‍ताविक भाषण करणार आहे. त्‍याखेरीज दिनकर गांगल, किरण क्षीरसागर, विनय सामंत व उदय पंचपोर हे वेगवेगळ्या सत्रांत सहभागी होती. काही फिल्‍म्स् दाखवल्‍या जातील.

या कार्यक्रमात एक महत्‍त्‍वाची गोष्‍ट घडेल, ती म्‍हणजे ‘लेखक’ या शब्‍दाचा विस्‍तार! भवताली साकार झालेल्‍या तंत्रजगताने आपल्‍या सा-या धारणा, विचार उलटेपालटे होण्‍यास सुरूवात झाली आहे. अनेक संकल्‍पना ढवळून निघाल्‍या. त्‍यामुळे आज लेखन फक्‍त लिखाणापर्यंत मर्यादित राहिलेले नाही. त्याची व्‍याप्‍ती विविध पातळ्यांवर विस्‍तारलेली आहे. ती जाणून घेण्‍याची संधी या कार्यक्रमाच्‍या निमित्‍ताने उपलब्‍ध होणार आहे.

‘थिंक महाराष्‍ट्र’चा क्राऊडसोर्सिंगमधून माहितीसंकलन करण्‍याचा प्रयत्‍न सामाजिक आणि सांस्‍कृतिक पातळीवर आपणा सा-यांना कवेत घेणारा आहे. तुम्‍ही या ना त्‍या प्रकारे त्‍याचे भाग होणारच आहात. म्‍हणूनच तुम्ही या कार्यक्रमाचा भाग असणेदेखील महत्‍त्वाचे आहे.

नितेश शिंदे

व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशन

info@thinkmaharashtra.com

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.