सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील रिधोरे गावात आधुनिक आगळे-वेगळे मंदिर आहे. ते ‘शेतकरी ज्ञानमंदिर’ या नावाने ओळखले जाते! आधुनिक मानवी शक्तीची देवता म्हणून शेतकरी मंदिर. अतिशय वेगळी कल्पना! ‘सिनामाई कृषिविज्ञान मंडळा’तर्फे ते बांधण्यात आले आहे. मंदिराचा मुख्य हेतू शेतक-यांचे शेतीविषयक प्रश्न सोडवणे हा आहे. सर्व शेतक-यांनी एकत्र येऊन त्यांच्या समस्या सांगून त्यावर उपाय शोधणे या उद्देशाने मंदिर बांधण्यात आले आहे. म्हणून त्या मंदिरात पुजापाठ करणे किंवा देवतांचे इतर विधी या गोष्टींना स्थान नाही. मंदिरात फक्त शेतीविषयक तत्वज्ञान व माहिती दिली जाते.
देशात सर्व बाबतीत आधुनिकीकरण आले, नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाले. शेतक-यांमध्ये आधुनिक पद्धतीने शेती करण्याची इच्छा बळावू लागली, पण सर्वच शेतक-यांना तशी माहिती उपलब्ध नसते. शेती महाविद्यालये विद्यापीठे दूर असतात. म्हणून सयाजीराव गायकवाड यांनी ‘शेतकरी ज्ञानमंदिर’ हा पहिला प्रकल्प 2 ऑक्टोबर 2004 रोजी स्थापन केला. त्यामुळे शेतक-यांना घर, शेतीजवळ आधुनिक शेतीविषयक माहिती मिळवून शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होत आहे.
सयाजीराव गायकवाड यांच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. सयाजीराव प्रकल्प जनक म्हणून काम पाहतात. त्यांचे शिक्षण एम. एस.सी. (कृषी) असे असून सयाजीरावांना परीक्षेत सुवर्णपदक मिळाले आहे. सयाजीनी डी. बी. एम. ही (डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट) डिग्री घेतली आहे. शेतक-यांना शेतीचे उत्तम तंत्रज्ञान माहीत व्हावे, त्यातून त्यांना चांगले पीक मिळावे व शेतक-यांचे उत्पतन्न वाढावे यासाठी सयाजीराव ज्ञानमंदिरात चर्चा-मेळावे आयोजित करतात. ज्ञान मंदिराची स्थापना करण्यासाठी त्यांनी नव्याण्णव वर्षांच्या- कराराने जागा घेतली. ज्ञानमंदिरात शेतीच्याच बियाण्याची माहिती दिली जाते. सेंद्रीय व रासायनिक खते यांचा तोल कसा साधावा याचे मार्गदर्शन दिले जाते. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रीय खते तर उत्पादकता वाढवण्यासाठी रासायनिक खते असा भर सुचवला जातो. शुद्ध सेंद्रीय शेती करणे शक्य नाही असे सयाजीराव यांचे ठाम मत आहे.
सयाजीराव यांच्या बोलण्यातून शेतीविषयक निष्ठाण, तळमळ व शेतक-यांविषयीची आपुलकी दिसून येते. शेतक-यांना त्यांचे उत्पन्न, वाढवण्यासाठी मंदिरातील चर्चेचा व माहितीचा खुप उपयोग होतो. ज्ञानमंदिरातील चर्चेतूनच दत्तात्रय गायकवाड यांना प्रेरणा मिळाली व त्यांना त्यांच्या शेतीतून ऊसाचे विक्रमी उत्पादन घेणे शक्य झाले. अशोक तरंगे यांनीही एकरी एकशेचार टन ऊसाचे विक्रमी उत्पादन घेतले.
शेतकरी ज्ञानमंदिर हा प्रकल्प. 2 ऑक्टोबर 2004 रोजी श्री सयाजीराव गायकवाड यांनी स्थापन केला. ज्ञानमंदिरातून शेतक-यापर्यंत पोचण्यासाठी पुढील सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
1. कायमस्वरूपी कृषीप्रदर्शन – शेतक-यांना बी-बियाणे व खते-औषधे आणि शेतीची अवजारे यांची माहिती व्हावी म्हणून कायमस्वरूपी कृषिप्रदर्शन ज्ञान मंदिरात उभारले आहे.
2. कृषी तत्वज्ञान माहितीचे डिजिटल फ्लेक्स (बोर्ड) – शेतक-यांना विविध पिकांच्या लागवडीपासून काढणीपर्यंतचे तंत्रज्ञान व त्यामागील विचार शेतक-यांच्या भाषेत लेखी व मुद्देसूद स्वरूपात शेतकरी ज्ञान मंदिरात वाचायला मिळतात. त्याचबरोबर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय व कुकुटपालन व्यवसाय वगैरे – या उद्योगाची माहिती मिळत आहे.
3. कृषी वाचनालय – ज्ञान मंदिरात कृषी वाचनालयाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामध्ये शेतीसाठी आवश्यक असणारी पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतक-यांना शेती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कशी करायची याची माहिती मिळते.
4. दृकश्राव्य माध्यमाची उभारणी – कानाने फक्त ऐकण्यापेक्षा डोळ्यांनी बघितल्यावर माणसाचा पटकन विश्वास बसतो. म्हणून जमीन तयार करण्यापासून पीक काढण्यापर्यंतचे नियोजन ‘स्क्रीचन’वर पाहण्यास मिळावे या करता दृकश्राव्य माध्यमाची उभारणी करण्यात आली आहे. तेथे विविध पिकांच्या व शेतीपूरक व्यवसायांच्या कॅसेटस उपलब्ध आहेत.
5. शेतीचा दवाखाना – ज्याप्रमाणे माणसांचे दवाखाने असतात त्याचप्रमाणे शेतीचे दवाखाने गावोगावी झाले तर शेतीचे प्रश्न सुलभतेने सोडवण्यास मदत होईल. ज्ञानमंदिरातून शेतक-यांना पिकांवर पडणारे रोग व किड यांपासून संरक्षण कसे करता येईल व प्रतिबंधक उपाय कसे राबवता येतील यांची माहिती लेखी स्वरूपात शेतक-यांना देण्यात येते. शेतीचा महत्वाचा घटक म्हणजे जनावरे, पशुपालन. त्यामुळे मंदिरातर्फे जनावरे तपासणी शिबीर आयोजित केले जाते.
शेतकरी ज्ञानमंदिर हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प आहे. भव्य इमारत आणि अद्यावत कृषी तंत्रज्ञान सुविधांसह शेतक-यांना आधुनिक शेतीची शिकवण देत आहे. महाराष्ट्रातील ब-याच शेतक-यांनी प्रकल्पास भेट देऊन कौतुक केले. त्या प्रकल्पासाठी सहा लाख रूपये खर्च झाला असून तो खर्च शेतक-यांच्या वर्गणीतून उभारला गेला असल्यामुळे सर्वांना प्रकल्पाविषयी आपुलकी व अभिमान वाटतो.
सयाजी गायकवाड
9421060898
मु.पो,रिधोरे, ता. माढा, जि. सोलापूर,
sayajigaikwad28@gmail.com
– उज्वला क्षीरसागर
सयाजीरावांनी स्वप्रेरणेने
सयाजीरावांनी स्वप्रेरणेने उभारलेले शेतकरी ज्ञानमंदिर रिधोरेसह पंचक्रोशीतील गावांना लाभदायी ठरले आहे.या ज्ञानमंदिरातील नावीण्यपुर्ण उपक्रमांमुळे शेतकरी ख-या अर्थाने साक्षर झाले आहेत.
शेतकरी मंदिर हे रिधोरे
शेतकरी मंदिर हे रिधोरे पंचक्रोशितील शेतकऱ्यांना वरदान आहे
रिधोरे गावातील शेतकरी ज्ञान …
रिधोरे गावातील शेतकरी ज्ञान मदिरामुळे लोकांना शेतीविषयक माहिती सोप्या पद्धतीने समजू लागली आहे .
सयाजी गायकवाड यांचा हा उपक्रम अतिशय उत्तम आहे .
Comments are closed.